इतिहासामध्ये अनेक अशी व्यक्तिमत्वे आहेत जी आपल्या भारतीयांच्या व्यक्तिपूजक स्वभावामुळे इतिहासातच लपून बसली आहेत. महाराष्ट्राचा इतिहास म्हणले की आम्ही शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज इथे अडकून पडलो.
आपल्या इतिहासामध्ये जिजाऊमाँसाहेब आपल्याला माहीत होत्याच, त्यानंतर ताराराणीसाहेब आम्हाला माहीत आहेत. परंतु मराठा राज्याचे रूपांतर साम्राज्यात करणाऱ्या शाहू महाराजांच्या आईसाहेब आणि संभाजी महाराजांच्या पत्नी "त्यागमूर्ती येसूबाईसाहेब" आमच्या लोकांना माहीत नव्हत्या ज्या आत्ता कुठे माहीत झाल्या. अहिल्याबाई होळकर आहेत, दुसऱ्या जिजाबाई साहेब आहेत अशा अनेक पराक्रमी स्त्रिया ज्यांनी इतिहासाला कलाटणी देणारे कार्य केले. परंतु अशा अनेक स्त्रिया अजूनही आहेत ज्यांचा इतिहास आम्हा सामान्य माणसाला माहीत नाही. अशाच एक पराक्रमी स्त्रीची ओळख या लेखातून मला करून द्यावीशी वाटली (इतिहास अभ्यासक आणि संशोधकांना नक्कीच माहीत असेल पण सामान्य माणसांना माहीती व्हावे म्हणून ही पोस्ट) त्या पराक्रमी स्त्रीचे नाव म्हणजे "श्रीमंत महाराणी, बाकाबाईसाहेब भोसले" !!
________________________________________________
मराठ्यांच्या इतिहासात नागपूर हे ठिकाण खूप महत्वाचे. नागपूरचे राज्य स्थापन करणारे प्रथम रघुजीराजे भोसले. ज्यांनी स्वकर्तृत्वावर प्रचंड दौलत निर्माण केली. त्यांना चार मुले होती. परंतु त्यांच्यातील भाऊबंदकमुळे भोसल्यांच्या सत्तेचा रघुजीकालीन दबदबा राहिला नाही. यामुळे ओरिसा-बंगाल भागाकडे दुर्लक्ष झाले आणि इंग्रजांना बंगालमध्ये आपली सत्ता बळकट करता आली. दुसरे रघुजी भोसले (इ.स. १७८८ ते इ.स. १८१६) यांच्या काळात १८०३ पर्यंत भोसल्यांच्या सत्तेचा सुवर्णकाळ होता.वर्धा नदीपासून ते ओरिसातील सुवर्णरेखा नदीपर्यंत आणि उत्तरेला नर्मदापासून ते थेट गोदावरीपर्यंत भोसल्यांच्या एकछत्री राज्य होते. परंतु दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात (इ.स. १८०३) रघुजीराजांचा पराभव झाला आणि भोसल्यांच्या बराचसा मुलुख इंग्रजांना द्यावा लागला.
दुसऱ्या राघोजीराजांच्या मृत्यूनंतर (२२ मार्च १८१६) त्यांचा मुलगा परसोजी यांच्या अपंगत्वामुळे भोसले दरबारात वाद निर्माण झाला. कार्यकारी शासक (रिजंट) कोण असावा म्हणून बाकाबाईसाहेब व दुसऱ्या रघुजीराजांचा पुतण्या आप्पासाहेब यांच्यात स्पर्धा सुरू झाली. बाकाबाईसाहेब या दुसऱ्या रघुजीराज्यांच्या तिसऱ्या पत्नी होय. परसोजी यांना १४ एप्रिल १८१८ रोजी समारंभपूर्वक सिहासनावर बसवण्यात आले. परंतु, २७ मे १८१८ रोजी परसोजींनी इंग्रजांशी तैनाती फौजेचा तह केला आणि नागपूर राज्याचे स्वतंत्र गमावले.
१८१८ ते १८५३ हा काळ खूप वेगवेगळ्या वळणाने सजलेला आहे ज्यामध्ये बाकाबाईसाहेब यांना कैद झाली अनेक संकटे आली. ११ डिसेंबर १८५३ रोजी तिसरे रघुजीराजे यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी कोणालाही दत्तक न घेतल्यामुळे लॉर्ड डलहौसीला राज्य खालसा करण्याची संधी मिळाली. बकबाईंनी राज्य वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले अनेक इंग्रज अधिकाऱ्यांना पत्रे पाठवली अनेक शिफारसी केल्या. इतकेच नव्हे तीन वकील लंडनला पाठवले. परंतु त्यांचे सर्व प्रयत्न फसत चालले होते.
बाकाबाईसाहेब यांची कारकीर्द ४० वर्षांची. त्यांचा जन्म २ मार्च १७८१ रोजी चांदुर तालुक्यातील शंकरपूर येथे झाला. वडिलांचे नाव विठुजी व आईचे नाव राजकुवर असून आडनाव महाडिक होय. त्यांचे लग्न दुसऱ्या रघुजीराजांसोबत १७९० साली झाले. रघुजीराजांचे हे तिसरे लग्न होते. दुसऱ्या रघुजीराजांनंतर आप्पासाहेब उर्फ मुधोजी भोसले यांच्या गादीवर बसण्याच्या महत्वकांक्षेच्या आड बाकाबाईसाहेब भिंत म्हणून उभ्या होत्या. परंतु बाकाबाईसाहेबांना शह देण्यासाठी आप्पासाहेब व त्यांच्या दरबाऱ्यांनी तैनाती फौज स्वीकारली व नागपूर राज्य खालसा होण्याच्या पायरीवर नेऊन ठेवले. यावेळी बाकाबाईसाहेबांची भूमिका तत्कालीन परिस्थितीशी मिळते-जुळते घेऊन राज्य वाचवले व त्यांच्यामुळेच तिसरे रघुजीराजे इंग्रजांच्या मदतीने गादीवर येऊ शकले. राजा अल्पवयीन असल्याने बाकाबाईसाहेबांना अंतर्गत कारभार सांभाळण्याची मुभा मिळाली व त्यांनी उत्कृष्टपणे सांभाळला. १८२६ नंतर राजा सज्ञान झाल्यानंतरही १८३२ पर्यंत राज्यकारभारावर बाकाबाईसाहेबांची पकड होती ही गोष्ट रेसिडन्ट ग्रोमेनी मान्य केले आहे.
बाकाबाईसाहेब यांच्यावर इतिहासात अनेक गैरसमजुती व आरोप आहेत त्यांना एक वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून सदैव दाखवण्यात आले परंतु तत्कालीन राजकीय परिस्थिती पाहता आणि त्याचे गांभीर्य पाहता बाकाबाईसाहेब यांची भूमिका समजून येते आणि बाकाबाईसाहेब यांच्या कार्याचा व कर्तृत्वाचा इतिहासावर अमीट ठसा उमटला आहे हे आपणास नाकारता येत नाही.
तिसऱ्या रघुजीराजांच्या मृत्यूनंतर राज्य कोणाकडे सोपवायचे असा प्रश्न ज्यावेळी पडला त्यावेळी मॅनसेलने बाकाबाईसाहेब यांच्याबद्दल पुढील उद्गार काढले -
"Undoubtedly the person most competent to rule the country under any such modified condition is the "Banka Baee" the widow of the second Rughojee. Thought 75 years of age. She is still in the full possession of her intellects everything she has every done or said favour. She is really superior women of good feeling and good sense. There is no one in the state from her position in Mr. Jenkins time and from her personal character so capable of conducting the government as her self."
________________________________________________
बाकाबाईसाहेब यांच्यावर संशोधनात्मक लेखन डॉ. अंधारे यांनी केले आहे. आणि तत्कालीन सर्व कागदपत्रे, इंग्रजी दफ्तर, अप्रकाशित मूळ साधने, इंग्रज-मराठे पत्रव्यवहार अशा अनेक अस्सल कागदपत्रांच्या आधारे बाकाबाईसाहेब यांचे चरित्र डॉ. अंधारे यांनी मांडले आहे. बाकाबाईसाहेब यांच्या कार्याची माहिती घ्यायची असेल तर हे पुस्तक नक्की वाचावे.
साभार प्रशांत लवाटे पाटिल
संदर्भ : श्रीमंत महाराणी बाकाबाईसाहेब भोसले.
लेखक: डॉ. भा. रा. अंधारे.
हिन्दी मराठी प्रकाशन - नागपूर.
No comments:
Post a Comment