लेखन- © सुमित अनिल डेंगळे
हिंगणी येथील अपूर्ण वाडा व समाधी–
हिंगणी हे छोटेसे गाव कोपरगावापासून साडेपाच किलोमीटर अंतरावर गोदावरी काठी आहे. कोपरगावात आल्यावर (1783) रघुनाथरावांनी येथे एक भव्य वाडा बांधावयास सुरुवात केली. पूर्ववाहिनी गोदावरी ज्या स्थानावर दक्षिणवाहिनी होते त्या काटकोनाच्या स्थानावर ही वास्तू बांधण्यास प्रारंभ झाला. परंतु दादांच्या मृत्यूमुळे हे काम पूर्णत्वास जाऊ शकले नाही. बेटातील वाड्यात दादांचा मृत्यू झाल्यावर त्यांचे अंत्यसंस्कार इथेच करण्यात आले व समाधी बांधण्यात आली. वाड्याच्या तीन भिंती अजूनही भक्कमपणे गोदेतटी उभ्या आहेत. त्यांची उंची प्रचंड असून नदीच्या बाजूने दोन्ही बाजूंना उंच व भक्कम बुरुज आहेत. वाड्याच्या प्रवेशद्वारावर सुंदर नक्षीकाम असून वर गणपतीची मूर्ती कोरलेली आहे. आत गेल्यावर रघुनाथरावांच्या समाधीचं मंदिर दिसतं. त्यात शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. वाडा खरोखरच पूर्ण झाला असता तर एक भक्कम, प्रशस्त व रेखीव वास्तू या गोदेकाठी पहावयास मिळाली असती.
लेखन- © सुमित अनिल डेंगळे.
संदर्भ-
- New history of the Marathas (Vol III)- G.S.Sardesai
- History of Mahrattas- James Grant Duff
- Last days of Peshwa Raghunathrao (article)- P.L.Saswadkar
- Ahmednagar district gazetteer
- Bet Kopargaon Devasthan Trust
No comments:
Post a Comment