विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 28 November 2020

मराठा साम्राज्य विस्ताराचा इतिहास :





 मराठा साम्राज्य विस्ताराचा इतिहास :

------------------------------------------------
1698 नंतर आधी छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या काळात मराठ्यांनी औरंगजेब विरोधात बचावात्मक पवित्रा सोडून दिला, आणि त्याच्या युद्धामुळे खचलेल्या आर्थिक स्थितीचा फायदा घेत आक्रमणाचा पवित्रा अंगीकारला.
ह्या काळात खंडेराव दाभाडे, परसोजी भोसले, सरदार कदम बांडे आणि गायकवाड यांनी उत्तर महाराष्ट्र, गुजरात आणि वर्हाड ह्या प्रांतावर मराठा साम्राज्याचा विस्तार केला.
------------------------------------------------
मराठा साम्राज्याचा जितका विस्तार झाला, त्यातला अर्ध्याहून जास्त साम्राज्य विस्तार हा रघूजीराजे भोसले यांनी केला आहे.
1737 ते 1740 ह्या काळात रघूजीराजे भोसले ह्यानी कर्नाटक, हैदराबाद, तसेच एकूण दक्षिण भारतात मराठा साम्राज्याचा विस्तार केला. त्यांनी ह्या काळात दोस्त अलीखान आणि त्याच्या सर्व साथीदार आणि शासकांचा एकंदरीत पाडाव केला.
युद्धाच्या शेवटी जवळचे सर्व साथीदार आणि सोबत नातेवाईक देखील मारले गेल्याने दोस्त अली खान रघूजीराजे भोसले यांना शरण आला.
1741 मध्ये नागपूर च्या गोंड राज्यावर रघूजीराजे यांनी अधिकार प्रस्थापित केला.
पुढे 1745 पर्यंत रघूजीराजे भोसले यांनी ओडिसा, छत्तीसगढ, झारखंड, हे प्रदेश मराठा साम्राज्यात जोडले.
ह्यानंतर च्या काळात रघूजीराजे भोसले यांनी बंगाल वर एकामागोमाग एक आक्रमणे केली व अंततः तिथल्याअली वर्दी खान ह्या नवाबाला नमवले.
शेवटी अली वर्दी खान याने रघूजीराजे भोसले यांच्याशी तह केला व बिहार व बंगाल (आजच्या बांगलादेश सहित ) ह्या प्रदेशासाठी मराठ्यांना 20 लाख रुपये वार्षिक चौथाई द्यायचे कबूल केले. शिवाय रघूजीराजे यांनी तीन कोटी युद्ध खर्च देखील घेतला.
अशाप्रकारे दक्षिण आणि पूर्व उत्तर भारतावर रघूजीराजे भोसले यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार केला.
रघूजीराजे भोसले यांच्या अधिपत्याखाली मराठा साम्राज्याचा जो आणि जितका भाग होता, तो भाग.... बाकी शिंदे, होळकर, पेशवा, गायकवाड यांच्या कडे असलेले भाग मिळवले, तरी त्याहून मोठा आणि विस्तृत होता.
------------------------------------------------
मराठा साम्राज्याचा माळवा (म्हणजे मध्यप्रदेश) आणि बुंदेलखंड ह्या भागात विस्तार,
बाजीराव पेशवे, राणोजी शिंदे, मल्हार राव होळकर, राणोजी भोईटे, आनंदराव पवार ह्यानी केला.
1740 पर्यंत.
ह्यातली बुंदेलखंड ह्या भागाची जहागिर छत्रपती शाहू महाराजांनी बाजीराव पेशवे याना दिली.
माळवा प्रांताची जहागिर छत्रपती शाहू महाराजानी राणोजी शिंदे, मल्हार राव होळकर यांना दिली.
धार पवारांना देण्यात आले होते, आणि भोईटे याना देखील वेगळी जहागिर शाहू महाराजांनी इनाम दिली होती.
------------------------------------------------
ह्यानंतर मराठा साम्राज्य दिल्ली, राजस्थान आणि पाकिस्तान (अटक, पेशावर ) ह्या भागावर पसरवण्याचे कार्य महारराव होळकर, जनकोजी शिंदे आणि सर्वात मुख्यत्वे दत्ताजी शिंदे यांनी केले.
------------------------------------------------
अशाप्रकारे छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या दरबारी असलेल्या कर्तृत्ववान लोकांद्वारे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर केले.
हे मराठा साम्राज्य भारतभर पसरलेले होते.
सर्वांना विनम्र अभिवादन
जय भवानी...... जय शिवाजी...

रघुजीराजे भोसले(pratham) नागपुर

 


रघुजीराजे भोसले(pratham) नागपुर

= सातारा जिल्ह्यातिल वाईनजिक क्रष्णाकिनारी पांडववाडी येथे भैरवगडास हिंगणीकर भोसल्यापैकी बापुजी, परसोजी,साबाजी या तिन बंधुपैकी बापुजीँचा मुलगा बिँबाजी आणी बिँबाजीपुञ हे राजेरघुजी भोसले हे होय आणी तेच नागपुरचे प्रथम राजेरघुजी भोसले होय,ते नागपुर येथे जाण्यापुर्वी नाशिक जिल्ह्यातिल भाम येथे होते, नाशीक जिल्ह्यातिल भामच्या कान्होजी भोसल्याचा पाडाव केल्यानंतर शाहु महाराजानी"सेनासाहब सुभा वस्ञे व सनद"बहाल केली भाम येथुनच ते संपुर्ण वर्हाड प्रांतावर अमल गाजवत.

★राजे दत्ताजीराव राजे लखुजीराव जाधवराव ★


 ★राजे दत्ताजीराव राजे लखुजीराव जाधवराव ★

१) परिचय = हे राजे लखुजीराव जाधवराव यांचे थोरले पुत्र होत.
२) है पराक्रमी असुन यांचा उल्लेख शिवभारतात आढळतो. हे नेहमी पिता राजे लखुजीराव यांच्या प्रत्येक लष्करी मोहिमेसोबत असत.याना पतंगराव हा किताब असुन या नावाची इ सन १६०६,१६१५,१६१७ सालची पत्रे देखिल उपलब्ध आहेत.
३) जन्म = यांच्या जन्माची नोंद आढळत नाही.
४) म्रुत्यु = २३ फेब्रुवारी १६२३ साली देवगिरीवर खंडागळे हत्ती प्रकरणात .
खंडागळे हत्तीप्रकरण हे एक आकस्मात घडलेला प्रसंग होता..यात राजे जाधवराव घराण्याने पराक्रमी दत्ताजीराव व राजे भोसले घराण्याने संभाजीराजे (शहाजीराजे यांचे चुलत बंधु) हे दोन पराक्रमी मोहरे गमावले..या दोन घराण्यातील हा प्रसंग हा आकस्मात घडलेला प्रसंग असुन यापुढे या दोन घराण्यानी एकमेकाविरुद्धच्या शाह्यात लढले परंतु एकमेकाचा रक्तपात कधी केला नाही.
४) कुटुंब = याना तीन पुत्र होत. 1.राजे यशवंतराव 2. राजे ठाकुरजी उर्फ पतंगराव 3. राजे लिंबाजी.
याचा उल्लेख खुद्द राजे लखुजीराव यांच्या समाधीवरील एका शिलालेखात आढळतो.
५) राजे यशवंतराव = हे राजे दत्ताजीराव यांचे थोरले पुत्र असुन हे सुरुवातीपासुन आजोबा राजे लखुजीराव यांच्या प्रत्येक लष्करी मोहिमेत असत. प्रसिद्ध भातवडी युदधात देखिल सहभागी असल्याचा उल्लेख शिवभारतात आढळतो. हे पराक्रमी होते.
यांची हत्या देखिल आजोबा व चुलते राजे आचलोजीराव व राजे राघोजीराव यांच्या समवेत देवगिरीवर झाली. यासमयी याना ४००० जात व ३००० स्वार अशी मनसब होती. तसेच यांचा उल्लेख जाधवराव घराण्याचे " सिपेसालार एवं पराक्रमी कुलवर्धक यौद्धा" असा केलेला आढळतो.
याना दोन पुत्र होत. * ¡◆ राजे रतनोजी उर्फ रुस्तुमराव ◆ राजे लखुजी दुसरे उर्फ लखमोजी.
◆ राजे रतनोजी उर्फ रुस्तुमराव = यांचा उल्लेख इ सन १६३९ च्या एका अस्सल कौलानाम्यात आढळतो. हे सुरुवातीस शिवराय महाराजांसोबत होते,परंतु परत सिंदखेडराजा परिसरात आल्याचा उल्लेख सापडतो.
रतनोजी व यांचे चुलते राजे ठाकुरजी याना इ सन १६३३ च्या जाधवराव घराण्यातील वाटणीपत्रातील एक हिस्सा मिळाल्याचा उललेख असुन राजे लखुजीराव यांच्या म्रुत्युनंतर जाधवराव घराण्याचा "जाधवराव" हा वंशपरंपरागत किताब देखिल याच ठाकुरजीच्या व यशवंतरावांच्या थोरल्या शाखेत दिलेला आहे. यानी व चुलते ठाकुरजी यानी छत्रपती शिवराय महाराजांशी संधान बांधुनच कार्य केले. रतनोजी याना तीन पुत्र व एक कन्या होत.
* राजे रायाजीराव /रायभानजी = याना १५०० जात व ६०० स्वाराची मनसब असल्याची नोंद मिळते. यांच्या वंशजशाखा सिंदखेडराजा परिसरातील जवळखेड व चिखली परिसरातील करवंड येथे आहेत.
* राजेसुभानजी/सुर्यभानराव = याना ७०० जात व ३०० स्वार मनसब होती. यांची वंशजशाखा सिंदखेडराजा परिसरातील उमरद देशमुख (रुसुमचे) या गावी आहे.
* राजे लखुजी तिसरे = यांची वंशजशाखा ही जालना जिल्ह्यातील सारवडी येथे आहे.
* दुर्गाबाईसाहेब = या छत्रपती संभाजी महाराज यांच्या द्वितीय राणीसाहेब होत.
◆ राजे लखुजी दुसरे/लखमोजी =यांची वंशजशाखा भुईंज सातारा येथे असुन ही शाखा शेवटपर्यंत मराठा स्वराज्यात राहिली.छत्रपती शाहु महाराज यांच्या कार्यकाळात या शाखेने उल्लेखीनीय कामगिरी केली. लखमोजी उर्फ लखुजी दुसरे यांचे पुत्र खंडोजी जाधवराव हे छत्रपती शिवाजी तिसरे (छत्रपती राजाराम महाराज व ताराबाई राणीसाहब यांचे पुत्र) यांच्या कार्यकाळात म्हणजे इ सन १७०२-०५ या काळात सिंहगडचे किल्लेदार होते.
५) राजे ठाकुरजी उर्फपतंगराव = हे राजे दत्ताजीराव यांचे द्वितीय पुत्र असुन यशवंतराव यांचे कनिष्ठबंधु असुन यांचा उल्लेख इ सन १६३३ च्या वाटणीपत्रात असुन हा हिस्सा यशवंतराव यांच्या पुत्रासोबत एकत्रीत आहे. हे इ सन १६६० सालच्या अफजल खानाच्या वधासमयी शिवराय महाराजांच्या सैन्यात मराठा सरदार म्हणुन पराक्रम केल्याचा उल्लेख सापडतो. तसेच यानी महाराजांशी संधान बांधुन वेळेनुसार कधी स्वराज्यात तर कधी मोगलांकडे जाऊन स्वराज्याचे कार्य केले याचा उललेख एका इंग्रजांच्या पत्रात, तसेच मोगलसाहित्यात देखिल आढळतो.
याना "दखनी जाधवराव" हा किताब होता. ठाकुरजी हे याच नावाने ओळखले जात. याना ५००० /५००० अशी मनसबदारी होती व हे इ सन १६७२ साली नाशीकचे ठाणेदार होते.यानी महाराजांशी संधान बांधुन साल्हेर मोहिमेत महाराजाना साथ देऊन परत स्वराज्यात आले.परंतु महाराजांच्या सांगण्यावरुन ठाकुरजी व पुतणे रुस्तुमराव /रतनोजी परत मोगलांकडे गेले. तेदेखिल दक्षिण दिग्विजयागोदर आपली खास माणसे महाराजानी मोगलाकडे पेरली होती त्यापैकी हे दोघे होत.
अशाप्रकारे जाधवराव घराण्याची राजे दत्ताजीराव जाधवराव यांची थोरली शाखा देखिल मराठा स्वराज्याच्या कार्यास वाहुन घेतलेली शाखा होय हेच सिद्ध होतै.
सदरील समाधी सिंदखेडराजा येथे आहे.
यांच्या वंशजशाखा = १) जवळखेड,२) उमरद देशमूख (रुसुमचे) ता सिंदखेडराजा, ३) करवंड ता चिखली जी बुलढाणा, ४) करणखेड ता चिखली जि-बुलढाणा, ५) वडाळी ता कन्नड , जि औरंगाबाद, ६) सारवडी जि जालना व ७) भुईंज (सातारा)

Friday, 27 November 2020

शिवस्वराज्याचा साक्षी रायरेश्वर

 



शिवस्वराज्याचा साक्षी रायरेश्वर

वयाच्या पंधराव्या वर्षी शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर या आपल्या बारा मावळातील सवंगडय़ांच्या साथीने २६ एप्रिल १६४५ रोजी स्वराज्याची शपथ घेतली. यामुळे रायरेश्वर मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.
📷पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात हे रायरेश्वर! इथेच शिवरायांच्या ओठातून ‘‘हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा’’ असे शब्द बाहेर पडले, त्यांची इमानदार मित्रमंडळी शब्दाला जागली आणि हिंदवी स्वराज्य साकारले! येथे यायचे असेल तर यासाठी पुण्याजवळचे भोर-आंबवडे करत रायरेश्वरच्या पायथ्याचे कोल्रे गाव गाठावे लागते. कोल्रे गावातून रायरेश्वरला जी वाट जाते तिला ‘गायदरा’ म्हणतात. पण याशिवाय भोवतीच्या अन्य गावांतूनही काही वाटा-आडवाटाही या पठारावर चढतात. लगतच्याच केंजळगडावर जाण्यासाठी गाडी रस्ता आहे. गडावरील पाय-याची डागडुजी तसेच लोखंडी शिडी बसविल्यामुळे गडाची चढण सोपी झाली आहे. प्रत्येक ट्रेकरने एकदा तरी या किल्ल्याला भेट द्यावी. केंजळगडापाशीच असणा-यारायरेश्वराच्या १५०० मीटर उंचीच्या विस्तृत पठारावर रायरेश्वराचे हे प्राचीन शिवस्थान आहे. महाराष्ट्रात एवढय़ा उंचीवर असणा-याकाही निवडक पठारांमध्ये रायरश्वर हे प्रसिद्ध पठार आहे. पाचगणीचे टेबल लॅन्ड सर्वाना माहीतच असते; मात्र त्याच्यापेक्षाही उंच आणि लांब असे टेबल लॅन्ड म्हणजे रायरीचे पठार. रायरेश्वराचे पठार खूप मोठे आहे. ११ कि.मी. लांबी आणि दीड कि.मी. रुंदी असेल. दाट झाडी, खोल द-या, उंचच उंच सुळके, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, लांबच लांब सोंडा आणि आडवळणी घाट यामुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे. येथेच महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. त्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले, मन प्रसन्न झाले. दोन मिनिटांसाठी तो प्रसंग डोळ्यासमोरून तरळून गेला, ज्यात शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसोबत स्वराज्याची शपथ घेत आहेत. पठारावर पूर्वाभिमुख रायरेश्वराचे मंदिर आहे. ओसरी, सभामंडप आणि गर्भगृह अशी याची रचना. मूळ मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार झालेला आहे. अशाच एका जीर्णोद्धाराचा तपशील सांगणारा एक शिलालेख मंदिराच्या सभामंडपाच्या भिंतीवर आहे. गडावर रायरेश्वराच्या शिवमंदिराशिवाय जननी देवीचे मंदिर व पाण्याची शिवकालीन टाकी आहेत. या किल्ल्याहून सूर्यास्त व सूर्योदय विलोभनीय दिसतो. गडावरील जंगम लोकांची वस्ती आहे. ती मंडळी पर्यटकांची सोय करतात. पावसाळ्यात किल्ल्याच्या पठारावर फुलझाडे बहरलेली असतात. यामुळे पावसाळ्यात गडाला भेट देण्यात वेगळीच मजा असते. पठारावर भातशेतीचे प्रमाणही मोठे आहे. किल्ल्यावरून पांडवगड, वैराटगड, राजगड, तोरणा, सिंहगड, विचित्रगड, पुरंदर दर्शन होते. किल्ल्यांना आणि महाराष्ट्राला जे सौंदर्य व सन्मान प्राप्त झाले ते महाराजांमुळे. म्हणूनच आपण हे जपले पाहिजे, म्हणजे पुढच्या पिढीलाही हे ऐतिहासिक वैभव पाहायला मिळेल. आपण या सौंदर्याचे रक्षक झाले पाहिजे. भक्षक नव्हे.

सोनोपंत डाबीर (मुत्सद्दी)


 सोनोपंत डाबीर (मुत्सद्दी)

छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अतिशय महत्वाचा मुत्सद्दी शहाजींच्या काळापासून भोसले कुटुंबाची सेवा करीत होता. जेव्हा शहाजींना कर्नाटकात अहेमाद आदिलशहाने पाठवले तेव्हा शहाजींनी सोनोपंतला पुणे व सुपे प्रांताच्या प्रशासकीय कामात जिजाबाई व शिवरायांच्या मदतीसाठी पाठवले.
स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी शिवरायांना उत्तम मार्गदर्शन केले.
वयाच्या पंधराव्या वर्षी शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर या आपल्या बारा मावळातील सवंगडय़ांच्या साथीने २६ एप्रिल १६४५ रोजी स्वराज्याची शपथ घेतली.
In 1658 मध्ये जेव्हा मुस्तफा खान याने शहाजीला अटक केली आणि त्याला ठार मारण्याचा कट रचला, तेव्हा सोनोपंतने आदिलशहाच्या चुकीच्या हेतूबद्दल शहजानला दिल्लीत आणून पटवून दिले. त्याच्या महान मुत्सद्दी युक्तीचा परिणाम म्हणून शहाजहानने आदिल शहावर शहाजीला तातडीने सोडण्यासाठी दबाव आणला.
In 1660 मध्ये, दख्खनचे नवीन मुघल सुभेदार असलेले शास्ताखान यांच्याशी चर्चा करण्यासाठी सोनोपंत यांची दूत म्हणून निवड झाली.
२५ जानेवारी १६६५ - सोनोपंत डबीर यांचे निधन. सोनोपंत डबीर म्हणजे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळीतील एक मौल्यवान रत्न. मराठा साम्राज्याचे पेशवे (पंतप्रधान) श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ साहेब व सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला केली होती.
६ जानेवारी १६६५ – सुवर्णतुला….
श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ साहेब व सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला केली. या दिवशी सूर्यग्रहण होते.
या मंदिरापासून समर्थ स्थापीत मारूती व मठ जवळच आहे. या दिवशी महाबळेश्वराचे मंदिर गजबजून गेले होते. ग्रहणकाल लागला. स्नानादि विधी झाले आणि एका पारड्यात आईसाहेबांना बसविण्यात आले. दुसर्या पारड्यात सोन्याच्या मोहरा-पुतळ्या टाकण्यास सुरूवात झाली. शास्त्री पंडीत तुलादानविधीचे मंत्र म्हणत होते. आईसाहेबांना या सोहळ्यापेक्षा शिवबाचेच कौतुक वाटत होते. माझा मुलगा ! केवढा रम्य आणि संस्मरणीय प्रसंग हा !
उंचच उंच सह्याद्रीचे ते वृक्षाच्छादित शिखर. तेथे ते प्राचीन शिवमंदिर. जवळच पंचगंगांच्या उगमधारा खळखळताहेत. ब्राह्मण वेदमंत्र म्हणताहेत. एका पारड्यात आई बसलेली आहे आणि एक मुलगा दुसर्या पारड्यांत ओंजळीओंजळीने सोने ओतीत आहे. मातृदेवो भव ! पितृदेवो भव ! आचार्य देवो भव ! राष्ट्राय देवो भव !
जगाच्या इतिहासात इतक उदात्त उदाहरण दूसरीकडे नाही.
. “मदर्स डे” ही आमची संस्कृती नाही. वर्षातील केवळ एक दिवस आईसाठी नसतो. आमचे आवघे आयुष्य आई-वडिलांना समर्पित आहे.
सोनोपंतांचे नाव आज खर्या अर्थाने सार्थ झाले. दोनिही तूळा पार पडल्या. सोनोपंत यावेळी खूप थकले होते.
शिवरायांनी सोनोपंताला त्यांच्या परिश्रमांचे व प्रामाणिकपणाचे कौतुक म्हणून चांदीचे वजन देऊन त्यांचा सन्मान केला.

Thursday, 26 November 2020

अखेर मातुःश्रींची भेट झाली !

 


अखेर मातुःश्रींची भेट झाली !
पोस्टसांभार :तुषार माने
३ फेब्रुवारी १६८९ रोजी संगमेश्वरास संभाजी राजांना कैद करण्यात आले.त्यानंतर राजारामाला मराठ्यांचा राजा म्हणून जाहीर करण्यात आले. येसूबाईनी या गोष्टीस संमती दिली. येसूबाईंना राजारामाविषयी आस्था होती, तसेच राजारामास शाहूबद्दल प्रेम होते. संभाजीराजे पकडले जाण्यापूर्वी रायगडाभोवती मोगली सैन्य जमा झाले होते. औरंगजेबाने एतिकादखान(झुल्फिकारखान) याला रायगडाच्या वेढ्याच्या कामास पाठविले होते. २५ मार्च १६८९ रोजी त्याने रायगडास वेढा घातला. ११ मार्च १६८९ रोजी संभाजी राजांचे समर्पण झाले. पतीनिधनाचे दुखः कोसळले असताना येसूबाईंनी जी धीरोदात्तता दाखविली, त्यास मराठ्यांच्या इतिहासात तोड नाही. मुघलांचा वेढा कडक होत असताना सर्व परिवार हाती लागू नये म्हणून,येसूबाईंनी सल्ला दिला. 'मुलाचे(शाहू) वय लहान,राज्य तरी गेलेचं,त्या अर्थी तुम्ही सर्वही पराक्रमी मनसबदार शूर याणी एक विचारे होऊन, राजारामसाहेब यास घेऊन बाहेर पडावे. मुलास बाहेर जाऊन राहणे यास जवळ जागा रायगडाहून बांकी ऐशी दुसरी नाहीच. अर्थी मुलास व आम्हांस येथील बंदोबस्त करून येथे ठेवावे. तुम्ही सर्वांनी राजारामसाहेबांसहवर्तमान बाहेर पडून, फौजा जमा करून, प्रांताचा बंदोबस्त राखिला असता सर्व मसलत, वोढ तिकडे आधी पडेल. येथे काही गिल्ला पडणार नाही. तत्रापि थोडी बहूत मसलत पडली असताही किल्ला बेलाग, मजबूद, वर्ष सहा महिने टिकाव पडेल. तो तुमचा सर्वांचा एखादे ठायी जमाव पोक्त जाला म्हणजे आम्हांस काढून न्यावे.' स्वराज्य राखण्याच्या दृष्टीने येसूबाईंचा हा निर्णय अतिशय योग्य होता व औरंगजेबाच्या राजनीतीस छेद देणारा ठरला. त्याप्रमाणे राजाराम महाराजांनी आपला कबिला आणि काही मुत्सद्दी व सेनापती यांसह ५ एप्रिल १६८९ रोजी रायगड सोडला. पुढे पन्हाळा व त्यानंतर राजाराम महाराज जिंजीस गेले.
अखेर येसूबाईंना रायगड सोडवा लागला. येसूबाई, शाहूराजे, संभाजी महाराजांचे दासीपुत्र मदनसिंग, माधवसिंग, राजाराम महाराजांच्या एक पत्नी जानकीबाई, प्रतापराव गुजर यांची मुले जगजीवन, खंडेराव तसेच शिवाजी राजेंच्या एक पत्नी सकवारबाई यासह सर्वजण कैद झाले. रायगड किल्ला मोगलांना दिल्याची नोंद आढळते. 'कार्तिक मासी रायगड सल्ला करून मार्गशीर्ष सुध २ रविवारी मोगलास दिला.' त्यानंतर सर्व कैद झालेल्यांना तुळापुरास नेण्यात आले. James Grant Duff लिहितो, 'The widwo of Sambhajee & her son Shivaji(Shahu) fell into the hands of Yetikad Khan. They were conveyed to camp where khan was received with particular designation and honoured with the title of Zoolfikar khan, Yesoo Bye and her son found a friend in Begam sahib, the daughter of Aurangjeb and the Emperor himself became partial to the boy, whom he named Sahoo, an appellalion which,pronouncing it Saho, he ever after choose to retain.'
कैद झालेल्यांना सन्मानाने वागवण्यात आले. बादशहाच्या गुलालबार(बादशहाचे निवासस्थान)च्या आवारात त्यांचे तंबू देण्यात आले.

त्यानंतर मराठे व मोगल यांच्यातले युद्ध चालूच राहिले. आधी राजाराम महाराज व त्यांच्या मृत्यूनंतर रणरागिणी ताराराणी यांच्या सल्ल्याने मराठे मोगलांशी लढत राहिले. सुरुवातीला मोगलांनी काबीज केलेले किल्ले मराठ्यांनी पुनः जिंकण्यास सुरुवात केली. सरतेशेवटी औरंगेब स्वतः बाहेर पडून हे किल्ले घेण्याच्या कामाला लागला.(बादशहा-ए-हिंदुस्ता वर काय ही वेळ ओढवली.)
बादशहाची छावणी जिथे-जिथे जाई तिथे-तिथे येसूबाई व शाहूराजे यांना जावे लागत. पुढे १७०३ साली औरंगजेबाने शाहू राजांना मुसलमान करण्याचा घाट घातला होता. परंतु ते शाहूने मान्य केले नाही. शाहूराजांचे धर्मांतर होऊ नये ही गोष्ट येसूबाईंच्या सल्ल्याशिवाय झाली नसावी. १७०५ साली दुष्काळी परीस्थिती निर्माण झाल्याने त्याची झळ येसूबाईंना बसली होती. कर्ज रूपाने आपल्याला काही मदत व्हावी यासाठी त्यांनी चिंचवडकर देवांना पत्र लिहिले होते.

औरंगजेबाला जराजर्जर अवस्था प्राप्त झाली आणि तो वैफल्याच्या वाटेने जाऊ लागला. मराठ्यांच्या समशेरींनी त्याची झोप उडविली. तब्बल २६ वर्षानंतर, २० फेब्रुवारी १७०७ रोजी औरंगजेब अहमदनगर जवळ भिंगार येथे मृत्यू पावला आणि स्वराज्यावरचा मुघली फास सुटला. आता औरंगजेबाच्या मुलांत यादवी युद्ध होणे अटळ होते. शहजादा आझम याने ५ मार्च १७०७ रोजी स्वतःला बादशहा म्हणून घोषित केले. येसूबाई, शाहू राजे व इतर कबिला बरोबर घेऊन तो दिल्लीला जाण्यास सिद्ध झाला. नर्मदा पार केल्यावर सिरोंचे येथे छावणीचा तळ पडला, झीनत बेगमेच्या मध्यस्थीने अखेर आझम शाहूस सशर्त सोडण्यास तयार झाला. ८ मे १७०७ रोजी दरोहा येथे शाहूराजे कैदमुक्त झाले. आझमने भावी राज्यव्यवस्था, कर्तव्ये, अधिकार याबद्दल शाहूशी लेखी करार केला. त्याचा तपशील असा, तुम्ही दिल्लीच्या बादशहाचे अंकित म्हणून राज्य करावे.तुमची आई,भाऊ मदनसिंग व बायका यास आम्हापाशी ठेवावे;तसेच तुम्ही आपल्या राज्यात जाऊन बंदोबस्त करावा,बखेडा करणाऱ्या लोकांचे पारिपत्य करावे आणि बादशाही लक्षात वागून इकडील मुलखास उपद्रव देऊ नये. तुम्ही याप्रमाणे वागता अशी हुजूर खातरजमा झाली म्हणजे आम्ही दिल्लीस गेल्यावर व तेथे सिंहासनारूढ झाल्यावर तुमची माणसे तुम्हाकडे लावून देऊ आणि तुम्हास सरदेशमुखीचे उत्पन्न ६ सुभ्यात चालते याची सनद त्याप्रमाणे ६ सुभ्यांच्या चौथाईची सनद देऊ. नेहमी बादशहाचे हुकुमात वागून प्रसंग पडेल तेव्हा आपल्या फौजेनिशी आम्हांस मदत करावी.

पुढे आग्र्याजवळ जाजाऊ येथे ३१ मे रोजी शहजादा आझम व शहजादा मुअज्जम यात युद्ध झाले व आझम त्यात मारला गेला. ८ जून १७०७ रोजी शहजादा मुअज्जम 'बहादुरशहा' असा किताब धारण करून बादशहा झाला. पुढे बहादुरशहा सन १७१२ मध्ये लाहोरला विश्रांतीसाठी गेला असताना फेब्रुवारी महिन्यात निधन पावला. तो पर्यंत दिल्ली दरबारात सय्यद बंधू म्हणजे सय्यद हुसेनअली व सय्यद हसनअली यांचा दबदबा वाढला होता. बहादुरशहाच्या मृत्युनंतर त्याचा मुलगा जहंदारशहा हा गादीवर आला. तो अतिशय क्रूर होता. त्याच्यात व फर्रूकसियर यांच्यात २८ डिसेंबर १७१२ ला लढाई होऊन, जहंदारशहा याचा पराभव झाला. फर्रूकसियरच्या आईने सय्यद बंधूंना विश्वासात घेऊन आपल्या मुलाला बादशहा करवले. सय्यद बंधूंची दरबारातील वाढती प्रसिद्धी व हुकुमत याचा आपल्याला त्रास होणार हे फर्रूकसियरने ओळखले होते. तसेच ते आपल्याला गादीवरून कधीही खाली खेचू शकतात याची बादशहाला जाण होती, यासाठी दक्खनच्या सुभेदारीच्या निमित्ताने सय्यद हुसेनअलीला रवाना केले. बादशहाचे हे राजकारण न समजण्याइतका सय्यद अजाण नव्हता.
बादशहाने मराठे व निजाम-उल-मुल्काला निरोप पाठवला की, हुसेन अलीला परस्पर मारून टाका. दिल्ली दरबाराची वझिरी मिळवून दरबाराची सूत्रे आपल्या तंत्राने चालविण्याची निजाम-उल-मुल्काची महत्त्वाकांक्षा होती. या सत्तास्पर्धेत तो सय्यद बंधूंचा कट्टर शत्रू बनला होता.शंकराजी मल्हार हे हुसेन अलीचे कारभारी होते. सय्यद हुसेनअली दिल्ली दरबारातील मराठ्यांची कामे करून देतील अशी ग्वाही शंकराजी मल्हाराने शाहू राजास दिली. यावरून दोन्ही पक्षात मध्यस्थीची बोलणी करण्याची जबाबदारी शंकराजी मल्हारावर सोपवण्यात आली. मराठ्यांचे अनेक जण मुघलांच्या कैदेत होते. त्यात शाहू महाराजांच्या मातुःश्री येसूबाई, मदनसिंग इ. होते. बरेच दिवस खल होऊन १७१८ सालच्या जून महिन्यात हुसेनअलीच्या मार्फत शाहू व बादशहा यांच्यात तह झाला तो पुढीलप्रमाणे:-
  1. शिवाजीराजांचे स्वराज्य तमाम गडकोटसुद्धा शाहूराजांच्या हवाली करावेत.
  2. अलीकडे मराठ्यांनी जिंकलेला प्रदेश म्हणजे खानदेश, गोंडवन, वऱ्हाड, हैद्राबाद, कर्नाटक या भागातले, यादीत नमूद केल्याप्रमाणे मोगलांनी सोडून देऊन ते मराठ्यांच्या स्वराज्यात दाखल करावे.
  3. मुघलांच्या दक्षिणेतील मुलखावर चौथाई आणि सरदेशमुखीचे हक्क मराठ्यांनी स्वतः वसूल करावेत. या चौथाईच्या बदल्यात आपली पंधरा हजाराची फौज मराठ्यांनी बादशहाचे मदतीस ठेवावी आणि सरदेशमुखीचे बदल्यात मुघलांच्या मुलखातील चोरांचा बंदोबस्त करावा.
  4. कोल्हापूरच्या संभाजीराजांना शाहू राजांनी उपद्रव देऊ नये.
  5. मराठ्यांनी दरसाल बादशहास दहा लाख रुपये खंडणी द्यावी.
  6. शाहूची मातुश्री, कुटुंब वगैरे दिल्लीस बादशहाचे कबजात आहेत त्यांना सोडून स्वदेशी पावते करावे.
तहाचा मसुदा हुसेनअलीकडे पाठवण्यात आला. हुसेनअलीने फर्मानासाठी तो दिल्लीला पाठवला. पण बादशहा फर्रूकसियरने मराठ्यांना फर्मान देण्यास नकार दिला. यावरून बादशहा व हुसेनअली यांमधील वैर वाढत चालले. बादशहाने आपल्या निष्ठावंत सरदारांना सैन्यासह दिल्लीत बोलावले. हे पाहून वजीर सय्यद हसनअली याने आपली फौज वाढवली व आपला भाऊ सय्यद हुसेनअलीला दिल्लीला बोलावले. हुसेनअली दिल्लीकडे जाण्यास निघाला. त्याच्या सहाय्यासाठी मराठी फौजेनेही दिल्लीला जावे.
  1. शाहू महाराजांनी सय्यद हुसेनअलीच्या सहाय्यासाठी ५० हजार फौज पाठवावी.
  2. या फौजेच्या दैनंदिन खर्चासाठी दररोज ५० हजार रु. याप्रमाणे जितके महिने फौज शाही कामासाठी मुलखाबाहेर राहील, तितके महिने दरमहा १५ लाख रु. सय्यद हुसेन अलीने रोख द्यावेत असे ठरले.
खंडेराव दाभाडेंच्या अधिपत्याखाली मराठी फौज औरंगाबादला आली. यावेळी अनेक मुत्सद्दी दिल्ली प्रकरणाची चर्चा करण्यास जमले होते. पेशवे बाळाजी विश्वनाथ, शंकराजी मल्हार, सय्यद हुसेनअली यांनी एकत्र येऊन एक शक्कल लढविली. औरंगजेबाच्या नातवाचा एक तोतया उभा केला. औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबर याचा मुलगा मुइनुद्दिन हुसैन हा मराठ्यांच्या ताब्यात आहे, असा बनाव रचण्यात आला. मुघलांच्या कैदेतील मराठ्यांची माणसे सोडल्यास या मुइनुद्दिनला बादशहाच्या हवाली करण्यात येईल, असे शाहू राजांशी बोलणे झाल्याचे हुसेनअलीने बादशहास कळविले.
हुसेनअली आणि मराठ्यांची फौज औरंगजेबाच्या तोतया नातवाला घेऊन दिल्लीला निघाली. एक हत्ती सजवण्यात आला होता. त्यावर एक उत्तम अंबारी कसण्यात आली होती. सकाळपासूनच लोक त्या तोतयाला कुर्निश करत असत. असा सगळा लवाजमा दिल्लीला पोहोचला. दिल्लीतले लोक या औरंगजेबाच्या नातवाच्या पाया पडले. दिल्लीला गेलेल्या फौजेत बरीच नामांकित मंडळी होती. सेनापती मानसिंग मोरे, महादेवभट हिंगणे, संताजी भोसले, खंडेराव दाभाडे, पिलाजी जाधव, उदाजी पवार, बाळाजी महादेव भानू, पेशवे बाळाजी विश्वनाथ, थोरले बाजीराव, नेमाजी शिंदे, अंबाजीपंत पुरंदरे, चिमणाजी दामोदर मोघे, आवजी निळकंठ चिटणीस, बाजी कदम, नारो शंकर सचिव, सटवोजी जाधव इ. लोक होते.
त्या तोतया नातवाला घेऊन हुसेनअली व मराठे जेव्हा दिल्लीला पोहोचले तेव्हा बादशहाचे धाबे दणाणले. फर्रूकसियरला पदच्युत करून नवीन बादशहा नेमण्याची तयारी सय्यदबंधूनी चालविली. २३ फेब्रुवारी १७१९ रोजी सरकारवाड्यात सय्यदांची व बादशहाची भेट झाली. हुसेनअली बादशहाच्या कदमबोसीसाठी वाकला असता बादशहाने स्वहस्ते त्याला खांदे धरून वर उठवले आणि त्याला आलिंगन दिले. इतर बोलणे झाल्यावर बादशहाने विचारले, "मुइनुद्दिनखानास तुम्ही कैद करून आणले आहे म्हणून कळविले तो कुठे आहे?" हुसेनअलीने उत्तर दिले, "शाहूची मंडळी सोडून द्या म्हणजे त्यास आणतो." दुसऱ्या दिवशी मुइनुद्दिनला आणयचे असे ठरले. शिकारीच्या निमित्ताने बाहेर पडून हुसेनअलीचा खून करावा असा बादशहाचा बेत होता. पण त्याचा सुगावा सय्यद हुसेनअलीला लागला होता. पुढचे ३-४ दिवस असेच गेले. २८ फेब्रुवारीला अमीनखानाचे लोक वाड्याच्या दिशेने जात असताना रस्त्यात मराठ्यांची गर्दी होती. तेव्हा त्यांची व मराठ्यांची माणिक चौकात मारामारी सुरु झाली. यात दीड हजार मराठे मारले गेले.
सय्यद बंधूंची पथके फर्रूकसियरचा लाल किल्ल्यात शोध घेण्यास हिंडत होती. अखेरिस फर्रूकसियर हाती लागला. त्याला कैद करण्यात आले.त्याची रवानगी शाही तुरुंगात करण्यात आली. सय्यद बंधूंनी फर्रूकसियरचा चुलत भाऊ रफिउद्दौरजत याला मार्च १७१९ मध्ये तख्तावर बसविले. ३ मार्च व १५ मार्चला दोन स्वतंत्र शाही दरबार भरून नूतन बादशहा करवी चौथाई, सरदेशमुखी आणि स्वराज्याच्या शाही सनदा छत्रपतींच्या नावे करण्यात आल्या. मराठ्यांच्या सर्व लोकांना सोडण्यात आले. २० मार्च १७१९ रोजी मराठी फौजा स्वराज्याच्या दिशेने दौडू लागल्या. सुरज, नानकपूर, भेलसा, सिहूर. हंडिया, रतनपूर, खारकोट, अंबाराई(बऱ्हाणपूर), तिसगाव, सोनई, पारगाव, माळशिरस, जेजुरी, सासवड, शिरवळ असा प्रवास करून ४ जुलै १७१९ रोजी साताऱ्यास पोहोचल्या. 'महाराजांच्या मातुःश्री दिल्लीहून देसी आल्या.' शाहू राजांची व येसूबाईंची भेट तब्बल १२ वर्षानंतर झाली. ते दृष्य कसे असेल हे शब्दात सांगणे कठीणच !
ह्या मोहिमेत कामी आलेल्यांना यथायोग्य भरपाई देण्यात आली. परसोजी भोसलेंचा दासीपुत्र संताजी पडला, त्याचा भाऊ राणोजी यास 'सवाई संताजी' असा किताब बादशहाने दिला. शाहू राजांनी बाळाजीपंत वगैरे मंडळींचा योग्य सन्मान केला.पाच महालांचे सरदेशमुखी वतन प्रधानपंतास महाराजांनी करून दिले. बाळाजी महादेव भानू लाल किल्ल्यात झालेल्या चकमकीत मारले गेले, याची खंत म्हणून भानू परिवाराला वाकसई गाव इनाम दिला.
बाळाजी विश्वनाथांच्या ह्या स्वारीमुळे मराठ्यांना दिल्लीची झालेली अवस्था(निर्माल्य) लक्षात आली. बाळाजीपंतांनी दिल्लीहून मिळवलेल्या सनदांचे मोल खूप मोठे आहे. त्याही पेक्षा मोठी गोष्ट म्हणजे येसूबाई साहेब तब्बल ३० वर्षानंतर स्वदेशी परत आल्या. महाराजांच्या भेटी झाल्या. मुले-माणसे भेटविली. मातुःश्रींची भेट झाली यावरून बहुत संतोषी होऊन कृतार्थ झाले.
येसूबाई मातोश्रींची सुटका व्हावी यासाठी शाहू राजे खटपट करीतच होते. त्यासंदर्भात त्यांचा पत्रव्यवहार चालू होता. फाल्गुन शु. ५ शके १६३९ रोजी त्यांनी यादवराव मुनशी यास लिहिलेलं पत्र खाली देत आहे.

संदर्भ: मराठी रियासत
चिटणीस बखर (छत्रपती संभाजी महाराज आणि थोरले राजाराम महाराज चरित्र)
मराठ्यांची बखर
पेशव्यांची बखर
पुरंदरे दफ्तर
महाराष्ट्र इतिहास मंजिरी
काव्येतिहास संग्रह
ज्वलज्वलनतेजस संभाजीराज
असे होते मोगल
मराठ्यांच्या स्वाऱ्यांचे मुक्काम
शाहू महाराजांची बखर
मराठ्यांचा इतिहास
औरंगजेब
औरंगजेबाचे संक्षिप्त चरित्र
पेशवे घराण्याचा इतिहास
महाराज्ञी येसूबाई
छत्रपती राजाराम ताराराणी
बाळाजी विश्वनाथ पेशवे
झंझावात
ऐतिहासिक गोष्टी
ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर चरित्र
ऐतिहासिक शकावल्या
सनदा पत्रे
पेशवाई
पुण्याचे पेशवे
Ⓒ तुषार माने

बचेंगे तो और भी लढेंगे


 बचेंगे तो और भी लढेंगे

(१० जानेवारी १७६० )
इसवी सन १७६०! मराठ्यांच्या दिग्विजयी फौजांनी नुकताच अफगाणिस्तानातल्या खैबरखिंडीत राहणाऱ्या कडव्या पठाणांचा समाचार घेतला होता. लाहोरचा बंदोबस्त केल्यानंतर तर मराठ्यांचा राजा दिल्लीवर राज्य करणार हे जवळजवळ पक्के होते. आशिया खंडातल्या मुस्लिमांच्या सार्वभौम सत्तेचे केंद्र असणारी दिल्लीची गादी आता मराठ्यांच्या वर्चस्वाखाली येणार हे ओळखून नाजीबखान रोहिल्याने दुराणी बादशहा अहमदशहा अब्दाली सकट इतर सर्व मुस्लिम राजांना इस्लामी सत्तेच्या रक्षणासाठी एकत्र येण्यासाठी खलिते पाठवून विनंत्यांचा रतीब घातला होता. येत्या काही काळात दिल्लीच्या क्षितिजावर युद्धासाठी सज्ज झालेल्या घोड्यांच्या टापांच्या धुळीचे लोळ पाहायला मिळणार हे आता जवळजवळ पक्के होते.
याचा काळात उत्तरेत ग्वाल्हेर येथे शिंदे तर इंदौर येथे होळकर या मराठ्यांच्या दोन वतनदार सरदारांनी संपूर्ण उत्तर भारताचा प्रदेश आपल्या टाचेखाली ठेवला होता. दत्ताजी शिंदे हे शिंदे घराण्याचे कर्ते पुरुष राणोजी यांचा दुसरा मुलगा. जयाप्पा शिंद्यांचा सख्खा आणि महादजी शिंदे यांचा सावत्र भाऊ. १७५५ साली शिंदे घराण्याची सरदारकी जयाप्पाचा पुत्र जनकोजी याच्या हाती गेली, पण जनकोजी लहान असल्याने दत्ताजी त्याच्या वतीने कारभार पाहत होता. दत्ताजी आणि जनकोजी या काकापुतण्याची जोडी तर कुकडीच्या लढाईमध्ये निजामाच्या विरोधात केलेल्या पराक्रमामुळे आलम हिंदुस्तानात गाजली.
५६ साली दत्ताजीने मारवाडचे संपूर्ण राज्य जिंकले. आणि त्याचा तिसरा हिस्सा मराठी साम्राज्यात दाखल करून घेतला. तब्बल पाच कोट रुपयांची खंडणी मिळवली. १७५८ साली दत्ताजीने स्वतचे लग्न उरकले आणि पुतण्यासह उज्जैन येथे आला. तिथे मल्हारबाबा होळकरांनी त्याचा भोळा स्वभाव ओळखून त्याला नजीबचे पारिपत्य करण्यापासून परावृत्त केले. तो सल्ला दत्ताजीच्याही गळी उतरला. पण लहान असून मुत्सद्दी असलेल्या जनकोजीने होळकरांचा हा सल्ला मानला नाही. दत्ताजीचा नाईलाज झाला.
शेवटी नजीबचे पारिपत्य करण्याच्या आणि लाहोर सोडवण्याच्या पेशव्यांनी सोपविलेल्या कामगिरी पार पडण्यासाठी दोघे काका-पुतणे उज्जैनहून निघून दिल्लीस आले. ‘दत्ताजी मनावर घेतलेले काम पाडील’ असा पेशव्यांचा आढळ विश्वास होता. १७५८ साली दत्ताजीने लाहोर घेतले आणि नाजीबाचा बिमोड करण्यासाठी यमुनाकाठी रामघाट येथे दाखल झाला.
शेवटी नजीबचे पारिपत्य करण्याच्या आणि लाहोर सोडवण्याच्या पेशव्यांनी सोपविलेल्या कामगिरी पार पडण्यासाठी दोघे काका-पुतणे उज्जैनहून निघून दिल्लीस आले. ‘दत्ताजी मनावर घेतलेले काम पाडील’ असा पेशव्यांचा आढळ विश्वास होता. १७५८ साली दत्ताजीने लाहोर घेतले आणि नाजीबाचा बिमोड करण्यासाठी यमुनाकाठी रामघाट येथे दाखल झाला.
यमुना नदीचे पात्र म्हणजे मराठ्यांच्या सैन्यासाठी जवळजवळ प्रतीसमुद्र. नजीबाने ही परिस्थिती ओळखली आणि कावा केला. पात्र ओलांडून येण्यासाठी दत्ताजीला नावांचा पूल बांधून देण्याचे वचन दिले आणि घोळत घेतले. जनाकोजीच्या मर्जीच्या बाहेर जात दत्ताजीने नजीबच्या वाचनावर विश्वास ठेवला. पूल बांधून देण्याच्या थापेवर नजीबाने दत्ताजीले सहा महिने नुसते झुलवत ठेवले. एप्रिल ते ऑक्टोबर हा काळ मराठा सैन्याने नावांच्या पुलाची वात पाहण्यात घालवला.
तोवर नजीबाने दत्ताजीच्या विरोधात सर्व बाजूंनी कडेकोट मोर्चेबांधणी केली. आतून सर्व मुस्लिम राजाशी संधान बांधले. १७५९ च्या नोव्हेंबरात नजीबच्या सांगण्यावरून अब्दाली मागच्या बाजूने दत्ताजीवर चाल करून आला. दत्ताजी पुरता कात्रीत सापडला. समोर नावांचा पूल तर नजीबच्या ताब्यात आणि मागून अब्दाली! अशा बिकट प्रसंगीही दत्ताजीने नजीबावर थेट चाल करून त्याला शुक्रतालहून हुसकावून लावत गंगेच्या पलीकडे रेटले. ही लढाई जिंकली परंतु त्यात जनकोजी आणि दत्ताजी दोघेही जखमी झाले. यावेळी नाजीबाने दत्ताजीशी तात्पुरता तह केला. डिसेंबरात अब्दालीने कुरुक्षेत्रात ठाण मांडले. सुजानेही एक कोटी खंडणीची थाप मारून दत्ताजीला अब्दाली येईपर्यंत कुरुक्षेत्रास अडकवून ठेवले.
आता तर रोहिले पुढे आणि अहमदशहा मागे, दोघांच्या मध्ये दत्ताजी! अशा पक्क्या कात्रीत दत्ताजी सापडला. माघार घेणे तर त्या बाजीन्द्या वीराच्या मनातही नव्हते. शेवटी त्याने कबिल्यासह जन्कोजीला दिल्लीला पाठवले आणि स्वतः कुंजपुरा येथे अहमदशहा अब्दालीची गाठ घेतली आणि त्याच दिवशी त्याचा पराभव केला. हा दिवस म्हणजे २४ डिसेंबर १७५९. हार पत्करून लागलीस अब्दाली यमुनापार उतरला आणि नजीब, सुजा व मोहम्मद बंगश यांना जाऊन मिळाला. सर्व मुसलमान एक झाले. दत्ताजी एकटा पडला. पेशव्यांकडून मदत मिळाली नाही तरी शेवटच्या श्वासापर्यंत लढायचे दत्ताजीने ठरवले. मराठ्यांचे सैन्य घेऊन तो थेट दिल्लीत जनकोजीला जाऊन मिळाला.
जनकोजी आणि दत्ताजी आता समोरासमोरचे युद्ध टाळता येणार नाही हे पुरते ओळखून होते. युद्धाची आखणी करायला सुरुवात केली. १७६० सालच्या मकरसंक्रांतीचा दिवस. १० जानेवारी. सकाळचे स्नान आटोपून मराठी फौज तयारीनिशी उभी होती. सेनापती युद्धाचा मुकाबला निश्चीत करण्यासाठी यमुनेचा ठाव घेऊ लागले पण तो काही लागेना.
हे चालू असतानाच शत्रूचे सैन्य नदी उतरून अलीकडे येऊन थेट हल्ले करू लागले. हे पाहून दत्ताजी चिडला. त्याच्या डोळ्यात युद्धाचा अंगार फुलू लागला. जणूकाही तो याच क्षणाची वात पाहत होतं. क्षणाचाही विलंब न करता दत्ताजीने आपल्या सैन्याच्या तीन तुकड्या केल्या. आणि एका तुकडीच्या सोबत त्याने आपल्या सजवलेल्या लाल्मानी घोड्यावर मजबूत मंद टाकत रणांगण जवळ केले. मागचे मराठी सैन्यही त्वेषाने रणांगणाच्या दिशेने झेप घेऊ लागले. नजीब आणि गीलच्यांच्या नरडीचा घोट घेण्यासाठी मराठी सैन्य आसुसले होते.
हर हर महादेव ची गगनभेदी गर्जना करत मराठी सैन्य शत्रूला भिडले. रणांगणावर तलवारीच्या खणाखनीने, घोड्यांच्या खिकाळ्यानी आणि वीरांच्या घोषणांनी नुसता हाहाकार माजवला. एका प्रहारापुर्वी निपचित पडलेल्या घाटाचे रूप पार पालटून गेले. मराठ्यांकडे बंदुका नव्हत्याच. त्यात अब्दालीचे सैन्य म्हणजे ताज्या दमाचे अफगाण पठाण.
त्यांच्या बंदुकीच्या माऱ्यापुढे तलवारीने लढणारे मराठे किती काल तग धरणार? एक एक मराठा सैनिक बंदुकीच्या गोळ्यांनी जायबंदी होऊ लागला. मराठ्यांच्या प्रेतांचा नुसता खच घाटात पसरलेला दिसू लागला. पण दत्ताजीला तर फक्त समोर येणारा अफगाण आणि त्याची मुंडी दिसत होती. त्याची तलवार विजेसारखी चालत होती.
ही पड कमी होती की काय म्हणून दोन धक्कादायक खबरी घेऊन शिपाई दत्ताजींकडे धावत आला. मालोजी फौजेसह मराठ्यांच्या मुडद्यांच्या राशीत दिसेनासा झाला होता आणि गनिमांनी एकाच वेळी तिन्ही बाजूंनी हल्ला केला होता. रणमदाने बेहोष झालेल्या दत्ताजीने पुन्हा लालमणीला टाच दिली. हातात तळपती तलवार, पाठीवर ढाल आणि शिरावर शिरस्त्राण घेतलेल्या दत्ताजीचा रणमर्द अवतार पाहून मराठी सैन्यात पुन्हा नवे स्फुरण चढले. तलवारीच्या प्रत्येक घावासरशी यवनाचे मुंडके धडावेगळे होत होते. शीर नसलेल्या धडातून रक्ताच्या धारा बरसत होत्या. दत्ताजीची तलवार गनिमांना मराठ्यांच्या शौर्याची ओळख पटवून देत होती.
बऱ्याच वेळापासून जरीपटक्याजवळ निकराने गिलच्याना पाणी पाजत असलेल्या जनकोजीच्या दंडावर गोळी लागली आणि तो घोड्यावरून खाली कोसळला. ही बातमी दत्ताजीला पोचवण्यात आली. हे ऐकून सुडाने लाल झालेला दत्ताजी दिसेल त्या आफ्गानाच्या बरगडीत तलवार खुपसू लागला. जय भवानी जय जगदंब च्या नावाचा जयघोष करत रणांगणात त्याने मृत्यूचे तांडव माजवले.
इतक्यात हाकेच्या अंतरावर लढत असलेला नजीब त्याला दिसला. कानाच्या पाळ्या तप्त झाल्या. छातीवरची बाराबंदी ताठ झाली. बाहू स्फुरण पावू लागले. वाटेत दिसेल त्या अफगानाचे शीर धडावेगळे करत दत्ताजी नाजीबाकडे झेपावला.
इतक्यात कुठूनतरी जम्बुरक्याचा गोळा धडधडत येऊन दत्ताजीच्या बरगडीला छेदत लालमनीच्या पाठीवर पडला तसा दत्ताजी घोड्यावरून जमिनीवर कोसळला.
हे दृश्य पाहताच नजीब आणि कुतुबशहा सैतानासारखे दत्ताजीकडे झेपावले. दत्ताजी तलवार उचलण्यासाठी धडपडत असल्याचे पाहून कुतुबशहाने त्याचे डोके हातात घेतले. डोळ्यासमोर भला नाचवत म्हणाला,
“क्यू पाटील, और लडोगे?”
ऐकताच उरलेली ताकद ऐकवतात रणशूर दत्ताजीने वाघासारखी डरकाळी फोडली,
“क्यो नही, बचेंगे तो और भी लडेंगे!”
दक्षिणेत निजामाला आणि उत्तरेत अब्दालीला पाणी पाजणार्या मराठा वीराची ती डरकाळी कानावर पडताच कुतुबशहा दत्ताजीच्या जखमी शरीरावर मांड ठोकून बसला आणि त्याच्या छातीची नुसती चाळण करू लागला. अंगात भूत शिरल्याप्रमाणे नजीबाने हातातला जमदाडा दत्ताजीच्या मानेवर घातला आणि त्याचे शीर धडावेगळे केले.
दत्ताजीचा देह हळूहळू रक्ताने माखत थंड पडू लागला. एका गिलच्याच्या हातातला भाला हिसकावून घेत नजीबाने त्यावर दत्ताजीचे शीर खोवले आणि बेभान होऊन मैदानात नाचवू लागला. दत्ताजीची अवस्था पाहणाऱ्या मराठा सैन्याला अभय द्यायचे सोडून त्यांच्या कत्तलींचा आदेश देऊन तसाच नाचत अब्दालीकडे निघून गेला.
दत्ताजी पडले! मराठ्यांच्या त्रिखंडात गाजलेल्या दिग्विजयी सैन्याचा हारीचा मोहरा निखळला. बुराडी घाटातल्या धरणीला काळजाचा ठोका चुकल्यासारखे वाटू लागले. यमुनेच्या प्रवाहाला क्षणभर थांबल्यासारखे वाटले. हे विद्रूप दृश्य पाहत असलेले अफगाणी देखील स्तब्ध झाले. शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा निश्चय तिळमात्र ढळू न देता बुराडी घाटाला दत्ताजीने रक्ताचा अभिषेक घातला. तो दिवस म्हणजे १० जानेवारी १७६०.
मुजरा त्या विराला.
🚩🚩🚩🚩🚩🚩

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...