एकोणिसाव्या शतकापूर्वी
महाराष्ट्राचा इतिहास म्हणून असा लिहिला गेला नाही. महाराष्ट्राचाच काय तर भारत या देशाचाही स्वतंत्र असा इतिहास लिहिला गेला नाही.
पाश्चिमात्य राष्ट्रांचा इतिहास त्या त्या काळात त्या त्या देशातील बुध्दिवंतानी लिहून ठेवल्यामुळे त्या देशांना नव्याने इतिहास
लिहिण्याचे विशेष कष्ट पडले नाहीत. जर नवी ऐतिहासिक महत्त्वाची साधने हाती पडली तर त्यांच्या आधारे त्यांच्या इतिहासाचे पुनर्मुल्यांकन करण्याचेच कार्य शिल्लक राहते ते त्यांनी केले. भारतीय इतिहासाचे तसे नाही. पाश्चात्यांप्रमाणे भारतीयांनी आपल्या देशाचा इतिहास लिहून ठेवल्याचे आढळून येत नाही.
"गत काळात भारतीयांना इतिहास लेखनाचे ज्ञान नव्हते”- पाश्चिमात्य विद्वानांनी केलेल्या या आरोपावरून आधुनिक भारतीय इतिहासकारांमध्ये उडालेली खळबळ, त्यावरून निर्माण झालेली प्रदीर्घ चर्चा आणि उपरोक्त आरोपाला भारतीय इतिहासकारंनी दिलेले चोख उत्तर हे सर्वज्ञात आहे.
शास्त्र, साहित्य, कला, संस्कृती, इत्यादी क्षेत्रात प्रचंड भरारी मारणाऱ्या भारतीयांना इतिहास लिहिणे अवघड व अशक्य नव्हते. याचा अर्थ त्यांना इतिहासाचे ज्ञान नव्हते असा होत नाही. कल्हणाचा "राजतरंगिणी" हा ग्रंथ संपूर्णतः ऐतिहासिक स्वरूपाचा असल्याचे सिध्द झाले आहे. याचा अर्थ असा होतो की भारतीयांना "इतिहास" या शास्त्राचे ज्ञान असूनही या क्षेत्रात त्यांनी अभिरूची न घेता या क्षेत्राकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. म्हणूनच, पाश्चात्य राष्ट्रांप्रमाणे भारताचा लिखित असा इतिहास सापडत नाही. कारण भारतीयांनी आपला जो काही थोडाफार इतिहास जोपासला तोही तोंडी स्वरूपात.
एका पिढीने दुसऱ्या पिढीला इतिहास काळातील महत्त्वाच्या व्यक्ती व घटना यांची माहिती अद्भूत रम्य व रंजक करून सांगण्याची परंपराच भारतामध्ये प्राचीन काळापासृन जोपासली गेल्याचे दिसून येते. लिखित स्वरूपात घटनांच्या नोंदी करून ठेवण्याची परंपरा भारतात रूजू शकली नाही. इतिहास काळातील एखादी घटना कशी घडली हे रंजीत करून सांगत असताना ती का घडली व कशी घडली असावी या तर्कसंगत प्रक्रियेत ते कधीच पडले नाहीत.
भारताला थोडाथिडका नव्हेतर सुमारे पाच हजार वर्षाचा इतिहास आहे, आणि एवढया मोठया काळाचा इतिहास लिहून काढणे साधे व सोपे कार्य नव्हे. भारतासारख्या खंडप्राय देशातील वेगवेगळे प्रांत, असंख्य भाषा, अनेक धर्म, जाती, विविध रूढी-परंपरा व समजूती, असंख्य राजघराणी, व्यक्ती व महत्वाच्या घटना, इत्यादी या सर्वांचा उपलब्ध साधनांच्या आधारे अभ्यास करून समन्वय साधण्याचे व त्यातून साकल्याने भारताचा इतिहास लिहून काढण्याचे महाभयंकर कार्य आधुनिक काळातील नव्या पिढीवर येवून पडले.
भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्याच्या जिज्ञासेपोटी काही युरोपीय तज्ञांनी भारतीय इतिहासात डोकावण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा त्यांना भारतीय इतिहासातील महत्त्वाचे टप्पे लक्षात येवू लागले. परंतु हे युरोपीयन तज्ञ युरोपीयन साम्राज्यवादाचे पुरस्कर्ते असल्यामुळे त्यांच्या भारतीय इतिहासाच्या लेखनात साम्राज्यवादी दृष्टिकोणाचे प्रतिबिंब स्पष्टपणे दिसू लागले.
ब्रिटिश राजवटीच्या काळात विशेषतः 19 व्या शतकात इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीय विद्वानांना ही गोष्ट खटकली व यातूनच
स्वतंत्रपणे व भारतीयांच्या दृष्टिकोणातून भारतीयांचा इतिहास लिहिण्याची धडपड सुरू झाली. यास राष्ट्रवादी भावनांचे उत्तेजनही बऱ्याच प्रमाणात जवाबदार ठरल्यामुत्ठे भारतीयांच्या इतिहास संशोधनाला गती मिलाली खरी, परंतु त्यांनी लिहिलेल्या इतिहासाला "राष्ट्रवादी इतिहास" असे संबोधण्यात आले. त्यामुळे साम्राज्यवादी इतिहासकार विरूध्द राष्ट्रवादी इतिहासकार असे चित्र उभे राहिले. नंतर यात भर पडली त्ती साम्यवादी इतिहासकार व वास्तववादी इतिहासकारांची,दृष्टिकोण काहिही असो किंवा प्रवाह कोणतेही असोत, पण या सर्व प्रक्रियेतून भारताचा हजारो वर्षाचा इतिहास आकार घेवू लागला तो विसाव्या शतकाच्या आरंभापासूनच.
No comments:
Post a Comment