विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 16 December 2020

सरदार - #ज्योतिबा_शिंदे

 


सरदार - #ज्योतिबा_शिंदे

मराठ्यांच्या इतिहासात असंख्य योद्धे धारातीर्थी पडले. काहींनी खुल्या मैदानात शत्रू समोर वीरमरण पत्करले. तर काहींना शत्रूच्या भ्याड हल्ल्यात प्राणास मुकावे लागले.मराठ्यांच्या इतिहासात आशा अनेक वीरांचे उल्लेख अपल्याला पानो पानी मिळतात.पण काही वीरांची म्हणावी तशी दखल इतिहासाने घेतलेली दिसत नाही.

त्यातीलच एक अपरिचित मराठा म्हणजे ज्योतिबा शिंदे. दस्तुरखुद्द सुभेदार राणोजी शिंदे ह्यांचे पुत्र.

मराठ्यांच्या इतिहासात शिंदे,युद्ध आणि धारतीर्थ हे समीकरण आपल्याला अनेक ठिकाणी पहायला मिळते. जणू संकटकाळी शिंद्यांनी रणात उतरावे व एक तर विजयश्री ला वरावे किंवा शरीरातून प्राणपाखरू उडाल्या शिवाय हातातील खडग खाली ठेऊ नये हा शिरस्ताच होता की काय ह्याची प्रचिती आपणास अनेक ठिकाणी येते.

प्रत्येक वेळेस आणिबानी च्या प्रसंगी कृष्ण काठ च्या ह्या वीरांनी रणदेवतेस स्वतः चा देहरूपी निवेद्य अर्पण केला आहे.मग ते दत्ताजी असतील किंवा साबाजी, जनकोजी तुकोजी सुद्धा.

परन्तु अनेक वेळा शिंदेंच्या पराक्रम समोर शत्रूचे काही चालत नसे त्यावेळेस मात्र त्यांनी कपटा ची हत्यारे बाहेर काढली आहेत. उदा. म्हणजे नागोर ला जयप्पा शिंदे ह्यांचा खून, मेडत्या च्या वेढ्या च्या वेळेस महादजी शिंदे न वर घातलेले मारेकरी. अशे दाखले इतिहासात मिळतात.

त्यातीलच एक म्हणजे ज्योतिबा शिंदे ह्यांच्या विरुद्ध चा बुंदेल्यांचा दगा. हो दगाच, कारण उघड्या मैदानावर ज्योतिबा ला अंगावर घेन्या एवढं पाणी समकालीन बुंदेल्यांमध्ये राहील न्हवत. म्हणूनच त्यांनी ही कपटनीती अवलंबली.असा दगा बुंदेल्यांना नवीन न्हवता. बादशाह अकबर च्या शेवट च्या काळात ही त्यांनी बादशाह च्या खास मर्जीतील अबुल फाजल ह्याला ही असेच दग्याने मारले होते. परन्तु ह्या वेळेस नियतीने शिंद्यांचा हा तरना पोर रणदेवतेची भूक भागवण्यास विश्वासघातकी बुंदेल्यानंच्या समोर उभा केला होता.

प्रकरण होते चौथाई चे, मुघलांना कमरेत वाकून मुजरा करण्यात धन्यता मानणाऱ्या बुंदेल्यांना स्वधर्मीय मराठ्यांच्या हिंदुपतपादशाही साठी चाललेले प्रयत्न मात्र खुपत असे. व त्याचाच एक भाग म्हणून मराठयांना चौथाई देताना ह्यांचा बुंदेली क्षत्रिय स्वाभिमान दुखावत असे.

ओरछा चा राजा विरणदेवसिंह ही त्यातीलच एक होता. मराठ्यांनी सततच्या स्वारीने ह्याला ही इतरांप्रमाणे नाकी नऊ आणले होते.

इ.स. सण १७४२ चा तो काळच मोठा धामधुमीचा होता, कावेरी पासून यमुने पर्यंत मराठ्यांचा वारू चौफेर उधळत होता. भीमथडी चे तटट, दिवस-रात्र न थकता दौडत होते. ध्येयय एकच, उभा हिंदुस्थान सह्याद्री च्या सावली खाली आणायचा. गेले दिड तप नर्मदे पासून चम्बळ पर्यंत चा प्रदेश मराठ्यांनी समशेरी च्या जीवावर पदनक्रत केला होता. माळव्यात मराठ्यांचा जरीपटका डौलाने फडकत होता. शिंदे,पवार, होळकर सारखे दौलतीचे खांब नर्मदेच्या मैदानात खम्बीर पणे पाय रोवून उभे होते.एक एक ठाणे मजबूत करत मराठे दिल्ली कडे टप्प्या टप्प्या ने सरकत होते. तोच मनसुबा नजरे समोर ठेऊन आता पुढील धोरण आखले जात होते. आणि त्यास अनुसुरूनच बुंदेलखंड मराठ्यांच्या नजरेत भरला होता.

त्याचे कारण ही विशेष असेच होते ते म्हणजे बुंदेलखंड चा भूगोल.बुंदेलखंड मधून मराठ्यांना राजपुतांचा प्रदेश, दिल्ली,गंगा-यमुना चा दुआब,उत्तरेतील तीर्थ क्षेत्र,बंगालचा सुपीक प्रदेश ह्या सर्वत्र आपली घोडी नाचवता येणार होती.

बुंदेलखंड तसा मराठ्यांना नवीन न्हवता. थोरले बाजीराव पेशवे ह्यांनी छत्रसाल प्रकरणात मराठ्यांना बुंदेलखंड ची ओळख करून दिली होती. मोहम्मद बंगश ने बाजीराव पेशवे ह्यांच्या पायावर तलवार ठेवताना सम्पूर्ण बुंदेलखंड ने पाहिले होते. त्या अभूतपूर्व रनांनंतर आता किमान १४ पावसाळे सरले होते.परन्तु मराठ्यांचा आवेश किंचित सा ही कमी झाला न्हवता. बघता बघता मराठ्यांच्या घोड्यांच्या टपांनी सम्पूर्ण बुंदेलखंड ची माती तुडवली.भेलशाला मुख्य छावणी करून मराठ्यांनी बघता बघता जैतपुर,कलिंजर, चंदेरी व इतर लहान राज्ये लष्करी बळावर नियंत्रणा खाली आणून त्यांना खंडणी देणे बाध्य केले होते. त्यामुळे हे राजे मराठ्यांवर डूख धरून बसले होते.

ओरछा चा राजा विरसिंहदेव हा त्या पैकीच एक.
मराठ्यांच्या लष्करी बळा पुढे नाइलाजाने त्याने नमते घेतले होते. परन्तु खंडणी देताना त्याच्या क्षत्रिय बण्यास प्रचंड पीळ पडत असे. परन्तु असे भले भले क्षत्रिय मराठ्यांनी वाकवले होते.

हया सम्पूर्ण बुंदेलखंड मोहिमेत सुभेदार राणोजी पुत्र ज्योतिबा शिंदे ह्यांनी बुंदेल्यांना आपल्या तलवारीने कृष्णेचे पाणी पाजले होते. आणि आता त्यांनी आपली तलवार विरसिंहदेवावर रोखली होती. त्यामुळे त्याला मुकाट्याने खंडनी देण्याचे मान्य करावे लागले. परन्तु त्याच्या मनात काहीतरी वेगळेच शिजत होते. त्याचा सुगावा मात्र त्याने कोणालाच लागू दिला नाही. हो नाही- हो नाही करत त्यांने खंडणी मान्य केलीच.व ती ठरलेली खंडणी वसूल करायला स्वतः ज्योतिबा काही निवडक साथीदारांसह आले होते. त्यांनी त्यांचा मुक्काम मोठ्या वीश्वासाने शंकरगड च्या पायथ्याशी केला होता (झाशी) परन्तु हिथेच घात झाला.

ह्या वेळेस विरसिंहदेवणे रात्री च्या अंधाराचा लाभ घेत बेसावध मराठ्यांच्या डेर्या वर हला करून निर्घृण पणे कापाकापी केली. त्याचा प्रमुख लक्ष्य ज्योतिबा व त्यांचे कारभारी हे होते. जणू कोणाला जिवंत सोडायचेच नाही असा निश्चय करून आलेल्या बुंदेल्यांनि छावणीतील जवळ जवळ दिडेक्षे माणसे मारली.छावणी ची पूर्ण नासधूस करून पागा ही ताब्यात घेतली.ह्या भयंकर हल्ल्यातून खुद्द ज्योतिबा शिंदे व त्यांचे इतर कारभारी ही बचावले नाही. ह्या सर्वांना निर्घृण पने ठार करून बुंदेल्यांनि ह्यांची मस्तके कापून गडावर न्हेले.

रात्री च्या अंधारात लढताना शत्रूपक्ष भारी असल्यास अनेक जण आपल्या साथीदारांस सोडून निसटल्याचे दाखले पानोपानी इतिहासात आहेत. परन्तु मराठ्यांच्या इतिहासाची पाने चाळताना असे प्रसंग मिळत नाहीत. कारण ते त्यांच्या रक्तातच न्हवते. मराठ्यांनी हयातभर गनिमी कावे खेळले परन्तु असा विश्वासघात कदीच केला न्हवता.

त्यामुळे मराठे बुंदेल्यांच्या ह्या कृतीवर प्रचंड चिडले होते. पुत्रशोकात बुडालेल्या राणोजीरावांस धीर देत स्वतः नारो शंकर ओरछा वर तुटून पडले.विरसिंहदेवणे जे केले त्याच्या कर्माची फळे सम्पूर्ण ओरछा स भोगावी लागली. मराठ्यांच्या क्रोधाअग्नीत सम्पूर्ण ओरछा उजाड झाला.
ह्या धुमचक्रीत विरसिंहदेव ही मराठ्यांच्या तावडीत सापडला. त्याला त्याच्याच किल्ल्यात कैदेत ठेवण्यात आले. त्याला त्याचे मरण स्पष्ठ दिसत होते.परन्तु त्याने लगेचच भेलशास पेशव्यांचे पाय धरले. व स्वतःचा जीव पदरात पाडून घेतला. परन्तु त्याच्या राज्यास तो कायमचा मुकला.ओरछा व झंशी चा किल्ला व इतर प्रदेश कायमस्वरूपी मराठ्यांच्या ताब्यात आले.

मराठ्यांनी मनात आणले असते तर ह्याच्या आदी ही सम्पूर्ण ओरछा जिंकला असता. परन्तु त्यांना हिंदुपतपादशाही स्थापन करून सर्व देशी राजांस एकत्र आणायचे होते. परन्तु स्वतःच्या पायपूरते पाहणाऱ्या विरसिंहदेव यास हे सगळे समजणे त्याच्या अवाक्या बाहेरचे होते. परिनामी आपल्या कुळा वर बट्टा लावून त्याला स्वतःच्या राज्यास ही मुकावे लागले व तिहेरी च्या तुटपुंच्या नाममात्र अशा नगरावर समाधान मानावे लागले.

ह्या सर्व घडामोडीत ज्योतिबा शिंदें ह्यांस हकनाक प्राणास मुकावे लागले.त्याची साक्ष ओरछा च्या वेशी वरून वाहणारी बेतवा नदी आज ही देते.

भविष्यात कधी ओरछा व झाशी चे किल्ले पाहायला गेलात की आवर्जून पायत्यास मुक्काम नक्की करा. एकदा ज्योतिबा व त्यांच्या सहकाऱ्यांचे समरण करून पहा. इतिहासातील ती काळरात्र पुन्हा तुमच्या समोर उभी राहिल्या वाचून राहणार नाही. तुम्हाला तिथे दिसतील ती म्हणजे बुंदेल्यांच्या घात करण्यास अधीर झालेल्या समशेरी व मराठ्यांचा कमी पडलेला प्रतिकार. ते वीर जणू काळाच्या ह्या अचानक पडलेल्या घावा समोर हतबल होऊन तुम्हा कडे जास्तीच्या कुमक ची अपेक्षा धरून जणू पाहत असल्याचे भास तुम्हाला होतील.

आज आपण मराठ्यांच्या उत्तरेतील वैभवशाली साम्राज्याच्या अनेक गाथा ऐकतो.परन्तु त्या गाथेचा मूळ गाभा हे ज्योतिबा सारखे अनेक द्यात अज्ञात वीर आहेत. ज्यांनी वेळो प्रसंगी आपल्या प्राणाचा नेवेद्य देऊन रणदेवतेस शांत केले.

मराठ्यांच्या अशा वीरांच्या धारतीर्थ वरच पुढे सुमारे शतक भर मराठ्यांचा साम्राज्य रुपी दिपस्तंभ उत्तरेतील काळ्याकुट्ट परकीय आक्रमण समोर पौर्णिमेच्या चंद्रा प्रमाणे लक्खं प्रकाश देत उभा राहिला.

ह्या आशा स्वराज्य कार्यास कामी आलेल्या ज्योतिबा शिंदे व त्याचे सहकारी ह्यांस बरोबर असंख्य ज्ञात अज्ञात
धरतीर्थी पडलेल्या मावळ्यांस मनाचा मुजरा

शिरकमल वाहिले तुम्ही
म्हणूनच आज ही डौलाने
फडकत आहे ही भगव्याची काठी.

समाप्त

लेखक - रोहित शिंदे
फोटो साभार- विशाल बर्गे इनामदार.

संदर्भ
शिंदे घराण्याचा इतिहास
सेनासप्तसहस्त्रि
झंन्झावत

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...