विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 28 July 2020

यावनी आक्रमण: भाग २





यावनी आक्रमण: भाग २

postsambhar :Prashant Babanrao Lavate-Patil... ___________________

जर आपण भाग-१ वाचला नसेल तर खाली दिलेल्या लिंकवर आपणास तो वाचायला मिळेल.
भाग-२ वाचण्या आगोदर भाग-१ नक्की वाचून घ्यावा. भाग-१ ची लिंक खाली दिलेली आहे.
https://m.facebook.com/groups/1770059159878452?view=permalink&id=1993525404198492
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
यावनी आक्रमण भाग-१ मध्ये आपण पाहिले, की भारताच्या वायव्य सरहद्दीवर जी प्रामुख्याने तीन हिंदू राष्ट्रे होती त्यामध्ये काबुल आणि झाबुल यांनी अरबांना जवळ-जवळ अडीचशे वर्षे कडवी झुंज दिली. परंतु अंतर्गत कलह आणि दुबळे नेतृत्व यामुळे याकूब लायेथ या एका डाकूच्या हातून ही दोन्ही राष्ट्रे संपुष्टात आली. आता एकमेव हिंदू राष्ट्र उरले होते ते म्हणजे "सिंध".
काबुल आणि झाबुल जिंकल्यावर अरबांचे लक्ष सिंधकडे जाणे हे स्वाभाविक होते. सिंध म्हणजे भारताचे प्रवेशद्वार किंवा भारताचे नाकच म्हणा. सिंध भागात घुसण्यासाठी दोन मार्ग होते. एक जमिनीवरचा जो खैबरखिंडीतून खुष्कीचा मार्ग आणि दुसरा म्हणजे समुद्री मार्ग जो पश्चिमी समुद्रातून होता. अरबांनी सिंधवर दोन्ही मार्गांनी स्वाऱ्या केल्या.
सिंधची राजधानी त्यावेळी 'अलोर' येथे होती. राज्याचा विस्तार म्हणजे अवाढव्य होता. इथे साहसी नावाचा राजा होता जो मौर्यवंशीय होता असे सांगितले जाते. सातव्या शतकाच्या सुरुवातीला 'पहिला साहसी' राजा इराणच्या मिमरुज नावाच्या सरदारकडून मारला गेला. पुढे त्याचा मुलगा 'रायसाहसी दुसरा' हा गादीवर आला परंतु त्यावेळी सिंधमध्ये राज्यक्रांती झाली. चच नावाच्या प्रधानाने त्याला ठार मारून स्वतः गादीवर आला. त्याने बराच पराक्रम करून सिंधच्या सीमा चारीबाजूला वाढवल्या व अनेक बंडखोरांचा नायनाट केला. पुढे इ. स. ६७२ च्या सुमारास चच मरण पावला. गादी मिळवण्यासाठी त्याच्या मुलांमध्ये संघर्ष झाला व शेवटी "दाहर" नावाचा मुलगा गादीवर आला.
अरबांनी ज्यावेळी काबुल- झाबुल नंतर आपला मोर्चा सिंधकडे वळवला त्यावेळी सिंधचा राजा होता "दाहर". अंतर्गत कलह, यादवी युद्धे यामुळे राज्याची परिस्तिथी कमकुवत झाली होती. अरबांचे आक्रमण थोपवण्याचे सामर्थ्य दाहर मध्ये उरले नव्हते. याचा फायदा अरबांनी घेण्याचे ठरवले. याकाळात बगदाद येथे खलिफा वालीद राज्य करत होता. त्याला भेटण्यासाठी काही मुसलमान यात्रेकरू बहुमोल खजाना घेऊन सिंधूसागरातून इराणकडे जात होती. वादळी वारे सुरू झाल्यामुळे त्यांची जहाजे सिंधू नदीच्या पश्चिमेस असलेल्या देबल बंदरात केवळ सुरक्षिततेसाठी थांबली होती. परंतु समुद्री लुटारूंनी ही जहाजे लुटली. देबल बंदरात त्यांना सुरक्षा मिळायला हवी होती जी तिथल्या अधिकाऱ्यांची जबाबदारी होती पण तसे झाले नाही. ही गोष्ट ज्यावेळी खलिफाला समजली त्यावेळी इराणचा सुभेदार हज्जाज याने सिंध राजा दाहरकडे नुकसानभरपाई मागितली पण ती देण्यास दाहरने नकार दिला. हे कारण पुढे करून अरबांनी सिंधविरुद्ध मोहीम सुरू केली. काही ठिकाणी याला हिंदूविरुद्ध जिहाद पुकारला असे नमूद केले आहे. या मोहिमेची सूत्रे होती मुहम्मद बिन कासीम याच्याकडे जो हज्जाजचा भाचा व जावई होता.
६००० (काही ठिकाणी १५००० उल्लेख आहे जिथे दाहर राजाचे सैन्य १ लाख होते असे सांगितले जाते) अरब घेऊन त्याने देबलवर हल्ला केला. 'लोलगदा' व 'भडिमार' या यंत्रांच्या साह्याने त्याने किल्ल्याची तटबंदी पाडण्यास सुरवात केली तरीही दाहरने देबलच्या रक्षणासाठी मदत पाठविली नाही. परिणामी, देबल दाहरच्या हातून गेले. देबलवर कबजा मिळताच कासीमचे लोक शहरात घुसले. बघता बघता कासीमने संपूर्ण राज्यात धुमाकूळ घालायला सुरवात केली आणि शेवटी तो राजधानीत घुसला. इथे मात्र हिंदू सैन्यांनी जबरदस्त प्रतिकार केला आणि अरब सैन्यांची दाणादाण उडवली. एकवेळ अशी आली की कासीमला माघार घेऊन पळून जावे लागेल. पण दुर्दैव होते ते दाहरच्या सैन्यांच्या मानसिकतेचे. दाहरला लढताना एक बाण लागला आणि तो खाली पडला आणि सैन्य सैरावैरा पळू लागले.
■ दाहरची राणी "महाराणी लाडी":
भारताच्या इतिहासात स्त्रियांनी तलवार हातात घेऊन राज्य राखण्यासाठी शत्रूला अंगावर घेतले हे बहुदा सिंधमध्ये पहिल्यांदाच घडले असावे. दाहर जखमी होऊन लढता-लढता मरण पावला. कासीमला विजय पुढे दिसत असतानाच एक रणरागिणी मैदानात उतरली आणि अरबांना तिने सळो की पळो करून सोडले. एक महाराणी आपल्या राजाच्या मृत्यूनंतर रणांगणात उतरली हे पाहून आणि तिचे रौद्ररूप पाहून एकवेळ कासीम सुद्धा आश्चर्यचकित झाला असावा. आपली महाराणी मैदानात लढते आहे हे पाहून सैन्य सुद्धा जिकरीने लढत होते परंतु अरबांच्या ताकदीपुढे महाराणी लाडीचे काही चालले नाही. पराजय पुढे दिसताच अरबांच्या अत्याचाराला बळी जायचं नाही आणि आपली निष्ठा व परंपरा या खातीर तिने शेवटी जोहार केला. आणि एका पराक्रमी महाराणीचा अंत झाला.
या युद्धामध्ये "महाराणी लाडी" सोबत राजा दाहरची बहीण "पद्मा" ही सुद्धा रणांगणात लढत होती असे काही ठिकाणी उल्लेख आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~~~~~~~~~~
■ कासीमच्या आक्रमणाच्या अनुषंगाने दोन गोष्टी सांगितल्या जातात ज्या सिंधच्या पराभवाला कारणीभूत ठरल्या.
१) देबलमध्ये एक मंदिर होते ज्याच्या कळसावर एक ध्वज होता. आणि त्या ध्वजात काही मंत्रसाधन केले होते आणि जोवर तो ध्वज शाबूत आहे तोवर देबल बंदर सुखरूप आहे असे मानले जाई. हे कळताच, कासीमने तो ध्वज कळसासकट पाडला आणि यामुळे तिथली जनता कासीमला स्वतःहून शरण गेली.
२) दाहरचे सैन्य कासीमला जोरदार प्रतिकार करत होत. मागे हटायचे नाव घेत नव्हत. ज्यावेळी कासीमला युद्ध जिंकणे अवघड वाटू लागले त्यावेळी एका मंदिराचा पुजारी फितूर झाला आणि त्याच्या मदतीमुळे कासीम युद्धामध्ये पून्हा वर्चस्व मिळवू शकला.
३) दाहरच्या सेनेपुढे कासीमच्या सेनेचे काहीच चालेना. दाहरच्या सेनेत आपले लोक घुसवण्यासाठी कासीमने आपले काही सैन्य हिंदू स्त्रियांच्या वेशभूषेत दाहरकडे पाठवले व त्यांनी दाहरला विनंती केली की अरबांपासून आमचे रक्षण करावे. हे पाहून, राजा दाहरने त्यांना आपल्या सैन्याच्या मध्यभागी ठेवले व त्यांच्या रक्षणाचे वचन दिले. स्त्रियांच्या रुपात लपलेले अरबांना सुरक्षित स्थळी घेऊन जात असताना त्यांनी राजा दाहरच्या सेनेवर अग्नीबानाचे हल्ले केले ज्यात दाहर जखमी होऊन खाली पडला आणि खाली पडताच राजा दाहरचे अरबांनी तुकडे तुकडे केले.
यानंतर कासीमने जो अत्याचार केला तो काळजाचा थरकाप उडवणारा होता. एखादा मनुष्य एवढाही क्रूर असू शकतो हे कदाचित या भारतीय जनतेने प्रथमच पाहिले असावे. या स्वारीची वर्णने जी उपलब्द आहेत त्यावरून कासीमने इथे आल्यावर नेमके काय केले याची माहिती मिळते.
• मंदिरांचा विध्वंस करणे • अगणित लोकांच्या कत्तली करणे • बायका व तरुण लोकांना गुलाम म्हणून कैद करणे • स्त्रियांवर शारीरिक अत्याचार करणे • स्त्रियांना गुलाम म्हणून पळवून नेण्यात आले • प्रजेवर जिझिया कर बसवणे • संपूर्ण राज्याची अक्षरशः राख रांगोळी केली
हे सर्व व त्याहून अधिक भयंकर प्रकार त्याने केले. सुदैवाने कासीम सिंध प्रांताअलीकडे आला नाही त्यामुळे त्याच्या स्वारीचे परिणाम व नुकसान भारताच्या इतर भागाला भोगावे लागले नाहीत. आणि ज्यांनी ज्यांनी कासीमला खंडणी देण्याचे मान्य केले त्यांचा छळ त्याने केला नाही. त्यामुळे कासीमची स्वारी इतर इस्लामी आक्रमानांच्या तुलनेत जास्त नुकसान न करणारी वाटते.
~~~~~~~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~~~~~~~~~~
■ दाहरच्या मुलींचा मुत्सद्दीपणा
दाहरराजाच्या दोन मुली कासीमच्या हाती सापडल्या. कासीमने दाहर राजाचे डोके आणि त्याच्या दोन मुली 'सूर्यदेवी' आणि 'परमालदेवी' या दोघींना कैद करून कासीमने खलिफाला भेट म्हणून पाठवले. ज्यावेळी खलिफा या दोघींना जवळ घेण्यासाठी पुढे सरकला त्यावेळी या दोन्ही मुलींनी खलिफाला सांगितले की "कासीमने आम्हाला तुमच्यासाठी भेट म्हणून पाठवण्या आगोदर आमचं पावित्र्य नष्ट केले आहे". हे ऐकून खलिफा भडकला आणि आपल्या दूतांना सांगून कासीमला चामड्याच्या पोत्यात घालून आपल्या पुढे हाजीर करण्याचा आदेश दिला. यात कासीमचा मृत्यू झाला. या डावपेचातुन या दोघींनी कासीमचा मृत्यू घडवून आणला आणि बापाच्या मृत्यूचा बदला घेतला. शेवटी, स्वतःला खलिफापासून वाचवण्यासाठी या दोघींनी एकमेकांना मारून टाकले.
~~~~~~~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~~~~~~~~~~
काबुल, झाबुल आणि सिंध ही हिंदू राष्ट्रे अरबांनी पूर्णतः संपवली. या दोन भागात हा इतिहास संक्षिप्तपणे मांडण्याचा प्रयत्न केला. जर यावर विचार केला तर हिंदूंनी प्रतिकार केला नाही असे अजिबात नाही. खूप कडवा प्रतिकार केला आणि अनेकवेळा अरबांना धूळसुद्धा चारली. पराक्रमात हिंदू कुठेच कमी पडले नाहीत. असे असूनही मग ही हिंदू राष्ट्रे का संपुष्टात आली हा विचार करण्यासारखा विषय आहे. या पराभवाची कारणमीमांसेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगळेपण लपले आहे असे मला इथे प्रामुख्याने नमूद करावेसे वाटते.
अरबांना जेवढा कडवा प्रतिकार काबुल, झाबुल आणि सिंधने दिला तेवढा प्रतिकार कधीच कोणत्या राज्याने केलेला आढळत नाही. आशिया, युरोप व आफ्रिका खंडातील राज्ये अरबांना अगदी सहजपणे बळी पडले. अरबांच्या विरुद्ध काबुल-झाबुल सव्वा दोनशे ते अडीचशे वर्षे लढले. सिंध ७५ वर्षे लढले. पंजाब १५६ वर्षे लढले. याउलट सीरिया एका वर्षात कोसळले (इ. स. ६५६). इराणचे बलाढ्य साम्राज्य पाच वर्षात धुळीस मिळाले. इराक लढलेच नाही. विशेष म्हणजे अरबांनी जी जी राष्ट्रे जिंकली तिथली संस्कृती धुळीस मिळवली, धर्म पूर्णपणे नष्ट केला परंतु हे त्यांना भारतात जमले नाही.
क्रमशः
#यावनी_आक्रमण #अरब_तुर्क_आक्रमण #जागर_इतिहासाचा #प्रबल

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...