विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 22 December 2020

#दीक्षित_वाडा-भाग-१

 #दीक्षित_वाडा-

-मोटे मंगल कार्यालय रोड, पुणे महानगरपालिका

भाग-१
पेशव्यांचे सावकार पटवर्धन- दीक्षित गुहागरचे. पैकी हरभट पटवर्धन गुहागरहून प्रथम वाईला आले. येथे भिक्षुकी करून त्यांनी काही पैसे गाठीला बांधला आणि थोडी सावकारी सुरू केली. त्यांना देशी औषधांची माहिती असल्याने, त्यांनी वैद्यकीही सुरू केली. थोडेसे स्थिरावल्यावर हरभट पुण्याला आले, आणि येथेही त्यांनी सावकारी सुरू केली. नदीकाठी, शनिवारवाड्याच्या उजव्या हाताला त्यांनी वाडा बांधला. हे पेशव्यांचे आजोळ. हरी बाळकृष्ण दीक्षित पटवर्धन हे श्रीमंत विश्वासराव पेशव्यांचे श्वशुर. त्यांची मुलगी दुर्गा ही पेशव्यांची सून. तिचे पेशव्यांकडील नाव लक्ष्मीबाई.
वाडा चार चौकी-चौसोपी. ऐसपैस. वाड्याचा मुख्य दरवाजा दक्षिणेला. दरवाजावर कलश व दोन्ही बाजूंना वेलबुट्टी असलेली सुबक गणेशपट्टी. वाडयाचे प्रवेशद्वार दक्षिण बाजूला आल्याने वाड्यात प्रवेश करण्यासाठी डाव्या हाताला, आणखी एक पूर्वाभिमुख मोठा दरवाजा. वाड्याचा दर्शनी भाग आकर्षक. मुख्य दरवाज्यावर तीन नक्षीदार कमानी व डाव्या हाताला लागूनच दिवाणखान्याची नक्षीदार गवाक्षे ओळीने दिसतात. त्यावरही महिरपी आहेत. दक्षिणमुखी दरवाज्यातून आत शिरताना वाड्यात पाठीमागे जाण्यासाठी परस्पर रस्ता. वाड्याच्या पहिल्या चौकात प्रशस्त सोपे. उजव्या हाताला सोप्यावरच 'कुसरीचा महाल'. चौकातील खांबही नक्षीदार. चौकातून समोरच्या बाजूने लागणाऱ्या सोप्यातून माजघरातून शिरण्यासाठी दोन दरवाजे. त्यावरही गणेशपट्टी. मधल्या चौकातून आतल्या बाजूला भोजनशाळा. मुदपाकखाना. तिसऱ्या चौकात लागून मोठे दालन. येथे धूर जाण्यासाठी बांधलेली धुराडी. येथे होमशाळा. (पटवर्धनांनी अग्निहोत्राची दीक्षा घेतल्याने, दीक्षित ही पेशवाईत त्यांना लागलेली उपाधी. त्यामुळे ते दीक्षित म्हणून ओळखले जाऊ लागले. दर्शपौर्णिमा, दृष्टी, स्थालीपाक, अमावास्येला पिंडपित्रीयज्ञ हे नित्यनैमित्तिक. याशिवाय ते सकाळ- संध्याकाळ होम करत.) शेवटच्या चौकात विहीर. येथे तुळशीवृंदावन. पाठीमागे दरवाजा. वाड्यातून पुढून परस्पर जाण्यासाठी जो रस्ता होता, तेथे मागे नोकर-चाकर, आश्रितांना राहण्याची व्यवस्था. वाडा दुमजली. वरच्या मजल्यावरही प्रशस्त दालने. भिंतीतूनच वर जाण्यासाठी जिने. वरच्या मजल्यावर इतर दालनांबरोबर दोन प्रशस्त दिवाणखाने. प्रमुख दिवाणखाना दुघई. कडीपाटाला नक्षीचे छत. हारीने सुरूचे खांब. दोन्ही बाजूनी नक्षीदार गवाक्षे. दिवाणखान्याच्या उजव्या हाताला एक दार; पण हे फसवे दार. अगदी हुबेहूब दार वाटावे असे. या दारामागच्या भिंतीतून जिना. कदाचित येथे पोकळीत शस्त्र लपविण्याची जागा असावी. पूर्वी भिंतीत, तळघरात, बळदांमध्ये शस्त्रे लपवत असत. वाड्यात सभामंडपाच्या खाली तळघर आहे व एका कोपऱ्यात भुयाराची जागा दिसते. आता ते बुजलेले आहे. खालच्या मजल्यावर पुढील चौकात सभामंडप. त्याच्या छताला वेलबुट्टीदार नक्षी. दीक्षितांकडे गणपती उत्सव मोठ्या प्रमाणावर होई. त्यासाठी महालाच्या समोरच्या बाजूला तीन महिरपींचे अत्यंत आकर्षक मखर. दोन्ही बाजूंना बिलोरी आरसे; तसेच मखराच्या दोन्ही बाजूंना सुरूचे खांब. वरच्या बाजूला काचेवर काढलेली राजस्थान शैलीतली सुंदर चित्र. रासक्रीडा, गोपीकृष्ण, शेषशाई-भगवान वगैरे साधारण दहा इंच उंचीची ही चित्रे आजही जशीच्यातशी आहेत. वाड्याला पुराचे पाणी लागले, तरीसुध्दा त्याचा परिणाम चित्रांवर झालेला नाही. दीक्षितांच्या आठव्या पिढीतील पुष्पाताई भेटल्या. त्या आता इतरत्र राहतात. त्यांनी त्यांचे कुलदैवत, गणपती उत्सव यांची माहिती सांगितली. भाद्रपद प्रतिपदा ते पंचमी व माघात गणपतीचा उत्सव अगदी थाटात होत असे. आजही ही प्रथा घरातल्या घरात चालू आहे. त्या काळात श्रीमंतांपासून सरदारांपर्यंत सर्वांना पारण्याच्या दिवशी भोजनाचे आमंत्रण असे. गणपतीला एकवीस पक्वान्नाचा नैवेद्य दाखवला जाई. वाड्यात पाच दिवस रोज पाचशे माणसे तरी जेवत.पारण्याच्या दिवशी पाच पायलीचे पुरण शिजत असे. भोजनशाळेत श्रीमंत पेशव्यांसह दीडशे पानांची पहिली पंगत बसत असे. चांदीच्या ताटांतून पंचपक्वान्ने वाढत. मोठ्या वाटीत पातळ तूप. एक पक्वान्न खाल्यावर तुपाच्या वाटीत हात धुवून मग दुसरे खायचे. त्या काळातील सुबत्ता आणि वैभव हे काही वेगळेच होते. या ब्राम्हणभोजनाच्या वेळी घरची यजमानीण तुप वाढत असे. मागे एक शागीर्द. तूप वाढताना नाकात नथ, हातात गोठ-पाटल्या, बिलवर हे दागिने हवेतच. अष्टमीच्या दिवशी श्रमभोजन होत असे. पाचही दिवस गणपतीपुढे कीर्तन, भजन, लळीत, गोंधळ वगैरे होई. कनाती लावलेला महाल पाच दिवस गजबजून जाई.
दीक्षितांचे कुलदैवत व्याडेश्वर आणि देवी चिपळूणची गोवळकोटला असलेली करंजेश्वरी. ती उंचावर आहे. देवीने एका रात्री दृष्टांत देऊन ती गुहागरला प्रगटली. आता येथे तिचे देऊळ बांधलेले आहे. चैत्रात महिनाभर एका सवाष्णीची ओटी भरायची. दीक्षित घराण्याचा गणपती मोरगावचा. घरच्या पुजेतील मूर्ती सोन्याची. मूर्तीचे आसन चांदीच्या कमळाचे. रत्नजडीत हार. एक पोवळ्याचा गणपती व हार पुष्पाताईंकडे होता; पण तो चोरीस गेला. गणपती उत्सवात सभामंडपात दुधई खांबांना व कडेने कनाती लावत. तसेच गझनीचे पडदे. त्यातील एक अजूनही पुष्पाताईंजवळ आहे. अत्यंत जुनी आणि दुर्मिळ अशी गणपतीची फ्रेम त्यांच्याजवळ होती, त्यावर चारही बाजूंनी देवदेवतांची रंगीत चित्रे होती. आता ती फ्रेम राजा केळकर संग्रहालयात आहे. परंपरेने आलेली एक सुंदर पैठणीही त्यांच्याजवळ होती. परंतू ती जीर्ण होऊन फाटली, तेव्हा ती जाळली. त्यात दोन तोळे सोने आणि १६ तोळे चांदी निघाली, असे त्यांनी सांगितले. वाईचे भट-भिक्षुक चातुर्मासात पुण्यात येत. ते दीक्षितांच्या वाड्यात उतरत. कामधंदा मिळाला नाही, तर दीक्षितांच्या पंक्तीला रोजची पाच -पन्नास माणसे तरी असत. दीक्षितांकडे कोणालाही आश्रित म्हणून वागवले जात नसे.(-डाॕ. मंदा खांडगे सन १९९२)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...