"माझा सूर्यराऊ पडिला. तो जैसा भारतीचा कर्ण होता", खुद्द छत्रपती शिवरायांचे हे उद्गार सूर्यराव काकडेंंचे शौर्य दर्शविते..
आपल्या इतिहासात विशेषत: इ. १२९६ पासून पुढे रक्तपाताने लाल झालेली पानेच जास्त दिसतात. या स्वातंत्र्ययुद्धकांडाचा इतिहास वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते , की महाराजांनी करावे लागले तिथे युद्ध केलेच , पण शक्यतेवढा रक्तपात टाळण्याचाही प्रयत्न केला. या शिवस्वराज्य पर्वाला सुरुवात झाली. इ. १६४६ मध्ये. पण तोरणा , कोरीगड , पुरंदर हे किल्ले रक्ताचा थेंबही न सांडता त्यांनी स्वराज्यात आणले.
पुढच्या काळातही झालेल्या लढायांचा अभ्यास केला , तर असेच दिसेल , याचे मर्म महाराजांच्या क्रांतीकारक युद्धपद्धतीत आहे. ती युद्धपद्धती गनिमी काव्याची , छाप्यांची , मनुष्यबळ बचावून शत्रूला पराभूत करण्याचे हे तंत्र म्हणजे गनिमी कावा.
पहिली खूप मोठी लढाई ठरली ती प्रतापगडाची. ( दि. १० नोव्हेंबर १६५९ ) या युद्धातही शत्रूची महाराजांनी कत्तल केली नाही. त्यांचा मावळ्यांना आदेशच होता की , ‘ लढत्या हशमास मारावे ‘ म्हणजेच न लढत्या शत्रूला मारू नये. त्याला निशस्त्र करावे. जरुर तर कैद करावे. पळाल्यास पळू द्यावे. कत्तलबाजी ही महाराजांची संस्कृतीच नव्हती. प्रतापगड विजयानंतर पुढे पाऊण महिना महाराज सतत आदिलशाही मुलुख आणि किल्ले घेत पन्हाळा , विशाळगड प्रदेशापर्यंत पोहोचले. हा प्रदेश दौडत्या छापेगिरीने महाराजांनी काबीज केला. शत्रू शरण आल्यावर आणि उद्दिष्ट साध्य झाल्यावर शरणागतांना ठार मारण्याची हौस त्यांना नव्हती. अकबराने राणा प्रतापांचा चितोडगड जिंकल्यावरही गडावरच्या राजपुतांची मोठी कत्तल केल्याची नोंद आहे. अशा नोंदी मोगलशाही इतिहासात खूपच आहेत. शिवइतिहासात नाहीत , हे सांस्कृतिक फरक होय.
एक तर
महाराजांच्या चढाया आणि लढाया या अचानक छाप्यांच्या असल्यामुळे रक्तपात कमी
घडले. त्यातही शरण आलेल्या लोकांना , शक्य असेल तर आपल्याच स्वराज्यसेनेत
सामील करून घेण्याची महाराजांची मनोवृत्ती होती.
उदाहरणार्थ अफझलखान
पराभवानंतर खानाच्या फौजेतील नाईकजी पांढरे , नाईकजी खराटे , कल्याणजी जाधव
, सिद्दी हिलाल खान , वाहवाह खान आदि खानपक्षाचे सरदार महाराजांना शरण आले
आणि सामीलही झाले. अशी उदाहरणे आणखीही सांगता येतील.
सुर्यराव
काकडे हे छत्रपती शिवरायांचे बालपणीचे मित्र होते. सूर्यराव काकडे हे
पुरंदर तालुक्यातील पांगारे गावचे शिलेदार फार मातब्बर. त्यांच्या
घराण्याला ‘ दिनकरराव ‘ अशी पदवी होती. या काकडे घराण्याने स्वराज्यात अपार
पराक्रम गाजविला. प्रतापगडचे युद्धाचे वेळी खासा प्रतापगड किल्ला
सांभाळण्याचे काम याच घराण्यातील गोरखोजी काकडे यांच्यावर सोपविले होते. ते
त्यांनीही चोख पार पाडले.
रोहिडा व जावळी सर करण्यात त्यांचा मोठा
वाटा होता. छत्रपती शिवरायांनी सुर्यराव काकडे यांच्यासोबत दोन हजार मावळे
जावळीवर रवाना केले. असा मोर्याच्या बखरीमध्ये उल्लेख आहे. सुर्यराव यांनी
गाजविलेली साल्हेरची लढाई इतिहासात प्रसिध्द आहे.
शिवरायांनी १६७१ मध्ये बागलाण मोहिम काढली आणि साल्हेर जिंकून घेतला.त्या मोहिमेची वार्ता दिल्लीच्या पातशहाला मिळाली. ते एकून पातशहा कष्टी झाला, नी म्हणाला, "काय इलाज करावा, लाख लाख घोडाचे सुभे रवाना केले ते बुडवले नामोहरम होऊन आले.आता कोण पाठवावे "तेव्हा पातशहाने 'शिवाजी जोवर जिवंत तोवर दिल्ली आपण सोडीत नाही" असा विचार केला आणि इखलासखान व बहोलोलखान यांस बोलावून वीस हजार स्वारांनिशी सालेरीस रवाना केले.
मग इखलासखानाने येऊन साल्हेरला वेढा घातला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा मोगलाईत पाठवलेले आपले सरनौबत प्रतापरावांना जासूदाकरवी कळविले "तुम्ही लष्कर घेऊन सालेरीस जाऊन बेलोलखानास धारून चालविणे आण कोकणातून मोरोपंत हशमानिशी रवाना केले.' हे इकडून येतील तुम्हीही वरघाटी कोकणातून येणे असे दुतर्फा चालून येऊन गनिमास गर्दीस मिळवणे" अशी पत्रे पाठविली.
या युध्दात मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली. सुर्यराव, मोरोपंत आणि प्रतापराव सरनौबत यांनी आणीबाणी केली.साल्हेरच्या युद्धात जय मिळाला , पण आनंदाच्याबरोबर युद्धातील विजय दु:ख घेऊनच येतो. या युद्धात महाराजांचा एक अत्यंत आवडता , शूर जिवलग सूर्यराव काकडे हा मावळा कामी आला. महाराजांना अपार दु:ख झाले. त्यांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले , ‘ माझा सूर्यराऊ पडिला. तो जैसा भारतीचा कर्ण होता. ‘
सूर्यराव काकडे यांना पराक्रम गाजवतांना आपला देह ठेवावा लागला.ते तोफेचा गोळा लागून पडले.'सूर्यराव काही सामान्य योध्दा नव्हे.भारती जैसा कर्ण योध्दा त्याचा प्रतिमेचा,असा शूर पडला.'विजयाची बातमी शिवरायांकडे गेली राजे खूप खूश झाले.खबर घेऊन आलेल्या जासूदांना सोन्याची कडी आणि प्रतापराव सरनौबत,मोरोपंत पेशवे, आनंदराव,व्यंकोजी पंत यांना अपार बक्षीस आणि द्रव्य देण्यात आले.हा पराभव दिल्लीच्या बादशहाच्या जिव्हारी लागला की सभासद म्हणतो,पातशहा असे कष्टी जाले.'खुदाने मुसलमानांची पातशाही दूर करून शिवाजीसच दिधली असे वाटते.
सभासद बखरीत याचा उल्लेख् खालीलप्रमाणे आढळतो ''चार प्रहर दिवस युध्द जाहले मोगल, पठाण, रजपूत, तोफांचे, हत्ती, उंट आराबा घालून युध्द जाहले. युध्द होताच पृथ्वीचा धुराळा असा उडाला की,तीन कोश औरस चौरस,आपले व परके लोक माणूस दिसत नव्हते.हत्ती रणास आले दुतर्फा दहा हजार माणूस मुर्दा जाहले,पूर वहिले.रक्ताचे चिखल जाहले.मराठांनी इखलासखान आणि बेलोलखानाचा पाडाव केला.युध्दात प्रचंड प्रमाणावर हानी झाली.या युध्दात शिवरायांच्या एक लाख २० हजार सैन्याचा समावेश होता,पैकी १० हजार माणसे कामीस आले.सहा हजार घोडे,सहा हजार उंट,सव्वाशे हत्ती तसेच खजिना,जडजवाहीर ,कापड अशी अफाट मालमत्ता शिवरायांच्या हाती आली.
आता शिवाजी अगोदर आपणास मृत्यु येईल तर बरे.आता शिवाजीची चिंता जीवी सोसवत नाही.'असा बादशाह औरंगज़ेब बोलिला.मोगलांच्या सैन्याशी समोरासमोर लढाई करून तोपर्यंत महाराजांना विजय प्राप्त झाला होता,त्यात साल्हेरचा विजय प्रथम मानावर होता.असा मोठा विजय यापूर्वी कधीही मिळाला नव्हता.या युध्दात मावळ्यांनी दाखवलेल्या युध्दकौशल्याची व शौर्याची किर्ती चहुकडे पसरली आणि त्यांचा दरारा अधिकच वाढला.साल्हेर जिंकल्यावर त्यासमोरील मुल्हेर किल्ला मराठ्यांनि जिंकला आणि संपूर्ण बागलाण प्रांतावर त्यांनी आपला शह बसवला.त्यामुळे सुरत शहरास कायमची दहशत बसली.
सुर्यराव काकडे समाधीवरील चंद्रसुर्य:
"चंद्रसूर्य असेपर्यंत तुमची किर्ती दिगंतात राहील" असा त्याचा अर्थ आहे.
No comments:
Post a Comment