बडोद्यातील वेदोक्त प्रकरण आणि धर्म सुधारणेसाठी शिक्षणाचे महत्व पटवून देणारे लोकराजा सयाजीराजे गायकवाड..!!
१८९६ साली वेदोक्त प्रकरणाने बडोद्यात डोके वर काढले. बडोद्याच्या राजघराण्यातील धर्मकृत्य पुराणोक्त पद्धतीने होत असत. राजपूत घराण्यातील धर्मकृत्ये वेदोक्त पद्धतीने होतात ही गोष्ट एकदा सयाजीराजे गायकवाड यांच्या कानावर शिवदत्त जोशी यांनी घातली व तशा पद्धतीने ही धर्मकृत्ये येथे का होऊ नये असे महाराजांना सुचविले. या बाबतीत विचार होऊन बडोद्याचे राजोपाध्ये राजारामशास्त्री ह्यांना वेदोक्त कर्मे करण्याबद्धल महाराजांनी आज्ञा केली आणि त्यानंतर म्हणजे १८९६ पासून वेदोक्त पद्धतीने राजघराण्यातील कार्यास आरंभ झाला.
बडोद्यातील वेदोक्त प्रकरण सयाजीराजेंनी सामंजस्य आणि हुशारीने हाताळले. याबद्दल मि. इलियट यांना पत्र लिहून कळविले. त्या पत्राचा आशय खालीलप्रमाणे -
‘‘आपणास शब्द दिल्याप्रमाणे तो वेळेत न पाळल्याबद्दल क्षमा मागतो. न लिहिण्याचे कारण म्हणजे माझ्यात उत्साहच राहिला नव्हता, तरीही माझ्या मनात सतत तुमचेच स्मरण होते. बाकी सगळे नेहमीप्रमाणे व्यवस्थित सुरू आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात व्हाइसरॉय यांची बडोद्यास भेट होत आहे. पाहुण्यांच्या भव्य स्वागतासाठी आणि प्रदर्शनासाठी सगळे तयारीत आहेत. या सर्व तयारीसाठी सर्वांची धावपळ सुरू आहे. माझ्याबद्दल सांगायचे झाल्यास, मी एका प्रकरणात पुरते गुंतवून घेतले आहे. याबद्दल तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. धर्माचे गैरवर्तन दुरुस्त करणारा म्हणून तुम्ही माझ्याकडे बघाल का? हे ऐकून तुम्हाला आश्चर्यही वाटेल. हे काम करताना मी थोडासा साशंकही आहे, मनातून काळजीही आहे. धर्माच्या दुरुपयोग करणाऱ्या विरुद्धचे हे माझे काम धार्मिक नाही, तर तो सामाजिक अंगाने करावयाच्या सुधारणांचे आहे. राजवाड्यातील आणि आजूबाजूचा धार्मिक विधीसंबंधीची माहिती मी घेत आहे. माझ्या लक्षात आले आहे की, दोन प्रकारचे धार्मिक विधी इथे केले जातात. एक आहे वैदिक पद्धतीचा विधी आणि दुसरा पौराणिक पद्धतीचा. वैदिक पद्धतीच्या विधीला धर्मशास्त्राची माहिती असणारे वरच्या श्रेणी अन् उच्च वर्गांनी म्हणजे ब्राह्मण वर्गांनी करावा असा धर्मशास्त्र सांगते. ब्राह्मणेतरांसाठी पौराणिक पद्धतीचा अवलंब केला जातो. ब्राह्मणेतरांसाठी केले जाणारे पौराणिक पद्धतीचे विधी म्हणजे पुरोहित करत असलेला एक प्रकारचा धार्मिक भ्रष्टाचारच आहे. ही एक प्रकारे धर्मिक फसवणूकच आहे.
मी राजदरबारातील जुनी धार्मिक विधीसंबंधीची कागदपत्रे तपासली. आमचे पूर्वज वैदिक पद्धतीवर विश्वास ठेवून, ती विधी करवून घेत असत. आजही ज्या मंडळींना पूजेची संस्कृत भाषा समजत नाही, धर्म विधीबद्दल त्यांचे अज्ञान आहे, अंधश्रद्धांचा पगडा आहे, ते चुकीच्या विधी करवून घेत आहेत. देवघर कामगार विभागाचे प्रमुख राजारामबुवा आणि त्यांचे पुरोहित विधीचे जे मंत्र म्हणतात, ते बरेचदा स्वार्थी अन् घाणेरड्या हेतूने करत असतात. यजमानाचे अज्ञान आणि पैशाची हाव यामुळे पवित्र धार्मिक विधीला या मंडळीने खोटेपणाने कर्मकांडाचे स्वरूप आणले आहे. त्यांना जर काही विचारले तर त्यांचे ढोंगीपणाचे उत्तर ठरलेले आहे, प्रत्येक विधी ते वेदांच्या आज्ञेनुसार करत असतो. आपण जर आणखी खोलात जाऊन चौकशी केली तर त्यांचा खोटारडेपणा ते करत असलेल्या दोन संमिश्र पद्धतीवरून लक्षात येते.
माझे वैयक्तिक मत सांगायचे झाले, तर मी या धार्मिक गोष्टींना खूप कमी प्राधान्य देतो. तशी तुलना करायची झाल्यास वैदिक पद्धतीला अधिक महत्त्व द्यायचे की, बायबल, कुराण अथवा अवेस्थाला, ह्याबद्दल तसे सांगणे अवघडच आहे पण माझ्या लक्षात आले आहे की, माणसे त्यांच्या आयुष्यात असल्या धार्मिक विधींना महत्त्व देत आले आहेत. वाईट या गोष्टीचे वाटते की, धर्माच्या नावाखाली ही सगळी माणसे कर्मकांडात इतकी अडकली आहेत की, धर्माच्या मूळ तत्त्वज्ञानाचा त्यांना विसरच पडला आहे. पुरोहिताने सांगितलेल्या गोष्टी ते आंधळेपणाने स्वीकारतात. ह्या गोष्टीत बडोद्यात बदल करावा अशी माझी इच्छा आहे. माणसाला खऱ्या धर्माची ओळख झाली पाहिजे. स्वार्थी पुरोहिताच्या मिठीतून सामान्य माणसाची सुटका करण्याचा हा प्रयत्न आहे. जसजशी माणसे अधिक शिकत जातील, तसतसा ज्ञानाचा प्रसार गरिबांपर्यंत होईल. हे ज्ञानच त्यांना रूढी, अंधश्रद्धा अन् धर्म थोतांडातून बाहेर काढील. शिक्षणामुळे माणसाच्या मनातील भीती दूर होते. खऱ्या धर्माची ओळखही शिक्षणातूनच होऊ शकेल "
(गायकवाड, पत्रे, 1896, 194)
कला, साहित्य, संगीत, वास्तू तसेच इतर अनेक क्षेत्रात दूरदृष्टी असलेला असा हा लोकराजा ज्यांना धर्माच्या अंगाने शिक्षणाचे किती महत्व आहे याची देखील जाणीव होती हे उपरोक्त पत्रातून दिसून येते..
– राज जाधव, बार्शी
No comments:
Post a Comment