छ.शिवाजी महाराजांचा कालखंड केवळ महाराष्ट्र नव्हेतर संपूर्ण भारतातील विविध प्रांतातील तत्कालीन राजकीय , सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रावर स्वतंत्र प्रभाव निर्माण करणारा कालखंड आहे. या कालखंडातील शिवाजी महाराजांच्या शासन मुल्यांचा अप्रत्यक्ष प्रभाव आधुनिक काळातील लोकशाही व्यवस्थेतील प्रशासनावर पडल्याचे देखील दिसून येते किंवा यास असेही म्हणता येईल की, आजच्या राजकीय काळातील लोकशाही मुल्यांचा स्रोत म्हणून म्हणूनच शिवाजी महराजांचे कार्य आणि त्यांची स्वराज्याची स्थापना ही घटना समस्त भारतीयांसाठी प्रेरणादायक अशी आहे. शिवाजी महाराजांचे साम्राज्य कांही मोजक्या प्रदेशावरच होते, असे म्हणणा-यांचा शिवकाळाच्या प्रभावाचा व्यापक परीप्रेक्षात अभ्यासच केला नसल्याचे दिसून येते. उत्तर भारतात बुंदेलखंड, दक्षिणेत जींजी म्हणजे कर्नाटक, तंजावर म्हणजे तामिलनाडू ते पुर्ण पश्चिम समुद्र किनारा या भागातही शिवाजी महाराजांच्या कार्याची आणि स्वराज्याची व्याप्ती होती
आधुनिक कालखंडात सन १८५७ च्या उठावानंतर ब्रिटिशांची सत्ता या देशावर मजबूत झाली. तेव्हा ब्रिटिशांनी तीन प्रांताकडे त्यांच्या राज्यकारभाराच्या सोईसाठी आवर्जून खास लक्ष दिले, ते म्हणजे बंगाल, महाराष्ट्र व पंजाब ! पण याच प्रांतात ब्रिटीशांनी आणलेल्या शैक्षणिक वातावरणातून स्वातंत्र्याचे स्फुलिंग निर्माण झाले, हे ही वास्तव आहे!
महाराष्ट्र व बंगाल प्रांतातील पुढारलेल्या शैक्षणिक वातावरणामुळे सुधारणावादी, प्रबोधनात्मक चळवळी स्थापन झाल्या. म्हणुन हया प्रांतातून अनेक अनेक सुधारणावादी, प्रबोधनकार, साहित्यिक, नेते, समाजसुधारक मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले.
पंजाब ,बंगाल आणि स्वाभाविकपाने महाराष्ट्र या तीन्ही प्रांतातील जनमानसावर शिवाजी महाराज यांच्या कार्य कर्तृत्वाचा प्रभाव आहे शिवाय अनेकांचे ते प्रेरणास्थान आहेत, हे बंगाल , पंजाब आणि महाराष्ट्रातील अनेक ग्रंथातून ,साहित्यकृतीतून आणि काव्यातून देखील दिसून येते. बुंदेलखंडातील छत्रसाल, कर्नाटकातील चिनम्मा या मध्ययुगीन राज्यकर्त्यावर शिवरायांच्या कार्याचा प्रभाव होता तर आधुनिक काळातील भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील सशस्त्र क्रांतीकारक प्रामुख्याने शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होते. त्यात भगत सिंग , कर्तार सिंग, चंद्रशेखर आझाद यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल कारण या सर्वांनी शिवाजी महाराजांना त्यांचे प्रेरणास्थान मानलेले आहे. एका संशोधनानुसार भगत सिंग यांनी महाराष्ट्रात येवून शिवाजी महाराजांचे स्मरण करून रायगड किल्ल्यास खास भेट दिली होती असे म्हटले जाते!
मध्ययुगीन कालखंडातील अनेक सत्ताधीशांपेक्षा शिवाजी महाराज पूर्णतः वेगळे आहेत आणि त्यांचे हेच वेगळेपण त्यांच्या कारकिर्दीचा आधुनिक काळाशी असणारा संदर्भ (Modern relevence) स्पष्ट करणारे आहे. कारण त्यांनी त्यांच्या राजकारभारात रुजवलेली मुल्ये आज भारतीय राज्य घटनेतील मुल्यांच्या अंमलबजावणीत आणि देशातील आधुनिक संसदीय लोकशाही व्यवस्थेतील शाषण आणि प्रशानानाच्या आकलनासाठी अत्यंत उपयोगाची ठरणारी आहेत. हीच बाब त्यांच्या युध्दनितीबाबतही आहे. शिवाजी महारजांनी विकसित केलेली युद्धनीती आणि सागरी संरक्षण सिद्धता , ही आजच्या आधुनिक काळातील भारताच्या संरक्षण धोरणाची मुलाधार बनलेली आहे. शिवाजी महाराजांचा 'Father of Indian Navy' हा उल्लेख याचेच प्रतिक आहे.
शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या मुळ संकल्पनेचे जनक शहाजीराजे भोसले हेच होते! त्यांनी मध्य युगातील अत्यंत कठीण काळात स्वराज्याची संकल्पना मांडली व तिचं प्रारूप अगदी प्राथमिक अवस्थेत का असेना दक्षिणेत निर्माण केलं. मुघल, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही यांच्यातील आपापसातील संघर्षात मिळालेल्या या उसंतीचा व राजकीय रिक्ततेचा वापर शहाजीराजे यांनी अत्यंत मुत्सद्दीपणे केला. प्रत्यक्ष मुघल सत्तेसही शहाजीराजांच्या कर्तृत्वामुळे त्यांच्यासोबत समान पातळीवर विचार करावा लागला होता, हे शहाजहान आणि शहाजी राजेंच्या भेटीच्या प्रसंगातून स्पष्ट होते.
शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या या प्रारुपास प्रत्यक्षात अवतीर्ण करून शहाजी महाराजांचे 'हिंदवी' स्वराज्याचे स्वप्न पुर्ण केले! त्यांच्या आयुष्यातील प्रतापगडचा महासंग्राम, पावनखिंड, आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानास त्यांनी दिलेली मात या बाबीचा एकूण कालावधी अत्यल्प असा आहे.मात्र हाच कालावधी लोकांच्या मनावर जास्त ठसलेला आहे. शिवरायांनी केवळ शौर्य आणि पराक्रमातून हे साम्राज्य स्थापेलेले नसून, त्या साम्राज्याच्या प्रक्रिये दरम्यानच त्यांनी स्वराज्यातील शासनपद्धतीचा मुलभूत विचार केला होता. हे त्यांचे दृष्टेपण होते व ते केवळ मध्ययुगीन काळापुरते मर्यादीत नव्हते तर स्वराज्य आणि स्वातंत्र्य यांच्या आधुनिक काळातील अर्थाशी साधर्म्य असणारे स्वातंत्र्य त्यांनी साधलं होतं. म्हणून भारतीय राज्यघटनेतील विविध स्वातंत्र्याचे अधिकार आणि सामाजीक न्याय याचा मूलस्रोत समाजमनात शिवकालापासून रुजलेल्या समताधिष्ठित स्वातंत्र्याच्या भावनेत देखील यशस्वीपणे शोधता येतो!
गुरूदेव रवीन्द्रनाथांनी शिवरायांवर 'जयतु शिवाजी' हे काव्य लिहीलेले आहे, ते काव्य शिवाजी महाराजांना समस्त भारतीयांचा राष्ट्रनेता या स्वरूपात पाहणारे आहे. याच रवीन्द्रनाथांच्या “Where the mind is without fear and head is held high” या कवितेत राष्ट्राची कल्पना स्पष्ट करताना 'भयशून्य समाजनिर्मिती' हा राष्ट्राचा मूलाधार असल्याचे म्हंटलं आहे. जवाहरलाल नेहरूंच्या 'Tryst with destiny' या भाषणात Freedom comes with responsibilty and freedom means fearless society' असाच अर्थ ध्वनित केला आहे. शिवरायांनी स्थापन केलेल्या साम्राज्याचा प्रमुख आधार भयशून्य समाज निर्मिती हाच होता. त्यांनी तत्कालीन समाजाला निर्भय बनवलं, स्वाभिमानी बनवलं! यातून जी समाजनिर्मिती झाली. तीने पुढील काळात साम्राज्यवादी ब्रिटिशांशी लढण्याची सुध्दा प्रेरणा दिली! त्यामुळे शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचं महत्व निव्वळ मध्ययुगीन काळातील ठराविक कालखंडापुरते आणि ठराविक प्रांतापुरते मर्यादित कधीच नव्हते, हे अधोरेखित होते.
शिवाजी महाराज त्यांच्या काळात देशातील समस्त हिंदूंच्या स्वातंत्र्याचे व स्वाभिमानाचे प्रतिक होते. परंतु हिंदूचा हा स्वाभिमान कोणत्याही धर्माच्या द्वेषावर अजिबात आधारलेला नव्हता. शिवाजी महाराजांनी कोणी परधर्मीय म्हणून ना कोणाचा द्वेष केला व स्वधर्मी म्हणून ना कोणाचा अतिलाड केला! धर्मातीत व वर्णातीत अशी त्यांची गुणग्राह्यता होती. म्हणूनच अठरापगड जातीचे व अनेक धर्माच्या नेत्यांचे सहकार्य त्यांना लाभले. विविध जातीधर्माच्या लोकांची नेमणूक त्यांनी अगदी खुल्या विचाराने अनेक महत्वपूर्ण पदावर केली. हेच सर्वसमावेशक राज्यकारभाराचे सुत्र आज अत्यंत उपयुक्त ठरले आहे. जातीय अस्मितांना उधान आलेल्या आजच्या काळात सार्वभौम व सक्षम राष्ट्राच्या निर्मितीसाठी हीच सर्वसमावेशक एकता (unity) आणि एकात्मता (integrity) आवश्यक आहे.
भारतीय राज्यघटनेचा मुख्य पाया असणा-या बंधुता आणि समता या दोन मुल्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी त्यांनी त्या काळातील प्रचलित व्यवस्थेत केली, ही कृती प्रागतिक म्हणावी अशी आहे. जीचे अनुकरण आजच्या भारतीय समाजासाठी अत्यंत मार्गदर्शक असेच आहे.
प्रत्येक नेता काळाचे अपत्य असतो आणि त्यामुळे कोणताही नेता त्याच्या काळातील प्रचलित समाज व्यवस्थेच्या प्रभावापासून मुक्त नसतो! शिवाजी महाराजही त्यास अपवाद नव्हते.परंतु यशस्वीपणे धेयाप्रति मार्गक्रमण करत असतानासुध्दा तर्क आणि सद्सदविवेक यांच्या आधारावर प्रचलित धर्मांच्या निरूपयोगी कर्मकांडाना व परंपरेत प्रचलित बाबींना शिवाजी महाराजांनी विवेकाच्या आधारावर आणि व्यवहारिकता पाहून डावलले. हा त्यांचा तर्कशुद्ध व विवेकी विचार होता.जो आधुनिक काळातील लोकशाही व्यवस्थेतील आधुनिक तथा विवेकी मूल्यांशी साध्यर्म सांगणारा होता. त्यांच्या विवेकी व शुद्ध व्यवहारीक विचारांचे आकलन करताना शिवाजी महाराजांना अनेकजण धर्मनिरपेक्ष, विज्ञानवादी, बुद्धीप्रामाण्यवादी, धर्माचे बंडखोर आणि वैदिक तथा ब्राह्मणी धर्मसत्तेचे विरोधक असे म्हणण्याचा मोह होते परंतु त्यांचे याबाबतचे निर्णय हे विवेकी आणि व्यावहारिकच जास्त होते, असे माझे स्वत:चे आकलन आहे.
शिवाजी महाराजांचा लढा मुख्यत: दडपशाही आणि शोषण याविरोधात होता. रयतेचे राज्य म्हणजेच लोकांचे राज्य त्यांना स्थापन करायचे होते, ही शासन स्थापनेची भुमिका आधुनिक काळातील लोकशाही राज्याच्या स्थापनेशी खूप मिळतीजुळती आहे.
शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा लढा तत्कालीन शासकांच्या विरोधात होता, जे धर्माने मुस्लिम होते. म्हणून लगेच काहीं समुहाकडून शिवाजी महाराजांना मुस्लीमद्वेषी किंवा हिंदुत्वाचे प्रतिक ठरवून राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. तर कांही समुहाकडून शिवाजी महाराजांना हिंदुत्त्ववादी ठरवून काहींकडून त्यांना गोब्राह्मणप्रतिपालक ठरविण्याचा आग्रह धरला जातो; तर कांहीजण शिवाजी महाराजांना ठराविक जातीत बंदीस्त करण्याचाही प्रयत्न करतात. वास्तविक शिवाजी महाराज हे सर्वजन अथवा सर्वप्रजापालक होते. आजच्या लोकशाही प्रशासना पद्धतीत देखील नेतृत्वाची व्याख्या समस्त जनतेचा प्रतिनिधी याच स्वरूपात केली जाते आणि सर्व प्रजेचे पालन करणारा, सर्व जातीधर्मियांबद्दल मनात समान प्रेम असणारा राजाच लोकांच्या मनावर शेकडो वर्ष राज्य करू शकतो, हे शिवरायांकडे पाहूनच ठामपणे सांगता येते!
भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद २५ मधील धर्मस्वातंत्र्याची तरतूद ही शिवाजी महाराजांच्या कालखंडातील राज्य आणि धर्म विषयक नितीशी बर्याच अंशी साध्यर्म्य सांगणारी आहे! राज्य आणि प्रजा यातील संबधात धर्म वा पंथ याचा विचार न करता त्यांनी अनेक जाती धर्मियांचे सहकार्य स्वराज्य निर्मितीसाठी घेतले. धर्म आणि राज्य या संबंधात प्रजानिरपेक्ष धोरण ठेऊन अनेक विविध धर्माच्या पवित्र क्षेत्रांना देणग्या दिल्या. त्याच प्रमाणे प्रजा आणि तिचा धर्म , यांच्या संबंधात राज्यास कधीही हस्तक्षेप करू दिला नाही. प्रत्येकाला ज्याचा त्याचा धर्म पालन करण्याचा अधिकार त्यांनी दिला, हे विशेषत्वाने सांगण्यासारखे आहे आणि याची अनेक उदाहरणे त्यांच्या चरित्राच्या अभ्यासातून मिळतात.
आधुनिक काळातील लोकशाहीत सत्तेचे विकेंद्रीकरण आवश्यक असते! सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा आत्मा आहे. मात्र त्याची राजकीय पातळीवर प्रत्यक्ष सुरुवात कांही अशी शिवाजी महाराजांनीच केली होती. अनेक गड, किल्ले, कोट यांच्यावर त्यांनी विविध जाती धर्माच्या आपल्या सरदारांची नियुक्ती केली आणि स्थापन केलेले स्वराज्य अधिक सघन बनवले. सत्तेच्या या विकेंद्रीकरणामुळे प्रत्येक नागरिकास हे स्वराज्य स्वतःचे आहे आणि त्याची संपन्नता आणि सार्वभौमत्व कांहीही प्रयत्न करून, प्रसंगी आत्माहुती देऊन अबाधित राहिले पाहिजे याची जाणीव झाली आणि या स्वराज्यासाठी शिवरायांचे अनेक सहकारी सतत प्रयत्नरत राहिले
शिवपूर्व काळातील समाजजीवनात
हिंदू-मुस्लीम संबंधावर राजकीय परिस्थितीचा मोठा प्रभाव होता.शिवपूर्व काळात काळात मुस्लीम हा घटक कांही अंशी सत्तेमुळे प्रबळ होता. तर हिंदू हा घटक आपसुकच दुय्यम होता. त्यामुळे हिंदू-मुस्लीम सामंजस्य, एकोपा, सहजीवन मिश्र स्वरुपात निर्माण झाले होते. परंतु असे असूनही एका बाजूला अहंभाव व एका बाजूस न्यूनत्व यातून या मिश्र समाजात सुप्त सांस्कृतीक संघर्ष व घुसळण सतत चालू होती. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेनंतर हिंदू हा घटक प्रबळ होवून, दोन्ही घटक समान स्तरावर येवून हा एकोपा, सामंजस्य, सहजीवन अधिक खुलले! स्वातंत्र्य समता आणि बंधुता यावर आधारलेल्या या नव सहजीवनातून संपूर्ण भारतातील कला, संस्कृती, साहित्य, काव्य, शिल्प यावर त्याचा प्रभाव पडला. अनेक सुफी संतांचे शिवपूर्व काळातील साहित्य, काव्य, उपासना, प्रथा यात बदल घडले आणि शिवरायांच्या आणि त्यांच्या नंतरच्या काळातील रचना, काव्य, साहित्य यावर हा प्रभाव साहित्याच्या तौलनिक अभ्यासातून हे स्पष्टपणे जाणवतो ! थोडक्यात शिवपुर्व काळातील हिंदू-मुस्लीम सहजीवनातील मुस्लिमांची प्रबलता व हिंदुचे न्युनत्व याचा तराजू वरखाली होऊन त्याच्यात समतोल साधला गेला, तो शिवाजी महाराजांच्या काळातच! म्हणून शिवाजी महाराजांचे महत्व एका बाजूला हिंदुंच्या आत्मविश्वासाचे प्रतिक आणि त्याचबरोबर दुस-या बाजूला ते सर्वसमावेशकतेचेही प्रतिक ठरतात. शिवरायांनी साधलेल्या सामाजीक समतोलाचा प्रभाव अठराव्या शतकाच्या सुरवातीस पूर्णतः विसावला. त्यानंतर हे समतोलाचं वातावरण ब्रिटिशांच्या आगमनापर्यंत पूर्णतः एकमेकांत मिसळून, एकरूपता व एकत्मता निर्माण झाली होती. हे ही आपल्याला अठराव्या शतकातील व एकोणिसाव्या शतकातील मध्यापर्यंत निर्माण झालेल्या साहित्यातून, कथेतून दिसून येते. एवढेच नव्हेतर साम्राज्यशाही विरोधातील १८५७ सालच्या पहिला स्वातंत्र्यलढा म्हणून संबोधल्या जाणा-या लढ्याचे नेतृत्व दुस-या बहाद्दुरशहा जफर या मुघल सम्राटाकडे होते! ब्रिटिशांनी मात्र हा समतोल जाणीवपूर्वक स्वसत्तेच्या बळकटीकरणासाठी पुन्हा बिघडवला!
आधुनिक काळात ब्रिटीशांच्या दडपशाही विरोधातील स्वातंत्र्य संग्रामात महात्मा गांधी, सरदार पटेल जवाहरलाल नेहरू यांनी लढलेला लढा शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संग्रामाच्याच पद्धतीचा होता, मात्र काळाप्रमाणे तो अहिंसक आणि सनदशीर मार्गाचा होता! तर भगत सिंग, आझाद यांनी लढलेला लढा प्रत्यक्ष सशस्त्र क्रांतीचा होता! पण उद्दिष्ट एकच होते ते म्हणजे स्वराज्य निर्मिती, जे स्वराज्य समतेवर, बंधुतेवर आणि निर्भयी समाज निर्मीतीच्या स्वातंत्र्य या संकल्पनेवर आधारले असेल. समस्त जनतेला स्वराज्याच्या निर्मितीत सोबत घेवून जाणे, ही शिवाजी महाराजांचीच प्रेरणा, स्वातंत्र्य संग्रामाच्या मागची मुख्य प्रेरणा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष स्वरूपात होती!
शिवाजी महाराजांचा कालखंड आणि स्वातंत्र्य संग्राम यात जवळपास तीनशे वर्षाचे अंतर आहे परंतु देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जऩकल्याण हा हेतु ठेवणा-या प्रजासत्ताकाची निर्मिती ज्या भारतीय राज्यघटनेनुसार करण्यात आली ती भारतीय घटना शिवाजी महाराजांच्याच धोरणांना पुन:प्रकाशित करते आहे, ही बाब शिवरायांच्या विचारावर निष्ठा असणा-या सर्वांना आधुनिक कालखंडातही प्रेरक आणि मार्गदर्शक अशी आहे.
भारतास एकविसाव्या शतकातही जनकल्यानाच्या उद्दिष्टांसाठी प्रबळ सक्षम बनविण्यासाठी छ.शिवाजी महाराजांच्या कार्याचा, विचारांचा आणि कर्तृत्वाचा आधुनिक परीप्रेक्षात अभ्यास खूप मार्गदर्शक असा आहे.
© राज कुलकर्णी.
( शिवराज्याभिषेक सोहळा समिती उस्मानाबादच्या वतीने शिवजयंती उत्सव २०१८ निमित्त प्रकाशित स्मरणिकेतील लेखाची ही सुधारीत आवृत्ती आहे)
No comments:
Post a Comment