वयाच्या १५ व्या वर्षी महाराजांचे स्वराज्य स्थापनेचे कार्य सुरु झाले होते. तोरणा, राजगड, कोंढाणा, पुरंदर यांसारखे किल्ले स्वराज्यात आले होते. महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाहाने फत्तेखानाला स्वराज्यावर पाठवले. फत्तेखानाच्या सासवड जवळील खळद बेलसर या तळावर मराठयांनी जोरदार हल्ला केला. बाळाजी हैबतराव सारखा प्रख्यात सरदार मराठयांनी फाडून टाकला.मोगली फौजेची धूळधाण उडवली. यामुळे खान भयंकर संतापला त्याची नजर पुरंदरकडे गेली.
हत्ती,घोडे,सैनिक,नौबती व निशाणे तय्यार झाले.मोठी फौज पुरंदराकडे निघाली. महाराज पुरंदरावर होते, खानाच्या फौजेचा धुरळा उडवून आलेल्या मावळ्यांचा जल्लोष चालू होता.सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते.इतक्यात टेहळणीच्या बुरुजावरून आरोळ्या ऐकू आल्या, ''खानाची फौज गडाकड येत हाय....तय्यार व्हा..!'' राज्यांनी नौबत वाजवण्याचा हुकूम दिला.गडावर धावपळ सुरु झाली. जो-तो हत्यार घेत, बुरुजावर मोर्चे बांधू लागला.तोफा फौजेकडे वळल्या गेल्या.
खानाची फौज पुरंदरच्या पायथ्याशी आली.खानाने गड चढून जाण्याचा हुकूम दिला.पण सैह्याद्रीचा तो डोंगर आणि पुरंदर हे चढणे म्हणजे काही सोपे काम नाही.फौजेची दैना उडाली, थकव्यामुळे ती धापा टाकू लागली. फौजेचे खूप भयंकर हाल होऊ लागले.
राजांची माकड फौज त्या कडे कपाऱ्यांमध्ये टपुनच बसली होती.मोगली फौज एका टप्यात आली अन गडावरून तोफा,दगड,बंदुकीचा भडिमार सुरु झाला.मोठ्या मोठ्या आकाराचे धोंडे गनिमांवर वरून पडत.खानाची फौज चिरडल्या जाऊ लागली. आरडाओरडा अन किंकाळ्या यांनी कऱ्हेपठार दणाणून गेले.
बाजी पासलकर, गोदाजी जगताप, कावजी मल्हार, बाजी जेधे व भिमाजी वाघ वैगरे मंडळी खानाच्या फौजेचा संहार करू लागली. गनीम डोंगर उतरून पळू लागली.खालून फत्तेखानाचा सरदार मुसेखान याने त्याच्या मंडळींना बरोबर घेऊन पुन्हा गड चढायला सुरुवात केली. त्यामुळे एक मोठी फौज गडावर आली होती.गोदाजी जगताप याने मुसेखानाला गाठले.लढता लढता गोदाजीने त्याच्या छातीत भाला खुपसला. पण मुसेखानही मोठ्या ताकदीचा होता, त्याने तोच भाला उपसला आणि त्याचे तुकडे केले.पण गोदाजीने एवढ्यात खानाच्या खांद्यावर तलवारीने असा वार केला कि तो खांद्यापासून पोटापर्यंत फाटला.
मुसेखान पडला.फौजेचा धीर खचला.स्वतः फत्तेखानही त्याच्या फौजेबरोबर पळत सुटला.दि.८ ऑगस्ट१६४८ फत्तेखानाचा जंगी पराभव झाला.
बाजी पासलकर आणि कावजी मल्हार खासनिस एका तुकडी सोबत खानाच्या फौजेच्या पाठलागला लागले.पाठलाग करत ते सासवड पर्यंत गेले आणि तिथेच पासलकर आणि खानाच्या फौजेची लढाई जुंपली. पासलकर पराक्रमाची शर्थ करत होते.त्यांनी गनिमांची चांगलीच दैना उडवली. अन इतक्यातच घात झाला.एका गणीमाचा घाव पासलकरांना लागला आणि ते तिथेच कोसळले.
सासवडजवळचा पासलकरांचा पराक्रम शिवशाहीर 'बाबासाहेब पुरंदरे' यांनी (२०१८ मध्ये) आपल्या पोवाड्यातून गायला तो असा,
''गरागर फिरवी पट्याला ।
फिरवी पट्याला जिर हा जी जी...।।
चराचर उडवी मुंडक्याला । पासलकर बेभान झालेला
इंच इंच जखमा अंगाला । रक्ताने विर न्हालेला ।
विर न्हालेला जिर हा जी जी...।। ''
स्वराज्याच्या पहिल्या लढाईमध्ये बाजी पासलकरांना वीर मरण आले. मराठ्यांच्या विजयाला दृष्टच लागली. महाराजांना हि बातमी कळली वाटवृक्षा सारखी सावली धरणारा गेला याचे त्यांना खूप दुःख झाले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. पुढे त्यांनी सासवडला पासलकरांवर अंतिम संस्कार केले आणि तेथे त्यांची समाधी बांधली.
आज इतिहास पासलकरांना विसरला. पण त्यांची समाधी आजून साक्ष देते त्यांच्या पराक्रमाची आणि बलिदानाची.
(संदर्भ:- राजाशिवछत्रपती पृ.क्र.२०९-२१२ )
-रोहित सरोदे
No comments:
Post a Comment