इतिहासातील पहिल्या महिला मराठा सरसेनापतींच्या पराक्रमाची गाथा उमाबाई दाभाडे
इतिहासातील पहिल्या महिला मराठा सरसेनापतींच्या पराक्रमाची गाथा उमाबाई दाभाडे
ज्या काळात स्त्रिया शक्यतो चूल आणि मूल याच जाळ्यात अडकल्या होत्या त्या काळातही अनेक स्त्रियांनी अतुलनीय पराक्रम केले आहेत. आज पाहूया अशीच एक गोष्ट.
आपल्या समाजात फार पूर्वीपासून पुरुषप्रधान संस्कृती अस्तित्वात आहे. पुरुषप्रधान संस्कृतीमुळे अनेक स्त्रियांचे हाल झाले, स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान देण्यात आले. परंतु सध्या हि परिस्थिती फार सकारात्मकरित्या बदलली आहे. आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात आपले गुण सिद्ध करतात आणि बरेचवेळी पुरुषांनादेखील मागे टाकतात.
या बदलाची सध्या आपल्याला सवय जडली आहे त्यामुळे आपण स्त्रियांच्या या बदलत्या गोष्टींकडे बरेच दुर्लक्ष करतो, पण ज्या काळात स्त्रिया शक्यतो चूल आणि मूल याच जाळ्यात अडकल्या होत्या त्या काळातही अनेक स्त्रियांनी अतुलनीय पराक्रम केले आहेत. आज पाहूया अशीच एक गोष्ट. हि कहाणी आहे उमाबाई दाभाडे यांची, ज्यांनी मराठ्यांच्या काळात आपल्या कर्तृत्वाने इतिहासात नावलौकिक मिळविला.
उमाबाई दाभाडे
उमाबाई यांच्या जन्मसालाबद्दल इतिहासात विश्वसनीय नोंद सापडत नाही परंतु, हे नक्की समजते कि त्यांचा जन्म नाशिक मधील अभोणे येथे झाला. उमाबाई या अभोणच्या देवराव ठोके देशमुख यांच्या कन्या होय. कालांतराने उमाबाईंचा विवाह खंडेराव दाभाडे यांच्याशी झाला आणि खंडेराव दाभाडे यांच्या तीन पत्नींपैकी उमाबाई सर्वांत लहान होत्या. तसेच उमाबाई व खंडेराव यांना त्रिंबकराव, यशवंतराव आणि सवाई बाबुराव अशी तीन मुले व शाहबाई, दुर्गाबाई व आनंदीबाई अशा तीन मुली अशी एकूण ६ अपत्ये झाली.
उमाबाईंनी कहाणी
दाभाडे घराणे शिवरायांच्या काळापासूनच मराठ्यांच्या सैन्यात होते. याच घराण्यात जन्मलेले खंडेराव दाभाडे यांच्याशी उमाबाईंचा विवाह झाला. पुण्यानजीक तळेगाव हे दाभाडे घराण्याचे वतनाचे गाव होते. खंडेराव हे मराठा साम्राज्याचे सरदार होते, त्यांच्या अनेक अतुलनीय कामगिरीनंतर त्यांना शाहू राजांकडून सेनापती घोषित केले गेले. बाजीराव पेशवा जेव्हा स्वराज्यविस्ताराचे कार्य करीत होते तेव्हा खंडेराव स्वतः गुजरातच्या मार्गाने कार्य करीत होते. पुढे मग दाभाडे घराण्याकडे गुजरातमधील अनेक प्रांतांचे अधिपत्य आले आणि त्यांनी उत्तमरीत्या ते सांभाळले.
सुमारे १७२९ मध्ये खंडेराव दाभाडे यांचा मृत्यू झाला आणि त्यांचा मोठा मुलगा त्रिंबकराव गादीवर आला. गुजरात कडून मिळणारी चौथ व सरदेशमुखी हे दाभाडे घराण्यासाठी महत्वाचे उत्त्पन्न साधन होते परंतु पेशवा बाजीराव व त्रिंबकराओ यांच्यात याच गुजरातच्या विषयावरून वाद झाले पुढे हे वाद विकोपाला गेले आणि डभोई येथील लढाईत सुमारे १७३१ मध्ये बाजीरावांनी त्रिंबकरावांना पराभूत करून ठार केले. पती गेला, आता मोठा मुलगाही गेला मग प्रश्न होता आता दाभाडे घराण्याची गादी चालवावी कोणी ?
उमाबाईंना एकूण ३ मुले, त्यातील एकाचा मृत्यू झाल्याने आणि इतर दोन्ही मुले वयाने लहान असल्याकारणाने त्यांच्याकडे हि जबाबदारी सोपविता येत नव्हती. या परिस्थितीमुळे घराणे व वतन दोन्ही वाऱ्यावर आले होते. घराण्यात कोणीही वतन संभाळण्यायोग्य नसल्यामुळे दाभाड्यांचे वतन नाहीसे होण्याच्या मार्गावर होते. एकंदरीत पाहता आता उमाबाईच घरातल्या मुख्य आणि कर्त्या स्त्री म्हणून राहिल्या होत्या. साहजिकच त्यांच्यावरील जबाबदाऱ्या वाढल्या होत्या म्हणूनच त्यांनी आणखीन एक महत्वाचा निर्णय घेतला आणि तो म्हणजे स्वतः वतन सांभाळणे होय.
उमाबाईंनी हे मोठे आव्हान स्वतः घेतले आणि समर्थपणे पेलले देखील. त्यांनी घरदार तर संभाळलेच, शिवाय दफ्तरीचे कामकाज पहिले, सेनेचे नेतृत्व देखील केले, वेळप्रसंगी स्वतः सैन्यासोबत लढाईत उतरून लढल्या सुद्धा. एक स्त्री असून त्या काळात असे धाडस करणे हे फार मोठे पाऊल होते. त्यांचे शौर्य, कर्तव्यदक्षपणा आणि कामकाज लक्षात घेऊन शाहू महाराजांनी त्यांना सरदार केले आणि उमाबाई दाभाडे आता सरदार उमाबाई दाभाडे झाल्या. त्यांना सरसेनापती व सेना सरखेल हे अधिकार देखील देण्यात आले.
उमाबाई दाभाडे या मराठ्यांच्या पहिल्या महिला सरसेनापती झाल्या. एक स्त्री म्हणून उमाबाईंचे धाडस खरंच कौतुकास्पद आहे. परंतु उमाबाईंच्या या निर्णयाला सगळ्यांचेच समर्थन होते असे नाही, अनेक वेळा अनेक प्रकारचे विरोध उमाबाईंना झाले. पुढे जेव्हा रामराजे सत्तेवर छत्रपती म्हणून आले परंतु ते नामधारीच राहिले आणि त्यांच्या अनेक सरदारांनी उमाबाई एक स्त्री आहेत म्हणून त्यांना कमी लेखून त्यांच्या अधिकारातील बराचसा प्रदेश कमी करण्याचा प्रयत्न केला. इतके विरोध होऊनही उमाबाईंनी आपले वर्चस्व टिकवून ठेवले.
उमाबाईंचा संघर्ष
पेशवा बाजीरावांमुळे उमाबाईंचा मोठा मुलगा मारला गेला होता त्यामुळे साहजिकच उमाबाईंचा बाजीरावांवर राग होता परंतु नाईलाजाने त्यांना बाजीरावांशी सोबत करणे भाग होते. छत्रपती राजाराम दुसरे यांच्या काळात पेशवा होते बाळाजी बाजीराव आणि याच काळात त्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते म्हणून त्यांनी दाभाडे घराण्याशी करार करून त्यांच्या मिळकतीत हक्क दाखविला आणि दाभाड्यानां अडचणीत आणले. या कराराला विरोध करून देखील उमाबाईंचा प्रयत्न असफल झाला.
या लढ्यात उमाबाईंना साथ मिळाली ती म्हणजे छत्रपती ताराराणींची. ताराराणींना देखील पेशव्यांबद्दल राग होता म्हणूनच त्यांनी उमाबाईंशी संधान बांधले आणि परस्परांना मदत करण्याचे आश्वासन दिले. उमाबाईंनी इतके वाद असूनही लढाई करण्याचे विचार बाजूला ठेवले होते व चर्चेवर भर देण्याकडे त्यांचा कल होता. त्यांचे समजूतदारीचे अनेक प्रयत्न फोल गेले परंतु तरीही उमाबाईंनी एक शेवटचा प्रयत्न म्हणून आपल्यातर्फे महादेव निरगुडे यांना सलोख्याची बोलणी करण्यासाठी पेशवे दफ्तरी धाडले परंतु पेशव्यांनी हि देखील विनंती धुडकावून लावली.
याउपरही उमाबाईंही स्वतः आळंदी येथे पेशव्यांची भेट घेतली व हा करार आमच्यावर जबरदस्तीने लादला गेला असून आम्हाला तो मान्य नाही त्यामुळे, हा करार रद्द करण्यात यावा असा दावा केला परंतु, हा दावा झुगारून लावत पेशवा दाभाडे घराण्याच्या गुजरात मधील मिळकतीमधील अर्ध्या हिस्स्याच्या मागणीवर अडून राहिले. आता मात्र सलोख्याचे प्रयत्न करून भागण्यासारखे नव्हते, काहीतरी ठोस कृती गरजेची होती.
पेशव्यांविरुद्ध उमाबाई
सलोख्याचे सर्व प्रयत्न व विनंत्या धुडकारून लावल्याने आता उमाबाईंनी लढाईचा मार्ग स्वीकारला. आधीच ठरलेल्या करारानुसार ताराराणीसाहेब देखील त्यांच्या सोबत होत्या. पेशवा बाळाजी बाजीराव मुघल मोहिमेवर गेले असता अतिशय चलाखीने सुमारे १७५० साली ताराराणींनी छत्रपती राजाराम (दुसरे) यांना कैद केले. ताराराणींच्या मदतीला पुढे उमाबाईंनी आपले मराठा व गुजरात असे दुहेरी सैन्य दमाजी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पाठविले. सुरुवातीला यश पदरी येत होते परंतु, पुढे परिस्थिती उलटी झाली आणि दमाजी जाळ्यात अडकले आणि कृष्णा नदीच्या नजीक दरीत फसले गेले.
दमाजी गायकवाडांना ताब्यात घेतले गेले आणि पेशव्यांशी करार करण्यास त्यांना दबाव टाकण्यात आला व करारानुसार गुजरातेतील अर्धा वाटा व या केलेल्या हल्ल्याची नुकसानभरपाई म्हणून मोठी रक्कमदेखील मागितली. दमाजींनी या मागणीला विरोध केला. पेशव्यांनी दमाजींना त्यांच्या परिवारासकट कैद केले, पाठोपाठ उमाबाई व त्यांच्या परिवारातील काही सदस्यांना देखील कैद केले गेले. परिणामस्वरूप दाभाडे घराण्याची जागीर परत घेतली गेली व त्यांचे सेनापती हे पद देखील हिरावले गेले.
२८ नोव्हेंबर १७५३ रोजी नाडगेमोडी, पुणे येथे उमाबाईंचा मृत्यू झाला. आजही तळेगाव येथे त्यांची समाधी आहे. पेशव्यांशी लढण्यात त्यांना यश आले नाही पण एक स्त्री म्हणून तेव्हाच्या काळात परिवारासोबत इतक्या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडणे खरंच कठीण काम होते. या सगळ्या विरोधांना, संकटाना मात देत आपल्या पतीच्या पश्च्यात उमाबाईंनी जवळजवळ २० वर्षे आपली सत्ता सांभाळली. स्त्री शक्तीला कमी लेखणार्यांना उमाबाई दाभाडे हे नेहमीच एक उत्तम उदाहरण राहतील.
मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Subscribe to:
Post Comments (Atom)
“कोरलाईचा किल्ला”.
१३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...
-
११ माशी अक्करमाशी असा उल्लेख असा येतो. आपण प्राचीन क्षत्रियांचे वंशज आहों असें मराठे म्हणतात. प्रचारांतल्या त्यांच्या आडनांवा...
-
## धनगर व माळी समाजातील लढवय्ये ## दामाजी थोरात postsaambhar:Udaykumar Jagtap ## ## ## नायगाव ,तालुका -पुरंदर जिल्हा -पुणे , गा...
-
*राणूबाई भोसले-जाधव* राणूबाई म्हणजे शंभूराजांची दुसरी आईच.शंभूराजांचा जन्म झाला त्या दिवशी बेभान होणाऱ्या म्हणजे "राणूबाई".त्यां...
No comments:
Post a Comment