“आतां मी सुखाने मरतों !"
शके १५८२ च्या आषाढ व.१ या दिवशी बाजी प्रभू देशपांडे यांनी श्रीशिवाजी महाराज यांच्या जिवासाठी आपला प्राणत्याग केला!
सिद्दी जोहार उर्फ सलाबतखान हा शिवाजी महाराज ज्या पन्हाळगडावर होते तेथे स्वारीसाठी चालून आला होता. पन्हाळ्याच्या वेढ्याचे स्वरूप बिकट झाले, शिवाजी राजांनी शरणागतीची आणि तह करण्याची हुलकावणी दाखविली; आणि वेढा ढिला पडताच आषाढ शु १५ या दिवशी मध्यरात्री मावळ्यांची एक टोळी यात हिरडस मावलाचे देशमुख असलेल्या बांदलांचे लोक असलेली अशी तुकडी घेऊन शिवाजी राजे शत्रूच्या चौक्या-पहारे चुकवून बाहेर पडले आणि थेट विशाळगडाकडे निघून गेले. सलाबतखानाचा जावई सिदी मसूद व फाजलखान पाठलाग करू लागले. विशाळगडाचा घाट चढत असतां शत्रु पाठलाग करीत आहे असे पाहून शिवाजी राजांनी बाजीप्रभूस सांगितले, "मी किल्ल्यावर जाऊन तोफा ऐकवितों, तोपर्यंत शत्रु या खिंडीत थोपवून धर, शूर वीर बाजी प्रभु खिंडीत उभे राहिले. यवन येऊन भिडले. अनेक हल्ले मागे परतविले गेले. फाजलखान ताजा दमाची तुकडी घेऊन आला. बाजींचे बहुतेक लोक पडले होते. तरी ते निकराने लढत तोफेच्या आवाजाकडे लक्ष देत होते. स्वामिभक्त बाजीला गोळी लागून ते खाली पडले. प्राणोत्क्रमणापूर्वी तोफांचे आवाज ऐकू आले. बाजी प्रभूच्या चेहऱ्यावर समाधान चमकले आपली कामगिरी बजावली, आतां सुखाने मरतों 'असे म्हणून त्यांनी प्राण सोडला.
बाजीप्रभु हे हिरडसचा देश कुलकर्णी. बांदलांचे सरनौबत. त्यांनी शिवाजी राजांना अनेक वेळा मदत केली होती. मोगल, आदिल, सिद्दी, सावंत, आदि शत्रूनी शिवाजी राजांस धेरले असतांना याच शूर वीराने प्राणपणाने शिवरायांना मदत केली. शेवटी आपल्या स्वामीसाठी त्यानी प्राणहि दिलेला पाहून याच्या एकनिष्ठेची साक्ष पटते. यांच्या मृत्यूनंतर उरलेल्या मावळयांनी शत्रूच्या अफाट सैन्याला तोंड देत देत यांचे शव रांगण्यावर नेलें. शिवरायासाठी प्राण देणारे असे जे सवंगडी त्या काळात निर्माण झाले होते त्यांत बाजी प्रभु देशपांडे यांचे नांव प्रामुख्याने चमकणारे आहे.
-
१३ जुलै १९६०
No comments:
Post a Comment