विनोद जाधव एक संग्राहक

Friday 7 August 2020

माढा करमाळ्याचे राजे रावरंभा जानोजीराव राजेनिंबाळकर

_



माढा करमाळ्याचे राजे रावरंभा जानोजीराव राजेनिंबाळकर

postsaambhar:History of maratha sardar family. 

भारतातील विवीध राज्यांसह भारताबाहेरही सापडतोय "रावरंभा" घराण्याचा इतिहास मध्ययुगीन इतिहासात सोलापूर जिल्हात उदयास आलेल्या पराक्रमी व बलाढ्य घराण्यांपैकी माढा व करमाळ्याचे "राजारावरंभा" व "राजाअजितराव" किताब असलेल्या राजेनिंबाळकर घराण्याचे मूळपुरूष श्रीमंत रावरंभाजीराजेंच्या चार पुत्रांपैकी द्वितीय पुत्र, "मदारूलमुल्ख महाराजा माहाराव रावरंभा जानोजीजसवंतराव अर्जुनबहाद्दर" अर्थात "श्रीमंत जानोजीराजे रंभाजीराजे राजेनिंबाळकर" यांची आज २५७वी पुण्यतिथी. या निमित्ताने त्यांच्या इतिहासाचा आढावा! माढा,करमाळ्याचे राजेनिंबाळकर अर्थात "रावरंभा" घराणे हे शिवछत्रपतींचे नातलग असून या घराण्याचे मूळपुरूष रंभाजीराजे हे छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र सम्राट छत्रपती शाहू महाराजांच्या सेवेत होते. स्वराज्याकडून लढत असताना स्वराज्याच्या इतिहासातील महत्वाच्या "गुजरात मोहीमेत" रंभाजीराजे सरसेनापती धनाजीराव जाधवराव यांच्या संगतीने लढले व त्यांनी सन१७०५मधे सुरतेला लूटून भडोचपर्यंतच्या गुजरातेतील प्रदेशावर स्वराज्याचा अंमल बसविला. सन१७०६मधे औरंगाबाद येथे औरंगजेबाच्या शहजाद्याची बादशाही छावणी पडली होती,तिजवर रंभाजीराजेंनी हल्ला केला होता.चंदनवंदन गडावर शाहूराजेंनी त्यांना राजवस्त्रे देऊन स्वहस्ते मानाचा शिरपेच रंभाजीराजेंच्या पगडीमधे खोवला.पण पुढे काही मतभेदांमुळे सन१७०९ नंतर ते अनुक्रमे मुगलांकडे व नंतर हैद्राबादच्या निजामअसफजहा कडे गेल्याने या घराण्याला "राजारावरंभा" या वंशपरंपरागत किताबासह माढा,रोपळे,करमाळा,बार्शी,शेंद्री,मोहोळ,पंढरपूर,औरंगाबाद,भूम-परांडा,नळदुर्ग,तुळजापूर,अपसिंगे,बीड-धारूर,परभणी,अहमदनगर-अष्टी,जामखेड,श्रीगोंदा,बारामती,सुपे,इंदापूर,सासवड,हैद्राबादेतील मूसापेठ,सिकंदराबाद,दारोसीफा,हळ्ळी व कर्नाटकासह तेलंगणातील असा महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांसह तीन राज्यांतील शेकडो गावांचा मूलूख,वीसहजारांची फौज, छत्रचामर,रत्नजडीत तलवार,मानाचे हत्ती-अंबारी, दरबारातील मानाची पगडी व नौबतीचा मान मिळाला.रंभाजीराजेंची पराक्रमी कारकीर्द इ.स.१७३६मधे माढ्यात मृत्यू झाल्याने संपली व त्यांच्या जानोजीराजे,सुलतानजीराव,रावमाहादजी या पुत्रांपैकी जानोजीराजे गादीवर आले व त्यांनी वडीलांचा रावरंभा हा किताब धारण केला.ते वडीलांप्रमाणेच पराक्रमी,गनीमीकाव्यात पटाईत व मुत्सद्दी होते.धनुर्विद्ये,तलवारबाजीसह,घोडे व हत्तींना काबूत आणण्याची कला वडीलांकडूनच त्यांना प्राप्त झली. रंभाजीराजेंच्या हयातीतच जानोजीराजेंना निजाम दरबारात स्वतंत्र मानाचे स्थान होते,ते पित्यासह विवीध मोहीमांमधे सहभागी होत असल्याने अल्पवयातच राजकीय डावपेच,युद्धशास्त्र व मुत्सद्दीपणा त्यांच्या अंगी भिनला व उत्तर भारतातील राजस्थानपासून बंगालपंर्यंत व गुजरातपासून तामिळनाडू पर्यंतच्या सत्ताधीशांमधील राजकारणात त्यांच्या नावाचा दबदबा निर्माण होऊन स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व त्यांनी निर्माण केले. इ.स.ऑक्टोबर १७२४च्या साखरखेडल्याच्या लढाईत जानोजींनी अतीव शौर्य दाखवल्याने निजाम त्यांवर खूश झाला तर सन१७२६च्या सातार्याच्या लढाईतील पराक्रमावर आनंदी होऊन निजामाने रंभाजीराजेंना सुप्याचे ठाणे दिले तर जानोजींना स्वतंत्र बारामतीचे ठाणे सोपवले. मुगल बादशाहाकडून त्यांना ७००० जात व ७०००ची मनसब प्राप्त होती. पुढे निजामाच्या पक्षात असताना सन१७२९मधे जानोजीराजेंनी पुण्यावर हल्ला केला हा पेशवाईला फार मोठा धक्का होता. तेव्हा बाळाजीबाजीरावांनी श्रीमंत बाजीराव पेशवेंना जानोजीला आवर घालण्याची विनंती करावी लागली. पण जानोजी अतिशय मुत्सद्दी! उलट श्रीमंत बाजीराव पेशवे व पेशवे बाळाजीबाजीराव यांसह जानोंजीराजेंनी स्नेह वाढविला याचे दाखले म्हणजे ते मध्यप्रदेशातून आणलेल्या आंब्याच्या पेट्यातील आंबे नानासाहेब पेशव्यांना पाठवताना दिसतात.पेशवीन काशीबाई व बाजीरावांच्या मातेला आदराने मानाची वस्त्रे भेट दिलेली व पेशव्यांना मकर संक्रांतींच्या शुभेच्छा देणारी व सणासुदीला इतर आमंत्रणपर पाठवलेली जानोजीराजेंची पत्रे उपलब्ध आहेत. जेव्हा करवीरच्या छत्रपती ताराराणी व पेशव्यांमधे राजकीय व मुलूखी कारणांवरून बेबनाव निर्माण झाला तेव्हा पेशव्यांनी हे प्रकरण सोडविण्यासाठी जानोजींना आमंत्रित केले व साहजीकच जानोजी व त्यांचे धाकटे बंधू रावमाहादजी(माढा गादी व माढेतील विठ्ठल मंदिराचे निर्माते) यांच्या मुत्सद्दी सूझांवामुळे पेशवे व ताराराणींतील कलह काही काळासाठी शमला. निजामाकडे असूनही रावरंभा जानोजीराजेंनी छत्रपती व पेशव्यांसाठी योगदान दिल्याने जानोजीराजेंना पुढे माधवराव पेशव्यांकडून अठराहजाराचा सरंजाम प्राप्त झाला. निजाम व पेशव्यांमधे इतराजी आल्याने सन १७४४ मधे रघुनाथराव पेशवे व निजामाच्या मसलती जानोजी राजेनिंबाळकरांच्या माढ्यातील व रोपळेतील गढीत तथा पुढील खलबते करमाळ्यातील भुईकोटात झाली. दक्षिणेत विस्तार पावलेली आणखी एक सत्ता म्हणजे फ्रेंच सत्ता! फ्रेंच व निजामामधे पुन्हा राज्यहद्दीवरून वाद उद्भवले व निजाम,पेशवे व फ्रेंच सत्तेत अराजक वाढले, त्यावर इंग्रज टपून होतेच. अशा वेळी निजाम,पेशवे व फ्रेंचांमधील हा आपसी कलह नोव्हेंबर१७५७ रोजी "भालकीच्या तहा"ने एकट्या रावरंभा जानोजीराजेंच्या मध्यस्तीने व मुत्सद्दीनेच घडून आल्याने नासीरजंगाने आनंदाच्या भरात जानोजींना "जसवंतराव" हा किताब देऊ केला (त्यामुळेच कागदोपत्री जानोजींचे नाव "जानोजीजसवंतराव" असे आढळते)सोबत नौबतीचा मानही होता.(गढीवर नौबती झाडण्याची ही प्रथा माढ्यात १९२०पर्यंत विनाखंड रूढ होती) व फ्रेंचाकडील अधिकारी मार्कीस बुसी याने जानोजींना फ्रांस देशात काढलेली रंगचित्रे मैत्रीचे प्रतीक म्हणून भेट दिली,ती आज जानोजींच्या रोपळेकर वंशज असलेल्या राजघराण्याने जपली असून ती नेमकी कधी व कोठे मिळाली याचा रास्त व तारखेवार तपशील अद्याप उपलब्ध नव्हता,पण माझ्या हाती लागलेल्या फ्रेंच रेकाॅर्डातील पुराव्यांनुसार सन११ व १२ ऑगस्ट १७५७ या दिवशी हैद्राबादेतील गोशामहालात ही चित्रे व काही भेटवस्तू जानोजींना बुसीने दिली व पुढे फ्रेंचांच्या गव्हर्नराने जानोजींचे ज्येष्ठ चिरंजीव राजेआनंदरावांना दहाहजार पॅगोडा रक्कम व अरबी जातीचा एक उंचापूरा घोडा भेट दिल्याचे पुरावे सापडत असून फ्रांस देशाच्या तत्कालीन देशाध्यक्षांपर्यंत अर्थात भारताबाहेरही राजेनिंबाळकरांची कामगिरी पोचल्याचे आज प्रथमच पुढे येत आहे. पुढे भारताच्या इतिहासातील सर्वात रक्तरंजीत ठरलेले पानिपतचे तिसरे युद्ध उत्तर भारतात झाले. यावेळी सदाशिवरावभाऊंनी आवाहन करताच जानोजींनी पाठवलेली निवडक फौज जानेवरी१७६१रोजी अहमदशहा अब्दाली विरूद्ध पानिपतावर लढली. या युद्धात सदाशिवरावभाऊ व विश्वासरावांचा दुर्दैवी मृत्यू होऊन पेशवे घराण्यावर व तमाम मराठेशाहीवर जणू दुखाचा पहाडच कोसळला. या दुःखाचा शोक कमी करण्यासाठी पेशवे नानासाहेबांना जानोजींनी आपल्या घरी काही दिवस मुक्कामास ठेवून घेतले. जानोजी अतिशय दृढनिश्चयी असल्याचे काही घटनांतून दिसून येते. निजामाकडील ठाणेदार म्हणून रंभाजींचा पुण्यावर नऊ वर्षे अंमल होता,त्यावेळी तो हटविण्यासाठी शाहूमहाराजांनी सेनापती खंडेराव दाभाडेंना रंभाजींवर चालून जाण्याचे आदेश दिले.२एप्रिल १७१६ रोजी गंगथडीत युद्ध होऊन रंभाजींचे लाडके ज्येष्ठ पुत्र व जानोजींचे सख्खे थोरले बंधू खंडेरावजी मारले गेले.रंभाजींसाठी व राजेनिंबाळकर घराण्यासाठी हा फार मोठा धक्का होता व याच घटनेने रंभाजींच्या मनातील स्वराज्याकडे परतण्याची इच्छा कायमचीच संपली व मराठेशाहीतील एक नामवंत मोहरा निजामाच्या आपसूक हाती लागला. आपल्या बंधूच्या मृत्यूचा सूड म्हणूनच की काय,पुढे जानोजींनी दाभांड्यावर हल्ला केला व त्यांच्या पागेतील दीडशे घोडे,चंदी व घासदाण्यासकट घेऊन गेले. जानोजीराजेंना त्यांच्या कारकिर्दीत "महाराव","महाराजा", "जसवंतराव", "मदारूल मुल्ख" व अर्जूनासारखे शौर्य दाखवतो म्हणून "अर्जूनबहाद्दर" असे पाच राजेशाही किताब प्राप्त झाले. आपल्या पित्यावरची निष्ठा त्यांच्या राजमुद्रेतील "श्रीपराशर चरणी तत्पर,रंभाजीसूत जानोजी निंबाळकर" या मजकूरातून प्रकटते. निव्वळ युद्ध व राजकारणातच तरबेज नसून रंभाजी व जानोजी पितापुत्रांसह पुढील पिढ्याही कलासक्त निपजल्या.सतत दक्षिणेत जाणेयेणे असल्याने व दक्षिणभारतीय स्थापत्याचा व निजामाकडून उत्तरभारतातील मोहीमेवर गेले असता रंभाजीराजेंना उत्तरभारतीय स्थापत्याचा परिचय झाला व सर्वप्रथम त्याची छटा ईशान्योत्तरभारतीय पंचायतन पद्धतीने व दक्षिणात्य गोपूर शैलीने तूळजापूरला समोर ठेवून बांधलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या माढेश्वरी मंदिरावर उमटली तर दक्षिणेतील स्थापत्याचे आगमन जानोजींच्या कारकिर्दीत झाले व करमाळ्याचे अद्वितीय ९६ कुळी मंदिर साकारले गेले व मंदिराला दरसाल ७५००रू. ची देण जानोजींनी नेमूण दिली. रावरंभा घराण्याला धर्मोपासनेचा वारसा रंभाजींपासूनच होता तो जानोजींनी पुढे राखला. त्रिचनापल्लीच्या(तामीळनाडू) मोहीमेत शाहूछत्रपती महाराजांच्या रघुजी भोसले,फत्तेसिंह भोसले इ.सरदारांसह जानोजीराजेही सहभागी होते. त्रिचनापल्लीच्या दक्षिणभारतीय वैष्णवपंथीयांच्या "श्रीमत्सत्यबोधविजयः" या एकवीस सर्गातील ऐतिहासीक व समाकालीन संस्कृत ग्रंथातील मध्यअध्यायात जानोजीराजेंचा उल्लेख "जानोजी निम्बाळकर नामक् मराठामंत्रेन" असा आला असून त्यांची धर्मउपासकता नमूद केली आहे.जानोजींनी हयातभर त्या मठाची व मठाधिशांची सेवा केली.त्यांनी दान केलेले दस्त आजही तेथील मठात उपलब्ध आहेत. धामणगाव(बार्शी) व उंदरगाव-वाकाव(ता.माढा) येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू असलेले बोधले महाराजांचे घराणे रावरंभा घराण्याच्याही शेवटपर्यंत गुरूस्थानी राहिले. तसेच जेजूरीच्या खंडोबा मंदिरास,मोरगाव व तुळजापूरच्या भवानी मंदिरास रंभाजीराजेंनी दिलेल्या दानपत्रातील नमूद व्यवस्था जानोजींनी पुढे कायम ठेवली असून तुळजापूरचा व माढा तालुक्याचा बाजार राजेनिंबाळकरांच्या हूकूमानुसार सुमारे तीनशेवर्षांपासून अद्यापही मंगळवारीच भरवला जातो. तूळजापूरच्या भवानी मंदिराची तटबंदी व यज्ञमंडपाची डागडूजी व बांधणी केल्यामुळे "सरदार निंबाळकर प्रवेशद्वार" हा दरवाजा रंभाजी व जानोजी या बापलेकांच्याच नावे असून ग्वाल्हेरच्या महाराजा महादजी शिंदेंची बहिण व रावरंभाजानोजींची सून अर्थात त्यांचे द्वितीय पुत्र राजेमहाराव यांची पत्नी राणीआनंदीबाई महाराव निंबाळकर यांनी भवानीमंदिरास दिलेली दानपत्रे उपलब्ध आहेत. जानोजींच्या काळात रावरंभा घराण्याने खरे वैभवाचे शिखरच गाठले होते, त्यांच्या हत्तींच्या पायात हाताच्या दंडांएवढी सोन्याची कडी व गळ्यात मोत्यांच्या माळा असत,तशी चित्रेही उपलब्ध आहेत.केवळ हत्ती सांभाळणार्या माहूतांसाठी जमीन जुमला न देता राजेनिंबाळकरांनी थेट आख्खे गावच दान म्हणून दिलेले "माहूतपूर" गाव सध्या "महातपूर(ता.माढा)" नावाने प्रचलीत असून तिथे आजही हत्तींच्या स्नानगृहांचे व पागेचे अवशेष दिसतात व राजेनिंबाळकरांचे हत्ती सांभाळणार्या माहूतांचे वंशज आजही तेथे राहत आहेत. रावरंभा घराण्याने तब्बल नऊ पेक्षा जास्त भव्य अशा गढ्या व राजवाडे उभारले. करमाळ्याचा रावरंभाजीराजे व रावरंभाजानोजीराजेंनी उभारलेला अठरा बुरूजांचा खंदकयुक्त भुईकोट हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला आहे. माढ्यातील रंभाजीराजेंनी उभारलेल्या किल्लेवजा गढीला पूर्वी तटबंदीसह तीन दरवाजे व सहा बुरूज होते,त्यातील एक आजही दिसतो यावरही उकळी तोफांची व्यवस्था दोघा पितापुत्रांनी केली होती(या गढीची भव्यता जपण्यासाठी स्थानीक माढारियासत संघ कार्यरत आहे.) जानोजींना एकूण पाच मुले होती.त्यापैकी राजेमहाराव यांचे वास्तव्य शेंद्री(बार्शी)येथील भव्य गढीत असून आजही त्यांचे वंशज तेथे राहतात तर राजेधाररावांचे वास्तव्य पुढे रोपळे(माढा) येथे असून धाररावांचे वंशज घराण्याची बुनीयाद जपत आहेत तर परांडा येथे जानोजींचे पहिले पुत्र आनंदरावांच्या पुढील पिढ्यांचे वास्तव्य राहिले असून तेथील भारदस्त वाडे व हवेल्या आजही निंबाळकरांचे राजत्व दाखवत उभा आहेत.परांडा किल्ल्यावरील जानोजीराजेंनी पेडगावाहून आणून बसवलेली तोफ आजही तेथे दिसते. औरंगाबादेत राजेनिंबाळकरानी "रंभापूर" नावाचे ठिकाण वसवून तेथे भव्य राजवाडा बांधला होता तथा हैद्राबादच्या जगप्रसिद्ध चारमिनार शेजरी रावरंभांची बुरूजयुक्त हवेली व कचेरी होती जी "राजारावरंभाकी देवडी" म्हणून प्रसिद्ध आहे,तिथे निंबाळकरांनी बांधलेला दगडी बारव होता जो बूजवण्यात आला असून ती जागा आज चारमिनार मंडलपंचायतच्या आखत्यारीत असून तेथून जवळच राजेनिंबाळकरांनी उभारलेले मूसापेठेतील छोटेखानी मंदिर, मुस्लीमांचे प्रार्थनास्थळ,अशूरखाना,मौलाअली टेकडीवरील दर्ग्याला दिलेले चांदीचे पंजे व रंभाजीराजेंनी, जानोजींनी व पुढील वंशजांनी विनाखंड सुरू ठेवलेला उरूस व पेशकरी दरसाल साजरा होत. रावरंभाजी व जानोजीराव दोघे उत्कृष्ट मल्ल होते, सिकंदराबाद येथे रावरंभांनी मल्लविद्येच्या उपासनेसाठी व दरबारात सांभाळलेल्या मैसूरी,तामीळी व तेलूगू पैलवानांसाठी उभारलेला आखाडा स्वतंत्रकाळापर्यंत अस्तित्वात होता.सिकंदराबाद रोडजवळील जुना बाजारच्या रस्त्याला राजारावरंभा मार्ग असे नामकरण असून निंबाळकरांच्या दरबारात व फौजेत असणार्या महाराष्ट्रातील ७००पेक्षा जास्त मराठा,कायस्थ इ. सरदार व वतनदार घराण्यांचे वंशज आजही सिकंदराबादेत राहत आहेत(पूर्वी त्या ठिकाणास निंबाळकरनगर संबोधले जात होते).काहीजणांनी तर राजेनिंबाळकरांवरील निष्ठेखातर चक्क "रावरंभा" हे आडनावच धारण केले.स्वंत्रपूर्व काळात या आडनावाची कैक लोक आढळून येतात. हैद्राबादेतील गोवळकोंडा किल्ला काही काळ जानोजींच्या व पुढे त्यांच्या नातवाच्या अंमलाखाली असताना तिथे एक छोटा वाडा उभारण्यात आला व गोवळकोंडातील जानोजींचे नातू जयवंतरावराजेंनी(तिसरे रावरंभा) उभारलेला नगारखाना,तलाव व तारामती बारादारीची पुनर्बांधणी व तेथील विश्रामगृह हे सर्व माढ्याच्या रावरंभा घराण्याचीच देण असून आज ती राज्य व राष्ट्रीय पातळीची पर्यटनस्थळे असून दरवर्षी देशभरातून व देशाबाहेरून आलेले पर्यटक तिथे भेट देतात परंतु महाराष्ट्राला याबाबत यत्किंचतही माहिती नसणे ही फार मोठी शोकांतीकाच आहे असे मला वाटते. वर उल्लेखीत एवढा प्रचंड व भव्य वारसा मागे ठेवून इंग्रज, फ्रेंच, निजाम,पेशवे व मुगल या भारतातील बलाढ्य संतांना आपल्या मुत्सद्देगीरीने तोलून धरणाऱ्या रावरंभा जानोजीराजेंचे राक्षसभूवन (बीड) मोहीमेवर जात असताना शनिवार ६ ऑगस्ट १७६३ रोजी आजारपणाने निधन झाले. जानोजींच्या कार्काळात हैद्राबादच्या गादीवर पाच निजामअसफजहा होऊन गेले पण जानोजींचे स्थान अढळ राहिले. त्यांच्या मृत्यूदिवशीच त्यांची राणी सती गेली तर थोरले पुत्र राजेआनंदराव हे मातापित्यांच्या आकस्मित झालेले मृत्यूच्या धक्क्यानेच तात्काळ मरण पावले. जानोजींचे अखरेच्या क्षणी राक्षसभूवनच्या मोहीमेवर हत्तीवर बसून जात असतानाचे ऐतिहासीक २५७ वर्षे जुने रंगचित्र त्यांच्या रोपळेतील वंशजांकडे आहेत. त्यांची व मुलगा आनंदराव यांच्या समाध्या बीड जिल्ह्यातील राक्षसभूवन परिसरात असून जानोजींनी रंभाजीराजेंची माढ्यात (सध्या लुप्त झालेल्या तळ्याकाठच्या निंबाळकरांच्या बागेत) मंगळवारपेठेत/साठेगल्लीत बांधलेली उत्कृष्ट व घुमटाकार पद्धतीची भव्य समाधी २०१५ साली त्यावरील शिलालेखाचे विवेचन करून मी उजेडात आणून सहकार्यांसह समाधीतील हरवलेले शिवलिंग शोधून ते समाधीत ठेवले होते.तिथे दिपोत्सव व पुष्पोत्सव साजरे केले जातात. विशेषकरून सांगण्याजोगी अतिमहत्वाची बाब म्हणजे तेलंगणा, बिकानेर,पश्चिमबंगाल व फ्रांस, इंग्लंडसह इस्लामाबाद (पाकिस्तान) येथे नेली गेलेली जानोजींची व घराण्यातील इतर राजपुरूषांची नवाबी, इराणी व फ्रेंच चित्रकारांनी काढलेली चित्रे व दस्तांचे तेथून हस्तांतर करीत असून राजारावरंभांच्या सर्व वंशजांच्या हस्ते प्रकाशीत करण्याचे योजिले आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण दक्षिणभारताचा मध्ययुगीन राजकीय, वास्तूस्थापत्य, साहित्य, युद्ध,अध्यात्म,प्रेमरस व राजकारणपटूत्व इ. क्षेत्रांतील इतिहास माढा-करमाळ्याच्या अष्टपैलू रावरंभा घराण्याशिवाय अपूर्णच असून तो उजेडात आणण्यासाठी रावरंभा घराण्याच्या अप्रकाशीत दस्तावेजांसह सर्वंकष इतिहासावरील शोधग्रंथ व दोन खंडांतील कादंबरीमय इतिहास लवकरच मी प्रसारित करणार आहे. - मयूर(पृथ्वीराज) दत्तात्रयराव चव्हाणसांभरीराव, उंदरगाव,मु.पो. ता.माढा. :-:-सोबत जोडून दिलेले रावरंभा जानोजीरावांचे रोपळेकर राजघराण्याच्या वंशजांकडील २८०वर्ष जुने चित्र, व गोवळकोंडातील रावरंभा जानोजींचे नातू जयवंतरावराजेंनी(तिसरे रावरंभा) बांधलेली बारादारी. -करमाळा भुईकोट,दरवाजे, ९६कुळी मंदिर व माढेतील किल्लासदृष्य गढी,माढेश्वरी मंदिर संकलन-मयूर द.राव चव्हाण

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...