विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 9 August 2020

पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी लेकीचा लासलगाव किल्ला..

 

पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी लेकीचा लासलगाव किल्ला....किलकिल्या नजरेतून!
POSTSAAMBHAR :: Prashant Rajaram Pardeshi
''किल्ला''...शब्द भलेही फारसी आहे...परंतू मराठी जनांच्या रक्तात भिनलेला हा शब्द...आज मात्र डोळे किलकिले करून त्यांचे दगड...त्यांचे...बुरूज...टाकी...देवळं हताशपणे बघावे लागत आहेत...
'किल्ल्याच्या देशा' महाराष्ट्रात काही थोड्या ठिकाणच्या किल्ल्यांची अवस्था त्यातल्या त्यात बरी आहे...बाकी बहुतांशी केवळ भग्न अवशेषांवरूनच कल्पनेच्या घोड्यावर स्वार होऊन त्यांची सफर करायची...आणि चडफडत रहायचं की, आमचा हा स्वाभिमान असा हताश, बेचिराख, छिन्न विछीन्न झालाय आणि आम्ही नुसते बघत बसलोय...काही करत का नाही आम्ही?
आमच्यातली घालमेल बघुन मग तो किल्लाच आम्हाला समजावतो, 'बाबांनो, आता आमचे महत्व ते कोणते उरलेत? की आम्हाला गतवैभवात नेण्यात येईल...आमचा उपयोग केव्हाच संपलाय, तेव्हा आमच्या चिरांकडे बघून अंदाज बांधायचा, आमचा वैभवाचा काळ कसा संपन्न असेल याचा...' 'आमचे बुरूज...दरवाजे...महाद्वार मुला बाळांना दाखवून, त्यांच्यात जमलं तर इतिहासाची ज्योत जागविण्याचा प्रयत्न करायचं...'
तुम्ही जर नाशिकच्या लासलगावी गेलात तर तुमच्यातला इतिहास व दुर्गप्रेमी हेलावल्या शिवाय राहणार नाही, इतका बलशाली किल्ला भारताच्या कांद्याच्या या आगारात आजही ताठ मानेने उभा आहे...पण त्याची वाटचाल फार झपाट्याने अधोगतीकडे सुरू आहे...अजुनही फार वेळ गेलेली नाही... 'तुम्ही मला लवकर दुरूस्त करा!' अशी करूण साद घालताना तुम्हाला तो किल्ला दिसेल.
पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या किल्ल्याची जाहागिरी आपल्या जावयाला दिली होती तो हा लासलगावचा भला थोरला किल्ला...किल्ला भुईकोट असून त्याचा रूबाब बघून आपण थक्क होतो...एक तर लासलगावची जुनी वेस ओलांडून आत गेल्यावरही तो सहजासहजी सापडत नाही...थोडी विचारपूस केल्यावर घरांच्या दाटीगर्दीतून त्याचे दर्शन आवाक करणारे असते.
लासलगाव ज्या तालुक्यात मोडतं त्या निफाडमध्ये फणसेंचा वाडा आहे...या वाड्याचे प्रवेशद्वारमात्र तेवढे शिल्लक आहे...बाकी ९५ टक्के वाडा ध्वस्त झाला आहे...तरी पण भरभक्कम अशा प्रवेशद्वारावरून त्याचा केवढा रूबाब असेल? याची कल्पना करता येऊ शकते...
मागे एकदा नानासाहेब मार्तंडराव होळकर यांची निफाडमध्ये जाऊन भेट घेतली होती...मला फणसे वाडा बघायचा आहे! असे त्यांना सांगितले तेव्हा त्यांनी चाव्या मागवून आणल्या...काही वर्षांपर्यंत या वाड्यात जिल्हापरिषदेची शाळा भरायची, परंतू योग्य देखभाल न ठेवल्याने व दुरूस्ती न केल्याने हा संपुर्ण वाडा धाराशाही झाला...दगडांच्या भिंतींच्या आत आता केवळ जुन्या आठवणीच शिल्लक राहिल्यात...वाड्यात पहिल्या मजल्यावर एका कुलुपबंद खोलीत अहिल्यादेवी यांचे हातात शिवलिंग घेतलेली प्रसिद्ध छबी बघायला मिळते...याशिवाय होळकर वंशावळी व त्यांची चित्रे...काही कृष्ण लिलेची चित्रे आहेत...उरल्या सुरल्या लाकडाचा आखिव रेखीपणा व कोरीवकाम यावरून वाडा मोठा वैभवशाली होता याची साक्ष पटते...
नानासाहेबांनी मुक्ताबाई, यशवंतराव असा गौरवशाली पट आपल्या शब्दातून उभा केला...त्यांच्या वारसदारांकडून या अमुल्य वारशाची कशी वासलात लागत गेली, याची खंत व्यक्त केली.
'लासलगावचा किल्ला'....? तो ना होळकरांकडे आहे...ना फणसेंकडे...ना सरकारकडे...! नानासाहेबांचे हे वक्तव्य ऐकुन आवाक झालो...
त्यांनीच मग कर्मकहाणी कथन केली, ''यशवंतराव हा एक साधारण शिपाई हाता, परंतू अहिल्यादेवींना शूर जावईच हवा होता...यशवंतरावांची निवड स्वयंवरातून झाली...त्यांनी जावयाला निफाडचा वाडा, लासलगावचा किल्ला, जुन्नर आदी जहागिर बहाल केली. यशवंतरावांच्या अकस्मिक निधनानंतर मुक्ताबाई सती गेल्या...
यशवंतरावांचे पाचवे वंशज गणपतराव रेवजी फणसे यांच्याकडे लासलगावच्या किल्ल्याचा कारभार होता. ८ सप्टेंबर १८३५ रोजी इंदूर येथील होळकरांची मुख्य गादी सांभाळणार्या हरीराव महाराजांच्या विरोधात त्यांनीच नेमलेल्या फणशांच्या सरदाराने बंड केले...होळकर महालात फणशांचे गारदी घुसले...परंतू त्यांचे नियोजन फसले आणि हरिरावांच्या सैनिकांनी गारद्यांची कत्तल केली. या बंडाचे नेतृत्व करणार्या राजाभाऊ फणसे यांना हरीराव महाराजांचा वारसदार तुकोजीराव यांनी ठार केले. या घटनेमुळे लासलगावच्या किल्ल्याचा कारभार सांभाळणारे त्यांचे बंधू गणपतराव सैरभैर झाले. 'आपली काही धडगत नाही, शिवाय इंग्रज सरकार या घटनेचा फायदा घेऊन आपल्यावर कारवाई करून आपल्यावर जप्ती आणतील या आशंकेतून गणपतरावांनी लासलगावचा किल्ला एका जैन व्यापार्याला पाच हजार रूपयात विकला...अवघा जमिन जुमला त्यांनी असाच स्वस्तात विकून टाकला...त्यांची मती स्थिर राहिली नव्हती''...
आजही लासलगावचा किल्ला खासगी मालकीत राहिला आहे...त्याला भक्कम अशी तटबंदी आहे...भले मोठे महाद्वार आहे...आतमध्ये आता सिमेंटची काही घरे उभी राहिली आहेत...जुन्या इमारती, आतले लाकडी, दगडी व विटांचे बांधकाम दुलर्क्षामुळे कोसळण्याच्या स्थितीत आहे...मधल्या मोकळ्या जागेत मागे एकदा भेट दिली तेव्हा दहा बारा फुट उंचीचे गवत वाढले होते..आतमध्ये लाकडाचे सुंदरकोरव कोम केलेला फार मोठा दरवाजा आहे...परंतू किल्ल्याची देखभाल अजिबात नाही...दुरूस्तीचा तर विषयच दूर...
महाराष्ट्रातील इतर असंख्य किल्ल्यांच्या तुलनेत हा किल्ला फार कमी खर्चात व श्रमात पूर्ववत केला जाऊ शकतो...आज जरी तो चहुबाजुंनी घरांनी वेढलेला असला तरी तो महाराष्ट्राची शान म्हणावा इतका सुस्थितीत आहे...शिवाय किल्ल्या पासून जवळच गावची जुनी वेस आहे...त्यालाही विशाल असे दरवाजे आहेत...व्यापरी दृष्ट्या लासवगाव हे भारताचे कांद्याचे आगार असले तरी इतला किल्ला हीच लासलगावची, नव्हे या महाराष्ट्राची शान आहे...त्याचे जतन करण्याचा मुहूर्त लवकर लागो...हीच प्रार्थना!









No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...