विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 22 April 2020

मराठे-

मराठे-
एकंदर हिंदुस्थानांत सुमारें ५० लाख मराठे आहेत. त्यापैकीं मुंबई इलाख्यांत सर्वांत जास्त (३२७९४९६) आहेत. त्याच्या खालोखाल हैदराबाद (१५३८८७४) संस्थानांत आहेत. बाकी पंजाब व बंगाल-बहार-ओरिसा खेरीजकरून सर्व प्रांतांतून हजारांनीं मोजण्याइतके मराठे सांपडतील . मुंबई इलाख्यांत हे दक्षिण कोंकण, व दक्षिण महाराष्ट्र यांतून सर्वत्र पसरलेले आहेत. मराठा शब्द भाषावाचक असून महाराष्ट्र शब्दाचा अपभ्रंश आहे.
मराठयांचीं ९६ कुळें आहेत तीं अक्षरानुक्रमानें:- अहीर, आंगणे, आंग्रे, इंगळे, इचारे, कदम, काकडे, काळे, कोंकाट, खडतरे, खंडागळे, खैर, गवस, गव्हाणे, गायकवाड, घाटगे, चवाण, चालके, जगताप, जगदले, जगधने, जाधव, जालिंदरे, ठाकूर, ढमढेरे, ढमाले, ढवळे, ढेंकणे, ढोणे, तावडे, तुवार, तेजे, थोटे, थोरात, दरबार, दळवी, दांडे, दाभाडे, देवकांते, धायबर, धुमाळ, नलोडे, निकम, निसाळ, पवार, पाठारे, पांढरे, पानसरे, पारटे, पालव, पालांडे, पिंगळे, पिसाट, फडतरे, फांकडे, फाटक, फाळके, बागराव, बागवे, बांडे, बाबर, भागवत, भोइटे, भोगले, भोंवरे, भोंसले, मधुरे, महाडिक, महांबर, माने, मालप, मालुसरे,मुलिक, मोरे, मोहिते, यादव, रसाळ, राऊत, राणे, रेणुसे, लाड, वाघ, शंखपाळ, शितोळे, शिंदे, शिरके, शेलार, सांबारे, सालवे, सावंत, साळुंखे, सिसोदे, सुर्वे, हंडे, हरफळे, क्षीरसागर.
ही शाण्णवकुळी क्षत्रियोन्नति- दर्पणांतून भागवत नीं उतरली आहे आणि तिच्यावर भागवत टीका करतात ती येणेंप्रमाणें : - ही शाण्णवकुळी कोंकणस्थांच्या ''मूळ साठ आडनांवां'' पेखां देखील नवीन व यथेच्छ बनविली आहे. जगताप, जगदळे, दळवी, राऊत व राणें हीं पडनांवें आहेत, आडनांवें नाहींत. कडचुडे किंवा कलचुरे, राठोड किंवा राष्ट्रकूट, रट्ट किंवा रट्टे या तीन प्रसिद्ध कुळींस यांत फांटा दिला आहे.
कदम, चाळके किंवा साळुंखे (गुजराथेंत सोळंकी), जाधव किंवा यादव, नलवड किंवा नलोडे, पालव, मोरे, शिंदे, शेलार व सालवे इतक्या कुळी पुऱ्या ऐतिहासिक होय. या महाराष्ट्र मंडळांतील ताम्रपटांत व शिलालेखांत प्राय: येतातच येतात. सिंदे किंवा शिंदे ही कुळी बेळगांव तालुक्यांत नांवाजली होती, व सालवे कुळी शालिवाहन शब्दाची प्रकृति दिसते. पालवांचा अमल द्राविड मंडळांत अनेक वर्षें बसलेला असून त्यांची राजधानी कांचीपूर होती. चवाण, तुवार, पवार, शिसोदे किंवा सिसोदे यांनीं नर्मदेच्या उत्तरेस आपापलें नांव गाजविलें. जशी महाराष्ट्र मंडळी तशीच नर्मदेच्या उत्तरेस चाळके किंवा साळुंखे, जाधव किंवा यादव, मोरे, राठोड व सालवे ही पंचकुळी मात्र नामांकित झाली. महाराष्ट्र मंडळांतील राठोडांच्या सत्तेची व अंमलाची साक्ष वेरूळ मुक्कामचीं भव्य लेणी देत आहेत.

या शाण्णवकुळींतील काळे, खैर, गव्हाणे व ढवळे या तीन कुळी उघड अष्टागऱ्या दिसतात. काळी ही नदी असून, खेर, गव्हाण व ढवळे हे तीन गांव आहेत. आंग्रे हेहि कोंकणी दिसतात. पाठारे हें नांव पांचकळशांमध्यें आहे. ही कुळी मूळची उत्तर कोंकणांतील म्हणावी लागते पाठार म्हणजे उघडा मुलुख. उत्तरकोंकणांत डोंगराळपणा फारसा नाहीं. हीं असल्या मुलुखावरून पाठारें हें आडनांव पहिल्यानें पडलेलें असावें. लाड ही कुळी उघड गुजराथी दिसते. अहीर हे मूळची अमीर म्हणजे गोपांमधील किंवा गवळयांमधील अर्थात अस्सल खानदेशी होत. शाण्णवकुळीच्या दोन प्रती दिसतात. एका प्रतींत पंधरा कुळी आहेत, व दुसऱ्या प्रतींत आणखी ११ कुळी ढकलून कुळींची संख्या २६ केली आहे.
आपण प्राचीन क्षत्रियांचे वंशज आहों असें मराठे म्हणतात. प्रचारांतल्या त्यांच्या आडनांवावरून व व्यावहारिक गोष्टींवरून रजपुतांचे व मराठयांचें मिश्रण पुष्कळ अंशी झालें आहे असें दिसतें. कांही मराठयांची आडनांवेंहि रजपूत दिसतात. उदाहरणार्थ - अहिरराव चांडेल, गुजर, कदम, कलचुरे, लाड, पवार, साळुंखे, शेलार, शिसोदे, यादव वगैरे. त्यांच्या रीतीभाती (उदाहरणार्थ, पुनर्विवाह न करणें, जानवें घालणें, पडदापद्धत, न्हाव्यामार्फत लग्ननिश्र्चय, मेजवानीच्या प्रसंगीं न्हाव्यानें पाणी देणें) रजपुतांप्रमाणें वाटतात. रजपूत राजघराण्याचे मराठे घराण्यांशीं शरीरसंबंध झालेले आहेत. अनहिलवाड येथील प्रसिद्ध राजा सिद्धराज जयसिंग याची आई गोवाकदंब घराण्यांतली मुलगी होती. शिवाजीचा आजा लखुजी जाधव, देवगिरीचे रामदेव यादव यांच्या वंशातला होता. मराठयांचा पिढीजाद धंदा लढण्याचा म्हणून म्हणतात. सांप्रत ते जहागीरदार, जमीनदार, दरबारी नोकर, व शेतकी करणारे आहेत. कित्येक मराठे संस्थानिक आहेत. त्यांच्यांत मुख्य दोन वर्ग आहेतः (१) अस्सल म्हणजे शुद्धबीजाचे व (२) इतर; यांत कुणबी व माळी या जातींचा समावेश होतो. तिसरा एक वर्ग आहे, तो म्हणजे दासीपुत्रांचा. त्यांनां लेकावळे, अक्करमासे अथवा शिंदे असें म्हणतात. अस्सल मराठयांत मुलामुलींचीं लग्नें करण्याच्या वेळी फार विवक्षणा करावी लागते. तरी अस्स्ल मराठयाची मुलगी श्रीमंत कुणब्याच्या घरीं व श्रीमंत कुणब्याची मुलगी अस्सल मराठयांच्या घरीं असलेलीं अशीं कित्येक उदाहरणें दाखवितां येतील मुख्य जातीशीं लेकावळे मराठयांचेंहि लग्न कधीं कधीं होतें. एक देवक असलेल्या घराण्यांत परस्पर लग्नें होत नाहींत. आतेबहीणीशीं व मावसबहिणीशीं लग्ने होत नाहींत. मामेबहीण लग्नाला योग्य व समंत समजतात. लग्नाला वयाची आडकाठी नाहीं. उच्च जातीच्या मराठयांत मुलीचें लग्न प्रौढवयांत (१५ ते २०) करतात. लग्नप्रसंगीं नवरानवरींमध्यें नवरानवरींचे मामे हातांत नागव्या तरवारी घेऊन उभे असतात. लग्नविधि चाललेला असतो, व अवलपासून अखेरपर्यंत नवऱ्याच्या हातांत कटयार असते. हिंदूमधील उच्च जातींत जो लग्नविधीचा संप्रदाय तोच मराठयांत आहे. व सप्तपदी झाली कीं लग्नविधि संपून लग्न कायमचें बंधक झालें असें समजतात. अस्सल मराठे लोकांत पुनर्विवाह नाहीं, तथापि आज मराठयांत त्याचा बराच प्रसार झालेला आहे. घटस्फोट संमत आहे तरी अस्सल मराठयांत तो प्रचारांत नाहीं.त्यांचे उपाध्याय ब्राह्मण व ब्राह्मणेतरहि असतात.
दक्षिणेंतील मराठे लोकांत पंचायतसंस्था शिस्तवार चाललेल्या आहेत असें जरी मानतां येत नाहीं, तथापि जातीसंबंधीं पुष्कळ प्रश्र्नांचा निकाल पंचायतीतर्फे होतो. पंचायतीचा अध्यक्ष देशमुख अथवा गांवचा प्रमुख पाटील असतो. रत्नागिरी जिल्ह्यांत गांवपंचायतीचा मुख्य बहिरजी कानोजी राजे शिर्के नांवाचे आहेत. त्यांची नेमणूक शंकराचार्यापासून झालेली असून चिपळून तालुक्यांत कुत्रे गांवीं ते रहातात. चिपळूणकर शिर्के राजाजवळ शिक्कामोर्तब असतो. बहुमतानें वादांचा निर्णय लागतो. पंचांचा निकाल स्थलसीमेंत असलेल्या गावांतील पुढाऱ्यांनां पत्रद्वारां कळवून जाहीर करतात. शिक्षांचे प्रकार - तीर्थयात्रा करणें, पंचांची माफी मागणें, ब्राह्मणभोजन देणें, धर्मार्थ द्रव्य देणें, तात्पुरता अथवा कायमचा बहिष्कार व दंड हे होत. दंडवसुलींतून कांहीं रक्कम धार्मिक कृत्यांकडे व कांहीं ज्ञातिभोजनाकडे खर्च करतात. कानडा जिल्ह्यांतील मराठे लोकांचा ३० अगर ४० गांवें मिळून एक गट केलेला असून कुदलगी मठाचे स्वामी त्याची व्यवस्था पहात असून देसाई नांवाच्या पिढीजाद मुख्य अधिकाऱ्याची गटावर नेमणूक केलेली असते. शिवाय 'कुणबी' पहा.
म्है सू र.- म्हैसूर संस्थानांत या लोकांची एकंदर संख्या (१९११) ४५८९८ आहे. हे शिमोगा, बंगलोर, म्हैसूर व कोलार या जिल्ह्यांत आढळतात. यांचा धंदा शेतीचा आहे. याशिवाय हे सैन्यांत व पोलिसखात्यांत नोकरी, व्यापार व धंदे करतात. म्हैसूरचे लोक यांनां 'आरे' (आर्य?) म्हणतात. यांच्यांतील हलक्या दर्जाच्या जातींत उपनयनविधि करीत नाहींत. विवाहसमयीं ते यज्ञोपवीत धारण करतात. धर्मकार्यप्रसंगीं हे ब्राह्मणांस बोलावितात. कोचीन व त्रावणकोर संस्थानांतूनहि मराठे शेतकऱ्यांची जात आढळते. यांची लोकसंख्या सुमारें साडेचार हजार आहे.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...