विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 27 November 2020

शिवस्वराज्याचा साक्षी रायरेश्वर

 



शिवस्वराज्याचा साक्षी रायरेश्वर

वयाच्या पंधराव्या वर्षी शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर या आपल्या बारा मावळातील सवंगडय़ांच्या साथीने २६ एप्रिल १६४५ रोजी स्वराज्याची शपथ घेतली. यामुळे रायरेश्वर मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.
📷पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात हे रायरेश्वर! इथेच शिवरायांच्या ओठातून ‘‘हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा’’ असे शब्द बाहेर पडले, त्यांची इमानदार मित्रमंडळी शब्दाला जागली आणि हिंदवी स्वराज्य साकारले! येथे यायचे असेल तर यासाठी पुण्याजवळचे भोर-आंबवडे करत रायरेश्वरच्या पायथ्याचे कोल्रे गाव गाठावे लागते. कोल्रे गावातून रायरेश्वरला जी वाट जाते तिला ‘गायदरा’ म्हणतात. पण याशिवाय भोवतीच्या अन्य गावांतूनही काही वाटा-आडवाटाही या पठारावर चढतात. लगतच्याच केंजळगडावर जाण्यासाठी गाडी रस्ता आहे. गडावरील पाय-याची डागडुजी तसेच लोखंडी शिडी बसविल्यामुळे गडाची चढण सोपी झाली आहे. प्रत्येक ट्रेकरने एकदा तरी या किल्ल्याला भेट द्यावी. केंजळगडापाशीच असणा-यारायरेश्वराच्या १५०० मीटर उंचीच्या विस्तृत पठारावर रायरेश्वराचे हे प्राचीन शिवस्थान आहे. महाराष्ट्रात एवढय़ा उंचीवर असणा-याकाही निवडक पठारांमध्ये रायरश्वर हे प्रसिद्ध पठार आहे. पाचगणीचे टेबल लॅन्ड सर्वाना माहीतच असते; मात्र त्याच्यापेक्षाही उंच आणि लांब असे टेबल लॅन्ड म्हणजे रायरीचे पठार. रायरेश्वराचे पठार खूप मोठे आहे. ११ कि.मी. लांबी आणि दीड कि.मी. रुंदी असेल. दाट झाडी, खोल द-या, उंचच उंच सुळके, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, लांबच लांब सोंडा आणि आडवळणी घाट यामुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे. येथेच महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. त्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले, मन प्रसन्न झाले. दोन मिनिटांसाठी तो प्रसंग डोळ्यासमोरून तरळून गेला, ज्यात शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसोबत स्वराज्याची शपथ घेत आहेत. पठारावर पूर्वाभिमुख रायरेश्वराचे मंदिर आहे. ओसरी, सभामंडप आणि गर्भगृह अशी याची रचना. मूळ मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार झालेला आहे. अशाच एका जीर्णोद्धाराचा तपशील सांगणारा एक शिलालेख मंदिराच्या सभामंडपाच्या भिंतीवर आहे. गडावर रायरेश्वराच्या शिवमंदिराशिवाय जननी देवीचे मंदिर व पाण्याची शिवकालीन टाकी आहेत. या किल्ल्याहून सूर्यास्त व सूर्योदय विलोभनीय दिसतो. गडावरील जंगम लोकांची वस्ती आहे. ती मंडळी पर्यटकांची सोय करतात. पावसाळ्यात किल्ल्याच्या पठारावर फुलझाडे बहरलेली असतात. यामुळे पावसाळ्यात गडाला भेट देण्यात वेगळीच मजा असते. पठारावर भातशेतीचे प्रमाणही मोठे आहे. किल्ल्यावरून पांडवगड, वैराटगड, राजगड, तोरणा, सिंहगड, विचित्रगड, पुरंदर दर्शन होते. किल्ल्यांना आणि महाराष्ट्राला जे सौंदर्य व सन्मान प्राप्त झाले ते महाराजांमुळे. म्हणूनच आपण हे जपले पाहिजे, म्हणजे पुढच्या पिढीलाही हे ऐतिहासिक वैभव पाहायला मिळेल. आपण या सौंदर्याचे रक्षक झाले पाहिजे. भक्षक नव्हे.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...