विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 25 June 2020

आमच्या ह्या कठीण प्रदेशात नुसता कल्पनेचा घोडा चालवणेही कठीण आहे. मग तो प्रदेश काबीज करण्याची गोष्टच कशाला ? - छत्रपती शिवाजी महाराज.

आमच्या ह्या कठीण प्रदेशात नुसता कल्पनेचा घोडा चालवणेही कठीण आहे. मग तो प्रदेश काबीज करण्याची गोष्टच कशाला ?
- छत्रपती शिवाजी महाराज.
___________________________

डिप्रेशन, टेन्शन बद्दलच्या बऱ्याच पोस्ट मागे वाचल्या. आपण एवढ्यात हरतोय ? जगद्गुरू तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील घटना जर पहिल्या तर आपल्याला असलेल्या चिंता त्यापुढे फार क्षुल्लक आहेत. पण परिस्थिती काहीही असली, 'आभाळ कोसळल्यावरही त्यावर पाय ठेऊन उभे राहायला शिकवतात ते हे दोन व्यक्तिमत्व!' शिवाजी महाराजांबद्दल आपल्या सर्वांच्या मनात प्रचंड आदर आहे, आपुलकी आहे. एक तरुण म्हणून मी तरी शिवाजी महाराजांकडून खूप काही शिकतोय आणि सर्वांनी शिकायलाही हवे.
शिवाजी महाराज हे मुघली सत्तेपुढे मोठ्या धाडसाने उभे राहिले होते. एखादा सामान्य माणूस त्याच्यात असलेल्या असामान्य कर्तृत्वाने कसा मोठा होतो हे शिवछत्रपतींनी आपल्याला दाखवलय. कुणापुढे वाकू नका, झुकू नका, तत्व सोडून वागू नका हे तर या मोठ्या लोकांच्या प्रत्येक हालचालीतून दिसून आलंय. या दोन्ही व्यक्तिमत्वांची मला सर्वात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे त्यांचा रोखठोकपणा! उगाच गोड हे लोक कधी बोललेले नाहीत. 'आहे ते आहे' अशीच यांची भूमिका होती आणि हीच भूमिका आपण स्वीकारायला हवी. इ.स. १६५९ पासून पुढील काही वर्ष हे शिवाजी महाराजांसाठी कठीण होते. मुघल बादशाह महाराजांवर एक- एक स्वारी पाठवतच होता आणि महाराज मोठ्या धाडसाने त्यांना तोंड देत होते. महाराज या स्वाऱ्यांबद्दल मुघल अधिकाऱ्याला काय म्हणतात ते एका पत्राचा दाखला देऊन मी तुम्हाला सांगणार आहे.

इ.स. १६६३ ला नीलप्रभू च्या हस्ते शिवाजी महाराजांकडून एका मोगल अधिकाऱ्याला पत्र लिहिल्या गेले. त्यात शिवाजी महाराज म्हणतात,

‘आज तीन वर्षे बादशहाचे मोठमोठे सल्लागार व योद्धे आमचा प्रदेश काबीज करण्यासाठी चालून येत आहेत, हे तुम्हा सर्वांना माहित आहेच. बादशाह हुकूम फर्मावितात 'शिवाजीचे किल्ले काबीज करा' तुम्ही जवाब पाठवता 'आम्ही लौकरच काबीज करतो' आमच्या ह्या कठीण प्रदेशात नुसता कल्पनेचा घोडा चालवणेही कठीण आहे. मग तो प्रदेश काबीज करण्याची गोष्टच कशाला ? भलत्याच खोट्या बातम्या बादशाहकडे लिहून पाठविण्यास तुम्हाला लाज कशी वाटत नाही ?'

शिवाजी महाराजांची परिस्थिती यावेळी बिकट असली तरी ते घाबरले नाहीत. आपल्या शत्रूचा अशा रोखठोक शब्दात समाचार घेतला गेला पाहिजे.
पुढे ते म्हणतात 'अफजलखान जावळीवर चालून आला आणि नाहक बळी पडला. हा प्रकार तुम्ही तुमच्या बादशहास का कळवीत नाही ? अमीरूलउमराव शाहिस्ताखान आमच्या गगनचुंबी डोंगरात व पाताळात पोहोचणाऱ्या खोऱ्यात तीन वर्षे सारखा खपत होता. शिवाजी चा पाडाव करून लौकरच त्याला काबीज करतो असे बादशहाला तो लिहून लिहून थकला. ह्या खोडसाळ वर्तनाचा परिणाम त्याला भोवला. तो परिणाम सूर्यासारखा स्वच्छ सर्वांसमोर आहे.'

शिवाजी महाराजांचा आपल्या कर्तृत्वावर असलेला विश्वास आपल्याला याठिकाणी स्पष्ट दिसतो. शिवाजी महाराजांना मुघल विरोधक होते आपल्याला आपल्या परिचयाचे असतील. पण घाबरण्याचे कारण नाही. सगळ्यांचे हिशोब होतात हे इतिहासानेच आपल्याला दाखवलंय.
या पत्राचा शेवट महाराज करतात कि,
आपल्या भूमीचे रक्षण करणे माझे कर्तव्य आहे आणि तुम्ही बादशाह कडे कितीही खोट्या बातम्या लिहून पाठवल्या तरी मी आपले कर्तव्य बजावण्यास कधी चुकणार नाही.

थोडक्यात काय तर आपले कर्तव्य आपण प्रामाणिकपणे पार पाडायला हवे. आपल्या भूमीचे रक्षण करून जनतेचे, सर्वसामान्यांचे आणि सर्वांचे राज्य उभे करण्याची जबाबदारी शिवाजी महाराजांवर होती आणि त्यांनी ती पार पाडली. आपणही आपल्यावर असलेली जबाबदारी पार पाडू.

टीप- तरुण असाल तर अभ्यास, वाचन, लिखाण करा तुमची जबाबदारी ती आहे.

- आशुतोष सुनील पाटील.

#HiStoryteller #AshutoshPatil

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...