विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 10 May 2020

'डर कूछ नही सबको सलाम बोलो'...


'डर कूछ नही सबको सलाम बोलो'...

postsaambhar: -इंद्रजित वसंतराव सावंत

कोल्हापूर

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा ६ मे १९२२ रोजी मुंबईस पन्हाळा लॉज या छञपतींच्या राजवाड्यामध्ये मृत्यू झाला . त्या वेळी त्यांचे वय होते फक्त ४८ वर्षे ! या वयातही ते धैर्याने मृत्यूला सामोरे गेले . मृत्यू समोर दिसत असता शाहू छञपती अंथरूणावर उठून बसले आणि त्यांनी सोबत्यांना बोलावून "मी जाण्यास तयार आहे... डर कूछ नही ; सबको सलाम बोलो" ही वाक्ये उच्चारली आणि शांत पणे ते मृत्यूच्या अधीन झाले. यानंतर त्यांचे पार्थिव कोल्हापूरला आणले गेले. तिथे लाखोंच्या जनसमुदायाच्या साक्षीने त्यांचे दहन झाले . यानंतर लगेचच राजर्षींचे यथोचित स्मारक करण्यासाठी पुण्यास ता. १४ जून १९२२ रोजी कौन्सिल हॉल मध्ये श्रीमंत तुकोजीराव पवार देवास ( सिनिअर ) चे महाराज , यांचे अध्यक्षतेखाली सुमारे ६०० निवडक लोकांची सभा भरली होती . शाहू महाराजांचे स्मारक पुणे मुक्कामी व्हावे असा पहिला ठराव महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मांडला . दुसरा ठराव भास्करावांनी मांडून त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करावा व त्यांच्या ध्येय धोरणास अनुरुप एक संस्था सुरु करावी असे सुचविले . या कामासाठी एक जनरल कमेटी नेमण्याचा ठराव बी.पी. जगताप यांनी मांडला. तर रा. ब. सि. के. बोले यांनी या जनरल कमेटीमधून कार्यकारी मंडळ नेमण्याचा प्रस्ताव मांडला . या स्मारकाची पायाभरणी मुंबईचे गव्हर्नर सर लॉईड जार्ज यांचे हस्ते करण्याचे ठरले . सुमारे ४०,००० रुपये या समितीकडून जमविण्यात आले होते. परंतु पुढे सन १९२९ पर्यंत या कार्यास गतीच मिळाली नव्हती. (तोपर्यंत कोल्हापूरला राजाराम महाराजांच्या प्रेरणेने शाहूंचा पूर्णाकृती पुतळा , शेतकी शाळा अशी स्मारके उभी राहीली होती). कोल्हापुरातून या कार्यास गती देण्याचे प्रयत्न सुरु होते. पण पुण्यातील शाहू स्मारकाचे काम काही पुढे गेले नाही. ( पुण्यात शाहूंचा पुतळा उभा रहायला1960 चे दशक उजाडावे लागले.आणि पूर्णाकृती भव्य पूतळा उभा राहयला सन2013 मधे ) पुढे तत्कालीन मंञी व शाहू अनुयायी भास्करराव जाधवांनी ९ मे १९३० रोजी एक सविस्तर पत्र देवासच्या महाराजांना पाठविले होते. त्या पत्रात ते शाहू स्मारका संबंधाने म्हणतात ' एक सुयोग्य स्मारक एव्हाना व्हायला हवे होते. महाराज , आपणच फक्त ते योग्य रीतीने करु शकाल.' याच पत्रात भास्कररावांनी शाहू महाराजांच्या पुतळ्या ऐवजी दुस-या स्मारकाची योजना स्वतंत्ररित्या स्वतःचे जबाबदारीवर देवासच्या महाराजापुढे मांडली होती . ते सदर पत्रात पुढे म्हणतात , ' पुण्यात प्रमुख अशा ठिकाणी पुतळा उभा करण्यासाठी श्री शाहू स्मारक समिती स्थापण्यात आली. आपण जमविलेली रक्कम व्याजासह सुमारे ४०,००० रु. असावी. उत्तम जागा खरेदीसाठी व पुतळयासाठी ही रक्कम अपुरी आहे. 'त्या पेक्षा शाहू महाराजांचा अंत ज्या मुंबईत पन्हाळा लॉजवर झाला. त्या इमारतीचेच शाहूंचे स्मारक व्हावे. समाजाच्या कार्यासाठी हे भवन राखले पाहिजे होते. ही इमारत वसतिगृहास उपयुक्त असून मराठ्यांच्या कार्यक्रमास सोईचे केंद्र होते. ही इमारत करवीर दरबार कडून १,१०,००० रूपयास श्री. फनिबंध यांना विकण्यात आली. (शाहूंचे निधन झाल्यानंतर लगेचच ही इमारत करवीर दरबारने विकली होती.) ही इमारत विकत घेऊन वसतिगृह व इतर कार्यक्रमासाठी योजिण्याची कल्पना मराठ्यांना पसंत पडेल व ते ठिकाण एक तीर्थक्षेत्र व तरुणांचे स्फूर्तीस्थान बनेल. ' पुढे भास्कररावांनी सुचविले की या इमारतीचे सध्याचे मालक ही इमारत नजीकच्या काळात रु. ८० ते ९० हजारास विकणार आहेत . तेव्हा बॅकेकडून या इमारतीच्या तारणावर रु.५०,००० हजाराचे कर्ज घेऊन मान्य असल्यास हा व्यवहार पुरा करावा. नंतर देणग्या जमवून हे कर्ज परत करता येईल. ही इमारत ताब्यात आल्यावर देणग्यासाठी मराठा शिक्षण परिषदेचे एक अधिवेशन ह्या इमारतीत भरवावे . सदर प्रसंगी शहरातील प्रतिष्ठीतांची एक समिती बनवावी. रु. १०० , १० , ५ व १ ची तिकीटे ठेवावीत . थोड्या दिवसात रक्कम जमेल अशी भास्कररावांना उमेद होती व त्याची जबाबदारी स्वीकारण्यास ते तयार होते. देवासच्या महाराजांनी ही सर्व योजना आखण्यासाठी दोन प्रतिनिधी त्यांचेकडे पाठवावेत असे त्यांस कळविण्यात आले होते. ही योजना तयार झाल्यावर ती स्मारक समिती व श्री राजाराम छत्रपती यांचेकडे मान्यतेसाठी पाठवावी अशी विनंती करण्यात आली होती. परंतु त्या योजनेस चालना मिळाली नाही. स्मारकाचे कामासही गती मिळाली नाही. भास्करराव जाधवांनी प्रयत्न करुनही ह्या इमारतीत शाहूंचे स्मारक काही झाले नाही. अशा रीतीने जिथे शाहू छञपतींचे निधन झाले ती जागा पुन्हा एकदा एका पारशी ट्रस्टला विकली गेली. काही वर्षापूर्वी या जागेवर एक 'इदूइला' नावाची टोलेजंग अपार्टमेंट उभी राहिली आहे. राजर्षी शाहू छञपतींचा हा पन्हाळा लाॕज नावाचा राजवाडा आजच्या मूंबईतील गिरगाव भागातील खेतवाडी, गल्ली नंबर १३ इथे होता. राजर्षी शाहू छञपती आजच्या प्रजासत्ताक भारताचे एक राष्ट्रपुरुष होत. अनेक राष्ट्रपुरुषांची जन्मस्थान व निधन स्थळे ही स्मारके झालीत. पण ज्या ठिकाणी या राजर्षींनीं अखेरचा श्वास घेतला त्या ठिकाणी साधा एक फलकही नाही. असे काय कारण घडले की या ठिकाणी शाहूंचे स्मारक झाले नाही याचा शोध मी अजूनही घेत आहे. अर्थात कोल्हापूरला शाहूंच्या इच्छेनूसार त्यांची समाधी त्यांच्या निधना नंतर बरोबर 98 वर्षांनी कोल्हापूरच्या महानगर पालिकेने बांधली. यामध्ये माझाही थोडाफार हातभार लागला याचे समाधान आहे.

राजर्षी शाहूंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...