#स्वराज्याच्या_अंमलाखालील_गोव्याचा_इतिहास
#शिव_गोमांतक_इतिहास
#बैतुलचा_किल्ला
postsaambhar by :
दुर्ग मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य - रजिस्टर
महाराष्ट्रा इतकाच गोव्यास शिवइतिहासाचा वारसा लाभला आहे त्याचबरोबर शिवराय व शंभू राजेच्या पराक्रमने पावन झालेली पवित्र भुमी होय.
गोवा म्हटलं की मजा मरायला जाणे व पर्यटकाच्या मनात सागरी बीच , थंडपेये , अन्य बरंचसं काही , पण त्याही पेक्षाही मनाला भुरळ घालतो तो गोमंतक अर्थांत गोव्यातील छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजाचा पराक्रमी इतिहास आपण दुर्लक्षित करत आहात.
पोर्तुगीजांना घाम आणणारा व दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशिर्वादाने बांधला गेलेला गोव्यातील एकमेव सागरीदुर्ग म्हणजे हा बेतुल उर्फ बैतुलचा किल्ला होय.
सन १६७९ मधे दक्षिण गोव्याच्या केपे तालुक्यात साळ नदीच्या तीरावर बेतुल येथे शिवाजी महाराजांच्या आज्ञेने त्यांच्या बाळ्ळीच्या हवालदाराने हा किल्ला बांधला.
बेतुल येथे साळ नदीजवळ मराठे व पोर्तुगीज यांच्या राज्यांच्या सीमारेषा एकमेकाला भिडलेल्या होत्या. उत्तर काठावर पोर्तुगीज राज्य, तर दक्षिण काठावर शिवाजी महाराजांचे राज्य अशी सीमा होती.
मडगावजवळ वेर्णा येथे उगम पावणारी साळ नदी पुढे मडगाव, चिचोणे, असोळणा असा प्रवास करत बेतुल येथे समुद्रास जाऊन मिळते.
या साळ नदीतून पोर्तुगीजांचे व्यापारी पडाव, छोटी गलबते भरतीच्या वेळी मडगाव या मुख्य बाजारपेठेच्या खारेबांध भागापर्यंत जलवाहतूक करीत असत.
या पोर्तुगीजांच्या सागरी व्यापाराला चाप देण्यासाठी बेतुल येथे साळ नदीच्या मुखावर एका मोक्याच्या जागी शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधायला सुरवात केली.
१६६४ पूर्वी गोव्याचा पेडणे, डिचोली, सांखळी, सत्तरी, अंत्रुज, अष्टागार, हेमाडबार्से, बाळ्ळी, चंद्रवाडी, काकोडे म्हणजे फोंडा, सांगे, केपे, काणकोण हा प्रदेश विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात होता तर बारदेश, तिसवाडी व सालसेत (साष्टी) हे पोर्तुगीजांकडे होते.
१६६४ साली खवासखान या आदिलशाही सरदाराविरुद्ध काढलेल्या कुडाळच्या स्वारीत पेडणे, डिचोली, सांखळी, सत्तरी हे आदिलशाही मुलखातील तालुके शिवाजी राज्यांच्या ताब्यात आले.
त्यावेळी अंत्रुज, अष्टागार, हेमाडबार्से, बाळ्ळी, चंद्रवाडी, फोंडा, सांगे, केपे, काणकोण हा गोव्याचा प्रदेश सोंधे संस्थानच्या ताब्यात होता.
पण सोंधे संस्थानचा राजाने आदिलशाहचे मांडलिकत्व स्विकारले असल्याने हा प्रदेश एकप्रकारे आदिलशाहाकडेच होता.
राज्याभिषेकानंतर म्हणजे १६७५ नंतर शिवाजी महाराजांनी परत एकदा गोव्याकडे लक्ष दिले व फोंड्यावर चालून गेले. त्यावेळी महाराजांनी फोंडा प्रांत घेतला व उरलेला आदिलशाही प्रदेश स्वराज्यात आणला.
याच महिन्यात कारवार, अंकोला हे किल्ले जिंकत महाराजांनी स्वराज्य सीमा गंगावल्ली नदीपर्यंत नेली.
आता सोंधे संस्थानच्या राज्याला मराठ्यांचे मांडलिकत्व स्विकारावे लागले.
अश्याप्रकारे मराठ्यांचे बाळ्ळी व चंद्रवाडी हे दोन महाल पोर्तुगीजांच्या अमलाखाली असणाऱ्या साष्टी प्रांताला भिडले.
अशा योग्यवेळी शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांची साळ नदीमार्गे चालणारी साष्टीतील जलवाहतूक संकटात आणण्यासाठी बेतुल येथे किल्ला बांधण्याची आज्ञा केली.
बेतुल येथे शिवाजी महाराजांच्या बाळ्ळीच्या हवालदाराच्या देखरेखीखाली किल्ला बांधला जात आहे हे पोर्तुगीजांच्या लक्षात आले.
तेव्हा त्यांचा लष्करी अधिकारी म्हणजे राशोल किल्ल्याचा किल्लेदार याने गव्हर्नरकडे सविस्तर वृतांत कळविला, तो असा –
"असोळणे (साळ) नदीच्या पैलतीरावर शिवाजी राजे यांनी एक किल्ला बांधण्यास घेतला आहे. तो जर बांधून झाला तर आमच्या राज्याच्या सुरक्षिततेला त्यांच्यापासून धोका आहे. असा किल्ला बांधण्याचा विचार आदिलशहाने कधी केला नव्हता, परंतु शिवाजी राजे यांनी त्याचे राज्य घेतल्यावर हा प्रयत्न सांप्रत सुरु केला आहे.
तेव्हा रासईच्या कॅप्टनला गव्हर्नरने उत्तर धाडले की, शिवाजी राजे यांनी अशा किल्ल्याचे बांधकाम केल्याने आमच्यात मैत्रीचा जो तह झाला आहे, त्यास बाधा येणार आहे.
तेव्हा बाळ्ळीच्या हवालदाराने किल्ल्याचे बांधकाम थांबवावे. तेव्हा बाळ्ळीच्या शिवाजी महाराजांच्या हवालदाराने त्यास उत्तर पाठविले की, मी किल्ला शिवाजी राजे यांच्या आज्ञेवरून बांधीत आहे, परंतु या किल्ल्याचा उपसर्ग तुम्हाला होणार नाही. दुसरी गोष्ट आमच्या राज्यात आम्ही काहीही करण्यास मुख्यत्यार आहोत. त्याचा जाब विचारणारे तुम्ही कोण?"
इ.स. १६८० मधे शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज व राजाराम महाराज यांनी मराठ्यांचे राज्य सांभाळले.
पुढे राजाराम महाराजांनी कारवार, सिवेश्वर, काणकोण, खोलगड, अष्टागार, हेमाडबार्से, बाळ्ळी, चंद्रवाडी व काकोडे हा सर्व प्रदेश सालाना बावीस हजार दोनशे होनास सोंधेचा राज्यास भोगवटयाने दिला.
तेव्हा हा सर्व प्रदेश सोंधे राज्याच्या अंमलाखाली आला. नंतर इ.स. १७६३ मधे हैदरअली सोंधे संस्थानवर चालून गेला.
पण सोंधेच्या राज्याची हैदरअलीसारख्या सरदाराशी झुंज देण्याची ताकद नसल्यामुळे सोंधेच्या राज्याने आपल्या मुलखातील अंत्रुज, अष्टागार, हेमाडबार्से, बाळ्ळी, चंद्रवाडी हा प्रदेश पोर्तुगीजांच्या हवाली केला व त्यांच्या आश्रयाला गेला.
पोर्तुगीजांनी सोंधेकर राजा आणि त्याचे कुटुंब यांना आश्रय दिला आणि उपरोक्त क्षेत्र आपल्या नियंत्रणाखाली आणून काबो-दी-राम (खोलगड) व बेतुल या किल्ल्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
अशाप्रकारे १७६३-६४ च्या सुमारास बेतुल किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात आला आणि अगदी १९६१ पर्यंत या परिसरावर त्यांचे नियंत्रण राहिले.
आज बेतुल परिसरात किल्ल्याचे खूपच कमी अवशेष शिल्लक आहेत. साळ नदीच्या मुखावर एक बुरूज आणि त्यावर साळ नदीकडे मोहरा करून ठेवलेली एक तोफ एवढेच काय ते थोडके अवशेष इतिहासाची साक्ष देत आजही पाहायला मिळतात.
या बुरुजावर उभे राहिले असता समोर गोव्यातील प्रसिद्ध मोबॉर बीच व समुद्राला मिळणारी साळ नदी यांचा खूप सुंदर देखावा दिसतो.
किल्ला दुर्लक्षित राहील्याने परिसरात भयंकर झाडी माजलेली आहे. या झाडीतच काही ठिकाणी किल्ल्याची शेवटच्या घटका मोजणारी तुरळक तटबंदी बघता येते.
तसेच नंतरच्या काळात या किल्ल्याचा परिसर कोण्या एका अनामिक फॅक्टरीला दिला गेल्याने त्या फॅक्टरीची काही जुनी बांधकामे व मशिनरी किल्ल्याच्या परिसरात आढळते.
बेतुल किल्ला दक्षिण गोव्याची राजधानी मडगावपासून २२ किलोमीटर अंतरावर आहे.
No comments:
Post a Comment