विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 8 July 2020

नाना पाटील

नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील : (३ ऑगस्ट १९०० – ६ डिसेंबर १९७६). महाराष्ट्रातील एक देशभक्त. झुंझार नेते आणि क्रांतिसिंह म्हणून ते ओळखले जातात. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील येडे मचिंद्र वा खेड्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. नानांचे वडील रामचंद्र हे गावचे पाटील होते. नानांचे प्राथमिक शिक्षण गावी झाले आणि ते मुलकीपरीक्षा उत्तीर्ण झाले (१९१६). यानंतर त्यांना तलाठ्याची नोकरी मिळाली. पुढे सत्यशोधक चळवळीकडे ते आकृष्ट झाले. त्यांनी ग्रामीण भागातून दौरे काढून तत्कालीन समाजातील अंधश्रद्धा, हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथा व चालीरीती यांविरुद्ध लोकमत जागृत केले. अनेक अनिष्ट चालीरीतीविरुद्ध त्यांनी बंड पुकारले. १९३० साली म. गांधींनी सुरू केलेल्या असहकारच्या चळवळीत ते सहभागी झाले. पुढे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीवर ते निवडून आ ले. १९४२ च्या ‘छोडो भारत’ आंदोलनात भूमिगत राहून कार्य करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्या नुसार सातारा जिल्ह्यात काही सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी प्रतिसरकार स्थापन केले व ब्रिटिश शासन बंद पाडण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला.

सरकारी बँका, पोस्ट व तारखाते, पोलीस ठाणी यांवर छापे घातले. सरकारतर्फे हेरगिरी करणाऱ्यास तसेच जबरीने सारा वसूल करणाऱ्या पाटील-तलाठ्यांस पायांवर काठीचे तडाके मारण्यात येत आणि पत्रेही ठोकण्यात येत. यावरून त्यांच्या या प्रतिसरकारला पत्रीसरकार हे नाव रूढ झाले होते. ब्रिटिश सरकारने नाना पाटलांना पकडून देणाऱ्यास दहा हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले.

या आंदोलनकाळातच नानांनी ग्रामराज्याची स्थापना करण्याचे कार्य हाती घेतले. खेड्यातील परकी सत्ता नामशेष करून त्यांना स्वयंपूर्ण बनवावे व त्यांचा सर्व कारभार ग्रामस्थांच्या हाती द्यावा, अशी त्यांची ग्रामराज्याची कल्पना होती. लोकनियुक्त पंचांनी खेड्याचा कारभार पहावा व आवश्यक वाटल्यास भूमिगतांनी त्यांना पदत करावी, अशी एकूण ग्रामराज्याची कार्यपद्धती होती. कराड, वाळवे, तासगाव इ. ठिकाणी पंचसभा स्थापन झाल्या. न्यायदान समित्याही स्थापन करण्यात आल्या. कोरेगाव, पाटण, सातारा इ, गावी, वर्षानुवर्षे बेकायदेशीरपणे गाळली जाणारी हातभट्टीची दारू चार महिन्यांत क्रांतिकारकांनी बंद केली.

काँग्रेस मंत्रिमंडळ अधिकारारूढ झाल्यावर (१९४६) त्यांच्यावरील पकड वॉरंट रद्द करण्यात आले. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला व ते शेतकरी कामगार पक्षात गेले. अकेरच्या दिवसांत त्यांनी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. ते दोन वेळा लोकसभेवर निवडून आले. (१९५७-६७). त्यांनी भारतीय सांस्कृतिक मंडळातून रशियाचा दौरा केला.

नाना पाटील प्रभावी वक्ते म्हणून प्रसिद्ध होते. पैलवानाच्या आविर्भावात अत्यंत रांगड्या भाषेत ग्रामीण दाखले देऊन आपला विषय ठामपणे प्रतिपादीत. अस्पश्यतेला त्यांचा विरोध होता. अज्ञानी, दुर्बल घटकांचे त्यांनी खंबीरपणे नेतृत्व केले. ते म. गांधीचे अनुयायी होते; तथापि सशस्त्र क्रांतिमार्गांने ब्रिटिश सत्ता उलथून पाडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. जनसेवा व देशसेवा हे त्यांचे जीवितकार्य होते. सत्यशोधक चळवळ, भारतीय स्वातंत्र्यसंग्राम, संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन या सर्वांना महाराष्ट्रात नाना पाटलांचे नेतृत्व लाभले. मिरज येते त्यांचे निधन झाले.

 

संदर्भ : पाटील, उत्तमराव; लाड, अप्पासाहेब, क्रांतिवीर नाना पाटील, पुणे, १९४७.

लेखक: सु. र. देशपांडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...