१८ ऑक्टोबरला मराठ्यांनी जोरदार हल्ला करून स्वतःची ताकद इंग्रज अधिकाऱ्यांना दाखवुन दिली होती. ह्या हल्ल्यात कैद झालेले सर्व इंग्रज अधिकारी सागरगडावर ठेवले होते. तरीही इंग्रजांचा खांदेरीवर अधिकार गाजवण्याचा त्यांचा हट्टी स्वभाव कमी झाला नव्हता. आतापर्यंत इंग्रजांच्या हाती काहीच लागलं नव्हतं. वेळोवेळी त्यांना फक्त अपयशच पदरी पडत होते. इंग्रज अधिकारी खोटे आकडे फेकून आपण शत्रूचे किती नुकसान केले हे दाखवण्यातच स्वतःचा पराक्रम समजत होते. स्वतःच्या झालेल्या नुकसानी बद्दल लिहताना त्यांचा हात अडखळत असावा असेच दिसते. इकडे खांदेरीवर बांधकामाचे काम काही थांबत नव्हते. पण इंग्रज त्यांच्या अधिकाऱ्यांना लिहिताना त्यांनी खांदेरीवर बांधकामाचे काम थांबवण्यात काही प्रमाणात यश मिळवले आहे असेच लिहीत होते.
कॅंग्विन त्याच्या २० ऑक्टोबर च्या पत्रात मुंबईकरांना लिहितो :
Sevagys armado came in the night alongst shoare as high as thull , and in the morning by break of day, with the tyde of flood, rowed upon us, we riding at an anchour within musquett shott , of the shoare, not a breath of winde stirring. Captain Minchin and myselfe to take it into consideration that if they lay us aboard, if our cable should breake or be cutt by the enemy or anchour should come home, the tyde would heave us ashore in 1/2 a quarter of an hourses time; therfore wayed , and caused the Manchuas to toe us , for without their help wee must goe ashoare.
शिवाजीचे आरमार रात्री थळापर्यंत किनाऱ्याने वल्हवित आले आणि पहाटे भरती वेळी आमच्याकडे चाल करून आले. आम्ही किनार्यापासुन गोळीच्या टप्प्यावर होतो तेव्हा त्यांनी आमच्यावर चाल केली. आमचा नांगर तुटला किंवा शत्रूने तोडला तर आम्ही किनाऱ्यावर भरतीबरोबर जाऊन आदळू. असा विचार करून मचव्याच्या साहाय्याने आम्ही बाजूला येऊन राहिलो. आमच्यापासून गोळीच्या टप्प्यात येताच आरमाराने आमचा रोख सोडला व ते बेटात कुमक देण्यासाठी गेले.
नव्या तोफा चढवून बेटातून मराठ्यांनी भडीमार सुरु केला होता. आता इंग्रज युद्धाचीच वाट बघत होते. मुंबईकरांनी केजवीनच्या मदतीसाठी अडटर्न बरोबर कुमक पाठविली. त्याच्या साहाय्याने बेटावर पाण्याचा तुटवडा पाडून रक्तपाताशिवाय बेट हस्तगत करण्याची योजना ब्रिटिशांनी आखली होती. शिवाजी महाराजांच्या ३ गुराबा इंग्रजानी बुडवल्या होत्या असा उल्लेख ते सुरतेला लिहलेल्या पात्रात करतात. इंग्रजानी मराठ्यांच्या ज्या गुराबांवर हल्ले केले होते त्यातल्या काही दुरुस्ती साठी नागावला पाठविण्यात आल्या होत्या. मराठ्यांचे ३०० लोक मारले गेल्याची आणि १०० लोक जखमी केल्याची नोंद इंग्रज आपल्या पत्रात करतात. पण यात तथ्य वाटत नाही. ही माहिती अतिरंजित वाटते. आणि जरी असे झाले असेल तर इंग्रज आरमाराची हि तितकीच हानी झाली असणार यात वाद नाही. पण इंग्रज अधिकारी त्यांच्या वागणुकीप्रमाणे स्वतःचे झालेले नुकसान लपवत असल्याचे दिसून येते.
इकडे शिवाजी महाराज हि काही शांत बसले नव्हते. इंग्रज लोक खांदेरी परिसरात जो त्रास देत होते त्याला उत्तर म्हणून आणि इंग्रजांना कायमच शांत करण्यासाठी महाराज तयारी करत होते. भेट म्हणून मिळालेली मुंबई इंग्रजांकडून जिंकण्याचा हा डाव महाराज आखत होते. कल्याण भिवंडीला महाराजांचे ४००० लोक मुंबईवर हल्ला करण्यासाठी तयार होते. वसईच्या पौतुगीज कॅप्टन जनरलकडे त्याच्या मुलुखातून जाण्याची परवानगी महाराजांनी मागितली होती पण त्याने ती नाकारली. त्यामुळे त्याला धमकी देऊन त्याच्याच मुलुखातून जाण्याची तयारी महाराजांचे सैन्य करत होते. बेटावरून सुरु असलेले हे युद्ध आता जमिनीवर येऊन पोहचले होते. मराठ्यांनी मुंबईवर हल्ला केला तर मराठ्यांना तोंड देऊ शकेल इतके सैन्य हि इंग्रजांकडे त्यावेळी मुंबईत नव्हते. त्यामुळे मुंबईकर सुरतेकडे ज्यादा आरमाराची आणि सोबतच मनुष्यबळ पुरवण्याची मागणी करत होते.
जे युद्ध इंग्रजांना अगदी सोपे वाटत होते त्या युद्धास मराठ्यांनी दिलेला प्रतिकार इंग्रजांना आता जड जात होता. काही दिवसात मराठ्यांना हरवू असे उद्गार काढणारे इंग्रज अधिकारी आता माघार घेत होते. या सर्व युद्धात फक्त खर्च होत होता पण इंग्रजांना याचा फायदा असा काही होतच नव्हता. म्हणूनच या युद्धातून माघार घेऊन मराठ्यांच्या मुख्य शत्रूला म्हणजे सिद्धीला पुढे करण्याचा घाट इंग्रज घालत होते. यात त्यांना यश आले कि अपयश. सोपे वाटणारे युद्ध मराठ्यांनी कशाप्रकारे कठीण केले होते हे जाणुन घेणे गरजेच आहे.
क्रमशः
✍️ स्वराज्याचे वैभव
संदर्भ ग्रंथ : शिव छत्रपतींचे आरमार
English records
छत्रपती शिवाजी महाराज ( उत्तरार्ध )
No comments:
Post a Comment