पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग १ )
पोस्टसांभार : http://www.misalpav.com/node/47195
मौजे
केर्ले-मार्गशीर्ष महिन्यातील एक निवांत दुपार. रब्बीची पेरणी होउन गाव तस
निवांत झाले होते.गावकर्यांशी हवापाण्याच्या गप्पागोष्टी उरकून गावचा
पाटील पारावर निवांत पसरला होता. डोक्याशी कुर्हाड ठेवून तो निवांत पारावर
पसरला होता. भल्या पहाटे थंडीचे श्रम केल्याने त्याचा डोळा लागला इतक्यात
गावच्या वेशीतून पोरेटोरे गलका करत चावडीकडे पळत आली. पोरांच्या दंग्याने
जागा झालेला पाटील खेकसलाच,"काय कालवा लावला रे?". पोरं घाईघाईने बोलु
लागली.पळाल्यामुळे धापा टाकता टाकता त्यांनी सांगितले कि उगवतीकडून एक फौज
येत आहे.
फौज ?
पाटलाच्या कपाळावर आठ्या उमटल्या. आत्ता तर खरीपाची वसुली करुन बादशाही
अंमलदार गेले होते.मग हि पातशाही भुतावळ पुन्हा गावाकडे कशासाठी आली असेल ?
बर काही गुन्हा,तंटाही झाला नव्हता. आणि झाला असता तरी त्यासाठी इतकी फौज
यायचे कारण नव्हते.
विचार करायला फार वेळ नव्हता,पाटलाने घाईघाईने कुर्हाड उचलली, पोरांना
दरडावून घरात लपायला सांगितले आणि गावाच्या वेशीकडे तो निघाला.
वेशीबाहेरच्या झाडाखाली डोळ्यावर हात धरुन पाटील निरखून बघत होता.धुळ उडत
होती, घोड्यांचा टापा एकु येत होत्या.नक्कीच फौज होती. आता हि साडेसाती परत
का आली? पुढ्च्या आक्रिताच्या कल्पनेने पाटलाच्या पोटात गोळा उठला.तरीही
धीर धरुन तो नेटाने तिथेच उभा राहीला. फौजा जवळ आल्या, तसे धुळीतून सैनिक
दिसायला लागले. आणि पाट्लाला एक महत्वाची गोष्ट दिसली.
भगवे निशाण !!
पातशाही फौजेत भगवे निशाण ? आँ ? अचानक त्याच्या डोक्यात उजेड पडला. हि
आदिलशहाची भुतावळ नव्ह्ती.हे तर आपलच राजं ! शिवाजी राजे !! केर्ले गाव
गेली कित्येक वर्ष करवीर परगण्यात आदिलशाहीच्या वरवंट्यात भरडत होतं.पण
लांब तिकडे कर्यात मावळात्,पुण्याकडल्या अंगाला शहाजीच्या ल्येकाने
स्वराज्याचा डाव मांडल्याच्या खबरा येत होत्या. जेजुरीला जाणारे
भाविक,वारीला जाणारे वारकरी आणि व्यापार्यांकडून बातम्या मिळायच्या. आपला
ह्यो मुलुख कधी या जाचातनं सुटायचा ? पाटलाला खंत वाटायची. शिवाजी राजाची
नजर इकडे कवा वळायची तवाच सुटका व्हायची. पण त्यो क्षण आलाच जणु.
आठवड्यामागं जावळीच्या रानात प्रतापगडाच्या पायथ्याला विजापुरच्या
अफझुलखानाला मारल्याच्या बातम्या आल्या होत्या. आज दस्तुरखुद्द राजाची फौज
गावात आली होती. हरखलेल्या पाटलानं कुर्हाड बाजुला टाकली आणि तो पुढ झाला.
इतक्यात फौज जवळ आली. खिंकाळणारी, फुरफुरणारी घोडी जवळ आली, निशाणाचा
घोडा तर उधळत होता. बघता बघता मराठे सैन्य पाटलाच्या पुढ्यात आले सुध्दा.
खुद्द शिवाजीराजेच पुढ होते. पाटलाने राजांना आधी बघितले नव्हते, पण त्या
तेजपुंज घोडेस्वाराला बघून पाटील उमगून गेला, 'ह्येच शिवबा राजं'. पातशाही
अमंलदारासमोर नाईलाजाने कंबर वाकवायची सवय लागलेल्या पाटील नकळत अदबीने
झुकला आणि त्रिवार मुजरा केला. हात जोडून तो उभारला.
राजे घाईत होते. पन्हाळयाचा बुरुज आता उत्तर आस्मानात दिसत होता आणि
त्यावर उन्मत्तपणे फडकणारे ते आदिलशाही निशाण आता उडवायचे होते. वेळ
नव्हताच. पाटलाची वास्तपुस्त करुन आणि त्याला धीर देउन राजांनी घोडा फेकला
आणि मागोमाग फौजा उधळल्या. पाटलाला भरुन आले. लई हाल सोसले, आयाबहीणी
लुटताना पाहील्या, टोळधाड परवडली अशी बादशाही फौजांनी केलेली लांडगेतोड
निमुटपणे सोसली. आता सुटका होणार ,सुखाचे दिस येणार, कधी नव्हे ती निवांत
झोप लागणार. पाटलाने वाडी रत्नागिरीच्या डोंगराला हात जोडले,'देवा जोतिराया
! राजाला यश दे ! ह्यो मुलुख त्या पातशाही दैत्याच्या तावडीतून सोडव".
राजांची फौज गेल्या काही दिवसात विजयाची भुकेली होती. हात घालावं त्या
मुलुखात यशच मिळत होत. आता समोर होता प्राचीन थेट शिलाहारांशी नाते
सांगणारा पन्हाळागड, पर्णालक दुर्ग. आता हा गड घ्यायचाच. ताबडतोब फौजा
पांगल्या एक तुकडी मावळतीकडे तीन दरवाज्याचा मोहरा घेउन पांगली. एक तुकडी
उत्तर अंगाशी भिडली, तर खुद्द राजे उगवतीला उभे होते, त्यांच्या बाजूने चार
दरवाज्याला मराठे गुळाला मुंग्या चिकटाव्यात तसे चिकटले. गडावरचा आदिलशाही
किल्लेदार बावचळलाच. गड म्हणावा तसा चोख नव्हता. गरजच काय ? भोवताली
एसैपैस आदिलशाही मुलुख पसरलेला. मोगलांचा थोडा धोका होता, पण औरंगजेब
दक्षीणेतून उठून दिल्लीला गेला, पातशहा झाला आणि तो दाब गेला. नाही
म्हणायला शहाजीचा मुलगा सिवाने तिकडे मावळात धुमाकुळ घातलेला होता, पण तो
ईकडे लांब पन्हाळ्यावर कशाला येतोय. शिवाय पातशाहांनी अफझलखानाला नुकताच
तिकडे पाठविला होता. तो त्या शिवाला संपवणार नाही तर पकडून विजापुरला
नेणार.शहाजीला या अफझलखानाने असाच पकडून नेले नव्हते का ? आदिलशाही
किल्लेदार का निवांत नसावा ?
पण पाच दिवसापुर्वीच गडावर खबर आली होती. अफझलखान बिन महमदशाहीला त्या
शिवाने प्रतापगडावर फाडला होता. या खुदा ! किल्लेदार सुन्नच झाला. त्याचा
कानावर विश्वास बसत नव्हता. पुन्हा पुन्हा त्याने जासुसाला खोदून विचारले,
जवाब एकच, 'होय ! खानाला मारले'. किल्लेदाराचे हातपायच गळाले. हबकलाच तो.
अचानक झट़का आल्यासारखा उठला आणि गंगा,जमुना कोठीकडे पळाला.कोठीजवळच्या
पहारेकर्याला समजेना ,किल्लेदाराला काय झाले.कोठी उघडायचा हुकुम
झाला.धान्याची पोती पुरेशी आहेत याची किल्लेदाराने स्वताच्या डोळ्यांनी
खात्री केली. आता वेळ होती दारु कोठार बघायची. तीन दरवाज्याकडे किल्लेदार
धावत निघाला. तिन्ही दरवाजे आणि बुरुजांची पहाणी करुनही त्याचे समाधान झाले
नाही. जो सिवा अफझलखानासारख्या नामांकित सरदाराला सैन्यासह गिळतो,
त्याच्याशी हा किल्ला किती दिवस मुकाबला करेल ? कसलीच खात्री नव्हती. पण
आता आदिलशाही चांद तार्यासाठी, धर्मासाठी, इस्लामसाठी झुंजायचे होते.
घाइघाईने त्याने गडावरचा जासूस बोलावला आणि रसद, दारुगोळ्यासाठी विजापुरला
पत्र लिहीले.जासूस रवाना झाला. आता जरा किल्लेदाराचे मनाचे समाधान झाले.पण
..... अचानक दुपारी गडावर जासूस मनहुस खबर घेउन आला. सिवाने कोल्हापुर
घेतले. सिवा कोल्हापुरात आला, म्हणजे तो आता पन्हाळ्यावर येणार हे नक्की!
या खुदा ! गड अजून होशियार नाही आणि या सैतानाला तोंड द्यायचे कसे ?
आले,आले म्हणेपर्यंत ते मनहुस मराठे मुंगळ्यासारखे गडाच्या चोहोबाजूने
पसरलेले दिसू लागले.गडाला चिकटून वर यायला लागले.घर फिरले कि वासे फिरतात,
याचा प्रत्यय किल्लेदाराला आलाच. गडाच्या घेर्यातील गावे या सिवाच्या
मराठ्यांच्या मदतीला धावली. दगाबाज ! पण आता वेळच नव्हता. वेड्यासारखा
सैरावरा किल्लेदार तटावरुन पळायला लागला. आदिलशाही सैनिक बाण चालवायला
लागले, गोफणगुंडे सुटले.तोफा फुटायला लागल्या.पण काही उपयोग होत
नव्हता.एकीकडून या मराठ्यांना आवरावे तो दुसरीकडून चढून येत होते.बर गड
औरसचौरस पसरलेला. आवरायचे तरी कसे ?नतीजा ?
आता सुर्य मावळून अंधार पडला होता. अंधार तर या मावळ्यांचा कित्येक
वर्षाचा सखा. रात्र झाली कि सह्याद्रीच्या भुताना दुप्पट अवसान चढायचे, ते
बादशाही फौजेला एकायचे होय. एखादा मावळा आत आला कि तो तोफा उडवणार्याला
गारद करायचा.अखेर गडाला माळा लागल्या. भराभर मावळे चढून येउ लागले. ईकडे
चार दरवाज्याच्या चोर दिंडीतून मराठे आत घुसले, दरवाजा करकरत उघडला आणि
बघता बघता मावळी भुते आत घुसली.शाही किल्लेदार शर्त करत होता.'मारो ! काटो !
शिकस्त करो !' आरडाओरडा, थयथयाट सुरु होता, पण विजापुर सैन्याचा धीर
सुटला.एवड्यात अंधारातून एक वार खाशा किल्लेदाराच्या मानेवर झाला, त्याचे
मुंडकेच तुटून जमीनीवर पडले आणि शाही फौजेचा प्रतिकार संपला.
संबंध गडावर एकच आरोळी उठली. "हर हर महादेव !".
त्या अर्धवट प्रकाशात विजयी आनंदात काही मावळे गडाच्या खाली मशाली
घेउन धावत सुटले. राजांना या आणखी एका नव्या विजयाची वार्ता द्यायची होती.
अर्थात त्यात नवीन काय होते, कारण गेले पंधरा दिवस उगवणारा नवा सुर्य फक्त
विजयाच्या वार्ता घेउन येत नव्हता का ? गडाखालच्या गावात राजे पुढचा मनसुबा
रचत आणि गावकर्यांशी बोलत बसले होते. राजांना मुजरा घालून आनंदाची बातमी
दिली गेली." राजे ! गड फत्ते, पन्हाळा काबीज झाला".सगळीकडे एकच खुशीची लहर
उठली. राजांबरोबर असलेले बाजी, फुलाजी साखरा वाटु लागले.ईतक्यात राजे
उत्तरले, "बाजी आम्ही गडावर जाणार"
बाजी थक्क झाले "इतक्या रात्री ? राजे गड आता आपल्याच ताब्यात आहे.उद्या सकाळी सगळेच गडावर गेलो तर?".
राजे आतूरतेने म्हणाले,"नाही बाजी ,आम्हाला हा पन्हाळा आत्ताच बघायचा
आहे.अहो फार प्राचीन गड आहे हा. शिलाहारांनी वसवलेली हि राजधानी या पातशाही
जुलुमाने बाटली होती.गडावरची दैवत जुलुम सहन करत निमुटपणे चोरून रहात
होती.आता या गडावर भगवे निशाण लावले आहे.तीनशे वर्षानंतर आज कोठे गड मोकळा
श्वास घेतो आहे. आज आमचे देवदेवता भरभरुन आशिर्वाद देत आहेत, आज या गडावर
स्वराज्याचा मोकळा वारा वाहतो आहे.गड आम्हाला आजच बघायचा आहे.रात्र झाली,
अंधार झाला म्हणून काय झाले? मशालीच्या उजेडात आपण हा महादुर्ग बघुया".
घोड्याला टाचा मारल्या गेल्या आणि अंधारात मार्गशीर्षाच्या थंडीची
पर्वा न करता महाराज आणि साथीदार पन्हाळ्यात पायउतार झाले. मावळे दिवट्या
घेउन धावले आणि त्यांच्या सोबत महाराज गड निरखू लागले. हा सज्जाकोठी, हा
गरजणारा वाघ दरवाजा, उत्तरेला रोख धरलेला दुतोंडी बुरुज, पिछाडी सांभाळणारा
पुसाटी बुरुज, शिलाहारांचे स्थापत्य सांगणारा तीन दरवाजा आणि शेजारचा
जलमहाल असणारी श्रीनगर उर्फ अंधारबाव, पराशर ऋषींच्या तपश्चर्येची
साक्षीदार असणारी लगुडबंद, दौलती बुरुज, कलावंतीणिचा सज्जा,
सादोबा,सोमेश्वर तलाव हे गडाची तहान भागवायला समर्थ होते, तर पोटात अनेक
धान्याची पोती साठवणार्या त्या गंगा,जमना कोठ्या.सारे सारे पाहून महाराज
प्रसन्न झाले.
राजांना गड ताब्यात असण्याचे महत्व ठाउक होते. नवीन गड बांधाण्याची हौस
होती.यामुळे प्रचंड खर्च व्हायचा. नवीन गड उभारण्यासाठी पैशाची तरतुद
करायची वेळ यायची, तेव्हा कारभारी म्हणाले,"महाराज, हे गड उभारायचे म्हणजे
फार खर्च येतो. हा खर्च करायलाच पाहिजे का ?"
"गड नसता राज्य देश मोकळा रहातो.परचक्र येता प्रजा निराश्रय होते. आमचा
पुणे परगणा कसा उध्वस्त झाला पाहिला कि नाही ? त्याचवेळी गडाचे महत्व
आमच्यावर ठसले. आता आम्हाला स्वराज्य उभारायचे असेल तर बळकट किल्ले तय्यार
ठेवायला हवेत.तरच या पातशाह्यांशी आम्ही टक्कर घेउ शकतो".
गड ताब्यात येउन चार दिवस उलटले. महाराज सदरेवर बसून गडाची व्यवस्था
तपासत होते.गडाखालची गावे.महसुल, खुद्द गडाची तब्येत सांगणारी कागदपत्रे
राजे जातीने तपासत होते. तोच हुजर्या आत आला आणि मुजरा करून वर्दी
दिली,"महाराज गडावर सरनौबत येत आहेत". सरनौबत म्हणजे नेतोजी काका. नेतोजीना
महाराजांनी अफझलखानाला मारल्यावर आदिलशाही मुलुखावर सोडले होते.
सरनौबतांनी मोठाच पराक्रम गाजवला होता.
कवठे,बोरगाव्,मालगाव्,कुंडल,घोडगाव्,सत्तीकीर,दोदवाड, सांगली,
गोकाक,मुरवाड, कागल,कुरुंदवाड्,किणी,आरग, अथणी,तिकोटे मोठा प्रदेश ताब्यात
घेउन नेतोजी पन्हाळगडावर दाखल झाले. महाराज जातीने सदरेबाहेर आले, तोच
नेतोजी आलेच. गळाभेट घेउन क्षेमकुशल झाले. नेतोजींनी सारी मुलुखगिरी
सांगितली. महाराजांना परमसंतोष झाला. नेतोजीनी पुढची कामगिरी विचारली.
महाराजांनी आज्ञा केली, "काका ! पन्हाळ्यासारखा बळकट किल्ला आताच
स्वराज्यात दाखल झाला आहे.आता या मुलुखाचा चोख बंदोबस्त व्हायला हवा आहे.
अजून काही आदिलशाही ठाणी आपल्या ताब्यात आलेली नाहीत. मिरजेचा भुईकोट असो
किंवा मावळतीकडचा खेळणा असो, हि ठिकाणे नसतील तर पाचरीसारखी आपल्याला रोखत
रहातील. तुम्ही एक तुकडी खेळण्याला पाठवा आणि तुम्ही स्वत: मिरज्,रायबागकडे
कुच करा,अजून आदिलशहाचा दरबार भेदरलाय, त्यानाच आजून एक मावळी हिसका
दाखवुया.".
लगोलग नेतोजी बाहेर पडलेच.यंदाचे सीमोल्लंघन जणु दसर्याला न होता
मार्गशीर्षात झाले होते. लगोलग चार पाच दिवसात खेळणा घेतल्याची बातमी गडावर
आली देखील. राजे लागलीच खेळण्यावर रवाना झाले. नवा मुलुख घेतल्याच्या
बातम्या तर रोजच्याच झाल्या होत्या.
गजापुरच्या घनदाट झाडीतून राजे अखेरीस खेळण्याच्या पायथ्याशी आले.
पाताळाशी स्पर्धा करणार्या त्या दर्या, फक्त वार्याला फिरकू देणारे
सह्यकडे आणि आडवातिडवा पसरलेला तो खेळणा महाराजांना विलक्षण आवडला. गडाच्या
उगवतीची वाट विलक्षण अरुंद, बर तिथून चढायचे म्हणजे अवघड पायर्या आणि वर
लक्ष ठेवणारा तो मुंडा दरवाजा. मावळतीकडची वाट तर थेट घसरगुंडीच जणु. हा गड
ताब्यात आला म्हणजे तळकोकणाचे नाकच हातात आल्यासारखे होते. ईथून आता मराठी
फौजा आता आचर्यापासून कुडाळपर्यंत जायला मोकळया झाल्या.
एकदा महाराज आणि सर्व साथीदार फिरत फिरत कुवारखांबी कड्यापाशी आले. गडाचा
वक्राकार कडा आणि त्याचे एका बाजुला असलेले सुळके मोठे भेदक दिसत होते.
गडाच्या पुर्वेला सुर्याचे किरण जमीनीवर उतरणार नाहीत अशी घनदाट झाडी दिसत
होती.महाराज हा नजारा बघत हरवून गेले.
नेतोजीच्या उदगारांनी महाराजांची तंद्री भंग झाली, "इतके काय निरखून बघताय महाराज ?".
"काका ! हि घनदाट झाडी बघता आहात. याच जंगलाने , सह्याद्रीने आणि या खेळण्याने एका शत्रुला आस्मान दाखवले होते" राजे उत्तरले.
"हि काय गोष्ट आहे?" सगळ्यांची उत्सुकता ताणली गेली. महाराज सांगू लागले,
"या गडावर एक निकराची लढाई दोनशे वर्षापुर्वी झाली होती. या भागात बहामनी
सुलतानाचे राज्य होते. अल्लाउद्दीन अहमदशहा राजधानी बिदर मधून राज्यकारभार
पहात होता.पुर्ण हिंदुस्थानात मुसलमानी राजवट पसरत चालली होती. पण आपल्या
या मराठी मुलुखात अनेक मराठा सरदार होते जे स्वतःच स्वतंत्र अस्तित्व राखून
होते. अनेकदा हज यात्रेसाठी जलमार्गाने निघालेल्या यात्रेकरूंची कोकणात
लूट केली जाई. या सगळ्याचा बंदोबस्त करण्यासाठी अहमदशहाने आपला सर्वात
पराक्रमी सरदार खलफ हसन मलीक उत तुज्जार याला कोकण मोहिमेवर पाठवले. मलिक
उत तुज्जार सात हजाराची बहामनी सेना घेऊन निघाला. चाकणला त्याने आपली छावणी
उभा केली आणि मावळातून तो कोकणात उतरला. रायरी वगैरे किल्ले ताब्यात
घेतले. तिथल्या शिर्के नावाच्या मराठा सरदाराला त्याने आपल्या ताब्यात
घेतले. या शिर्केना मलिक तुज्जारने मुसलमान होण्याची अट घातली. शिर्के
म्हणाले, 'मी धर्मांतर करण्यास तयार आहे मात्र शेजारच्या खेळणा गडावरील
माझा शत्रू शंकरराय मोरे याचे देखील धर्मांतर करावे.' शिर्केच मत होतं की
फक्त मी जर धर्मांतर केले तर मोरे माझी अवहेलना करेल आणि माझी माझ्या
बिरादरीत पत कमी होईल आणि प्रजेचं बंड होऊन माझ माझ्या वाडवडिलांपासुन
ताब्यात असलेला प्रदेश माझ्या हातातुन जाईल. म्हणुन माझा प्रतीस्पर्धी
शंकरराय याला प्रथम वठणीवर आणा आणि त्याच्या ताब्यातील प्रदेश माझ्या
अधिका-यांच्या स्वाधीन करा. त्याचे देखील धर्मांतर झाले तर मला त्रास होणार
नाही. अशी विनंती शिर्केनी मलिक उत तज्जारकडे केली. मलिक तज्जारला ठाऊक
होते की खेळणा हा अजिंक्य आहे. तिकडे जाण्याचा रस्ता हा बिकट आहे. पण
शिर्क्यांनी खेळण्यापर्यंत पोहचवण्याचे त्याला वचन दिले. खेळण्याचा मोह
मलिक तज्जारला आवरला नाही. अख्खी कोकणपट्ट्यावर आपलं वर्चस्व निर्माण होईल
सुलतानाची शाबासकी मिळेल म्हणून मलिक तज्जार आपली सेना घेऊन शिर्क्यांच्या
पाठोपाठ विशाळगडाच्या दिशेने निघाला. शिर्क्यांच्या गोड बोलण्याला मलिक
तज्जार भूलला.त्यांनी त्याला सह्याद्रीच्या उंच कड्यावर आणून अडकवले.एकीकडे
हे आपण पहातो आहोत ते घनदाट जंगल तर दुसरीकडे हि भयानक दरीकपारी. वाटा
वाकड्या तिकड्या. एवढ्या प्रचंड सेनेला धड चालता देखील येत नव्हते.
विसाव्याला जागा नव्हती. त्यातच मलिक उतज्जारला रक्ताच्या हगवणीचा त्रास
सुरू झाला. त्याची सेना त्या जंगलात बेजार झाली होती. अशातच बेसावध क्षणी
शिर्के तिथून सुटले आणि विशाळगडावरच्या शंकरराय मोरेंना जाऊन मिळाले.
दोघांनी मिळून ते हजारोंच बहामनी सैन्य सहज कापून काढलं. खुद्द मलिक उत
तुज्जार या युद्धात मारला गेला. काका ! सह्याद्रीने हि केलेली मदत आपले लोक
पुढे विसरले आणि आपल्या वाडवडीलांना या पातशाही गुलामगिरीला तोंड द्यावे
लागले. फक्त आमच्या आबासाहेबांनी प्रयत्नाची शर्थ केली. अगदी हा खेळणा
स्वकीयांच्या फितुरीमुळे तो आदिलशाहीच्या ताब्यात गेला."
राजे बोलता बोलता स्तब्ध झाले. सगळेच जण निशब्द झाले.
आडवातिडवा प्रशस्त पसरलेला , शंकरराव मोर्याचा पराक्रम आणि मलिक रेहानची
फजितीची कथा सांगणारा हा खेळणा महाराजांना आवडला, त्यांनी त्याचे नामकरण
केले "विशाळगड".
विशाळगडावर महाराज काही दिवस राहिले आणि पन्हाळ्याला परत आले.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
"बा अदब बा मुजा ! होशियार ! सल्तनते आदिलशाही अली बादशहा पधार रहे है !
खडी ताजीम हो" भालदार,चोपदाराने ललकारी दिली, आणि विजापुर दरबार सुरु झाला.
अवघा अठरा वर्षाचा अलि आदिलशहा तख्तावर येउन बसला. गेले महिनाभर दरबार
भरायचा, पण कामकाज चालायचे ते जान नसल्यासारखे. जय्,पराजय दरबाराला नवीन
नव्हते. पण त्या बंडखोर शहाजीच्या सिवाने अफझलखानाला मारल्यानंतर एक उदासी
वातावरणात आली होती. त्यात वाई,मिरज,कोल्हापुरचा बराच मुलुख सिवाने बळकावला
होता.आला दिवस काही तरी मनहुस खबर घेउनच यायचा. नुसत्या खबर नाही, तर
आठवड्यापुर्वी अफझलचा बेटा फाजलखान विजापुरात आला होता,पण तो अजून
घराबाहेरही पडला नव्हता. आज फाजल दरबारात हजर होता.मान खाली असली तर सारखा
अस्वस्थपणे हाताचा चाळा करणारा आणि अंग विलक्षण ताठलेला फाझल आज दरबाराने
पाहीला होता. ईतक्यात चिकाच्या पडद्यामागे हालचाल झाली आणि समस्त दरबाराने
त्या दिशेने मुजरा घातला, बडी बेगम आज जातीने हजर होती. फाझलने ताबडतोब एक
अर्जी शिपायाला दिली आणि बडी बेगमकडे सुपुर्द करण्यासाठी दिली आणि मान खाली
घालून तो हुकुमाची वाट बघत उभा राहिला.
"तो तुम सिवापर फिर एक बार जाना चाहते हो ?" अर्जी वाचल्यानंतर बडी बेगमचा तीक्ष्ण स्वर दरबारात घुमला.
"हां, बेगमसाहीबा" खाल मानेने पण निश्चयाने फाजल उत्तरला.
"हम तुम्हे जरुर ईजाजत देते है|लेकीन ये मुहीम आसान नही, पता है ना?" पुन्हा एकदा बडी बेगमेने खडया स्वरात विचारले.
"जानता हुं साहिबा, लेकीन पिछ्ले सात दिन सो नही पाया | सोता हुं तो वो
शैतान मराठे, जावलीका वो पहाडी और घने झाडीभरा मुल्क और वो चुहा सिवाही
सामने आते है | अब्बुजान को तो एक पलभी भुलना मुमकीन नही | उन्हे कोई ईस
तरहसे मार सकता है, अभी भी यकीन नही आता | वो तो प्रतापराव मोरे साथ जो उस
घने झाडीसे वापस तो आ गये और अल्ला का लाख शुक्र है, हमारा जनाना बच
गया|लेकीन अब सोचता हुं, फिर एकबार सिवा पे जा के अब्बाजान कि मौत का
इंतकाम लुं, अगर आपकी इजाजत हो तो" फाझलचा स्वर दीन पण निश्चयी होता.
त्याला काहीही करुन सिवाला संपवायचे होते. सिवासारख्या दुष्मनाचा काटा निघत
असेल असेल तर दरबाराला हवेच होते.अफझल मेल्याने दरबारात जी उदासी पसरली
होती, ती फाझलच्या या अर्जीने उडाली आणि पुन्हा एकदा चैतन्य पसरले.बडी
बेगमने अर्जी मंजुर केली आणि फौज गोळा करायचा हुकुम केला.
ईतक्यात रुस्तमेजमा पुढे आला आणि मुजरा घालून म्हणाला "बडी बेगम साहीबा,
आपली ईजाजत असेल तर या मोहीमेत मलाही सोबत जाण्याची परवानगी द्यावी. त्या
नेतोजी आणि सिवाजीने माझ्या मुलुखाला काबीज केले आहे.कोल्हापुर ते
रत्नागिरी माझाच मुलुख आहे.मी ही बरोबर जातो आणि त्या सिवाला पन्हाळ्यावरुन
हुसकावून शाही चाकरी बजावतो".
रुस्तमेजमा ???
तो पुढे आलेला बघून बडी बेगमेच्या कपाळावर नकळत आठी चढली. सिवा याच्याच
मुलुखात घुसतो आणि बरोबर तीन हजार स्वार आणि पायदळ होते.तरी याने त्या
भोसल्याला रोखले नाही. हा आणि याचा वालीद पहिल्यापासून शहाजी भोसल्याच्या
नजदीकीचे.याचा विश्वास धरावा का?
पण फार विचार करायला वेळ नव्हता. आज सिवाने पन्हाळा घेतला.उद्या तो
विजापुरवर आला म्हणजे पळायची वेळ येणार होती. काहीही करुन सिवाचा काटा दुर
होत असेल तर बेगमेला ते हवेच होते. तीने ताबडतोब अर्जाला मंजुरी दिली.
--------------------------------------------------------------------------------------------------------------
पन्हाळ्याच्या सदरेवर नेतोजी,बाजी,फुलाजी, पन्हाळगडाचे किल्लेदार
त्रिंबक भास्कर सगळे जमले होते. गडाच्या आणि ताब्यात घेतलेल्या मुलुखाच्या
बंदोबस्ताची चर्चा सुरु होती. आदिलशाही प्रदेशावर कोठे मारा करायचा आणि काय
ताब्यात घ्यायचे, याचे बेत आखले जात होते. ईतक्यात हुजर्या आत आला आणि
मुजरा करुन म्हणाला, "महाराज ! जासुस आला आहे, विजापुरची काही तरी खबर
आहे".
"पाठव त्याला आत" राजांनी परवानगी दिली.
जासुस आत आला मुजरा घालून म्हणाला, "महाराज विजापुर दरबारात पुन्हा
हालचाली चालु झाल्यात. फाजलखान आणि रुस्तमेजमा फिरुन स्वराज्यावर यायला
निघालेत.फौजा जमा केल्यात आणि मिरजेकडे निघालेत. ह्या दोघां सरदारांसमवेत
दहा हजार फौज दिली आहे. तसेच हत्ती, तोफा, उंट वगैरे सारा थाट केला
आहे.बरोबर मलिक इतबार, सादातखान, फत्तेखान, बाजी घोरपडे, सजेराव घाटगे आदी
सरदार आहेत."
"फाजलला पुन्हा मावळच्या मिरच्याच्या ठेच्याची आठवण झालेली दिसते
आहे.यावेळी बादशहाने बराच नजराणाही सोबत पाठवलेला दिसतोय" महाराजांच्या
मुखावर स्मित होते. सदरेवर एकच हास्य उमटले.
"महाराज, येउ दे फाजलला. वाईत छापा घातला तेव्हा हा फाझल जनान्याबरोबर
थोडक्यात निसटला.तेव्हाच तलवारी खाली यायचा, पण नशीब बलवत्तर म्हणून
अंधारातून पळाला. आता ह्यो मौका न्हाई सोडायचा.येउ देतच फाझलला".नेतोजी
खुशीत म्हणाले.
"होय काका ! सोबत आमचा जुना सखा रुस्तमेजमा आहेच. रुस्तम आमच्या
आबासाहेब शहाजी राजांच्या मित्राचा, रणदुल्लाखानाचा मुलगा. विजापुर दरबारात
असला तरी आमचा आतून स्नेह आहे बरं का.तो बरोबर आहे म्हणल्यावर फाझल अलगद
आमच्या तावडीत येतो कि नाही बघा" राजे उत्तरले.
सगळेजण या नव्या मोहीमेचा व्युह रचायची तयारी करु लागले.
क्रमशः
No comments:
Post a Comment