पुरंदर तहानंतर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज, मिर्झा राजे, सरसेनापती नेताजी पालकर आणि दिलेरखान विजापूरवर चालून गेले. तेथे आदिलशाही सेनापती सर्जाखान याच्यासमोर ते चौघे अपयशी ठरत होते. आणि त्या अपयशाचे खापर दिलेरखान महाराजांवरच फोडू लागला. म्हणून विजापूरकरांचा पन्हाळगड जिंकण्यासाठी महाराज विजापुरहून परत आले, महाराजांनी रात्रीच गडावर छापा घातला. आदिलशाही किल्लेदार बेसावध असेल अशी महाराजांची खात्री होती पण किल्लेदार सावध होता. त्यात सरसेनापती नेताजी पालकर वेळेवर पोहोचून महाराजांना कुमक पोहोचवू शकले नाहीत. यात महाराजांचा पराभव झाला आणि सुमारे १००० माणसे मारली गेली. महाराज नेताजींवर चिडले आणि त्यांनी नेताजीला पत्राद्वारे "समयास कैसा पावला नाहीस" असे म्हणून बडतर्फ केले. मग नेताजी विजापूरकरांना जाऊन मिळाले. महाराज आग्र्याच्या भेटीस निघून गेल्यानंतर मिर्झाराजांनी नेताजी पालकरांना विजापूरकरांकडून मुघलांकडे वळवले.
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्ग्र्याहून औरंगजेबाच्या कैदेतून सुटण्यात यशस्वी झाले, तेव्हा शिवाजी सुटला, आत्ता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचे फर्मान दि.१९ ऑगस्ट १६६६ रोजी आग्रा येथून सोडले. नेताजी या वेळी मोगली छावणीत बीड नजीक धारूर येथे होते. दि.२४ ऑक्टोबर १६६६ रोजी मिर्झा राजे जयसिंह यांनी नेताजी आणि त्यांचे चुलते कोंडाजी यांना अटक केली. दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली. ४ दिवसांच्या अतोनात हालानंतर नेताजींनी धर्मांतरास मान्यता दिली. दि.२७ मार्च १६६७ रोजी नेताजी मुस्लिम झाले व त्यांचे 'मुहम्मद कुलीखान' असे नामकरण करण्यात आले (जून १६६७). औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजी काबूल कंदाहाराच्या मोहिमेवर रवाना झाले. लाहोरजवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला. पण पुढे ९ वर्षे नेताजी काबूल कंदाहार येथेच मोहिमेवर होते.
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते, त्यावेळी औरंगजेबाला 'प्रतिशिवाजीची' आठवण झाली. मग त्याने या 'मुहम्मद कुलीखानास', दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले.मे १६७६. रोजी पच्छाताप झालेले नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले. १९ जून १६७६ रोजी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा विधिवत हिंदू धर्मामध्ये घेतले.
महाराज व नेताजी नातलग आहेत असे उल्लेख मोगली अखबारातून मिळतात. महाराजांची पत्नी पुतळाबाई राणीसाहेब यांचे माहेर पालकर घराण्यातले आहे. महाराजांची एक राजकन्या कमलाबाई हिचे लग्न जानोजी पालकरांशी झाले. पण जानोजी अन् पुतळाबाई यांचे नेताजींशी काय नाते होते हे फार मोठे प्रश्नचिन्ह अजूनही आहे. 'छावा' नुसार नेताजी पालकर शिवरायांच्या एक महाराणी सगुणाबाई यांचे सख्खे काका होते.....🚩🚩🚩
No comments:
Post a Comment