विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 29 May 2020

'महाराजा सयाजीराव गायकवाड - तिसरे

आजि सोनियाचा दिनु...

आज १४५ वर्ष झाली, एका आडवळणाच्या खेड्यात, खुद्द नाशिकचा गोरा ब्रिटिश कलेक्टर जातीने दाखल झाला, आपल्या सर्व फौजफाट्यासह. साधारण निरक्षर शेतकऱ्यांचं हे गाव एकदम हादरून, घाबरून गेलं. विचार करायला लागलं,"काय बला आहे बाप्पा आता?" कारण अचानकपणे,कलेक्टर स्वतः गावात येणं, म्हणजे काही साधारण गोष्ट नव्हे. तेव्हा तर नव्हतीच. गावात सर्वत्र आश्चर्य आणि चिंता.

गाव होतं 'कवळाणे'. नाशिक जिल्ह्यातील, मालेगाव पासून १८किमी वर. कलेक्टर इलियट,आले तसे, थेट काशिराव पाटील यांच्या घरी गेले. ते सुद्धा साधे शेतकरीच होते. आल्या आल्या साहेबांनी, त्यांच्या घराण्यातील मुलांची चौकशी केली. तीन चार दिवसांत सर्व मुलांना घेऊन नाशिकला यायला फर्मावले. नंतर गोरा साहेब आला तसा निघून गेला. हुकुमा प्रमाणे काशीराव पाटील मुलांसह हजर झाले. त्यांना सर्वांना घेऊन एक पोलिस इन्सपेक्टर रेल्वेने बडोद्याला निघाला. तिथे त्यांची खूप चांगली बडदास्त झाली. मुलांसोबत खाशांच्या गप्पा गोष्टी झाल्या. त्यांना खुद्द बडोद्याच्या महाराणी साहेब जमनाबाई पण भेटल्या. त्या महाराजा खंडेराव गायकवाड ह्यांच्या तरुण विधवा. या किशोर मुलांचे त्यांच्यासोबत भोजन सुद्धा झाले. त्या तिन्ही किशोरांना त्यांनी विचारले," तुम्ही इथे कशासाठी आलात?"
एकाने घाबरून सांगितले,"माहित नाही. "दुसऱ्याने सांगितले,"शिक्षण घ्यायला." तर तिस-याने अतिशय धीरोदात्तपणे सांगितले," राजा व्हायला." तो होता गोपाळ.

होय,त्या मुलांना तिथे राजा बनवायलाच आणले होते. कारण, महाराजा खंडेराव गायकवाड १८७० मध्ये वारले.त्यानंतर महाराजा मल्हारराव राजा झाले.त्यांना, ब्रिटिश सत्तेने विविध आरोप ठेवून पदच्युत केले. मद्रासच्या तुरुंगात पाठविले.विधवा महाराणी जमनाबाईंना मुलगा नव्हता. त्यामुळे त्यांना दत्तक घ्यायचा होता. तो दत्तक पुत्र बडोद्याच्या राज गादीवर बसणार होता. होणारा राजा,महाराणींपेक्षा वयाने कमी असावा. बडोद्याच्या गायकवाड घराण्यातील असावा. औरस पुत्र असावा, अशा ब्रिटिश सत्तेच्या अटी होत्या. कारण आपण ह्या कोवळ्या वयाच्या राजाला हवे तसे वाकवू, झुकवू, हवे तसे घडवू. मग बडोदा राज्यात संपूर्ण नियंत्रण आपलेच. होणारा राजा केवळ नामधारी असेल.असा ब्रिटिश राज्यकर्त्यांचा कुटील डाव होता.

एकंदरीत निरीक्षण केल्यावर,गोपाळ हा चुणचुणीत मुलगा सर्वांना योग्य वाटला. तेव्हा त्याचं वय होतं केवळ १२ वर्षे. तोपर्यंत तो शाळेत वगैरे काही गेला नव्हता. कारण तेव्हा गावात शाळा असायचं काही कारण नव्हतं. मग काय, दिवसभर उनाडक्या करीत रानावनात हुदांडणे. विहिरींमध्ये खुशाल पोहणे, गुरांमागे जाणे हाच त्याचा दिनक्रम. बाहेरच्या जगाशी अजिबात संबंध नाही. बडोद्यात येताना, पहिल्यांदा,रेल्वे बघीतली. तसेच बाहेरचे जग पण. असं सांगतात की,महाराणी साहेबांसोबत जेवताना इतर मुलं बावरली. गोपाळ मात्र ज्येष्ठ मंडळींचे नीट निरीक्षण करून अगदी त्यांच्यासारखेच जेऊ लागला. त्याच्या ताटात बासुंदी होती. सोन्याच्या तसेच चांदीच्या वाटीत. त्याने बरोबर सोन्याची वाटीच निवडली. त्यानंतर या शेतकरी पुत्र गोपाळला दत्तक घेण्यात आले. साहजिकच तो बडोद्याच्या नामांकित राज्याचा राजा झाला.

बरोबर आजच्याच दिवशी.म्हणजे '२७ मे,१८७५' रोजी. म्हणून आजचा दिवस म्हणजे सोनियाचा दिनू.
कारण,हा गोपाळ म्हणजेच


'महाराजा सयाजीराव गायकवाड - तिसरे' हे केवळ अपघाताने योगायोगाने राजा झाले. पण त्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणावरील कामं, सुधारणा,जगभर संपर्क, बडोदा राज्याला आधुनिक आणि समृद्ध बनविणे,न्यायी कारभार हा मात्र अपघात किंवा योगायोग अजिबात नव्हता. तर, it was a meticulously planned,brilliant and sustained mission of legendary Maharaja Sayajirao-3. त्यांच्या सगळ्या आयुष्यभर.
"प्रजेचे कल्याण हाच माझा मोक्ष" हे त्यांचे ब्रीदवाक्य.
म्हणूनच स्वतंत्र भारताचे, पहिले भारतीय गव्हर्नर जनरल, चक्रवर्ती राजगोपालाचारी,यांनी म्हटले की, *"हिंदुस्थानात दोनच खरे राजे. छत्रपती शिवाजी महाराज आणि सयाजीराव गायकवाड."*
त्यांचे कार्य,अर्थातच,इतके दैदिप्यमान होते की, तत्कालीन राज्यकर्त्या ब्रिटनसह अख्ख्या जगानं त्यांची अनेकदा दखल घेतली.
आजच्या ह्या पावन दिनी ह्या थोर प्रजा हितैशी राजाला मानाचा मुजरा.

(मजकूर सौजन्य - डॉ.अरुण मानकर,नागपूर,
छायाचित्रे - आंतरजालावरुन साभार)

No comments:

Post a Comment

राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे

  राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे : सरदार मलोजी रणनवरे हे जिंती तालुका फलटण येथील पुरातन वतनदार....