विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 29 December 2020

क्षेत्र #शेगाव_मंदिर..

 क्षेत्र #शेगाव_मंदिर.....

प. प. श्री #गजानन_महाराजांचे वास्तव्याने परम पावन झालेले श्री क्षेत्र शेगाव! रोज हजारो भक्त भारतातील कानाकोपऱ्यातून या क्षेत्री येतात व परम पावन समाधीचे दर्शन घेतात व सिद्ध स्थानी येऊन या अवलिया संताचरणी नतमस्तक होतात.
आपले अवतार कार्य पूर्ण होत आले आहे हे साधारणपणे १९०८ मध्ये श्री गजानन महाराजांना जाणवले. योगायोग असा की त्याच सुमारास श्रींचे भक्त श्री जगू पाटील ह्यांनी शेगाव मध्ये महाराजांचे भव्य मंदिर स्थापन करावे अशी ईच्छा महाराजांच्या अपरोक्ष त्यांच्या इतर भक्तगणांकडे व्यक्त केली आणि सर्वांनी ही विनंती मान्य केली. पण त्या वेळेस शेगावांतील पाटील आणि देशमुख घराण्यात दुफळी माजली होती. महाराजांचा जुना मठ माळी समाजातील माणसांच्या मालकीचा होता आणि माळी समाज देशमुखांच्या बाजुला होता. मात्र गावात पाटील घराण्याचे वर्चस्व होते. महाराजांना ही दुफळी पसंत नव्हती. म्हणून त्या दोघांपैकी कुणाचीच जागा मंदिर बांधन्यासाठी महाराजांनी स्विकारली नाही. त्यांना कुणाच्या मालकीची जागा नको होती. कालांतराने महाराजांनी "मी येथे राहिन" असे सांगून ज्या जागेचा निर्देश केला त्या ठिकाणी श्रींच्या मंदिराचे काम सुरु करायचे असे ठरले. ती जागा सरकारची असल्याने महाराजांच्या संकेतानुसार परमभक्त हरी कुकाजी पाटील ह्यांनी जागेच्या मागणीचा अर्ज सरकार दफ्तरी दाखल केला. बुलढाणा जिल्ह्याचे तत्कालीन सर्वाधिकारी (Deputy Commissioner) करी साहेब ह्यांनी नगर परिषदेच्या १९०१ ठरावानूसार एक एकर जागा मंदिरासाठी मंजुर केली. शिवाय एका वर्षात ही दिलेली जागा व्यवस्थितपणे विकसित केल्यास अजून एक एकर जागा देऊन तुमचा हेतू पुरविला जाईल, असा शेरा करी साहेबांनी मारला.
श्री क्षेत्र शेगाव मंदिर
जागा मिळाल्यावर मंदिराचे बांधकाम करणे आवश्यक होते. श्रींचे भक्त हरी पाटील व बंकटलाल एकटयाने हे काम पूर्ण करु शकले असते. पण महाराजांना हे काम सर्व भक्तांद्वारे करवून घ्यायचे होते. म्हणून महाराजांच्या निर्देशानुसार १२ सप्टेंबर १९०९ रोजी शेगाव येथील नारायण कडताजी पाटील, ह्यांच्या अडत दुकानावर श्रींचे भक्त, गांवकरी व व्यापारी ह्यांची एक सभा बोलावली. त्यात प्रत्येक कापसाच्या गाडीवर ६ पै आणि बोऱ्यावर ३ पै धर्मादाय निधी आकारायचे ठरले. अशाप्रकारे बांधकामाची सोय झाली. श्रींनी निर्देश केलेल्या जागी हरी पाटलांनी एक शीला ठेवली आणि त्याच्या आजुबाजुला मंदिराच्या बांधकामाची सुरुवात झाली. ही जागा शेगावातील सर्वे नं. ७०० (४३/४५/२) येथील जमीनीच्या मध्यभागी होती. मूळ मंदिराचे बांधकाम दगड, चुना आणि रेतीचे आहे.
भुयार
आज मुख्य मंदिराच्या तळघरात जिथे हरि पाटलांनी शीला ठेवली होती तिथे श्री गजानन महाराजांची संगमरवरी मूर्ती आहे. ह्या जागेला भुयार म्हणतात. भुयारात प्रवेश केल्यावर श्रींचे दर्शन घडते. भुयारात आतल्या बाजुनी आता संगमरवराच्या लादया बसविण्यात आल्या आहेत.
मंदिराचा बाहेरचा भाग
१९०९ साली मंदिराच्या बांधकामाची सुरुवात झाली. काळया दगडांनी बांधलेल्या या मंदिराची लांबी ४८ फुट व रुंदी ४२ फुट असून शिखराचा भाग ५१ फूट उंच आहे. मंदिराच्या पूर्वीच्या दगडी भिंतीवर पौराणिक काळातील व्यक्तिरेखा कोरल्या होत्या. समाघी शताब्दी सोहळयाचे औचित्य साधून हा फोडलेला भाग आणि दगडी शिखराचा भाग २००९ मध्ये उतरवीण्यात आला आहे. उतरविलेल्या भिंती आणि शिखराची पूनर्रचना संकल्पानुसार अडगांवच्या मंदिराच्या जिर्णोध्दारासाठी करण्यात येणार आहे.
राम मंदिर
श्रींचे दर्शन घेऊन भक्त भूयारातून तळमजल्यावर राम मंदिरात प्रवेश करतात. अशी रचना करण्या मागे एक विशिष्ट हेतू आहे. संताकडे गेल्यावर संत भक्तांना देवापर्यन्त पहोचण्याचा मार्ग दाखवितात. म्हणून महाराजांचे दर्शन घेऊन भूयारातून बाहेर पडल्यावर भक्त रामाच्या दर्शनासाठी जातात. याच राम मंदिरात महाराजांचे पालखीत ठेवन्यात येणारे चांदीचे दोन मुखवटे आहेत.
सभामंडप
राम आणि हनुमान मंदिराला जोडणाऱ्या सभामंडपातील आतल्या भागात महिरपीच्या (कमान) वरच्या भागात महाराजांच्या पोथीतील विविध लीला चित्रबद्ध केल्या आहेत. या सभामंडपात सर्वत्र रेखीव कमानी आहेत. पूर्वीच्या दगडाच्या बांधकामावर रंग चढविल्याने त्या अधिक आकर्षक दिसतात.
श्री गजानन महाराज पालखी
समाधीग्रहण स्थळ व शयनगृह
मुख्य मंदिराच्या आग्नेयेस महाराजांनी जेथे दिनांक ८ सप्टेंबर १९१० रोजी समाधी घेतली तेथे आज संगमरवरी पादुका आहेत. त्यापाठी विठ्ठलरुक्मिणीचे मंदिर असून त्या जागेला समाधीस्थळ म्हणतात. त्याला लागूनच महाराजांचे शयनगृह आहे. श्रींच्या वापरातील पलंग येथे ठेवला असून त्यावर त्यावर दोन बाजूला लोड आहे आणि मध्यभागी श्रींचा फोटो आहे. समाधीग्रहण स्थळाच्या डाव्या बाजूला श्रींनी त्या काळी प्रज्वलीत केलेली धूनी आजही धगधगत असून शेजारीच श्रींनी वापरलेले चिमटे येथे ठेवलेले आहेत. एक सेवक धूनी अखंड तेवत ठेवतो. शिवाय अनेक भक्त त्यात तूप,राळ,तूपाची वात, गांजा इत्यादी साहित्याची भर घालत असतात.
पाठशाळा
मुख्य मंदिराच्या भोवती पटांगण आहे आणि त्याला चार बाजूंनी दगडी पाठशाळेने वेढलेले आहे. पाठशाळेला जागोजागी सुंदर कमानी आहेत. ह्याच पाठशाळेत आज विश्वस्त मंडळाची कचेरी, देणगी, आणि अभिषेक काउन्टर आणि सनई चौघडा वाजविण्याची जागा आहे.
समाधी ग्रहण स्थळाबाहेरचा परिसर
समाधी ग्रहण स्थळाबाहेर पूर्व बाजूस एक विशाल औदुंबर वृक्ष व हनुमानाची अतिप्राचीन मूर्ती असणारे छोटे मंदिर आहे.
श्री गजानन महाराज
मुख्यप्रवेशद्वारा बाहेरचा परिसर
मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजुला नागदेवता मंदिर आणि श्रींचे सेवक श्री बाळाभाऊ महाराज व श्री नारायण महाराज ह्यांच्या समाध्या आहेत.
पारायण मंडप
समाघीग्रहण स्थळ आणि शयनगृहाच्या समोर पारायण मंडप आहे. ज्या भक्तांना महाराजांच्या ग्रंथाचे वाचन करायची इच्छा असते त्यांच्याकरीता ग्रंथ, आसन, निरांजन विझू नये म्हणून काचेचे कंदिल, उदबत्तीची घरे सुद्धा ठेवले आहेत. काही वेळेस भक्त आपले चष्मे न आणल्याने पारायण करु शकत नाहीत. ही अडचण लक्षात घेऊन संस्थानाने विविध नंबरच्या चष्म्यांची सोय तेथेच केलेली आहे. या मंडपात भक्तांना जप, ध्यान, चिंतन, मनन व पारायण करता येते.
प्रवेशद्वार
पाठशाळेला लागूनच दोन प्रवेशद्वारे आहेत. उत्तरेकडे मंदिरात येण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार असून पश्चिमेला दुसरे प्रवेशद्वार आहे.स्वामी भक्त यांनी या मठात जाऊन स्वामींच्या या प्रासादिक पादुकांचे अवश्य दर्शन घ्यावे.
शेगावचा इतिहास
प्राचिन काळी श्रृंगमुनींनी वसविल्यामुळे श्रृंगगाव हे नाव पडलेल्या या गावास पुढे शेगांव म्हणून ओळखले जाऊ लागले. येथील सुप्रसिध्द शिवमंदिरामुळे या गावास शिवगांव असेही म्हणत. या शिवगांवाचे पुढे शेगांव असे नामकरण झाले. शेगांव या गावाच्या जन्मकथेबद्दल विविध मते असली तरीही आज मात्र हे ओळखले जाते ते परब्रह्. मस्वरूप संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पावन वास्तव्यामुळे. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव या खेडेगावात श्रींच्या पदस्पर्शाने तसेच त्यांच्या संजीवन वास्तव्यामुळे समृद्धीची गंगा, भावभक्तिची यमुना व ज्ञानरूपी सरस्वती सतत वाहत आहेत.
गजानन महाराज समाधी
जेव्हा गजानन महाराजांनी त्यांच्या अवतार समाप्तीची वेळ येऊन ठेपली आहे असे ठरवले, त्यावेळी ते हरी पाटलासोबत पंढरीला गेले. असे म्हणाले जाते की त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले व ऋषिपंचमीचा पुण्यदिनही ठरविला. समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी सांगितले,
मी गेलो ऐसे मानू नका | भक्तित अंतर करू नका |
कदा मजलागी विसरु नका | मी आहे येथेच ||
यावरून महाराजांचे भक्तांवरील अपरंपार प्रेमच दिसून येते. लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या समाधिप्रसंगी हजर होते. तत्पूर्वी महाराजांना सुवासिक द्रव्ये लावून अभ्यंग स्नान घालण्यात आले होते. अनेक सुवासिनींनी त्यांची पूजा करून मंगलारती ओवाळली होती. सर्वत्र सनईचे सूर ऐकू येत होते. सूर्याची पहिली किरणे जमिनीला स्पर्शिली आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलीन केले. देहाचे चलनवलन थांबले आणि भक्तगण एकदम शोकसागरात बुडाले. भक्तांना आकाश फाटल्यासारखे झाले, सर्वत्र दु:खाश्रूंचा पूर लोटला. त्यावेळी स्वतः श्री महाराजांनी त्यांच्या समाधीची वार्ता कित्येक भक्तांना स्वप्नात जाऊन कळविली.
त्याचवेळी डोणगावच्या गोविंद शास्त्रींनी निर्वाळा दिला की जोपर्यंत महाराजांचे सर्व भक्त दर्शन घेऊन जात नाही तोपर्यंत महाराज त्यांचे प्राण मस्तकी धारण करतील. महाराजांच्या समाधीचा सोहळा हा अवर्णनीय असा झाला. लाखोंच्या गणनेने भक्त समाधीच्या मिरवणुकीत भागीदार झाले. लोकांनी शृंगारित रथात ठेवलेल्या महाराजांच्या पुण्यमय देहावर अबीर, गुलाल, फुले, तुळशी आणि पैसे उधळले. संपूर्ण शेगावातून फिरुन पहाटे ती मंदिरात आली; तेथे महाराजांवर पुन्हा अभिषेक केला गेला. त्यांचा देह शास्त्रात सांगितल्यानुसार उत्तराभिमुख असा समाधीच्या जागी ठेवला. अखेरची आरती ओवाळली आणि मीठ, अर्गजा, अबीर ह्यांनी भरली. सर्व भक्तांनी एकच जयजयकार केला,
जय गजानना | ज्ञानांबरीच्या नारायणा |
अविनाशरुपा आनंदघना | परात्परा जगत्पते ||
आणि शिळा लावून समाधिची जागा बंद केली. त्यानंतर दासगणूंनी म्हंटले आहे की सार्वभौम राजाचाही त्यांच्यापुढे पाड नाही. त्यांचे विश्वप्रेम, बंधुत्व आणि भक्तांच्या हाकेला धावून जाणे तसेच अतर्क्य असे चमत्कार करून त्यांना संकटातून सोडवून, त्यांच्या चुका त्यांच्या पदरात घालून अत्यंत प्रेमाने त्यांना मोक्षमार्गावर घेऊन जाण्याच्या लीला पहाताच सर्वच भक्त धन्यतेने नतमस्तक होतात. आज गजानन महाराज आपल्यात फक्त देहाने नाहीत, परंतु ते जगदाकार असल्याने ते नाहीत अशी जागाच अखिल ब्रह्मांडात नाही. म्हणूनच त्यांना
अनंतकोटी ब्रह्मांडनायाक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगांवनिवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय!!!
असे प्रेमादराने संबोधले जाते. ज्या भक्तांना त्यांचे पुनीत चरणकमल लाभले ते खरोखरच धन्य होत. अशा सर्वच भक्तांच्या जीवननौका श्री महाराज भवसागराच्या पैलतीरी लावतील यात शंकाच नाही. अशा सदगुरुंविषयी परमपूज्य श्री कलावतीदेवी ह्यांनी स्वतः लिहिलेल्या 'गुरुस्तुति'मध्ये सांगितले आहे,
अगा! निर्गुणा, निश्चला, सच्चिदानंदा | अगा! निर्मला, केवला आनंदकंदा || स्थिरचररुपी नटसी जगी या | नमस्कार माझा तुला गुरुराया ||१||
अगा! अलक्षा, अनामा, अरूपा | अगा! निर्विकारा, अद्वया, ज्ञानरुपा || कृपाकरोनी अक्षयपद दे दासा या | नमस्कार माझा तुला गुरुराया ||२||
सदगुरूच्या स्वरूपाचे खरे वर्णन ह्या ओळींमध्ये सामावलेले आहे, गजानन महाराजांना हे वर्णन किती चपखल बसते आहे हे तर सर्वांना विदितच आहे. त्यांनी अनेक लोकांना दु:ख, संकटे, रोग यांपासून मुक्त करून सन्मार्गाला लावले. ते एक परमहंस संन्यासी तसेच उच्च कोटीचे विदेही संत होते. आज शेगावात त्यांच्या दर्शनाला येणाऱ्या असंख्य भक्तजनांना पाहून ह्या गोष्टीची नक्कीच खात्री पटते. ०८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषिपंचमीच्या दिवशी त्यांनी शेगाव येथे समाधी घेतली आणि त्यांचे समस्त भक्तगण दु:खसागरात बुडाले तेव्हा सर्वांना आठवते ते महाराजांनी भक्तांना सांभाळण्याचे दिलेले वचन; ते समाधि घेण्यापूर्वी म्हणाले,
दु:ख न करावे यत्किंचित | आम्ही आहोत येथेच |
तुम्हा सांभाळण्यापरी सत्य | तुमचा विसर पडणे नसे ||
देह त्यागून महाराज ब्रह्मीभूत झाल्याकारणाने ते आता जगदाकार झाले आहेत. त्यामुळे लाखो भक्तांना आजही त्यांची कृपा, प्रेम, आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभत आहे.
शेगाव संस्थान एक उत्तम व्यवस्थापन केंद्र
मंदिराचे व्यवस्थापन म्हणजे एक अत्यंत व आदर्श व्यवस्थापन व श्री शिवशंकरभाऊ पाटील. बुलडाणा या विदर्भातील मागासलेल्या जिल्ह्यात असलेल्या शेगावमधील सुप्रसिद्ध श्री गजानन महाराज संस्थानचे ते प्रमुख आहेत. राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीच्या बैठकीच्या निमित्ताने समितीचे सदस्य त्यांना भेटले. शिवशंकरभाऊंचे वय अवघे ८८ वर्षे. चेहºयावर सुरकत्या असल्या तरी प्रदीर्घकाळ केलेल्या सत्कार्याच्या समाधानाचे तेज त्या सुरकत्यांमधून सकाळच्या कोवळ्या पण ऊबदार सूर्यकिरणांसारखे पसरत असते.बोलताना क्षणाक्षणाला ते भावनिक होतात, लगेच डोळ्याच्या कडा पाणावतात. मग ते स्वत:च काहीतरी मिश्किल बोलून वातावरण हलकंफुलकं करतात. 'भाऊ पद्मश्री, पद्मभूषण तुम्हाला सरकारनं देऊ केले पण तुम्ही ते नम्रपणे नाकारले, असं का? त्यावर भाऊंचे उत्तर हृदयाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही. ते सांगतात, 'अहो! माझा हात माऊलींच्या (गजानन महाराजांच्या) चरणांवर असतात, उद्या पुरस्कार घ्यायला गेलो तर माऊलींच्या चरणांवरील हात हटतील नं माझे! ते कधीही हटू नयेत अशी माझी मनोमन इच्छा आहे म्हणून मी कुठलाही पुरस्कार नाकारतो.
शेगावच्या अवाढव्य संस्थानचा कारभार शंभर टक्के पारदर्शक असा आहे. स्वत: भाऊ किंवा कोणीही ट्रस्टी संस्थानमधील पाणीही पित नाहीत. जेवणाचा डबा घरून आणतात. आज संस्थानमध्ये तब्बल ११ हजार सेवेकरी आहेत. एकही पैसा मानधन न घेता ते काम करतात. त्यात आबालवृद्ध, गावखेड्यातील मुलामाणसांपासून नोकरदार, बड्या कंपन्यांमधील अधिकारीही असतात. ३ हजार सेवेकरी सेवेची संधी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या सेवेकºयांचे वैशिष्टय म्हणजे त्यांना नेमून दिलेलं काम ते नेटानं करतात. उगाच दुसरीकडे लुडबूड करीत नाहीत. भक्तनिवास परिसरातील झाडांची पाने उचलण्याचे काम नेमून दिलेला सेवेकरी पान झाडावरून खाली पडण्याच्या आतच झेलतो, असे शिवशंकरभाऊ कौतुकमिश्रित नजरेनं सांगतात. या सेवेकºयांच्या राहण्याजेवण्याची व्यवस्था, आरोग्याची काळजी संस्थान करते.दहा सेवेकºयांपासून या अभिनव संकल्पनेला सुरुवात झाली ती ऐंशीच्या दशकात. आजूबाजूच्या खेड्यातून आलेले दहा सेवेकरी सायंकाळी संस्थानमध्ये जमले. त्यांच्या राहण्याची व्यवस्था होती त्या खोलीत जाऊन शिवशंकरभाऊंनी डोकावले तर त्यांना धक्काच बसला. लाल मिलो ज्वारीच्या भाकरीवर मीठ, पाणी टाकून ते खात होते. भाऊंनी विचारलं, अरे बाबा! तुम्ही सेवेकरी म्हणून आले आहात तर संस्थांनमध्ये तुमच्या जेवणाची व्यवस्था करणारच आहोत ना! त्यावर, ते सेवेकरी म्हणाले, 'भाऊ! आम्ही सेवेकऱ्याचे काम उद्यापासून सुरू करणार आहोत मग आज आम्ही संस्थानमधील जेवण कसे जेवणार? त्याच क्षणी भाऊंनी निर्णय घेतला, आजपासून संस्थांनमधील पाणीही ते पिणार नाहीत. वर्षभरातील तीन महाप्रसाद सोडले तर भाऊंनी ते व्रत आजही तंतोतंत पाळलं आहे. इतर ट्रस्टींनी त्यांचं अनुकरण केलंय. मंदिरात कमालीची शिस्त, स्वच्छता, पावित्र्य जपले आहे.
'भक्तांचा हात धरुन त्यांना माऊलींच्या चरणी पैसे टाकण्याची जबरदस्ती करणाºया बडव्यांना इथे स्थान नाही. ते सगळे चंद्रभागेच्या तिरी. हजारो भक्तांची निवासाची सोय करणाºया भक्तनिवासांमधील टापटीप वाखाणण्यासारखी आहे. संस्थानमार्फत एकदोन नाही तर तब्बल ४२ सेवाप्रकल्प चालविले जातात.
बुलडाणा जिल्ह्यातील हजारो लोकांना मोफत आरोग्य सेवा गावोगावी दिली जाते. आबालवृद्धांच्या मनोरंजनाबरोबरच त्यांना अध्यात्माची शिकवण देणारा आनंदसागर हा अनोखा पार्क ही शिवशंकरभाऊंच्या कर्तृत्वाची आणखी एक देण. समाजाला केवळ बोधामृत पाजण्याऐवजी कर्मयोगाचे उदाहरण घालून दिलेला हा तपस्वी आहे. शेगावच्या आधी वा नंतर ज्या संस्थांनचे नाव घेतले जाते त्याचे अध्यक्ष मध्यंतरी भाऊंच्या भेटीला आले; काही मार्गदर्शन करा म्हणाले. भाऊ एवढेच म्हणाले, 'आमच्या संस्थानचे बजेट दीडशे कोटींचे आहे. तुमच्या संस्थानची तूप खरेदीच तीनशे कोटींची आहे असं मी ऐकतो. असे खर्च कमी करा. बाकी काय सांगू. श्री गजानन महाराज संस्थानच्या सेवेचा हा पॅटर्न सगळ्या संस्थानांनी स्वीकारला तर सेवाकार्याचे एक मनोहारी विश्व तयार होईल यात शंका नाहीच.

दिपाई_बांदल

 #


दिपाई_बांदल

आमच्याकडे अनंत काळापूर्वीची समुद्राच्या पाण्याखाली गेलेल्या मथुरा नगरीचे अस्तित्व आढळते, टीव्हीवरल्या बातम्यांमध्ये नको त्या विषयांवर कंटाळवाण्या चर्चा राजरोज घडतात. या व अश्या कित्येक गोष्टींवर मोठमोठाली चर्चासत्र देखील रंगतात, रामयणातील अमुक अमुक प्रसंग इथे इथे घडले आहेत असे 10 वेळा रिपीट करून सांगितले जाते पण साडेतीनशे - चारशे वर्षापूर्वीचा काळ अभ्यासायचा म्हटलं तर इथे चाचपड़ावं लागतं ही खरी मराठेशाही इतिहासाची शोकांतिकाचं म्हणावी लागेल.
लोकांचे अडाणीपण, इतिहासाविषयची कृष्टता यांमुळे मराठ्यांचा इतिहास काळाच्या ओघात कुठेतरी मागे पडला आणि शिवाजीचा भाऊ कोण विचारले तरं मग तान्हाजी अशी उत्तरे मिळू लागली. जर शककर्त्या शिवरायांविषयी एवढी माहिती समाजाला असेल तर त्यांच्यासाठी जीवाच्या बाजीने लढलेल्या असंख्य मावळ्यांचा पराक्रम तर केवळ इथल्या गडकोटांनीचं पाहिला आणी तेचं एकमेव या गोष्टीचे मूक साक्षीदार म्हणावे लागतील.
जीजाबाई, ताराराणी, अहिल्याबाई सोडल्याचं तर मराठा इतिहासाशी निगडित चौथी स्त्री सांगायला कौन बनेगा करोड़पतिच्या लाइफलाइन सुद्धा कमी पडव्यात हीच सत्य परिस्थिती., पण आता चुलीत जाऊनं ख़ाक होण्यापासून वाचलेल्या, पोटमाळयावरील ट्रंकेत अखेरच्या घटका मोजत वाळवीशी लढणाऱ्या कागदपत्रातून आम्ही काहीतरी खऱ्या अर्थानं शोधण्याचा प्रयत्न केला आणि मराठा इतिहासतं मोलाची कामगिरी बजवलेल्या तरी कळत नकळत वगळण्यात आलेल्या एका कर्तबगार महिलेचे चित्र त्यातून स्पष्ट झालं आणि त्या महिला म्हणजे "दिपाऊ बांदल" होय.
महाराष्ट्रात जेव्हा परकीय सत्तांसाठी आप्तस्वकीयांच्या सर्रास कत्तली आरवल्या जात हा तो काळ. स्वतःच्या मर्दुमकीच्या जोरावर अनेक मोठमोठ्या कुटुंबांनी आपली छाप महाराष्ट्रवर पर्ययानं इतिहासवर पाडली अश्यांपैकी एक असणाऱ्या निंबाळकर घरण्यातील "सबाजी राजे निंबाळकर" यांच्या यांच्या घरण्याची लेकं "दीपाई" बांदल घराण्याची लक्ष्मी म्हणून हिरडस मावळातील नाईक बांदल देशमुख यांच्या घरण्यात आल्या.
दिपाऊ यांच्या पोटी जन्माला आलेला रणमर्द योद्धा म्हणजे "बाजी बांदल" होय. 'बांदल घरानं म्हणजे फितूर, स्वराज्याच्या कार्यात त्यांनी नेहमीच आड़काठी केली, रोहिड़ा जेव्हा स्वराज्यात दाखल झाला तेव्हा कृष्णाजी बांदलांचा विरोध मोडून त्यांना यमसदनी धाडले गेले आणि त्यानंतर उपरती होऊन बांदल घराण स्वराज्याच्या सेवेत दाखलं झाले, असे शालेय पुस्तकापासून मोठमोठ्या इतिहासकारांच्या कादंबरयातून सांगण्यात आले'.
परंतू बांदल घरण्यात असणाऱ्या या हरहुन्नरी, कर्तबागर स्त्रीचे कार्य आणि त्यांच्यासंबधीचे उल्लेखचं बोलके, की जेणे करून इतिहासचं आपनेआप बोलका झाला आणि बांदल यांच्यावरील ऐकवल्या जाणाऱ्या बंडल गोष्टी बंद झाल्या. पण अजूनही इतिहासचे अज्ञान असणारी मंडळी त्याच त्याच विषयांची घोकम पट्टी करते, हे मोठे दुर्दैव.
मराठ्यांच्या आपापसातील युद्ध असोत वा शत्रू शाह्यांशी केलेली निकराची पंजेफाड़, संपूर्ण ताकदिनिशी पाठिंबा देणे हेचं दीपाई बांदल यांनी आपले आद्य कर्त्यव्य समजले., कान्होजी जेधे आणि कृष्णाजी बांदल यांच्यातील लढाई दरम्यान लढण्यासाठी कृष्णाजींस दीपाई औ यांनी शंभु प्रसाद नावाचा घोडा दिला होता, अशी इतिहासात नोंद आहे.
स्वराज्याच्या लुटुपुटुचा खेळ शिवरायांनी जेव्हा नुकताचं मांडला, तेव्हा नुकताचं मांडलेला डाव मोडून काढण्यासाठी विजापुरी दरबारने पाठवलेला कसलेला सरदार फत्तेहखान आणि त्याची कैक हजाराची फ़ौज स्वराज्यावर चालून आली यावेळी खळद बेलसर येथे स्वराज्याचा पहिला रणसंग्राम झाला., हे घडलेलं युद्ध सगळ्या जाणकारांना ठाऊक असेलचं., पण याचं युद्धात स्वराज्याला मदत म्हणून स्वताच्या दिमतीस असलेलं सैन्य या लढ्यात शिवरायांच्या बाजूने लढण्यासाठी म्हणून दीपाई बांदल यांनी पाठवले हे ठाऊक असलेली लोकं नगण्यचं.
१६५९ साली स्वराज्यावर आलेली अफझलरूपी टोळधाड़ कायमची गर्दीस मिळविण्यासाठी झालेल्या प्रतापगडाच्या महाप्रतापी पर्वात दिपाऊ बांदल यांचा सक्रीय सहभाग असल्याची नोंद इतिहासात आहे., पण आम्हाला ते कधी दिसलचं नाही कारण आम्हाला इतिहास माहितीये तो एवढाचं "विसरलात का वाघनखे"
राजं पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले, तेव्हा अतिशय मुरब्बी राजकारणी पत्रांची, शब्दांची देवाणं घेवाणं करून, शत्रुला गाफिल ठेवत, मराठ्यांचा मुकुट शत्रुच्या तावडीतून निसटला खरा पण शत्रूला या गोष्टीचा सुगावा लागताचं त्यांचा पाठलाग सुरु झाला, पण लाख मेले तरी चालेल पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजेल एवढ्या जबरदस्त महत्वकांक्षी स्वराज्यनिष्ठा आपल्या मनाशी होती, म्हणूनचं गजापूरच्या खिंडीत स्वतःच्या देहाची चाळण करण्यासाठी बाजी बांदल हे खडे ठाकले आणि त्यांनी राजांना विशाळगडी जाण्यसाठीची विनंती केली., हे बाजी बांदल म्हणजे या वीर मातेचा वीर सुपूत होयं. राजे दुष्मनाच्या गर्दीतून निसटले खरे पण त्यासाठी या बांदल घराण्याने हसत हसत सूतक आपल्या घरावर घेतले., सूतक चढलेल्या घराला सांत्वन करण्याच्या आपल्या पूर्वपार चालत आलेल्या पद्धती प्रमाणे, जिजाऊनी स्वतः जातिनिशी जाउन दिपाऊचे सांत्वन केल्याच्या उल्लेखाची नोंद आपण कुणी घेतली नसेल पण ती ऐतिहासिक दस्तऐवजात झाली हे नशिबचं. "पोटचं पोरं गेल्याचं समिंदराएवढं दुःख त्या मायिनी कसं सोसले हे तिचं तिलाचं ठावं"
याचं युद्धानंतर भरविण्यात आलेल्या जखमदरबारात शाहीर अज्ञानदासानं गायिलेल्या पोवाड्यात जेधे आणी बांदल घराण हे शिवरायांना, प्रभू श्रीरामचंद्राला लभलेल्या अंगत-हनुमंताप्रमाणे नोंदवले गेले आहे., आणी याचं गजापुरच्या खिंडीतील पराक्रमापाई बांदल घरण्याला तलवारीच्या पहिल्या पातीचा मान मिळाला.
जशा दीपाई उत्तम माता, होत्या तश्या त्या उत्तम प्रशासकदेखील होत्या हे मानायला देखील इतिहासचं भाग पाड़तो., अत्ताच्या काळात चालणारे जमिनीचे तंटे हे त्या काळात देखील चालायचेचं तेव्हा शिवरायांना यात लक्ष घालून त्यासंदर्भात योग्य तो न्यायनिवाडा करावा लागायचा., अश्याच एकदा डोहर देशमुख यांच्या जमीनीविषयक तंट्यावर निवाडा करण्याची वेळ शिवरायांवर आली तेव्हा त्या निवाडा सभेत म्हणजे तत्कालीन कोर्टात न्यायाधीश म्हणून दीपाई बांदल या कार्यरत होत्या.
मिर्झाराजा जयसिंग जेव्हा स्वराज्यावर चालून आला, तेव्हा नाइलाजास्तव त्याच्यासोबत तह करणे शिवाजी राजांना भाग पडले., आणि याचं तहाच्या कलमानुसार राजे आणि बाळ संभू राजांना आग्र्यास बादशहाच्या भेटिस जावे लागले, मोघल दरबारी असणाऱ्या रिवाजाप्रमाणे यांच्यासोबत दगा होऊन पिता पुत्रास कैददेखील घडली, तेव्हा राजगड़ी जाउन दीपाई बांदल यांनी जिजाऊस धीर दिल्याचे उल्लेख देखील आपणास मिळतात फक्त तटस्थ इतिहासकाराच्या हाती हा लेखाजोखा जायला हवा एवढीचं माफक अपेक्षा.
प्रस्तुत लेख वाचूनसुद्धा जरं कोणास रामाची सीता कोण असा प्रश्न उद्भवत असेल तर दस्तूरखुद्द "छत्रपती शिवरायांची प्रथम पत्नी, युवराज संभाजी महाराजांच्या मातोश्री सईबाईसाहेब राणीसरकार यांच्या दिपाऊ बांदल ह्या आत्त्या होतं".
कर्तुत्व, त्याग, पराक्रम परंतु पूर्णपणे अपरिचत असणाऱ्या या मराठा स्त्रीची, पर्यायाने बांदल घराण्याची तत्कालीन पत - प्रतिष्ठा काय असेल यविषयीची गोळा बेरीज वाचकांनीचं केलेली बरी....!
सदर लेखास ऐतिहासिक ख़तपाणी पुरविन्यास दिपाऊ बांदल यांच्या वंशावळीत अत्ताचे वंशज म्हणून असणाऱ्या करणराजे बांदल इतबारराव यांनी मोलाचे सहकार्य केलेले आहे
#दीपाऊ_बांदल यांचे चित्र उपलब्ध नसल्याने #जिजाउंचे चित्रं वापरतो आहे.

सरदार रास्ते वाडा- रास्ता पेठ, पुणे भाग -२


 सरदार रास्ते वाडा-

रास्ता पेठ, पुणे भाग -२
#शाहूमहाराजांच्या काळात रास्त्यांच्या घराण्यातील भिकाजी नाईक व सदाशिव नाईक सावकारी करण्यासाठी साताऱ्यात आले. ते सावकारी करत म्हणून त्यांना नाईक म्हणत देवीघेवीच्या व्यवहारातून शाहूमहाराज व त्यांचा घरोबा झाला. त्यातूनच एकदा शाहूमहाराज दिवाळीत रास्त्यांकडे आले असता, त्यांनी भिकाजींची कन्या गोपिकाबाई पाहिली. त्यांनी नानासाहेब पेशवे यांच्यासाठी शब्द टाकला. थोड्या दिवसांतच वाई येथे लग्न थाटात पार पडले आणि रास्ते पेशव्यांचे आप्त झाले. भिकाजींना सात मुलगे, पैकी मल्हारराव रास्त्यांना पेशवे -दरबारी सरदारकी मिळाली, ते पेशव्यांच्या घोडदळाचे प्रमुख होते. त्यांच्या पश्चात आनंदराव भिकाजी, आनंदराव व त्यांच्या बंधूच्या कारकीर्दीत मोठी बांधकामे झाली, वाई येथे महालक्ष्मी, विष्णु, गणपती, काशी विश्वेश्वर. गंगारामेश्वर, पंचायतन ही देवालये, कृष्णा नदीस घाट, धर्मपुरी ही नवी पेठ वसवून ब्राम्हणांना त्यांनी तेथे घरे बांधून दिली. बोपर्डीचा रस्ता व सोनजाईचा मार्ग यांच्या दुतर्फा तीन मैलाच्या परिसरात आंब्याची झाडे लावली. अनंतपूर येथे किल्ला बांधला. याखेरीज नाशिक, त्र्यंबकेश्वर, सातारा, तासगाव, अनंतपूर, अथणी, पंढरपूर, वाल्हे, मांडवगड, तालीकोट येथे वाडे बांधले. वाईच्या घाटावरील गणपातीची विशाल मूर्ती प्रेक्षणीय आहे. दक्षिण महाराष्ट्रात एवढी भव्य मूर्ती कोठेच नाही. शौर्याखेरीज रास्त्यांनी जी अफाट कामगिरी केली. त्याच्या या खुना आजही शिल्लक आहेत.
आनंदराव भिकाजी यांनी पुण्याच्या पूर्वभागात गणपतीचे देऊळ बांधून या भागात रास्ता पेठ वसवली. उत्तरेस आपली भव्य वास्तू बांधली. अकरा-बारा हजार चौरस मीटर परिसरात बाहेरून भक्कम तट असलेली ही वास्तू पेशवाईतील वैभवाची साक्ष देत आजही उभी आहे. तटाच्या दर्शनी भागासह पूर्णपणे शाबूत असलेली ही वास्तू म्हणजे पेशवाईतील आखीव-रेखीव बांधकामाचा, तसेच लाकडी कोरीव स्थापत्याचा एक उत्कृष्ठ नमुना आहे.
उत्तराभिमुख प्रचंड दरवाजा असलेल्या या वाड्याला दोन मुख्य चौक असून, खेरीज दोन चौक आहेत. दिंडी दरवाजातून आत शिरताना दिसतो चहूबाजूंनी उंच तट या तटाभोवती आतून मोकळे आधार लागते. नंतर उजव्या बाजूने मुख्य वाड्याचा दरवाजा. मुख्य वाड्याच्या उंच दरवाजातून आत शिरताना गणेशपट्टीकडे लक्ष वेधल्यावाचून राहत नाही. दरवाज्याच्या उंबऱ्यातून आत आल्यावर लागतो चौसोपी चौक, सरळ चालत जाऊन चौकाच्या तीन पायऱ्या चढून ओसरीवर डाव्या हाताला घरातील शंकराचे देऊळ आजही नित्यनियमाने त्याची पूजा होते. चौकाच्या मध्यावर उभे राहून दृष्टिक्षेप टाकला तर तीन मजली भव्य वास्तूचे देखणेपण डोळ्यात भरते. खाली चारही बाजूंनी सोपे, माजघर, मुदपाकखाना, पाठीमागे कोठीची खोली, जाबता किंवा जामदारखानाही तळमजल्यावरच होता. शिवाय एक मोठेच्या मोठे दालनही. कदाचित येथे भोजनव्यवस्थेचा प्रबंध केला जात असावा. या याड्यात एकूण पाचशे लहानमोठी दालने होती म्हणतात. "घरात मंडळी तर खूप नाहीत, मग एवढे प्रचंड वाडे कशाला बांधत असावेत?" असे विचारता रास्ते म्हणाले, "हा वाडा काहीच नाही. वाईला यापेक्षा भव्य वाडा आहे." -(डाॕ. मंदा खांडगे)
-वैभव पेशवेकालीन वाड्यांचे
फोटो - रास्ते वाडा, पुणे महानगरपालिका (विकास चौधरी)

हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती – मर्द मराठा #हंबीरराव_मोहिते !





 हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती – मर्द मराठा #हंबीरराव_मोहिते !

शहाजीराजांचे भोसले घराणे म्हणजे कर्तबगार. भोसले घराण्याशी आपले संबंध जुळावेत म्हणून प्रांतातील अनेक मराठी घराणी उत्सुक असतं आणि त्या काळी भोसले घराण्याशी सोयरिक करणे म्हणजे प्रतिष्ठेचे देखील मानीत असत. त्यापैकीच एक घराणे म्हणजे मोहिते घराणे होय.
हे घराणे शहाजीराजांच्या भोसले घराण्याच्या अगदी जवळचे होते असे इतिहासात नमूद आहे. स्वराज्यस्थापनेच्या पूर्वी मोहिते घराण्यातील अनेक पुरुषांनी आपल्या कर्तबगार घराण्याला साजेशी अशी कामगिरी करून दाखवत घराण्याचा नावलौकिक वाढवला होता आणि पुढे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रवासामध्ये देखील मोहिते घराण्यातील वीरांनी आपले कर्तुत्व गाजवून हा वसा पुढे चालवला.
मोहिते घराण्याचा भोसले घराण्याशी पहिला संबंध तेव्हा आला जेव्हा संभाजी व धारोजी मोहिते यांनी शहाजीराजांच्या सेनेमध्ये प्रवेश केला. शहाजीराजांसोबत त्यांनी अनेक मोहिमा यशस्वी करण्यामध्ये मोलाचे योगदान दिले होते. यापैकी संभाजी मोहिते यांचा पुत्र म्हणजे हंबीरराव मोहिते होय. (मूळ नाव-हंसाजी मोहिते, शिवाजी महाराजांनी त्यांच्या पराक्रमावर खुश होऊन त्यांना हंबीरराव हा किताब दिला होता.)
संभाजी मोहिते यांनी आपली मुलगी सोयराबाई यांचा विवाह शिवाजी महाराजांसोबत लावून दिला व भोसले आणि मोहिते घराणे कधीही न तुटणाऱ्या एका नात्यात बांधले गेले. त्यानंतर हंबीरराव मोहिते यांनी देखील आपली मुलगी ताराबाई हिचा विवाह शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांशी लावून दिला आणि सोयरिक अधिक घट्ट केली.
हंबीरराव मोहिते यांना आपल्या कर्तबगार घरण्याचा वारसा लाभल्याने आपल्या पूर्वजांप्रमाणे ते अतिशय शूर होते. कोणतेही संकट का असेना त्याला निधड्या छातीने सामोरे जाणे ते आपला धर्म मानीत असत.
प्रथम हंबीरराव मोहिते हे शिवाजी महाराजांच्या सेनेमध्ये सेनानी म्हणून कार्यरत होते. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापूर्वी बहलोल खाना विरुद्धच्या लढाईमध्ये प्रतापराव गुजर धारतीर्थी पडले आणि स्वराज्याच्या सेनापतीची जागा रिकामी झाली. ज्या लढाई मध्ये प्रतापराव गुजर धारातीर्थी पडले त्याच लढाईमध्ये हंबीरराव मोहते यांनी स्वत:हून पुढाकार घेत जबरदस्त शौर्य गाजवीत शत्रू सैन्याचा पराभव केला.
त्यांचा हा पराक्रम पाहून प्रतापराव गुजर यांच्या नंतर रिकामी झालेल्या सेनापतीच्या जागी प्रतापरावां सारखाच त्यांच्या शौर्याचा वारसा पुढे नेणारा निधड्या छातीचा वीर असावा म्हणून शिवाजी महाराजांनी हंबीरराव मोहिते यांची निवड केली, सोबत त्यांना हंबीरराव हा किताबही बहाल केला आणि हंबीरराव मोहिते झाले अष्टप्रधान मंडळातील हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती!
हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची जिवंत साक्ष म्हणजे त्यांची तलवार होय. ही तलवार प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदीरात भवानी माते समोर विराजमान आहे. त्याचे कारण म्हणजे अफझलखाना सोबत झालेल्या लढाईत हंबीरराव मोहिते यांनी गाजवलेला पराक्रम होय.
या लढाईत त्यांनी ६ तासात ६०० शत्रूंना मारले असे म्हटले जाते. ह्या तलवारीवर सहा चांदणीच्या आकाराचे शिक्के आढळतात. त्या काळात शिवाजी महाराजांनी ही प्रथा चालू केल्याचे म्हणतात. म्हणजे एखाद्या मावळयांने एकाच लढाईत १०० शत्रूंना कंठस्नान घातले तर त्या मावळयाच्या तलवारीवर एक शिक्का ऊमटवला जायचा. त्यानुसार सरसेनापती हंबीरराव मोहितेच्या तलवारीवर ६ शिक्के आहेत. असा पराक्रम कोणीही गाजवल्याचे ऐकिवात नाही.
राज्याभिषेकानंतर स्वराज्याचा गाडा हाकण्याची जबाबदारी वाढली होती. शत्रू सैन्य चहुबाजूंनी टपून बसले होते. अश्यावेळी हंबीरराव मोहितेंसारख्या खंद्या सेनापतीने आपल्या महाराजांना पदोपदी साथ दिली.
हंबीररावांनी पहिले लक्ष्य केले मुघल सुभेदार दिलेरखान व बहादूरखान यांना. महाराजांच्या आज्ञेनुसार त्यांच्या छावण्यांवर जबरदस्त प्रहार करून हंबीरराव मोहितेंच्या सैन्याने त्यांना सळो की पळो करून सोडले. त्यानंतर त्यांनी खानदेश, बागलाल, गुजरात, बर्हाणपूर, वर्हाड, माहूड, वरकड पर्यंत मजल मारीत प्रत्येक मुघलाला हाकलून दिले.
दिवसागणिक त्यांच्या शौर्यामुळे स्वराज्याचा दबदबा वाढत होता. शत्रू सैन्य हंबीररावांच्या वाटेला जाताना दोनदा विचार करू लागला. इकडे मुघलांसोबत आदिलशाहीला देखील त्यांनी जबरदस्त दणका दिला. कर्नाटकातील कोप्पल येथील अदिलशाही पठाणी सरदार हुसेनखान याचा प्रचंड पराभव करून तेथील जनतेला स्वराज्याच्या छत्रछायेखाली आणले.
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले, स्वराज्य पोरका झाला.
शिवाजी महाराजांनंतर अर्थातच स्वराज्याची धुरा थोरला पुत्र संभाजी महाराजांकडे येणार होती, परंतु दरबारातील एक गटाने संभाजी महाराजांना गादीवर न बसवता राजाराम महाराज यांना गादीवर बसवण्याचा घाट घातला. पण हंबीरराव मोहिते यांनी मात्र संभाजी महाराजांना पाठींबा दिला आणि अखेर नियतीच्या इच्छेप्रमाणे संभाजी महाराज हे स्वराज्याचे छत्रपती झाले.
संभाजी राजांच्या राज्याभिषेकानंतर, त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा एकदा स्वराज्याचा वारू चौफेर उधळण्यासाठी हंबीरराव मोहिते सज्ज झाले. या काळात त्यांनी केलेली बुर्हाणपुरची लुट महत्त्वाची मानली जाते. तो विजय म्हणजे हंबीरराव मोहितेंच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या क्षणांपैकी एक आहे. या विजयामुळे मोघलांच्या वर्चस्वाला चांगलाच तडा गेला.
रामशेजच्या किल्ल्याची लढाई ही इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली गेलेली लढाई आहे. या लढाईमध्ये हंबीररावांनी किल्ल्याला वेढा देऊन बसलेल्या खानाला चांगलीच अद्दल घडवली होती.
यानंतरही मुघल सरदार कुलीचखान, रहुल्लाखान व बाहदुरखान आणि शहाजादा आज्जम यांना देखील स्वराज्याच्या बाहेर पिटाळून लावताना हंबीर राव मोहिते यांनी पराक्रमाची शर्थ केली.
हंबीररावांची शेवटची लढाई म्हणजे वाईजवळील मुघल सरदार सरदार सर्जाखान विरुद्धची लढाई होय. या लढाईत देखील आपल्या कर्तुत्वाला साजेसे शौर्य गाजवताना तोफेचा गोळा लागून स्वराज्याचे सरसेनापती हंबीर राव मोहिते धारातीर्थी पडले. या लढाईत मराठ्यांना विजय मिळाला खरा, पण त्यांनी आपला अमुल्य हिरा मात्र गमावला.
संभाजी महाराजांच्या कारकिर्दीतील प्रत्येक लढाईमध्ये हंबीर राव मोहिते यांचे नाव आवर्जून पाहायला मिळते. आपल्या सेनापतीपदाला साजेशी कामगिरी करून दाखवीत, शेवटच्या श्वासापर्यंत लढून हंबीररावांनी शिवाजी महाराजांनी त्यांची केलेली निवड सार्थ करून दाखवली.
स्वराज्याच्या या मर्द मराठ्या सरसेनापतीस मानाचा मुजरा!

सह्याद्रीचा सिंह सिद्दी च्या वेढ्यात अडकलेला होता.

 


सह्याद्रीचा सिंह सिद्दी च्या वेढ्यात अडकलेला होता..

राजेंची बातमी नेतोजींपर्यंत पोहोचली.
रणमार्तंड नेतोजी विजापूर ला विध्वंस करत सुटले , पण आदिलशाही ला नेतोजींकडे कमी सैन्य असल्याची खबर मिळाली होती..
आदिलशाही ने खवासखान ला पाच हजार सैन्यासह नेतोजींचा पडाव लावण्यासाठी पाठवले खवासखान ला मदतीला गोवळकोंड्याचे सैन्य आले , तुटपुंज्या सैन्यामुळे हे युद्ध नेतोजी हारले ...
जिजाऊंना सर्व पराजयाच्या खबर मिळत होत्या, शाहिस्तेखान शिरवळ ला आपल्या अवाढव्य सैन्येसह स्वराज्यात येऊन पोहोचला होता..
शाहिस्तेखान च्या मदतीला अनेक मराठे सरदार आले.
आणि हेच काय कमी होते की, त्र्यंबकराव भोसले, बाबाजी भोसले, दत्ताजीराव जाधव आणि स्वतः आपल्या भाच्या विरूद्ध शिवरायांचे मामा रुस्तमुराव जाधव हे सुद्धा खानाला मिळाले..
मासाहेब जिजाऊ कणखरपणे उभ्या झाला , मावळ्यांना गनिमी काव्याने लढण्यासाठी आदेश दिले..
मराठा फौजांनी शाहिस्तेखान ला बेजार केले ,खान शिवापूर सोडून सासवड ला आला ,तिथून पुण्याला आणि खुद्द शिवरायांच्या लाल महालात त्याने मुक्काम ठोकला...
वनवा पसरावा तसे खानाचे लष्कर पसरले..
दिवस पुढे जात होते पण महाराजांची कुठलीच खबर येत नव्हती , मासाहेबांनी कित्येकहेर पाठवले पण कुणीही वेढा पार करून जाऊ शकले नाही.. प्रत्येक येणारा दिवस नवीन संकट उभे करत होते..
जिजाऊंमासाहेबांच्या मनात काही तरी विचार सुरू झाला... जिजाऊंनी जेवढे हातात लष्कर आहे ,तेवढे गोळा केले.. शस्त्र तयार करण्यास सांगितले...
आणि अखंड वज्रचुडे मंडीत ,सकल सौभाग्य संपन्न, जिजाऊ मासाहेब स्वतः पुढे आल्या हातात तलवार घेऊन , महिषासुर ला मारण्यास स्वतः जशी अष्टभुजा जगदंबा उभी राहिली तश्याच म्लेंच्छ मर्दनास राजगडाची जगदंबा उभी राहिली...
सर्व मंत्रीमंडळ विचारात पडले , मोरोपंत पुढे आले, मासाहेबांना त्यांनी न जाण्यासाठी शब्द टाकला...
जिजाऊ मासाहेब म्हणाल्या..
"इथे थांबुन काय करावे पंत ! शिवबा वेढ्यात अडकले, खान स्वराज्य गिळण्यासाठी नागाप्रमाणे येऊन बसलाय आम्हाला निघावे लागेल..."
मोरोपंत म्हणाले,
"आऊसाहेब, एवढ्या सैन्यात वेढा तोडणे अशक्य आहे, क्रुपया थांबावे....."
जिजाऊ मासाहेब म्हणाल्या.....
"किती थांबावे आता पंत !! स्वराज्य धोक्यात आहे ,, आम्हाला जावं लागेल पंत.....
आई भवानी च्या मनात असेल तर शिवबांची सुटका करून , परत येऊ आणि जर नाही..., तर आम्ही स्वराज्यासाठी विरमरण पत्करु.."
"पण आऊसाहेब....." पंत काही बोलणारच की, मासाहेबांनी हात वर केला...
आणि आपल्या तुळजाऊ डोळ्यांनी विजयश्री भगव्या ध्वजाकडे बघतांना म्हणाल्या...
"हा हिंदवी स्वराज्याचा भगवा , हे स्वराज्य संपतांना आम्ही नाही बघू शकत...
या वेळी स्वराज्याला त्यांच्या राजांची रक्षणकर्त्याची , शिवबांची गरज आहे पंत..राजमाता जिजाबाईंची नाही... आणि या एका शब्दाने सर्वांच्या डोळ्यात अश्रू आणले....क्रमशः
✍🏻अक्षय चंदेल (लेख अधिकृत)

*बहिर्जी नाईक- एक अज्ञात थोरपण*


 *बहिर्जी नाईक- एक अज्ञात थोरपण*

१०-१० दिवसअन्नपाण्या शिवाय राहतो,तर महिना महिना भर एकाच झाडावर दबा धरुन बसतो…!
धावायला लागला तर वाऱ्याच्या कानफाटीत मारल्यासारखे धावतो,पुराच्या डोहात खुशाल उडी मारतो..!
तलवार,भाला,फरीगगदा,पट्टा, विटटा,धनुष्य,असे काही चालवतो की समोर महासागर येऊदे शत्रूचा…!
शत्रूच्या राणीवशात जाऊन राहू शकतो,तर खुद्द औरंगाजेबाच्या दरबारात जाऊन त्यालाच कव्वाली ऐकवून बक्षीस घेऊन येऊ शकतो…!
माणूस म्हणाल तर एकही माणसाचा गुण नाही,जनावर म्हणाल तर दिसतो माणसासारखा..!
मोठमोठ्या गोष्टीत अचूक निर्णय,सावध नियोजन आणि स्वतःच्या देखरेखीखाली प्रत्यक्ष घोडदौड…!खरं सांगतो गड्यांनो…हा बहिर्जी नाईक जणू शिवरायांचा तिसरा डोळाच होता..!
आणि शिवराय त्याला इतके मानत की महाराजांच्या राणीवशात एकमेव जिजाऊ माँसाहेब सोडून कोणी विना परवाना जाऊ शकत असतील ते म्हणजे बहिर्जी नाईक…!
गड्यांनो,महाराजांचा नाईकांच्यावर इतका विश्वास की हा माणूस चुकून सुद्धा चूक करु शकणार नाही इतका दृढ विश्वास…!
पाची पातशाहिना रणांगणात चारी मुंडी चित करुन जेव्हा महाराज राज्याभिषिक्त झाले तेव्हा सुद्धा बहिर्जी नाईक समोर येऊ शकत नव्हते इतकी गुप्तता पाळत होते नाईक….!
महाराजांचा अभिषेक सुरु होता,महाराज मुक्त हस्ताने गरीब फकिराना ओंजळ भरभरून द्रव्य दान करत होते आणि एक म्हातारा फकीर त्या रांगेत उभा होता…!
जक्ख म्हातारा हुंदके देऊन रडत होता आणि डोळे भरून महाराजांना पाहत होता…..महाराजांनी जेव्हा त्या फकिराला पाहिले तेव्हा मात्र त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला…!
ओठावर मिशा नव्हत्या तेव्हा पासून ह्या बहिर्जीने आणि मी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले….आणि आज मराठेशाही स्थापन होत आहे,राज्य आनंदात आहे,आणि ज्याने आजवर सारी संकटे आपल्या छातीवर झेलली तो बहिर्जी फकीर होऊन याचकांच्या रांगेत उभा आहे…!
काय बोलावे या प्रकाराला….कसली वेडी माणसं असतील ती…!
एका मंदिराला फरशी दान दिली की साऱ्या घराण्याची नावे टाकणारे तुम्ही आम्ही त्या बहिर्जी नाईकांच्या काळजाला कधी समजू शकू का ?
स्वतःच्या बायकोला सुद्धा अगदी शेवटपर्यंत माहिती नव्हते की ज्याच्या सोबत मी सात जन्माचे बंधन बांधले आहे….तो खुद्द स्वराज्याचा गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक आहे….इतकी कमालीची गुप्तता…!
आणि एवढा विलक्षण त्याग करुन राजे त्यांना देत तर काय होते हो …?
काहीच नाही….उलट प्रत्येक मोहिमेत जीवाचा प्रश्न…माघारी येईल का नाही शाश्वती नव्हती…!
ही वेडी खुळी माणसे अशी का जगली असतील ??
बस्स…एवढ्या एका प्रश्नाचे उत्तर ज्याला समजून येईल त्याच्या आयुष्याचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही….!
अश्या या स्वराज्य वेड्या माणसांना मानाचा मुजरा !
जय जिजाऊ जय शिवराय....
_चांगली महिती मिळाली म्हणून शेअर करीत आहे_याचे श्रेय मला नाही...ज्यांच्या अभ्यासातून आलय त्यांना सुध्दा धन्यवाद!
🙏🏻🙏🏻🙏🏻
Amrut khalse.

#जेजुरी जिल्हा : पुणे येथील #खंडोबाचे_मंदिर

 





#जेजुरी जिल्हा : पुणे

हळदी ची होळी ,खंडोबा मंदिर ,जेजुरी
पुणे जिल्ह्यातील खंडोबाचे हे देवस्थान आहे. हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून जेजुरीचा खंडोबा या नावाने सर्वपरिचित आहे. उंच डोंगरावर असलेल्या कडेपठार या ठिकाणी जुने खंडोबाचे स्थान होते. परंतु आता जेजुरी या ठिकाणी नव्याने बांधलेले देऊळ आहे. तरी तेही आता तीन शतकांपूर्वीचे (इ.स.1712) देऊळ आहे. मोगलांच्या सैन्याने मंदिर उद्ध्वस्त केल्याचे इतिहास सांगतो. औरंगजेबाने 1,25,000 चांदीच्या मोहरा देऊन, या देवळातील उठलेल्या पोळ्यातील माशा शांत होण्यासाठी खंडोबालाच साकडे घातले, असाही उल्लेख सापडतो. देवळासमोर दगडी दीपमाळा आहेत.
सुमारे 200 पाय-या चढून वर गेल्यावरच मल्हारी मार्तंडाचे म्हणजेच खंडोबाचे दर्शन होते. नवलाख पायरीचा (नऊ लाख पाय-या) डोंगर असेही या देवस्थानच्या डोंगरास म्हटले जाते. देऊळ अतिशय सुंदर आहे. सभामंडप आणि गाभारा असलेल्या या देवळात खंडोबाची मूर्ती आहे. म्हाळसा, मणिमाला आणि खंडोबा अशा तीन सुबक मूर्ती देवळात आहेत. देवळात तलवार, डमरू आणि परळ या पुरातन वस्तू जतन केलेल्या आहेत. अतिशय जड अशी पुरातन तलवार उचलण्याचा एक अवघड खेळ इथे दरवर्षी खेळला जातो. उंच धरून तलवार जास्तीत जास्त वेळ उचललेली ठेवणा-या व्यक्तीला बक्षिस देण्याची पद्धत आहे. दस-याच्या दिवशी मोठी यात्रा इथे भरते.तसेच सोमवती अमावास्येलाही भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात.
जेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिरवास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा आहे. पुण्याजवळच्या जेजुरी ह्या सुमारे तीस मैलावरील गावी खंडोबाचे हे जागृत समजले जाणारे देवस्थान आहे. धनगर, आगरी, कोळी व इतर अनेक लोकांचे हे आराध्यदैवत असून इ.स. १६०८ मध्ये या देवळाचे बांधकाम झाले. सभामंडप व इतर काम इ.स. १६३७ साली राघो मंबाजी या मराठा सरदाराने केले, तर सभोवारच्या ओवऱ्या व इतर वास्तू होळकरांनी बांधल्या. इ.स. १७४२ मध्ये होळकरांनी दगडी खांब बांधले आणि सभोवारच्या तटबंदीचे व तलावाचे काम इ.स. १७७० मध्ये पूर्ण झाले. तुकोजी होळकरांच्या काळात जेजुरी पासून १७ कि.मी. अंतरावर असलेल्या श्री भुलेश्वर मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम झाले. काही जुन्या पत्रात जेजुरीच्या ओव-याच्या कामासाठी तयार केलेला चुनखडीचा चुना भुलेश्वरला नेला होता. भुलेश्वर मंदिर अकराव्या शतकात देवगिरीच्या यादवांनी बांधले.काही काम नंतरच्या काळातही झाले. ब्रम्हेंद्रस्वामी भुलेश्वरचा मंडप, माळशिरस गावातील बारव, यासाठी खर्च केला हाेता. साहित्यिक व इतिहासाचे अभ्यासक दशरथ यादव यांच्या यादवकालीन भुलेश्वर या ऐतिहासिक संशोधन पर पुस्तकात क-हापठारचाही इतिहास उलगडला आहे. खंडोबा हे भुलेश्वराचे भक्त होते. बळीराज्याच्य काळात खंडोबा हे एका खंडाचे मुख्य होते. लोकदेव खंडोबा व लोकदेव विठोबा हे महाराष्ट्राच्या घराघरात रुजलेली दैवत आहेत.
निसर्गाच्या सन्निध्यात नैसर्गिक रित्या वाढणाऱ्या वास्तूकलेचे जेजुरीचा खंडोबाचे देवालय हे उत्तम उदाहरण आहे. खंडोबा हे शिव, भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे व म्हणूनच खंडोबाचा उपास रविवार या सूर्याचे वारी करण्याचा प्रघात असावा. कडेपठारावर सुमारे तीनशे मीटर उंच डोंगरावर व पाच किलोमीटर अंतरावर मुख्य देऊळ आहे. किल्लाकोटा हे महत्त्वाचे स्थान खाली आहे.
गेल्या अनेक शतकात धनगर व इतर जमातींच्या भक्तांनी दगडी पायऱ्या, दीपमाळा, व कमानी उभारल्या आहेत. या सर्व बांधकामात मराठी वास्तुकला व निसर्गाशी समरसता दिसून येते. दीपमाळांचे अनेक प्रकार, कमानीवरील उत्तम भित्तिचित्रे व नक्षी हे पाहिल्यावर जेजुरीच्या गतवैभवाची थोडी कल्पना येते.
देऊळ व परिसर संपादन करा
जेजुरीचे शिखर व समोरच्या मोठ्या दगडी कमानी यांचे प्रमाण व तोल मराठी वास्तुकारांनी उत्तम साधला होता. दुर्दैवाने शिखर-शिंगणापूर तीर्थक्षेत्राप्रमाणेच येथेही दाक्षिणात्य शैलीचे या वास्तूशी पूर्ण विशोभित शिखर नव्याने बांधण्यात आले आहे. देवळाच्या ओवऱ्या व समोरचा ओटा यांवर टोकदार दगडी कमानी आहेत.गडावर जाताना सुंदर उद्यान नगर पालिकेने तयार केलेले आहे.देवळात
वळात प्रवेश करताना उत्तरेच्या दरवाजावरच देवाचा नगारखाना आहे. पूर्वाभिमुख देवळासमोर सात मीटर व्यासाचे आणि पितळी पत्र्याने मढवलेले मोठे कासव आहे. यावर भंडारा व खोबरे उधळण्याचा नवस फार लोक करतात. चांगभले खंडोबांचा येळकोट असा जयघोष करीत या भंडाऱ्यांची उधळण होते. तळी भरणे हा एक विधी असतो. ताटात खोबरे व भंडारा घ्यावयाचा, पूजा करून तळी त्रिवार डोक्यावर घ्यावयाची व मग खोबऱ्याची उधळण करावयाची.
खंडोबा ही सकाम देवता आहे. नाना फडणवीस यांनी नवसाप्रीत्यर्थ एक लाख रुपये देवाला वाहिले होते. पंचवीस हजाराच्या मूर्ती केल्या, दगडी मंडपी रुप्याने मढवली व उरलेल्या रकमेतून सोन्याचे मुखवटे वगैरे सामग्री वाहिली. मंदिरात चांदी-पितळेचे तीन मूर्ति-जोड होते. एक सोन्याचा जोड इ.स. १९४२ च्या सुमारास चोरीला गेला; बाकी शिल्लक आहेत.
*खंडोबाची यात्रा व जत्रा*
खंडोबाच्या यात्रा व जत्रा चैत्र, पौष व माघ या तीन महिन्यात शुद्ध द्वादशी ते वद्य प्रतिपदा हे पाच दिवस, मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्टी असे सहा, वर्षातील सर्व सोमवती अमावस्या व आश्विनी शुद्ध प्रतिपदा ते दशमी अशा दहा दिवस असतात. देवास वाहिलेल्या मुला-मुलींचे वाघ्या-मुरळींत रूपांतर होते. कावडी घालणे किंवा नियत संख्येच्या पाण्याच्या कावडी वाहणे, वाघ्या-मुरळींकडून जागरण किंवा तळी भरणे-उचलणे, बगाड किंवा गळ टोचून टांगून घेऊन देवास प्रदक्षिणा घालणे, लंगर साखळी तोडणे, वारी किंवा भीक मागणे व हाळावरून (विस्तवारून) चालणे अशा अनेक प्रकारे नवसपूर्ती करण्यात येते. पौषी व माघी पौर्णिमांच्या यात्रांसाठी वऱ्हाड, खानदेश, कोकण इत्यादी भागांतून उपासक येतात. खैरे, होलम व होळकर यांच्या काठ्या म्हणजे लाल पागोट्याचे फडके गुंडाळलेले उंच कळक मिरवणुकीने वद्य द्वितीयेस कोटात येतात व शिखरास स्पर्श करून आपापल्या गावी परत जातात. नवरात्रातही देवाचा मोठा उत्सव असतो. जेजुरीस अनेक भक्तगण महाराष्ट्रातून नियमाने येतात व खंडोबाच्या कृपेने यात्रेत संतुष्ट होऊन परत फिरतात.
*खंडोबाची स्थाने*
अणदूर (नळदुर्ग) (उस्मानाबाद)
जेजुरी (पुणे)
देवरगुड्डा (राणीबेन्नूर)
निमगाव धावडी (पुणे)
पाली (सातारा)
मंगसुळी (बेळगाव)
माळेगाव (नांदेड)
आदि मैलार (बिदर)
मैलारपूर (यादगीर) (गुलबर्गा)
मैलार लिंगप्पा (खानापूर) (बेल्लारी)
शेगुड (अहमदनगर)
सातारे (औरंगाबाद)
संग्रहक विजय दत्तात्रय सुवर्णकार पुणे.🙏🙏
साभार - व्हाट्सअप

*पेशव्यांची सध्याची पिढी*


 *पेशव्यांची सध्याची पिढी*

postsaambhar :vijay rane

हिंदुस्थानच्या राजकारणावर सुमारे सव्वाशे वर्ष प्रभुत्व गाजवलेल्या, दिल्लीच्या तख्तालाही धडकी भरवलेल्या आणि मराठी साम्राज्याचे झेंडे अटकेपार गाडणाऱ्या पराक्रमी श्रीमंत पेशवा घराण्याचे वंशज पुण्यातल्या प्रभात रस्त्यावरच्या सातव्या गल्लीत 'रघुनाथ' नावाच्या बंगल्यात राहतात.
डॉ. विनायकराव पेशवा, त्यांची पत्नी जयमंगलाराजे, मुलगा पुष्कर, सून आरती आणि रिया व सना या नाती असं पेशवा कुटुंब इथे राहतं. ही पेशवा घराण्याची दहावी पिढी. ७४ वर्षांचे विनायकराव भूगर्भशास्त्रज्ञ आहेत. आणि याच विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी पुणे विद्यापीठात ३३ वर्षे नोकरी केली. पुष्करचं वय ३८ आहे. आणि आर्किटेक्ट म्हणून तो एका कंपनीत नोकरी करतो. पुष्करला दोन बहिणी. एक- आदिती अत्रे आणि दुसरी- सुपर्णा देव.
पेशव्यांचं नाव निघालं की शनिवारवाडा डोळ्यासमोर येतो.. शनिवारवाडय़ाच्या प्रांगणात असलेला पराक्रमी बाजीराव पेशव्यांचा अश्वारूढ पुतळा आठवतो.. पुण्याची पर्वती.. पेशव्यांचा तळ्यातला गणपती.. पेशवेकाळात शनिवारवाडय़ापासून पर्वतीपर्यंत एक भुयारी रस्ता होता, ही पुण्यात सांगितली जाणारी कथा.. अशा एकेक गोष्टी आठवत राहतात..
पेशव्यांच्या वंशजांना 'रघुनाथ'मध्ये भेटायला जायचंय या कल्पनेनंच मनावर दडपण आलं होतं.
'रघुनाथ' बंगल्याच्या प्रवेशद्वारावर संगमरवरी दगडात कोरलेली पाटी दिसली. पाटीवर कोरलेली 'डॉ. वि. वि. पेशवा' ही अक्षरं वाचली आणि पुण्यात राहणाऱ्या पेशव्यांच्या वंशजांपर्यंत आपण पोहोचलो आहोत याची जाणीव त्या पाटीने करून दिली.
प्रभात रस्त्याच्या परिसरात प्रशस्त आणि सौंदर्य जपणारे अनेक बंगले आहेत, तसाच पेशव्यांचाही हा बंगला. खूप काही ऐतिहासिक वगैरे वस्तूंनी त्याची सजावट केलेली असेल अशी आपली कल्पना असते, किंवा पेशवा घराण्याचे वंशज इथे राहतात याचं दर्शन लांबूनच होईल असंही मनात येऊन गेलेलं असतं; पण तशी काही परिस्थिती इथे नाही. म्हणजे भव्य, उंच प्रवेशद्वार, कमानी, दारात जुन्या तोफा वगैरे असं इथे काही आढळत नाही. हे पेशव्यांचं निवासस्थान आहे याची कल्पना बाहेरून येत नाही.
जुन्या थाटाच्या काही ऐतिहासिक वस्तू या कुटुंबानं हौसेनं जमा केल्या आहेत. त्या घराची.. दिवाणखान्याची शोभा वाढवतात. इतिहासाची साक्ष देतात. पण अशा वस्तूंनी 'रघुनाथ' बंगला भरलेला आहे असं मात्र बिलकूलच नाही. या भागात असलेल्या इतर बंगल्यांप्रमाणेच हादेखील एक बंगला.
पेशवा घराण्यातील दोन कुटुंबं पुण्यात आहेत. दुसरं पुण्यातलं कुटुंब म्हणजे डॉ. विनायकराव पेशवा यांचे ज्येष्ठ बंधू कृष्णराव पेशवा. रत्नपारखी म्हणून त्यांची ख्याती होती. त्यानिमित्ताने भारतभर त्यांनी प्रवास केला आहे. त्यांची पत्नी उषाराजे, मुलगा महेंद्र, सून सुचेता आणि नात पूजा हे कुटुंबदेखील प्रभात रस्त्यावरच राहतं. महेंद्र यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. कृष्णरावांना एक मुलगी- मोहिनी करकरे. आदिती आणि मोहिनी यांचं सासर पुण्यात, तर सुपर्णाचं सासर दिल्लीत आहे.
पुण्यात असलेल्या या पेशवा घराण्याकडे वंशपरंपरागत वा पिढीजात मालमत्ता, जमीनजुमला असं काहीही आलेलं नाही. याचं मुख्य कारण म्हणजे इंग्रजांचा पेशव्यांवर असलेला विलक्षण राग. त्यांनी पेशव्यांच्या अनेक मालमत्ता ताब्यात घेऊन पेशव्यांच्या वंशजांकडे काही राहणार नाही याची आवर्जून काळजी घेतली.
सन १८०० च्या आसपास अमृतराव वाराणसीत गेले. पुढील काही पिढय़ा तिकडेच राहिल्या. पण गेल्या दोन-तीन पिढय़ांच्य आधीची पेशवे मंडळी तिकडून पुण्यात आली. पेशव्यांचा वारसा सांगता येईल असं या पेशव्यांकडे काय आलं? तर दोन गोष्टी आल्या.. एक म्हणजे आडनाव आणि दुसरी गोष्ट म्हणजे मंदिरं. अर्थात ही मंदिरं पुण्यात वा महाराष्ट्रात नाहीत. वाराणशीतील गणेश घाटावर असलेलं गणपतीचं मंदिर तसंच वाराणशीतल्या राजा घाटावरचं अन्नछत्र या पेशव्यांना परंपरागत मिळालेल्या दोन गोष्टी. त्यातलं अन्नछत्र आता अस्तित्वात नाही.
पण त्या घाटावर अन्नपूर्णेचं व शंकराचं अशी काही जुनी मंदिरं आहेत. गणेश घाटावरच्या गणपती मंदिराची मात्र पूर्ण व्यवस्था आजही पुण्यातील पेशवा घराण्याकडे आहे. त्यासाठी पुण्यातील दोन्ही पेशवा कुटुंबीयांनी मिळून ट्रस्ट स्थापन केला आहे. त्याच्या माध्यमातून मंदिराची व्यवस्था पाहिली जाते. अतिशय चांगल्या स्थितीत मंदिर राखलेलं आहे. तेथे नियुक्त केलेले व्यवस्थापक, कर्मचारी वगैरे या मंदिराची दैनंदिन व्यवस्था पाहतात. हे मंदिर हा पेशवे घराण्याकडे चालत आलेला सध्याचा एकमेव वारसा.
पेशवे म्हणून जगताना या मंडळींना काय अनुभव येत असतील याची उत्सूकता खूपजणांना असते. अनुभव दोन्ही प्रकारचे असतात. डॉ. विनायकराव, महेंद्र, पुष्कर यांच्या गाठीशी असे खूप अनुभव आहेत. एक मोठा वर्ग असा आहे की- मुख्यत: नवी पिढी.. या पिढीला पेशवे हे प्रकरणच माहिती नाही. त्यामुळे इतर अनेक आडनावं तसंच पेशवा हे एक आडनाव अशी त्यांची धारणा असते. पण त्याबरोबरच ज्यांना पेशव्यांचा इतिहास माहीत आहे, ज्यांना थोरल्या बाजीरावांचे असाधारण कर्तृत्व माहिती आहे, त्यांच्याकडून मात्र खूपच वेगळा अनुभव येतो. अशी मंडळी पेशवा कुटुंबीयांविषयी आजही खूप आदर व्यक्त करतात. मनापासून आस्था दाखवतात. हे आडनाव ऐकलं तरी लोकांकडून कृतज्ञतेची भावना व्यक्त होते. पेशवा घराण्यातील वंशज म्हणून आजच्या पिढीकडेही कौतुकानं बघितलं जातं.
महेंद्र पेशवा यांचा स्वत:चा व्यवसाय आहे. नव्यानं कोणाशी ओळख झाली की हमखास लोक गमतीनं म्हणतात, 'अरे, तुम्ही तर पेशवे! तुम्हाला काय गरज आहे उद्योग-व्यवसायाची? ज्यांनी इतिहास वाचला आहे, ज्यांनी पेशवे वाचले आहेत, अशा मंडळींना मात्र पेशव्यांच्या वंशजांबद्दल खूप उत्सुकता असते, हा अनुभव त्यांना नेहमीच येतो. महाराष्ट्राबाहेर मध्य प्रदेशात पेशव्यांबद्दल खूप आस्था आणि आदर असल्याचा अनुभवही पेशवा वंशजांना येतो.
महेंद्र यांचे वडील कृष्णराव पेशवा. केंद्र सरकारमधील नोकरीनिमित्तानं त्यांचं वास्तव्य बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशात होतं. शिक्षणासाठी त्यांनी महेंद्र यांना पुण्यात ठेवलं. महेंद्र यांचा अनुभव असा की, पुण्यात जेवढी पेशव्यांविषयी माहिती लोकांना आहे, त्यापेक्षा कितीतरी अधिक जाण वा माहिती आणि आदर उत्तर प्रदेशात आहे. पेशव्यांना असलेलं जनमानसातील आदराचं स्थान तिकडे जाणवतं. पानिपतच्या रणसंग्रामाचा स्मृती समारंभ असो किंवा पेशव्यांविषयीचा एखादा कार्यक्रम असो; पेशवा घराण्यातील मंडळींना त्या ठिकाणी बहुमान दिला जातो, त्यांचा सन्मान केला जातो, असा महेंद्र यांचा अनुभव आहे- जो ते कधीच विसरू शकत नाहीत.
पेशवा आडनावामुळे येणारं अपेक्षांचं काहीसं ओझं असलं तरी एका गोष्टीबद्दल मात्र पेशव्यांच्या वंशजांसमोर तसा कोणताही प्रश्न वर्तमानकाळात उभा राहत नाही. इतर अनेक संस्थाने, राजेराजवाडे यांच्या पुढील पिढय़ांसमोर पूर्वजांकडून आलेली आणि गावोगावी पसरलेली विविध प्रकारची स्थावर मालमत्ता, जमीनजुमला जपण्याचे, त्यांची देखभाल करण्याचे प्रश्न वर्तमानकाळात निर्माण झाले आहेत. हे ओझं पेशवा घराण्यातील नव्या पिढय़ांवर बिलकूल नाही.
कर्तृत्वानं मिळवायचं, ते राखायचं आणि ते वाढवायचं, हीच या घराण्यावर असलेली जबाबदारी. अशा घराण्यांमधील वंशजांवर दुसरी महत्त्वाची जबाबदारी असते, ती आपल्या दिग्गज पूर्वजांचं नाव कायम राखण्याची! कारण लोकांच्या मनात या घराण्यांबद्दल विशिष्ट प्रतिमा असते. त्यांच्यावर प्रचंड श्रद्धा असते. या दोन्ही कुटुंबातील पेशव्यांच्या वंशजांनी ही जबाबदारी चोख बजावल्याचं दिसतं.
खुद्द पेशव्यांना त्यांच्या पूर्वजांबद्दल काय वाटतं? महेंद्र आणि पुष्कर यांचा अनुभव असा की, शनिवारवाडा असो वा पेशव्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारी अन्य कोणतंही ठिकाणं असोत- अशा ठिकाणी गेलं की नकळत ऊर अभिमानानं भरून येतो. आपल्या पूर्वजांचा त्यांना सार्थ अभिमान वाटतो. या अभिमानातूनच या मंडळींनी अनेक उपक्रम सुरू केले आहेत.
या मंडळींनी पेशवा आडनावाचं अवडंबर माजवलेलं नाही, हेही जाणवत राहतं. किंबहुना, साधी राहणी हीच त्यांची खासीयत. कोणताही बडेजाव न करता आयुष्य जगायचं, नेटकं राहायचं, ही या घराण्याची रीत. रोजचं जगणं आणि इतिहासातलं जगणं यात महद्अंतर असतं. 'आम्ही असे होतो,' 'आमचे पूर्वज असे होते,' अशा कथा वर्तमानात कधीतरी सांगणं ठीक असतं; पण त्याची सांगड वर्तमानाशी घातली जात नसेल तर मात्र गडबड होते. मग जुना थाटमाट, जुन्या प्रतिष्ठा वर्तमानात जपताना अकारण ताण येतो. आपल्या पूर्वजांना जो मान मिळाला तो आपल्यालाही मिळावा अशी अपेक्षा निर्माण होते. अनेक राजकीय घराण्यांमध्ये, वलयांकित व्यक्तींच्या घराण्यांत हे प्रकर्षांनं दिसतं. पेशव्यांच्या वंशजांनी मात्र ही गोष्ट जाणीवपूर्वक टाळली आहे.
पुढच्या पिढय़ांवरही तसेच संस्कार केले जात आहेत. त्यामुळे आडनाव हे पुढच्या पिढय़ांसाठी ओझं झालेलं नाही. उलट, वर्तमान जगताना दोन्ही पेशवा कुटुंबीयांचं जीवन आनंददायी झालं आहे. खरं तर ही गोष्ट तशी खूप अवघड. माणसांना मानमरातब, पद, बडेजाव सोडवत नाही. हे सारं मिळवण्यासाठी अशी माणसं वर्तमानातही धडपडत राहतात.
'रघुनाथ'मधून बाहेर पडताना मात्र मनात आलं- अरे, हे तर सहज भेटणारे पेशवे.. इतिहासाचं ओझं न वागवता जगणारे!
(आधारित: माहिती सेवा ग्रूप)
आजचे पेशवे कुटूंब.

Monday, 28 December 2020

वारणेचा तह : कोल्हापूर व सातारा गादीची स्थापना

 


वारणेचा तह : कोल्हापूर व सातारा गादीची स्थापना
पोस्टसांभार ::

Yuvraj Sambhajiraje Chhatrapati

छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य व छत्रपतींची गादी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी नऊ वर्षे लढविली. संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी अत्यंत पराक्रमाने स्वराज्याचे अस्तित्व टिकवून ठेवले व स्वराज्याचा दक्षिणेस विस्तारही केला. मात्र २ मार्च १७०० रोजी वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी काळाने राजाराम महाराजांवरही घाला घातला. छत्रपती राजाराम महाराजांनंतर छत्रपतींच्या घराण्यात असणाऱ्या तीन पुरुषांपैकी वडील वारस शंभूपुत्र शाहूराजे मुघलांच्या कैदेत होते तर राजारामपुत्र शिवाजीराजे व संभाजीराजे हे अज्ञान होते. अशा परिस्थितीत राज्य लढवायचे तर राज्याला राजा हवाच या न्याय्य हेतूने शिवस्नुषा ताराराणी साहेबांनी आपले पुत्र शिवाजी महाराज यांना सिंहासनारुढ करुन युद्धाची सूत्रे हाती घेतली. औरंगजेबाच्या पाच लाख सेनासागराशी तब्बल सात वर्षे यशस्वी झुंज देऊन महाराष्ट्र जिंकायला आलेल्या औरंगजेबाचे थडगे महाराणी ताराबाई साहेबांनी याच महाराष्ट्रात बांधले. २० फेब्रुवारी १७०७ रोजी औरंगजेबाचा मृत्यू झाला व मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध महाराणी ताराबाई साहेबांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी जिंकले.
मात्र हार पत्करतील ते मुघल कसले ! औरंगजेबाचा मुलगा आझमशहा याने मराठ्यांमध्ये दुफळी माजावी या हेतूने दि. १ मे १७०७ रोजी शंभुपुत्र शाहू महाराजांना कैदमुक्त केले. यावेळी कित्येक बडे सरदार शाहूराजांना सामिल झाले. सन १७०८ साली शाहू महाराजांनी स्वतःस राज्याभिषेक करवून घेऊन साताऱ्यास राजधानी घोषित केली. पुढे १७१० साली पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करुन करवीर राज्याची स्थापना केल्याचे ताराराणींनी जाहीर केले. यामुळे स्वराज्याचे विभाजन होऊन छत्रपतींची करवीर (कोल्हापूर) व सातारा गादी अस्तित्वात आली. पुढे छत्रपती राजाराम महाराजांचे धाकटे पुत्र संभाजी महाराज कोल्हापूरच्या गादीवर आले. करवीर व सातारा राज्यामध्ये वर्चस्वासाठी छोट्यामोठ्या लढाया होत होत्या. मात्र १७३० साली वारणेकाठी निर्णायक युद्ध झाले. यामध्ये दोन्ही छत्रपतींना आपल्या ताकदीचा अंदाज आला. ऐकमेकांशी लढाई करणे गैर असल्याने दोन्ही बाजूच्या प्रमुख व्यक्तींनी वाटाघाटी केल्या व तह करण्याचे निश्चित झाले.
तह व आपले बंधू छत्रपती शाहू महाराजांच्या भेटीकरीता पन्हाळगडहून संभाजी महाराजांनी साताऱ्यास प्रयाण केले तर साताऱ्याहून शाहू महाराज संभाजी महाराजांच्या स्वागतासाठी जाखिणवाडी येथे आले. छत्रपती राजबंधूंच्या भेटीच्या दिवशी जाखिणवाडी व वाठार पर्यंत दोन लाख लोक उपस्थित होते. दि.२७ फेब्रुवारी १७३१ रोजी संभाजी महाराज व शाहू महाराजांची भेट झाली. तोफांची सरबत्ती झाली. शाहू महाराजांसोबत संभाजी महाराज साताऱ्यास आले. अदालत राजवाड्यामध्ये महाराजांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली. दोन महिन्यांच्या मुक्कामात छत्रपती संभाजी महाराजांना अनेक सरदारांनी शाही मेजवान्या व नजराणे अर्पण केले. शाहू महाराजांनी शेकडो जातीवंत घोडे, हत्ती, जडावांचा खंजीर, पोषाख व रोख दोन लाख रुपये महाराजांना भेट दिले.
शाहू महाराज व संभाजी महाराज यांच्यामध्ये दि.१३ एप्रिल १७३१ रोजी सातारा येथे तह झाला. या तहान्वये वारणा नदी हि दोन्ही राज्यांची सीमा ठरवली गेली. त्यामुळे हा तह "वारणेचा तह" म्हणून ओळखला जातो. एकूण ९ कलमांच्या या तहामधील ५ वे कलम खूप काही सांगून जाते,
"तुम्हाशी जे वैर करतील त्यांचे पारिपत्य आम्ही करावे. आम्हासी जे वैर करतील त्यांचे पारिपत्य तुम्ही करावे. तुम्ही आम्ही एकविचारे राज्यभिवृद्धी करावी".
अशाप्रकारे स्वराज्याच्या करवीर (कोल्हापूर) व सातारा अशा दोन गाद्या निर्माण झाल्या.
सोबतचे चित्र - वारणेच्या तहानंतर छत्रपती संभाजी महाराज (करवीर पहिले) व छत्रपती शाहू महाराज (सातारा पहिले) यांची हत्तीवरुन मिरवणूक. छत्रपती राजबंधूंच्या भेटीचे हे ऐतिहासिक चित्र सध्या कोल्हापूरच्या नवीन राजवाड्याध्ये आहे.

Sunday, 27 December 2020

छत्रपती थोरल्या शाहू

 राष्ट्रात हजारो नवीन कर्तबगार माणूसे निर्माण केली हे शाहू महाराजांचे कृत्य न सांगताही आज चिरस्मरणीय झाले आहे. हजारो कुटुंबे सर्व जातीची व सर्व वर्गातील शाहू महाराजांच्या प्रोत्साहनाने पुढे आली, त्यांच्याच कर्तबगारीने आजचा मराठ्यांचा इतिहास बनला आणि कोणत्या ना कोणत्या रूपाने ती कुटुंबे अद्यापही पुर्वजांच्या उद्योगाचे फल उपभोगत आहेत.

शाहू महाराजांनी दिलेल्या सनदाच आपल्या पुढे हजारोंनी मोजण्या सारख्या असून त्याच महाराष्ट्राच्या कर्तबगारीची साक्ष देतात. सध्याची मराठी राज्ये, सरदार घराणी, इनामे मिळवलेली देवस्थाने वगैरे बहुतेक शाहू महाराजांच्या काळातील आहेत.
धनाजी जाधव व पिलाजी जाधव, संताजी घोरपडे व त्यांची कुटुंबे, नागपूरचे भोसले व एकेकाळी अर्ध्या हिंदुस्थानास व्यापणारा त्यांचा उद्योग, समस्त चिटणीस घराणे, प्रतिनिधि वगैरे अष्टप्रधान व त्यांचे मुतालिक, आंग्रे, दाभाडे, राजाज्ञा, इचलकरंजीकर, बारामतीकर, पटवर्धन मंडळी अशा कित्येक हयात व कित्येक दिवंगत कुटुंबाची नुसती नावानिशी यादी देणेही शक्य नाही.
शिंदे, होळकर, पवार, गायकवाड यांची राज्ये तर आज आपल्या पुढे आहेतच. राष्ट्राच्या उद्योगास भरपूर क्षेत्र पुरवणे आणि ते क्षेत्र व्यापण्यास लायक माणसे निर्माण करणे हे शाहू महाराजांचे दोन्ही कार्य इतिहासात चिरस्थाई बनले आहे. त्यांचे दृश्य प्रतिक शाहू नगर उर्फ सातारा अर्ध्या दशकभर देशभर गाजले ते शाहू महाराजांची मुख्य राजधानी होती.
अखंड हिंदुस्थानात आपला भगवा ध्वज गाजवणाऱ्या

छत्रपती थोरल्या शाहू महाराजांना मानाचा मुजरा

इतिहास


 इतिहास म्हणजे अनेक भूतकाळातील मनुष्यांच्या कृत्यांची, घटनांची नोंद व ज्ञान होय. इतिहास म्हणजे काही निराळी गोष्ट नाही. राष्ट्रांत पराक्रमी किंवा दुष्ट मनुष्य निर्माण होतात. त्यांच्या मानवी कृतींनी राष्ट्राचा इतिहास बनतो.‌

राष्ट्राचा उदय काळ आला म्हणजे पराक्रमी, तेजस्वी आणि विशेषतः नीतिमान मनुष्ये उत्पन्न होतात. तोच राष्ट्राच्या अवनीतीचा काळ आला म्हणजे पराक्रम आणि विशेषतः नितीमत्ता नसलेली माणसे राजकारणात वावरू लागतात. महाराष्ट्राच्या इतिहासाकडे पाहिले असता या विधानाची सत्यता दिसून येते.
इसवी सन १६३० मध्ये पुण्यश्लोक थोरल्या स्वामींचा जन्म झाला. तेव्हापासून महाराष्ट्र उदय पावू लागले. त्यावेळची माणसे कितीतरी नीग्रहाची, स्वार्थत्यागाची, न्यायप्रिय आणि धर्मपरायण होती. त्यांचे नाव उच्चारल्या बरोबर त्यांचे चरित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. आणि आपल्या राष्ट्रात आपल्या राज्यात अशी माणसे निर्माण झाली होती हे पाहून अभिमान, आनंद व पुढील काळात झालेल्या राष्ट्राच्या पतनामुळे खेदाने अंतकरण भरून जाते.
पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज सर्व व्यक्तींमध्ये शिरोमणी होतेच परंतु त्यांच्या समकालीन इतर माणसेही अलौकिक तेजाची व नीतीची होती. छत्रपती शिवाजी महाराजांची माताच डोळ्यांपुढे आणली तरी निश्चय, अभिमान, करारीपणा, शहाणपणा, स्वराष्ट्रप्रेम, धर्मपरायणतेची मूर्ती आपल्यापुढे उभी राहते. श्री विष्णूंनी अवतार घेतल्याबरोबर इतर देवता ही निरनिराळ्या योनीत अवतार घेतात असे धर्मग्रंथांत वर्णन आहे ते अक्षरशः खरे वाटते. महान विभूतींच्या समकालीनच इतर दिव्य विभूती निर्माण होतात. आणि परमेश्वराचे ईप्सित हेतू सिद्धीस नेतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरच अनेक लोकोत्तर माणसे महाराष्ट्रात निर्माण झाली व त्यावेळी सर्व जातीत आणि स्त्री-पुरुषांत तेजस्वी व नीतीमान वीर निपजले हे आश्चर्यकारक नव्हे काय?
शिलेदारांत तानाजी, येसाजी, हंबीरराव मोहिते, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, बाजीप्रभू, स्त्रियांत जिजाबाई, सईबाई, येसूबाई, ताराबाई, कारभारी मंडळीत रामचंद्रपंत, प्रल्हाद निराजी, गागाभट्ट कित्येक साधूवर्य, इत्यादी अगणित-ज्ञात-अज्ञात महान निरनिराळ्या व्यक्ती त्या वेळेस निर्माण झाल्या आणि त्यांनी महाराष्ट्राच्या स्वराज्याचा पाया मजबूत व खोल घातला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर म्हणजे १६८० पासून पुढे कित्येक वर्ष हिंदुस्थानचा सार्वभौम कपटशत्रु असलेल्या औरंगजेबाने मराठ्यांच्या स्वराज्याची ही इमारत ढासळून पाडण्याचा जिवापाड प्रयत्न केला परंतु तो सिद्धीस गेला नाही. शिवपुत्र शंभूराजांनी या औरंग्यारुपी यवनी आक्रमणाला यशस्वीरीत्या तोंड दिले. या काळातही लोकोत्तर पुरुष निर्माण होऊन त्यांनी स्वराज्याचे रक्षण केले. राजाराम महाराजांस धनाजी, संताजी, प्रल्हाद निराजी, रामचंद्रपंत, इत्यादी स्वदेशाभिमानी मुत्सद्दी व वीर पुरुषांचे पाठबळ मिळाल्याने सत्तावीस वर्षांची आपत्ती महाराष्ट्राने स्वराज्यात पराक्रमाने आणि हिमतीने काढली. अर्थात औरंगजेबाच्या साम्राज्याच्या प्रचंड लाटेने मराठी साम्राज्याच्या इमारतीचा पायाही ढासळला नाही.
इसवी सन १७०७ मध्ये औरंग्या मरण पावला आणि महाराष्ट्राचा ग्रीष्मकाळ म्हणजेच मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध संपले. औरंगजेबाच्या प्रखर आगीतून महाराष्ट्र स्वराज्याचा वृक्ष तगून राहिला तो पुढे इतका फोफावला की त्याच्या जोरदार शाखा सर्व हिंदुस्तानभर पसरल्या. यावेळेसही राष्ट्रात नवीन माणसे उदयास आली व त्यांनी आपल्या पराक्रमाने शहापणाने व कर्तुत्वाने महाराष्ट्राचा अंमल सर्व हिंदुस्थानभर बसविला.
संकेत पगार,
१६ डिसेंबर २०२०

महाराष्ट्राचा इतिहास

 एकोणिसाव्या शतकापूर्वी


महाराष्ट्राचा इतिहास म्हणून असा लिहिला गेला नाही. महाराष्ट्राचाच काय तर भारत या देशाचाही स्वतंत्र असा इतिहास लिहिला गेला नाही.

पाश्चिमात्य राष्ट्रांचा इतिहास त्या त्या काळात त्या त्या देशातील बुध्दिवंतानी लिहून ठेवल्यामुळे त्या देशांना नव्याने इतिहास
लिहिण्याचे विशेष कष्ट पडले नाहीत. जर नवी ऐतिहासिक महत्त्वाची साधने हाती पडली तर त्यांच्या आधारे त्यांच्या इतिहासाचे पुनर्मुल्यांकन करण्याचेच कार्य शिल्लक राहते ते त्यांनी केले. भारतीय इतिहासाचे तसे नाही. पाश्चात्यांप्रमाणे भारतीयांनी आपल्या देशाचा इतिहास लिहून ठेवल्याचे आढळून येत नाही.
"गत काळात भारतीयांना इतिहास लेखनाचे ज्ञान नव्हते”- पाश्चिमात्य विद्वानांनी केलेल्या या आरोपावरून आधुनिक भारतीय इतिहासकारांमध्ये उडालेली खळबळ, त्यावरून निर्माण झालेली प्रदीर्घ चर्चा आणि उपरोक्त आरोपाला भारतीय इतिहासकारंनी दिलेले चोख उत्तर हे सर्वज्ञात आहे.
शास्त्र, साहित्य, कला, संस्कृती, इत्यादी क्षेत्रात प्रचंड भरारी मारणाऱ्या भारतीयांना इतिहास लिहिणे अवघड व अशक्य नव्हते. याचा अर्थ त्यांना इतिहासाचे ज्ञान नव्हते असा होत नाही. कल्हणाचा "राजतरंगिणी" हा ग्रंथ संपूर्णतः ऐतिहासिक स्वरूपाचा असल्याचे सिध्द झाले आहे. याचा अर्थ असा होतो की भारतीयांना "इतिहास" या शास्त्राचे ज्ञान असूनही या क्षेत्रात त्यांनी अभिरूची न घेता या क्षेत्राकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. म्हणूनच, पाश्चात्य राष्ट्रांप्रमाणे भारताचा लिखित असा इतिहास सापडत नाही. कारण भारतीयांनी आपला जो काही थोडाफार इतिहास जोपासला तोही तोंडी स्वरूपात.
एका पिढीने दुसऱ्या पिढीला इतिहास काळातील महत्त्वाच्या व्यक्ती व घटना यांची माहिती अद्भूत रम्य व रंजक करून सांगण्याची परंपराच भारतामध्ये प्राचीन काळापासृन जोपासली गेल्याचे दिसून येते. लिखित स्वरूपात घटनांच्या नोंदी करून ठेवण्याची परंपरा भारतात रूजू शकली नाही. इतिहास काळातील एखादी घटना कशी घडली हे रंजीत करून सांगत असताना ती का घडली व कशी घडली असावी या तर्कसंगत प्रक्रियेत ते कधीच पडले नाहीत.
भारताला थोडाथिडका नव्हेतर सुमारे पाच हजार वर्षाचा इतिहास आहे, आणि एवढया मोठया काळाचा इतिहास लिहून काढणे साधे व सोपे कार्य नव्हे. भारतासारख्या खंडप्राय देशातील वेगवेगळे प्रांत, असंख्य भाषा, अनेक धर्म, जाती, विविध रूढी-परंपरा व समजूती, असंख्य राजघराणी, व्यक्ती व महत्वाच्या घटना, इत्यादी या सर्वांचा उपलब्ध साधनांच्या आधारे अभ्यास करून समन्वय साधण्याचे व त्यातून साकल्याने भारताचा इतिहास लिहून काढण्याचे महाभयंकर कार्य आधुनिक काळातील नव्या पिढीवर येवून पडले.
भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्याच्या जिज्ञासेपोटी काही युरोपीय तज्ञांनी भारतीय इतिहासात डोकावण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा त्यांना भारतीय इतिहासातील महत्त्वाचे टप्पे लक्षात येवू लागले. परंतु हे युरोपीयन तज्ञ युरोपीयन साम्राज्यवादाचे पुरस्कर्ते असल्यामुळे त्यांच्या भारतीय इतिहासाच्या लेखनात साम्राज्यवादी दृष्टिकोणाचे प्रतिबिंब स्पष्टपणे दिसू लागले.
ब्रिटिश राजवटीच्या काळात विशेषतः 19 व्या शतकात इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीय विद्वानांना ही गोष्ट खटकली व यातूनच
स्वतंत्रपणे व भारतीयांच्या दृष्टिकोणातून भारतीयांचा इतिहास लिहिण्याची धडपड सुरू झाली. यास राष्ट्रवादी भावनांचे उत्तेजनही बऱ्याच प्रमाणात जवाबदार ठरल्यामुत्ठे भारतीयांच्या इतिहास संशोधनाला गती मिलाली खरी, परंतु त्यांनी लिहिलेल्या इतिहासाला "राष्ट्रवादी इतिहास" असे संबोधण्यात आले. त्यामुळे साम्राज्यवादी इतिहासकार विरूध्द राष्ट्रवादी इतिहासकार असे चित्र उभे राहिले. नंतर यात भर पडली त्ती साम्यवादी इतिहासकार व वास्तववादी इतिहासकारांची,दृष्टिकोण काहिही असो किंवा प्रवाह कोणतेही असोत, पण या सर्व प्रक्रियेतून भारताचा हजारो वर्षाचा इतिहास आकार घेवू लागला तो विसाव्या शतकाच्या आरंभापासूनच.

मराठ्यांचा धाक

 


मराठ्यांचा धाक

मराठ्यांचे सर-सेनापती प्रतापराव गुजर यांनी सुरतेचे अधिकारी आणि धनाढ्य नागरिक यांना एक ताकीद पत्र पाठवले होते.
आपण इंटरनेटवर एकाशिवाय अधिक लोकांना मेल पाठवताना Cc, Bcc कॉलम मध्ये ऍड करत असतो.
*CC (carbon copy) and BCC (blind carbon copy)
तसेच *CC BCC करत हे पत्र सुरतेच्या सुभेदाराशिवाय समस्त धनाढ्य सुरतकरांसही गेले असे ह्या खालील पत्राच्या भाषेवरून निदर्शनास येते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर मराठ्यांनी औरंगजेबाच्या अत्यंत प्रिय अश्या समस्त गडगंज सुरतकरांच्या आणी सुरतेच्या सुभेदाराच्या पार्श्वभागावर दिलेले फटक्यांचे वोळ अजून ओसरायचे होते.
**
मराठ्यांनी सुरतेवर पहिला छापा हा ५ जानेवारी १६६४ आणी दुसरा छापा हा २ ऑक्टोबर १६७० रोजी टाकला होता.
हे पत्र १६७२ चे आहे म्हणजे हे पत्र दुसऱ्या छाप्याच्या दोन वर्षानंतर पाठवले गेले आहे.
पत्र अत्यंत दुर्मिळ आहे. हे पत्र इसवीसन १६७२ चे आहे.
लंडनच्या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथात एक फारसी हस्तलिखित आहे. या ग्रंथाचे नाव आहे "खुतूते शिवाजी" म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे.
ह्या हस्तलिखिताची जून एक पत्र कलकत्याच्या एशियाटिक सोसायटीत आहे.
फेसबुकवरील महाराष्ट्र धर्म समुहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम ह्यांच्या अभ्यासानुसार;
ह्या संग्रहात एकूण बत्तीस पत्रे आहेत. त्यातील सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे हे एक पत्र सादर करत आहे.
सर्वांनी वाचून आनंद घ्यावा.
ताकीद पत्र सुरु:
" सुरतेचे अधिकारी, देसाई, व्यापारी, दलाल, महाजन, इंग्रज, फ्रेंच आणि डच या कंपन्यांचे लोक आणि सामान्य जनता यांनी काळजीपूर्वक जाणावे कि,
शिवाजी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे सुरतेतील आयात - निर्यात होणाऱ्या मालमत्तेवर जो कर आकारला जातो, त्याचे एकंदरीत उत्त्पन्न काय होते याचा तपशील लिहिण्यात यावा.
या उत्पनाची चौथाई शिवाजी महाराजांच्या मराठा सैन्याने घ्यावी. या कामाकरिता शिवाजी महाराजांनी माझी नेमणूक केली आहे.
(चौथाई: हा एक प्रकारचा वसूल केला जाणारा कर आहे. चौथाई ही पूर्ण उत्पन्नाच्या एकचतुर्थांश भाग एवढी असे. मराठा साम्राज्यात चौथाई हि मराठी राज्याबाहेर पण राज्याच्या छायेखाली असलेल्या प्रदेशांतून वसूल केली जात असे. चौथाई दौलतीकडे म्हणजे राज्याच्या खजिन्यात जमा होत असे. )
महाराजांच्या आज्ञेप्रमाणे मी तुम्हाला ताकीद पत्र लिहीत आहे.
माझ्या हुकमांची अंमलबजावणी करण्यातच तुमचे हित आहे. मी माझा अधिकारी पाठवीत आहे. तो म्हणेल त्याप्रमाणे करा म्हणजे तुमचे-आमचे चांगले होईल.
नाहीतर मराठ्यांचे शूर विजयी सैन्य लवकरच सुरतेच्या भागात सहल-शिकार करण्यासाठी येऊन धडकेल.
सुरतेच्या गावातील घर अन घर धुळीला मिळविण्यात येईल. सुरतेचा अवशेषही राहणार नाहीत. या शहरातील सर्व माणसे आमच्या तावडीत सापडतील. एकाही माणसाला सुटून जाता येणार नाही.
औरंगजेब बादशहाची मदत येईल या समजुतीने तुमची डोकी फिरली असतील; तर यात तुमचा सर्वनाश आहे असे समजा.
आमच्या मराठा विजयी सैन्याने दोन वेळा हा सुरतेचा प्रांत आमच्या घोड्यांच्या टाचांखाली रगडून काढला आहे.
तुमचा औरंगजेब बादशाह आमचे काय करू शकला?
तुमच्या तोफांचा आणि बंदुकींचा धूर तुमच्या डोक्यात साठला असेल आणी आपला सुरतेचा किल्ला अजिंक्य आहे असे तुम्हाला वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा.
आमचे मराठा विजयी सैन्य सुरतेत लवकरच येऊन पोहचेल. पिंजारी कापूस धुनकतो त्याचप्रमाणे आमचे सैन्य तुमच्या सुरतेच्या किल्ल्याचा दगड आणि दगड धूनकून काढील आणि तुमच्याच शहराच्या तोफांनी आणि बंदुकींनी तुमचे शहर उध्वस्त करून टाकील.
'साल्हेर आणि मुल्हेर' हे किल्ले अतिशय मजबूत आहेत. मनुष्य आपल्या कल्पनेच्या दोऱ्याने देखील या किल्यांचे बुरुज हस्तगत करू शकत नाही. असे असूनही आमच्या तोंडातून शब्द बाहेर पडण्यास जो वेळ लागेल तेवढ्याच अल्पावधीत ते किल्ले आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेने जिंकून घेतले. मग सुरतेच्या किल्याची काय व्यथा?
बहादूरखान आणि दिलेरखान हे तुमच्या औरंगजेब बादशहाचे सेनापती आहेत. डोंगरदऱ्यांतून फिरणाऱ्या आमच्या शूर मराठा वीरांपुढे बहादूरखान आणि दिलेरखान ह्यांची काय मातब्बरी आहे?
फजित पावून, मनगटे चावीत, निराशेने जमिनीवर आदळ-आपट करीत साल्हेर समोरून त्यांना पुण्याकडे पळून जावे लागलेच ना?
केवळ तुमच्यावर दया म्हणून; तुमचे उत्तर येईपर्यंत माझे मराठा सैन्य पाठविण्याचे मी थांबविले आहे.
परमेश्वराने तुम्हाला सद्बुद्धी दिली, तुमचा गाफीलपणा दूर झाला, आणी माझ्या उपदेशाचे शब्द तुम्ही ऐकले तर त्यात तुमचे हित राहील.
नाहीतर तुम्हावर पश्चाताप करण्याची पाळी येईल. "
पत्र समाप्त.
फेसबुकवरील महाराष्ट्र धर्म समुहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम ह्यांच्या अभ्यासानुसार;
मराठ्यांचा धाक कसा असतो हे ह्या पत्रातून निदर्शनास येते.
पत्रातील प्रत्येक ओळीत मराठ्यांचा जबरदस्त जबरदस्त आत्मविश्वास ठासून भरलेला आहे.
हेवाच वाटतो ह्या आत्मविश्वासाचा.
आता खालील वाक्ये हि कल्पना-चित्र डोळ्यासमोर उभे करून वाचा.
केवळ एकाच पत्रावर सुरतेच्या सुभेदाराची 'निंद हराम' झाली असेल.
हे मराठा कधीही अचानक वादळासारखे सुरतेला येऊन धडकतील आणी जे काही शिल्लक आहे तेही घेऊन जातील ह्या धाकाने सुरतेच्या सुभेदाराला 'झक' मारून दिवस-रात्र आपल्या फौजेसहित घोड्यावर बसून राहावे लागले असेल.
लढायला?
लढायला नाही.
मराठा फौज सुरतेवर चालून आली तर पळून जायला.
मुघलांची परंपरा जपायला नको का?
पळपुटे कुठले. न पळतील तर मग रट्टे खातील.
आणी सुजलेले बूड कोणास दाखविणार?
कि बघा आमचे हे बूड... मराठ्यांनी रट्टे देऊन सुजविलेले आहे.
मराठ्यांनी सुरतकरांना दिलेल्या फटक्यांचे ओळ तिकडे आग्ऱ्यास बसलेल्या औरंगजेबाच्याही बुडाखाली उमटले असतील.
तो तरी काय करील बिचारा.
बूड चोळीत बसण्याशिवाय?
सांगताही येत नाही आणी सहनही करता येत नाही.
खरं तर इथं मला 'स्मायली' टाकायचं होत..पण फेसबुकच्या झुक्याने (मार्क झुकरबर्ग) हि 'स्मायली' टाकायची व्यवस्था केलेली नाही. असो..
हसत हसत लेख समाप्त.
लेखाविषयी तुमची प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये कळवा आणी आपल्या महाराष्ट्र धर्मवर मित्रमंडळींना 'Invite' (आमंत्रित) करा.
श्री भवानी शंकर चरणी तत्पर
सतीश शिवाजीराव कदम
निरंतर

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...