विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 9 March 2020

छत्रपती शाहू महाराज

छत्रपती संभाजी महाराजांना मुगलांनी छळ करून मारलं पण त्यांचे पुत्र
छत्रपती शाहू महाराज ह्यांना कैदेत असताना मुगलांनी काहीच का केलं नाही?
संदर्भ:वसंत कानेटकर लिखित 'शिवशाहीचा शोध'


छत्रपती संभाजी महाराजांना ज्या अमानुष रीतीने औरंगजेबाने मारले ती बातमी ऐकून कुणाचेही पाय लटपटले असते आणि ताबडतोब शरण जाण्याशिवाय अन्य पर्याय सामान्य स्त्रियांना सुचला नसता.पण काही व्यक्ती जितके मोठे संकट तितके कणखर होत जातात. येसूबाईंनी मोठ्या धीराने दुःख आवरले आणि गडावरच्या मुत्सद्दी सरदारांना एकत्र करून पुढचा मार्ग ठरविला.सगळ्यांना कामे नेमून दिली आणि स्वतः छोट्या शाहूसमवेत कैद झाल्या.
औरंगजेब हे एक प्रचंड विसंगतीने भरलेले गूढ व्यक्तिमत्त्व होते.एकीकडे अल्लाला तो घाबरून असे तर दुसरीकडे मौलवींच्या तोंडून (स्वतः नाही)गुन्हेगारांना क्रूर शिक्षा फर्मावी.बाप आणि भावांची अशीच वासलात त्याने लावली पण आपल्या बायका सोडून कुणाशीही त्याने गैरसंबंध ठेवले नाहीत.
शाहूला त्याने अतिशय ममतेने वागविलेले आणि येसूबाईला इज्जतीने सांभाळले."येसूबाई ही प्रात:वंदनीय माऊली आहे "असे उद्गार त्याने काढले आहेत.आपण कैदेत आहोत म्हणून मिठाई वा फळे खातो असे म्हणणाऱ्या शाहूला त्याने 'तू कैदेत नाहीस घरीच आहेस असे समज आणि जेवण घे' असा निरोप पाठविला होता.
अधूनमधून शाहूला मुसलमान करण्याची त्याला उबळ येई तेव्हा ती उबळ त्याची लाडकी मुलगी झिनतून्नीसा दाबून टाकी.शाहू हिंदू आहे तो पर्यंतच मराठ्यांचे नाक तुमच्या मुठीत आहे त्याला मुसलमान केले तर मराठे शाहूला आणि तुम्हालाही काडीइतकी किंमत देणार नाही असा इशारा ती वेळोवेळी औरंगजेबाला देत असे.
औरंगजेबाने शाहूला मोठ्या ममतेने वागविले.त्याने शाहूला सात हजारी मनसबदार केले.राजा हा किताब, खिलतीची वस्त्रे,रत्नजडित खंजीर,शिवाय नगारे- नौबतीचा मान दिला.इतकेच नव्हे तर त्याला स्वतंत्र शिक्का करवून दिला.
मनुची म्हणतो,की "आपल्या मालकाशी फितूर होऊन जे त्याला मिळत,त्या फितुरांना औरंगजेब देहांत शासन देत असे,पण त्यांच्या वंशजांना आपल्या पदरी मोठ्या मनाने आश्रय देत असे." खाफिखानाने हेच म्हटले आहे,"सापाला ठार मारायचे पण त्याच्या पिल्लांना मात्र दूध पाजायचे अशी आदतच त्याला पडली होती."
असे म्हणतात शाहूंचे मूळचे शिवाजी नाव त्यानेच बदलले आणि शाहू केले.औरंगजेबाने शाहूला जरी मुसलमान बनविले नाही तरी मनाने त्याला मुसलमान बनवायचे असे ठरवून बादशहाने शाहूला आपल्याला हवे तसे शिक्षण दिले.नाही म्हटले तरी औरंगजेबाच्या स्नेहाचा शाहुवर पगडा बसला,इतका की पुढे तो सुटल्यानंतर तो खुलताबादला गेला आणि औरंगजेबाच्या कबरीचे त्याने दर्शन घेतले.अप्रत्यक्षपणे शाहूच्या मनावर आपण आणि आपले कुटुंब केवळ बादशहाच्या 'चांगल्या वर्तणुकीमुळे' जिवंत राहिलो हे ठसविण्यात औरंगजेब यशस्वी झाला.
१७०५ च्या सुमारास औरंगजेबास तापाने ग्रासले,त्याचे दुखणे बळावत चालले.आता शाहूचे काय करायचे हा विचार बादशहासमोर प्रामुख्याने होता.काही सरदारांनी त्याला मांडलिक करून मराठ्यांच्या गादीवर बसवावे म्हणजे युद्ध बंद होईल आणि बादशहास आराम मिळेल असे सुचविले.बादशहाला हे पटले.त्याने मराठ्यांशी बोलणी करण्यास संमती दिली.पण बोलणी करण्याच्या निमित्ताने त्याच्या छावणीत इतकी गर्दी जमायला लागली की हे सगळे शाहूला परस्पर पळवून घेऊन जातील अशी भीती त्याला वाटली आणि पुढची बोलणी खुंटली.
शेवटी त्याने त्यास वर सांगितल्याप्रमाणे पोशाख आणि सप्त हजारी मनसब दिली आणि कामबक्षाच्या आज्ञेत राहून दक्षिणेत राज्य कर असे सांगितले.
शाहू मोकळा झाला खरा पण त्यावर नजर ठेवण्यास त्याने झुल्फिकारखानास ताकीद दिली होती.इथेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेला तडा गेला आणि या सुभेदाराच्या राज्यातून पेशवाईतील मराठेशाहीचा जन्म झाला.औरंगजेबाचा हेतू जिवंतपणी नाही तर मेल्यानंतर साध्य झाला.मराठेशाही ताराबाई आणि शाहूमध्ये दुभंगली.प्रतिशिवाजी म्हणून गनिमांना धडकी भरविणारी ताराबाई शाहूंमुळे झाकोळली गेली.
आपल्या शत्रूच्या वंशजालाच औरंगजेबाने स्वतःचा अंकित बनविले आणि त्याचा वापर मराठेशाही विरुद्ध एखाद्या हत्यारासारखा केला असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...