'' तिन्हीसांझा टळून गेल्या. सूर्य पश्चिम क्षितिजावर रेंगाळू लागला. पन्हाळा पर्वताची अवाढव्य सावली पूर्व दिशेला गडाच्या पायथ्याशी वसलेल्या गावांवर, वाड्यावस्त्यांवर पसरू लागली. तिथले गावकरी आपली गुरेढोरे, चीजवस्तू यांसह केव्हाच गांव सोडून निघून गेले होते. त्यांच्या घराचा ताबा घेतलेला. गडाभैती त्यांचे हजरो तंबू ,राहुट्या उभ्या होत्या. छावणीत सहस्रावधी लोकांचा गोंधळ-गलका लगबग सुरु होती. माऱ्यासाठी मोक्याच्या ठिकाणी काळ्या कुरुंद तोफा लावलेल्या. मोरच्यांसाठी लावलेल्या खंदकात शिपाई अंग चोरून बसलेले. किल्याच्या सज्याकोठीत उभे असलेले धिप्पाड नि उंच सावल्या रंगाचे कपाळ भव्य नि भुवया जाड नाक सरळ नि पिळदार मिश्या असणारे संताजी वरून हे सारं दृष्य पहात होते.त्यांचे डोळे विलक्षण बोलके होते आणि नजर समसेरीच्या पाट्यासारखी धारदार. त्यांच्या उजव्या भरीव शिसवी मनगटात सोन्याचं कडं होतं अंगावर दागिना काय तो एवढाच. बाकी घडीव शिल्पासारखं त्यांच शरीर हाच एक दागिना होता. अंगात सैल बाराबंदी नि खाली तंग मांडचोळणा त्यांनी घातलेला. डोक्याला बाकदार मराठमोळी पगडी होती. दमदार चालीने ते निघाले की उघड्या रानातून निर्भयपणे जाणाऱ्या सिंहाची आठवण व्हावी असा त्यांच्या देहाचा दिमाख होता. ओल्या चिखलाच्या थरासारखी दाट शांतता सगळीकडे पसरली. रातकिडे किर्रर्र करू लागले.अंधारात आसंख्य काजवे रानभर उडू लागले. शत्रूच्या छावणीत पेटलेल्या हजारो मशालींचा तंबूत उजेड आसमंतात थरथरू लागला. हाती काकडा घेऊन उभा असलेल्या दिवट्या ने विचारले ''धनी,निघायचं न्हवं ? ''कारे तुला का एवढी घाई झालीय ?'' ''अजून अख्या गड फिरायचाय. पहारे तपासायचेत. बिघीध्याने ही कामं उरकून घेतलेली बरी. ''बरं, चल. हो पुढे.'' दोघे निघाले.
तेवढ्यात सज्जाकोठीच्या जिन्यात कुणाची तरी पावलं वाजली. संताजींनी थांबून कानोसा घेतला. जिन्याच्या पायऱ्या लगबगीने चढत कोकनोबा वर येत होता. तो चांगलाच घाबरलेला दिसला. ''काय रे कोकनोबा, तुझा चेहरा असा पडलाय का ?'' ''दाजी घात झालाय घात!'' तो ओरडला. शेख निजाम चार हजार जमावानीशी संगमेश्वरकडे दैडत सुटलाय. ''काय सांगतोस ?''संताजी जवळ जवळ किंचाळलेच. ''एकदम पक्की खबर राज अजून संगमेश्वरलाच थांबल्यालं दिसत्यात. रायगडकडं निघायचं म्हणून सोबतचा जमावही पुढं घडलाय म्हण त्यांच्याकडं फौज बेताची हाय.'' जमिनीत पाय रुतावेत तसे संताजी क्षणभर निश्चल उभे राहिले. ही भलतीच बिलामत भुतासारखी अचानक अंगावर आल्यामुळे काय करावं ते क्षणभर त्यांना सुचेना. मग पायऱ्या उतरून ते खाली धावले आणि घोड्याच्या पाठीवर झेप घेऊन तसेच भन्नाट आपल्या वाड्याकडे दैडत सुटले. ''आबा... आबा'' अशी हाक मारत ते वाड्यात शिरले. जेवणखाण आटोपून म्हालोजीबाबा नुकतेच बैठकीच्या खोलीत येऊन बसलेले. अडकीत्याने कातरलेली सुपारी तोंडात टाकून ते पानाला चुना लावत होते. धावत आलेल्या संताजीकडे पाहत त्यांनी विचारलं, '' काय रे, काय झालं ? भूतानं पाठ धरल्यासारखी अशी पळापळ का करतोस ?'' '' आबा वैऱ्याने वेळ साधली.'' ''कसली वेळ ? कुठला वैरी ? नीट उमज पडेल असं बोल की.'' ''शेख निजाम फौजेसह संगमेश्वराकडे निघालाय.'' ''ऑ ?'' ते ऐकताच चटका बसावा तसे म्हालोजी आपला देह सावरत उठले.
''मायला त्या शेख निजामाच्या. त्याची ही हिंमत! उतरू दे त्याला कोकणात.मलकापूरची पाच हजार पागा अन खेळण्याचा जमाव घेऊन मागनं जाऊन त्याचा बुक्का उडवू आपण.'' ''तेवढा वेळ कुठं आहे आबा ? इथली शिबंदी घेऊन आपल्याला निघावं लागेल.तेही आता लगेच.'' ''अरे पण शिबंदीतले सोबत किती लोक घ्यायचे आणि गड झुंजवायला किती लोकं ठेवायचे ?'' ''राजांपुढं गडाची काय मातबरी आबा ? तो गेला ? तर जाऊ द्या. पुन्हा आपण जिंकून घेऊ.'' ''ते ही खरंच म्हणा. चल!'' दोघे वाड्यातून बाहेर पडले. शिबंदीतले पाचशे निवडक स्वार वेगळे काढुन म्हालोंजींनी गडकऱ्याला फर्मावलं, ''या लोकांसह आम्ही गड उतरू.राहिलेली शिबंदी घेऊन तुम्ही झुंज द्या.'' गडकरी भांबवला. मूठभर मावळ्यांना घेऊन पन्हाळ्यासारख्या अजस्त्र किल्ला कसा लढवायचा हा प्रश्न त्याच्या समोर आ वासून उभा राहिला. बाबांनी त्याला धीर दिला. '' एकदम असं दिल टाकू नका गडकरी. तुमच्या हिमतीपुढं गनिमाचा हिसाब तो काय ? '' ''ते खरं पण त्यांनी एकदम एल्गार केला तर... ?''
'' तर काय ?'' बाबा कडाडले. '' लढत लढत कटून मरा. मराठ्यांच्या अवलादीला झुंजत मरावं कसं ते सांगायची वेळ आजवर कधी कुठल्या सरनौबतावर गुदरली नाही हे ध्यानी धरा.''त्यांची रागीट नजर पाहून गडकरी गारठला. दोन पावले मागे सरत तो म्हणाला, ''जशी आपली आज्ञा. विवाची कस्त करू पण जितेपणी गणिमाला गडाची पायरी चढू देणार न्हाई.'' '' शाब्बास रे मर्दा! आता कसं बोललास बरं!'' घोड्यावर स्वार होताच हवेत हात उंचावून बाबांनी गर्जना केली, ''जय भवानी...!चला.'' त्यांनी इशारा करताच ५०० स्वारांचे पथक गडाच्या पश्चिम दरवाज्यातून वादळासारखे बाहेर पडले.
''संदर्भ - मावळ्यांचा इतिहास लेख -प्रविण म्हात्रे
'पेण-रायगड ''सहयाद्री माझा''
No comments:
Post a Comment