मराठी संस्कृतीचा गर्व बाळगणारा हरयाणा राज्यातील ‘रोड मराठा’ समाज!
१७६१ च्या पानिपत युद्धामधील पराभव हा वैभवशाली मराठी इतिहासाला लागलेला सर्वात मोठा काळा डाग ठरला. या युद्धापासून मराठा इतिहासाला उतरती कळा लागली ती कायमचीच ! रोहिले आणि अफगाणांविरोधात सदाशिवराव भाऊंबरोबर नेटाने लढलेले कित्येक मराठा शूरवीर आणि सैनिक या युद्धात धारातीर्थी पडले, तर मोजता येणार नाही इतके जण जायबंदी झाले. युद्धात सहभागी झालेली अनेक मराठा कुटुंबे लाजिरवाण्या पराभवानंतर आपल्या मायभूमीत परत गेली, तर जवळपास २९८ कुटुंबे तो पराभव सहन करत पानिपता मध्येचं राहिली. त्यांनी तेथेच आपले जीवन नव्याने सुरु केले.
आज युद्धाच्या २५४ वर्षांनतर त्यांची लोकसंख्या दहा लाखांच्यावर आहे. मुळचा मराठी मातीतला पण सध्या पानिपतामध्ये स्थायिक असलेला आणि ‘रोड मराठा’ या नावाने प्रसिद्ध असलेला आपला बांधव आज परमुलुखात मान उंचावून जगतो आहे यापेक्षा कौतुकास्पद गोष्ट दुसरी नाही.घोर पराभवाच्या जखमा मनावर आणि शरीरावर घेऊन त्या २९८ कुटुंबांनी काळानुसार पानीपताची भूमी स्वत:ची मानली आणि तेथील संस्कृतीचा प्रत्येक घटक अंगी बाणून घेतला. पानिपत, सोनपत, कर्नाल, कुरुक्षेत्र या भागातील जवळपास २०० गावांमध्ये हा रोड मराठा समाज विखुरलेला आहे. त्यांनी केवळ आपल्या देहबोली आणि पेहरावातचं बदल केला नाही तर आपल्या नावांमध्ये देखील बदल करून घेतले. पवारांचे पानवर झाले, महालेचे महल्ले आणि महालान झाले, जोगदंडाचे जागलन झाले.
आज पानिपतामध्ये गेल्यावर रोड मराठा समाज हा एका नजरेत ओळखता येत नाही. बहुतेक जण तर अस्सल जाट असावे असे दिसतात. परंतु बाहेरील रूपातील हा लक्षणीय बदल त्यांच्या अंतरंगातील मराठी संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान मात्र बदलू शकला नाही. अनेकजण स्वत:चा उल्लेख आवर्जून ‘मराठा चौधरी’ असा करतात आणि हा रोड मराठा समाज गर्वाने सांगतो की, आम्ही शूर मराठा सैनिकांचे वंशज आहोत.
पानिपतामध्ये फिरताना मराठी नावांच्या दुकानाच्या पाट्या हमखास पाहायला मिळतात. आपली मराठा संस्कृती जपण्यासाठी एका मुलीचा रोड मराठा बाप आपली मुलगी फक्त रोड मराठा समाजाच्या मुला घरीच देतो. हेच कारण आहे की रोड मराठा समाज आजही आपले अस्तित्व टिकवून आहे.
गंमत अशी की महाराष्ट्रातील मराठ्यांना पानिपतच्या शौर्याचा विसर पडला आहे, पण या रोड मराठ्यांना अजूनही तो इतिहास सर्व तोंडपाठ आहे. त्यांच्या मते,
युद्धातील पराभव हा कोणाच्याही हाती नसतो. पेशव्यांनी आणि मराठ्यांनी अखंड भारत जिंकण्याची जी महत्त्वकांक्षा बाळगली तिचा अभिमान प्रत्येक मराठी माणसाला असायलाच हवा. कारण मराठे युद्धातून पळून गेले नाहीत, त्यांनी शेवटपर्यंत लढा दिला. म्हणजे त्यांच्या पराक्रमापेक्षा त्यांचे शौर्य कित्येक पटीने जास्त आहे.
हा रोड मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं दैवत मानतो. येथे काही तरुणांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी सेवा संस्था स्थापन केली आहे. या संस्थेमार्फत अहमद शाह अब्दाली व रोहील्यांशी लढताना मराठ्यांना आलेल्या वीरमरणाच्या शौर्यगाथेचा प्रसार केला जातो. ज्याप्रमाणे कुरुक्षेत्रावर महाभारत घडले म्हणून सरकारने मोठे स्मारक उभारून त्या जागेला वॉर मेमोरीयलचा दर्जा दिला. त्याचप्रकारे पानिपतामध्ये देखील शूर मराठ्यांचे स्मारक उभारून त्या जागेला देखील वॉर मेमोरीयलचा दर्जा द्यावा अशी रोड मराठा समाजाची तीव्र इच्छा आहे आणि यासाठी हरयाणा आणि महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा अशी त्यांची मागणी आहे.
परमुलुखामधून आलेले म्हणून रोड मराठा समाजाला हरियाणामध्ये कोणीही बोल लावत नाही. हरयाणाच्या राजकारणात देखील रोड मराठा समजाचे बऱ्यापैकी वर्चस्व आहे. काही मतदारसंघ असे आहेत जेथे वर्षानुवर्षे केवळ रोड मराठा समाजाचा प्रतिनिधीचं निवडून येतो. हरयाणातील प्रत्येक स्तरावर त्यांनी आपल्या कामगिरीची छाप पाडली आहे.
कधी पानिपताला भेट दिलीत तर आपल्या या बांधवांची भेट घ्यायला बिलकुल विसरू नका.
—शिवांजली नाईक निंबाळकर,पुणे
No comments:
Post a Comment