विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 27 September 2020

मराठी साम्राज्याच्या भाळावरची भळभळणारी जखम

 

मराठी साम्राज्याच्या भाळावरची भळभळणारी जखम

पोस्टसांभार :रोहित शिंदे 

 

मराठी साम्राज्याच्या भाळावरची भळभळणारी जखम’, असं पानिपतच्या युद्धाचं वर्णन केलं जातं. दोन मोती, सत्तावीस मोहरा आणि असंख्य चिल्लरखुर्दा गमावलेल्या या युद्धाने मराठा साम्राज्याचा कणा खिळखिळा केला. पण हे युद्ध मराठा सैन्य नेमकं का हरलं?

याची कारणं शोधणं महत्त्वाचं आहे. पानिपतच्या युद्धाला 257 वर्षं पूर्ण झाली. आजही या प्रदेशात गेलं, की पानिपतमधले स्थानिकही या युद्धाबद्दल माहिती देतात.

या युद्धात मराठा सैन्य शौर्यानं लढलं, पण अखेर त्यांचा पराभव झाला. या पराभवामागची नेमकी कारणं काय, पाहू या!

निसर्ग शत्रू ठरला!
कुंजपुऱ्यावरून दिल्लीच्या दिशेने निघालेल्या मराठा सैन्याने नोव्हेंबर 1760मध्ये पानिपतमध्ये तळ ठोकला. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे तीन महिने उत्तरेत कडाक्याच्या थंडीचे असतात.

इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे सांगतात, “मराठा सैन्य दक्षिणेतून मोहिमेला निघालं, तेव्हा 1760चा जानेवारी महिना संपत आला असल्याने गरम कपडे वगैरे काहीच घेण्यात आले नव्हते. त्यामुळे मराठे उत्तरेच्या थंडीत गारठून गेले होते.”

‘पानिपता’नंतर हरियाणात थांबलेल्या रोड मराठ्यांची कथा
पानिपतच्या युद्धानंतरही सदाशिवराव भाऊ जिवंत होते?
मोहिमेच्या शेवटच्या दिवसांपर्यंत पानिपतच्या आसपासच्या गावांमधली झाडंही शिल्लक राहिली नव्हती. त्यामुळे सरपणाला लाकडं मिळणं मराठा फौजेला कठीण झालं होतं. परिणामी मराठा सैन्याचे हाल होत होते, असं अनेक ऐतिहासिक संदर्भ ग्रंथांमध्ये नमूद केलं आहे.

“त्या उलट अफगाण सैनिकांचा पेहराव मात्र थंडीचा सामना करण्यासाठी योग्य होता. अफगाण सैनिक अंगावर चामड्याच्या कोटासारखा पोशाख करायचे. थंडीपासून रक्षण करण्यासाठी हा पोशाख योग्य होता,” असं बलकवडे यांनी नमूद केलं.

सूर्य माथ्यावर आला आणि…
या युद्धात सूर्याची दिशा निर्णायक होती, असं अनेक इतिहासकार मानतात. अयोद्धेचा नवाब शुजा उद्दौला याच्या छावणीत असलेल्या काशीराज पंडितानंही याबाबत लिहून ठेवलं आहे.

मराठे पानिपतावरून दिल्लीकडे म्हणजेच दक्षिण दिशेला चालले होते. सकाळी नऊपासून सुरू झालेल्या या युद्धात दुपारनंतर सूर्य दक्षिणेकडे झुकू लागला आणि मराठा सैन्याच्या डोळ्यांवर, डोक्यावर तिरीप येऊ लागली. त्यामुळे मराठे हवालदिल झाले.

“मराठा सैन्याला पाण्याची भ्रांत होती, त्यातच सूर्य माथ्यावर आल्यानं ते आणखीनच हैराण झाले,” बलकवडे यांनी या युद्धातली सूर्याची निर्णायक भूमिका स्पष्ट केली.

बखरकारांनी याचं वर्णन ‘भानामती’ असं केलं आहे. मराठा सैनिक भानामती झाल्यासारखे पाण्यासाठी कासावीस झाले. त्यांच्या डोळ्यांसमोर अंधारी आली, असं वर्णन भाऊसाहेबांच्या बखरीतही केलं आहे.

व्यूहरचना आणि प्रत्यक्ष युद्ध
पानिपत आणि आसपासचा मैदानी, सपाट मुलूख लक्षात घेता इथे मराठ्यांचा गनिमी कावा चालणार नाही, हे ओळखून मराठ्यांनी गोलाची लढाई करण्याचं धोरण अवलंबलं होतं.

गोलाची लढाई म्हणजे तोफखाना पुढे ठेवून त्याच्या मागे घोडदळ आणि पायदळ यांचा गोल करून पुढे सरकत जाणं. पांडुरंग बलकवडे यांच्यानुसार, अशा प्रकारच्या लढाईची सवय मराठा फौजेला नव्हती.

युद्धाला तोंड फुटल्यावर इब्राहिमखान गारदी याच्या तोफखान्याने अब्दालीच्या मधल्या फळीचं कंबरडं मोडलं होतं. मात्र त्याच वेळी विठ्ठलपंत विंचुरकरांच्या तुकडीने गोल मोडला आणि रोहिल्यांच्या दिशेने धाव घेतली.

“तोफखान्यासमोर आपलंच सैन्य आलेलं बघून इब्राहिमखानाने तोफखान्याचा मारा बंद केला. याचा फायदा अब्दालीने घेतला आणि उंटांवरच्या आपल्या हलक्या तोफा पुढे करत मराठ्यांना भाजून काढलं,” बलकवडे यांनी सांगितलं.

सदाशिवराव भाऊ पेशवे आणि इब्राहिमखान गारदी
अंबारी रिकामी दिसली आणि…
भारतातल्या राजांची युद्धादरम्यानची सवय म्हणजे, सगळ्यांत उंच हत्तीवरच्या अंबारीत बसून सैन्याचं नेतृत्त्व करायचं! या सवयीबद्दल नादिरशहा यानंही टीका केली होती.

‘The Army of Indian Mughals’ या पुस्तकात W. आयर्विन यांनी नादिरशहाच्या पत्राचा दाखला देत म्हटलं आहे, “हिंदुस्तानच्या राजांचा हा अजब परिपाठ आहे. युद्धात ते हत्तीवरून येतात आणि शत्रूचं निशाण बनतात.”

“विश्वासरावांना गोळी लागली आणि ते धारातीर्थी पडल्यावर सदाशिवराव भाऊ अंबारीतून उतरले आणि त्यांनी घोड्यावर मांड ठोकली. अंबारी रिकामी दिसल्याने भाऊही पडल्याची बातमी मराठा सैन्यात पसरली आणि सैन्याने कच खाल्ली,” असं बलकवडे यांनी सांगितलं.

अहमदशहा अब्दाली
राखीव सैन्य आणि भाडोत्री सैनिक
याबाबत रूईया महाविद्यालयातल्या इतिहासाच्या प्राध्यापक मोहसीना मुकादम यांनी अब्दालीच्या राखीव सैन्यावर प्रकाश टाकला. त्या सांगतात, “मराठ्यांना दख्खनकडे जायचं असल्यानं त्यांचं सगळं सैन्य एकत्र निघालं होतं. अब्दालीने मात्र 10 हजारांचं राखीव दल ठेवलं होतं. मराठ्यांचं पारडं जड झाल्यावर त्याने अचानक हे दहा हजार सैनिक रणात उतरवले. दमलेल्या मराठ्यांना या ताज्या दमाच्या सैनिकांचा मुकाबला करणं कठीण झालं.”

“तसंच अब्दालीच्या फौजेतले भाडोत्री सैनिक पळून जायला लागल्यावर त्यांना मारून पुन्हा युद्धभूमीकडे वळवण्याचं काम केलं जात होतं. ते भाडोत्री सैनिक असल्याने त्यांच्यावर नियंत्रण मिळवणं सोपं होतं.”

याउलट मराठा सैन्यात काही सरदारांनीच युद्धातून काढता पाय घेतला आणि त्यांच्याबरोबर अनेक सैनिक पळायला लागल्याचं निरीक्षण मुकादम नोंदवतात.

पानिपतची युद्धभूमी म्हणजेच काला आम्बचा परिसर
राजपूत, जाट आणि इतरांची बघ्याची भूमिका
हिंदुपदपातशाहीच्या रक्षणासाठी पेशव्यांनी ही मोहीम आखल्याचं ऐतिहासिक दाखल्यांमधून स्पष्ट होतं. पण त्यांना इतर राजपूत राजे, सुरजमल जाट, अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला यांची साथ लाभली नाही, हादेखील इतिहास आहे.

याबाबत बलकवडे म्हणतात की, “मराठ्यांच्या उदयाआधी मुघल साम्राज्याच्या रक्षणाची जबाबदारी राजपूत राजांवर होती. 1734च्या अहमदिया करारानंतर ती मराठ्यांकडे आली. त्यानुसार पेशव्यांना मुघल साम्राज्यात चौथाई आणि सरदेशमुखीचा हक्क मिळाला.”

ताजमहाल ‘परदेशी’ मुघलांचा, मग मौर्य स्वदेशी कसे?
अलाउद्दीन खिलजी आणि मलिक काफूरचं काय होतं नातं?
“हीच बाब राजपूतांना डाचत होती. अब्दालीकडून मराठ्यांच्या वर्चस्वाला शह बसला, तर त्यांनाही ते हवंच होतं. त्यामुळेच जोधपूरचा बीजेसिंग आणि जयपूरचा माधोसिंग हे दोघंही तटस्थ राहिले,” बलकवडे यांनी पुष्टी जोडली.

“सुरजमल जाटाने आग्रा आणि अजमेर यांचा ताबा मागितला. अब्दालीच्या पाडावानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असं मराठ्यांनी सांगितल्यावर जाटही मराठ्यांची साथ सोडून गेला,” बलकवडे म्हणाले.

शुजा उद्दौलाला दिल्लीची वजिरी हवी होती. त्याबाबतही काहीच निर्णय झाला नाही, म्हणून तोदेखील आपल्या सैन्यासह अब्दालीला सामील झाला. शुजा अब्दालीकडे जाणं, हे युद्धात निर्णायक ठरलं, असं मोहसिना मुकादम सांगतात.

उत्तरेतल्या मराठा वर्चस्वाला धक्का लागला असं म्हटलं जातं.
बाजारबुणगे आणि यात्रेकरू
अब्दालीच्या फौजा सड्या फौजा होत्या. त्याउलट मराठा फौजेबरोबर यात्रेच्या निमित्ताने हजारो यात्रेकरू, व्यापारी आणि कुटुंबकबिला असे सुमारे 30-40 हजार बिनलढाऊ लोक होते.

या लोकांच्या खाण्यापिण्याची सोय करताना मराठा सैन्याचं कंबरडं मोडलं होतं. तसंच खजिन्याची कमतरताही भेडसावत होती, यावर मोहसिना मुकादम प्रकाश टाकतात.

मराठी फौजेचा वेग आणि या बाजारबुणग्यांचा वेग यांच्यात प्रचंड तफावत असल्याने फौजेला या लोकांच्या वेगाशी बरोबरी करत आगेकूच करावी लागत होती. तसंच प्रत्यक्ष युद्धाच्या आधीही तीर्थयात्रेसारख्या गोष्टींमुळे फौजेला वेगवान हालचाली करणं अशक्य झालं, असं बलकवडे यांनी स्पष्ट केलं.

कारणं काहीही असली, तरी पानिपतच्या युद्धातल्या पराभवामुळे मराठा साम्राज्याचं कंबरडं मोडलं. मराठ्यांचा उत्तरेकडचा दबदबा अचानक नाहीसा झाला. मोठ्या संख्येने मराठा सैनिक पानिपतावर मारले गेल्यानं पेशव्यांची सामरी ताकद कमकुवत झाली.

पानिपतच्या पराभवानंतर उत्तरेच्या राजकारणात मराठ्यांना दबदबा निर्माण करण्यासाठी 12 वर्षं वाट बघावी लागली. महादजी शिंदे यांनी 1773-74 मध्ये उत्तरेत पुन्हा मराठ्यांचं वर्चस्व प्रस्थापित केलं. पण पानिपतच्या या युद्धाने मराठा साम्राज्याचीच नाही, तर भारताच्या इतिहासाचीही दिशा बदलली.


No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...