*#संकलन: #दिव्या_वराडकर*
महाराष्ट्रातील पेशवे कालखंडातील सर्वांत अखेरीस निर्मिती करण्यात आलेला दुर्ग म्हणून *#मल्हारगड* स्वतःचे वेगळेपण जपत आहे. इ स १७५७ ते १७६० या कालखंडात पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख असलेले सरदार भीमराव पानसे व माधवराव पानसे यांनी या गडाची उभारणी केली. दुहेरी तटबंदीची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी असणारा हा किल्ला पुण्याच्या आग्नेय दिशेस ३५ कि मी अंतरावर आहे. सोनोरी गावाच्या संरक्षणासाठी व दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती करण्यात आलेली होती. मल्हारगडास सोनोरीचा किल्ला या नावानेही ओळखण्यात येते. सदर किल्ल्याचा प्रकार गिरिदुर्ग प्रकारातील असून सह्याद्रीच्या भुलेश्वर रांगेत समावेश होतो. किल्ल्यावर जाणाऱ्या विविध जुन्या नव्या मार्गात पुणे हडपसर दिवे सोनोरी, पुणे हडपसर दिवे इत्यादींचा समावेश होतो. सिंहगडपासून पूर्वेकडे पसरलेल्या रांगेतील हे अखेरचे उंच शिखर होय. किल्ल्याच्या घेऱ्यात विस्तीर्ण परिसरात जेजुरी, पुरंदर, वज्रगड, दिवे घाट जाधववाडी, सोनोरी, सासवड, लोणी, दिघीची टेकडी, कानिफनाथ टेकडी इत्यादी बराचसा मुलुख अंतर्भूत होतो. मुख्य किल्ल्यावर आज कोणत्याही शिलालेखाची नोंद उपलब्ध होत नाही. गडाचा पूर्वाभिमुख दरवाजा लक्षवेधी आहे. चिरेबंदी बांधणीची कमान व पहारेकरी देवड्या आजही चांगल्या स्थितीत आहेत. गडावर पिण्याच्या पाण्याची फारच कमतरता असल्याने दुर्गमित्रांनी गडाकडे कूच करताना मुबलक पाणी सोबत ठेवावे. किल्ल्याचा पसारा आटोपशीर असल्याने दोन तासांत किल्ल्यास मनसोक्तपणे अभ्यासता येते. जुन्या संदर्भात गडावरील शिबंदीच्या व्यवस्थेसाठी पेशव्यांनी वार्षिक तीन हजार रुपये मंजूर करून तरतूद केल्याचा उल्लेख मिळतो. गडावरील चिरेबंदी हौद, सदर स्थान, विहिरी, मंदिरे, बुरुज, लहान दरवाजा, बालेकिल्ला इत्यादी अवशेषांचा मागोवा घेताना १७ व्या शतकातील अखेरच्या दुर्गबांधणी पर्वाचा अंदाज येतो. शिवकालीन दुर्गवैभव व पेशवेकालीन दुर्गवैभव यातील फरक जाणून घेण्यासाठी दुर्गमित्रांनी सदर किल्ल्यास नक्कीच भेट द्यावी. अनेक अभ्यासकांच्या मते, शिवकालीन दुर्गबांधणी आढळणाऱ्या व कुतूहल निर्माण करणाऱ्या अनेक बाबी मल्हारगडाच्या बांधणीत आढळून येत नाही, पण उपलब्ध साधने व उपलब्ध निसर्ग याचा विचार करता मल्हारगड स्वतःचे वेगळेपण जपून आहे यात शंका नाही. गड निर्मितीत विशेष योगदान असणाऱ्या पानसे घराण्यातील नरवीरांचे तोफखाना विभागातील कर्तृत्व इतिहासात मानाचे पान आहे. आजमितीला गड भ्रमंती करताना इतिहासात स्वराज्याच्या अस्तित्वासाठी जीवाचे रान करणाऱ्या समस्त नरवीरांच्या स्मरणाने आपण मनोमन सुखावतो. सद्या राजा शिवछत्रपती परिवार पुणे विभाग अंतर्गत मल्हारगडावर विशेष श्रमदान व संवर्धन मोहिमा सातत्याने सुरू आहेत.

No comments:
Post a Comment