महाराष्ट्राचे वैभव "वाई" व वाईच्या इतिहास :
महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र, वाई तालुक्याचे मुख्यालय व एक ऐतिहासिक शहर वाई आहे. लोकसंख्या २६,२८६ (१९९१). साताऱ्याच्या वायव्येस सु. ३३ किमी. व पुण्याच्या आग्नेयीस सु. ८८ किमी.वर ते कृष्णा नदीकाठी वसले आहे. ‘दक्षिण काशी’ म्हणून त्याची प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांत गणना करतात. वाई या नावाच्या व्युत्पत्तीविषयी तज्ञांत मतैक्य नाही तथापि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ‘वायदेश’ या शब्दातील ‘वाय’ (कोष्टी) यावरून वाई हे नाव पडले असावे, असे मत व्यक्त करतात. स्कंदपुराणांतर्गत कृष्णामाहात्म्यात वाईचा ‘वैराजक्षेत्र’ असा उल्लेख आढळतो. ‘विराटनगर’ या नावानेही हे परिचित आहे.
वाईचा फार प्राचीन इतिहास ज्ञात नाही परंतु येथील किवरा ओढ्याच्या (कीचक विहिरीच्या) परिसरात सापडलेली क्षुद्राश्म हत्यारे प्राचीन वस्तीच्या खुणा दर्शवितात. पुरातत्त्वीय सर्वेक्षणांत सापडलेल्या सातवाहनकालीन अवशेषांवरून वाई हे सातवाहन राजांच्या अंमलाखाली (इ. स. पू. २००-इ.स. २०३) असावे. वाईच्या ईशान्येस सहा किमी.वर लोहारे गावाजवळ हीनयान बौद्धांच्या आठ गुहा आहेत.त्यानंतरच्या बाराव्या शतकापर्यंतचा इतिहास अस्पष्ट आहे. वाईच्या परिसरातील पांडवगड, वैराटगड, कमळगड, चंदन-वंदन इ. डोंगरी किल्ले हे शिलाहारांनी (९००-१३००) बांधलेले आहेत. त्यावरून या प्रदेशावर शिलाहारांचे आधिपत्य असावे, असे इतिहासज्ञांचे मत आहे. १३९६ ते १४०८ या बारा वर्षात दुष्काळामुळे वाईची वस्ती उठून गाव ओस पडले होते. तेव्हा बीदरचा बहमनी सुलतान पहिला अहमदशाह वली (कार. १४२२-३६) याने मलिक-उत्-तुज्जार खलफ हसन यास महाराष्ट्रात पाठविले. त्याने वाई परिसरातील किल्ले घेऊन येथे वस्ती करण्याचे काम दादा नरसो व एक तुर्की खोजा यांवर सोपविले (१४२९). बहमनींचे लष्करी ठाणे वाई येथे होते. ⇨ महमूद गावानच्या कोकणातील स्वारीत (१४६९) वायदेशातील काही शिपाई होते, नंतर वाई आदिलशाहीकडे गेले. आदिलशाहीचा सरदार अफझलखान १६४९-५९ यांदरम्यान येथे सुभेदार होता. त्याच्या वाड्याचा काही भाग (तटबंदी, बुरूज इ.) अवशिष्ट असून सतराव्या शतकातील दोन मशिदी अद्यापही सुस्थितीत आढळतात. प्रतापगडाच्या युद्धात अफझलखानाचा वध झाल्यानंतर (१६५९) वाई हे काही काळ मराठ्यांच्या अंमलाखाली होते तथापि मराठ्यांना वाईवर सलग ताबा ठेवता आला नाही. अफझलखानानंतर येथे सय्यद इलियास शर्झाखान याची सुभेदार म्हणून नियुक्ती झाली. छ. शिवाजी महाराजांनी १६७४ मध्ये हा प्रदेश पूर्णतः जिंकून येसाजी मल्हार यास येथे सुभेदार नेमले. संभाजीच्या मृत्यूपर्यंत हा प्रदेश मराठ्यांच्या ताब्यात होता. या काळात शर्झाखानबरोबरच्या युद्धात (१६८७) सेनापती हंबीरराव मोहिते वाईजवळच केंजळ परिसरात मारले गेले. नंतर १६८९ मध्ये वाई मोगलांच्या ताब्यात गेले. संताजी घोरपडे, रामचंद्रपंत अमात्य आणि शंकराजी नारायण यांनी मोगलांबरोबर लढा देऊन पुन्हा वाई काबीज करून तेथे मराठ्यांचे ठाणे केले. छ. शाहूंच्या वेळी (कार. १७०७-४९) वाईवर सुरुवातीस मोगल व मराठे असा दुतर्फी अंमल होता.
साताऱ्यातील एक सावकार भिकाजी रास्ते (नाईक) यांनी बाळाजी बाजीरावास आपली मुलगी गोपिकाबाई दिली आणि रास्ते घराण्याचे पेशवे दरबारी वजन वाढले. परिणामतः पेशव्यांनी रास्त्यांना १५ लाखांचा सरंजाम दिला. त्यामुळे रास्ते हे उत्तर पेशवाईत (१७६१-१८१८) वाईत स्थायिक झाले आणि जवळजवळ अनभिषिक्त राजे बनले. त्यांनी वाईचा सर्वांगीण विकास केला. रास्ते व त्यांचे आश्रित यांनी कृष्णाकाठावर अनेक फरसबंद घाट बांधले, उमामहेश्वर (पंचायतन), महागणपती, काशीविश्वेश्वर, गोविंद-रामेश्वर, विष्णू, लक्ष्मी, भद्रेश्वर, केदारेश्वर, इ. सुरेख मंदिरे उभारली, वाडे बांधले आणि किवरा ओढ्यावर छोटी धरणे बांधून बागायतीस उत्तेजन दिले व पिण्याच्या पाण्याची योजना केली.
वाईत, लहान- मोठी अशी शंभराहून अधिक मंदिरे आहेत. त्यांतील कृष्णा पुलाजवळची महादेव, दत्तात्रेय, दक्षिणकाठचे सिद्धश्वेर इ. काही मंदिरे एकोणिसाव्या शतकातील असून हरिहरेश्वर, अंबाबाई (महाकाली), रामदासांनी स्थापन केलेले रोकडोबा (मारुती), वाकेश्वर, गणपती (साबणे) ही पूर्व-पेशवाईतील मंदिरे आहेत. त्यांच्या चुनेगच्चीतील शिखरांचे बांधकाम मात्र पेशवाईत झाले असावे. या जुन्या मंदिरांतून काही पाषाणशिल्पे आढळतात. तद्वतच मंदिरांतील प्रतिष्ठापित मूर्तीतील काही मूर्ती, विशेषतः महालक्ष्मी, विष्णू, विठ्ठल-रखुमाई, महागणपती, महाकाली, त्रिमुखी दत्तात्रेय, गोशाळेतील संगमरवरी कृष्णमूर्ती, काशीविश्वेश्वर मंदिरातील घंटायुक्त झूल घातलेला एकसंध अलंकृत पाषाण नदी व गर्भगृहाची कलाकुसरयुक्त द्वारशाखा ही लक्षणीय आणि चित्तवेधक आहेत. महालक्ष्मी, विष्णू, काशीविश्वेश्वर, महागणपती, उमामहेश्वर, इ. मंदिरे एका विशिष्ट मराठा वास्तुशैलीत (नव-यादव) बांधलेली आहेत. या मंदिरांचे विधान चतुरस्त्र असून त्यांत गर्भगृह, सभामंडप, क्वचित अंतरालय आढळते. शिखरांवरील कोनाड्यांत चुनेगच्चीत मूर्तिकाम आहे.
गोशाळे रास्तेवाडा, विद्यमान शासकीय मुद्रणालय (मुख्यतः विश्वकोश छपाईकरिता), नगरपालिका, मोतीबाग, इ. रास्त्यांनी बांधलेले वाडे चौसोपी, प्रशस्त आहेत. वाईच्या उत्तर-पश्चिमेस असलेल्या मोतीबागेतील वाडा आनंदराव रास्त्यांनी विश्रामधाम म्हणून बांधला. त्यातील पोहण्याची खास विहीर, बाग, कारंजी, पाणी ओढण्यासाठी वैशिष्ट्यूपूर्ण रहाटगाडगे इ. अवशिष्टआहेत. या वाड्यातील दिवाणखान्याच्या भिंती भित्तिचित्रांनी सुशोभित केलेल्या आहेत. पेशवाईतील वाडा हा एक स्वतंत्र वास्तु-विषय आहे कारण कार्यानुरूप आकारनिर्मित, भक्कम बांधकाम, सूक्ष्म कलाकुसर, छायाप्रकाशाचे कार्यानुरूप इ. वैशिष्ट्ये यात आढळतात.
मराठाकालीन अवशिष्ट भित्तिचित्रांत कदाचित वाईचा पहिला क्रमांक लागेल. या चित्रांचा काळ साधारणतः १७३० ते १८५४ असा वास्तूंच्या बांधणीवरून ठरविता येईल. भाव्यांच्या कोटेश्वर मंदिरातील भित्तिचित्रे ही अखेरची कलाकृती होय. मोतीबाग, पटवर्धन वाडा, जोशी (मेणवलीकर) वाडा, शासकीय मुद्रणालय इत्यादींतून भित्तिचित्रे अवशिष्ट असून जवळच मेणवली येथील नाना फडणीस वाडा व मेणेश्वर मंदिर यांतून भित्तिचित्रे आहेत. या भित्तिचित्रांत वैष्णव धर्माचा प्रभाव अधिक दिसतो. रंगसंगती, विषयांतील वैविध्य आणि रेषांचे लालित्य यांमुळे ही भित्तिचित्रे वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहेत. चुनेगच्चीतील मूर्तिकाम आणि भित्तिचित्रांतील प्रतिमा यांतून तत्कालीन मराठमोळी संस्कृती दृग्गोचर होते.
कृष्णेचा उत्सव हे वाईचे खास वैशिष्ट्य . हे उत्सव सात घाटांवर साजरे होतात. छ. शिवाजी महाराजांच्या वेळी यास प्रारंभ झाला असावा, अशी समजूत आहे. या उत्सवांप्रमाणेच प्रत्येक वाडी व काही पेठा यांच्या वार्षिक यात्रा भरतात. मध्ययुगापासून वाई हे वेदविद्येचे व संस्कृत भाषेच्या अध्ययन-अभ्यासाचे प्रसिद्ध केंद्र समजले जात होते. विष्णुशास्त्री ग. जोशी व दत्तात्रेय जोशी (मेणवलीकर), बाळंभट रानडे, का. वा. ऊर्फ भाऊशास्त्री लेले, गोरक्षक चौंडे महाराज, राष्ट्रीय कीर्तनकार पटवर्धनबुवा, बाळशास्त्री डेगवेकर, ⇨ केवलानंद सरस्वती (नारायणशास्त्री मराठे) इ. विद्वान मंडळींचे येथे वास्तव्य होते. शहरात प्राज्ञपाठशाळा, चौंडे महाराजांनी स्थापिलेली श्री गोवर्धन संस्था (गोशाळा), लो . टिळक स्मारक ग्रंथालय, वाई व्यायामशाळा, ब्राह्मो समाज, वाई अक्षर इन्स्टिट्यूट या प्रसिद्ध जुन्या -नव्या संस्था आहेत. येथे ⇨ महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या विद्यमाने मराठी विश्वकोशरचनेचे काम, तर्कतीर्थ ⇨ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या प्रमुख संपादकत्वाखाली १९६२ पासून चालू आहे. एकोणीसाव्या शतकात मोदवृत्त, मधुवृत्त, वृत्तसार, इ. वृत्तपत्रे येथून प्रसिद्ध होत होती. मकरंद हे मासिक काही वर्षे चालू होते. त्याच्या स्मरणार्थ मकरंद प्रतिष्ठान स्थान झाले असून त्याच्या तर्फे दरवर्षी उत्तम पत्रकारितेबद्दल पुरस्कार देण्यात येतात. सांप्रत तांबडी माती, ज्ञानकिरण ही साप्ताहिके आणि नवभारत हे मासिक येथून प्रसिद्ध होते. वाईची नगरपालिका (स्था. १८५६) आरोग्य, पाणीपुरवठा, साफसफाई इ. नागरी सुविधा पुरविते. शहरात शासकीय रुग्णालय व ग्रामीण आरोग्य केंद्र असून अनेक खाजगी दवाखाने व रुग्णालये आहेत. त्यांपैकी ‘मिशन हॉस्पिटल’ हे सर्वांत जुने असून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. शहरात सहा माध्यमिक विद्यालये (एक इंग्रजी माध्यमाचे) असून विज्ञान, वाणिज्य व कला या तिन्ही शाखांचे एक महाविद्यालय आहे. कृषि-उत्पन्न बाजार समितीतर्फे शेतकऱ्यांचे हळद, गूळ व धान्य यांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार चालतात. दर सोमवारी बाजार भरतो. शहरात सात बँका असून तालुका पातळीवरील सर्व कार्यालये आहेत. याच्या परिसरात खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे चालविण्यात येणारे रेशीम उत्पादन केंद्र असून सहकारी सूतगिरणी आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची वसाहत हे दोन संकल्पित प्रकल्प आहेत. वाईतील मंदिरे, फुलेनगरचे बगाड व वाईच्या परिसरातील डोंगरावरील सोनजाई देवी, मेणवली (नाना फडणीसांचा वाडा, कृष्णेवरील घाट, मेणेश्वराचे मंदिर, पोर्तुगीज बनावटीची भव्य घंटा इ.) भोगाव येथील वामन पंडितांची समाधी, धोम, (धरण व नरसिंह मंदिर), बावधन (भैरवनाथाचे मंदिर, पांडवलेणी व बगाड यात्रा), मांढरदेवी (काळूबाई मंदिर व पौष पौर्णिमेची प्रसिद्ध यात्रा), भुईंज येथील सहकारी साखर कारखाना, अंबाडखिंड (वाई-भोर रस्त्यावरील), किकली (भैरवनाथ-यादवकालीन प्राचीन कलाकुसरयुक्त शंकराचे मंदिर) ही प्रसिद्ध स्थाने पर्यटकांची खास आकर्षणे होत .
No comments:
Post a Comment