विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 19 February 2021

बाहुलीचा हौद

 



बाहुलीचा हौद 
पोस्टसांभार :सुवर्णा  नाईक निंबाळकर 
*पुण्यात काचा खायला घालून मारलेल्या बाहुलीची गोष्ट तुम्हाला माहित आहे का..?*
बाहुलीच्या हौदावरच्या गणपतीचे 1952 मध्ये "सुवर्ण युग तरुण मंडळ" असे नामांतर झाले.
त्यानंतर "श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती" उत्सव म्हणून तो ओळखला जाऊ लागला.
बाहुलीचा हौद अष्टकोनी होता, त्यामध्ये कात्रज तलावाचे पाणी खापरीच्या सहाय्याने आणलेले होते. त्यावर पुणे नगरपालिकेने नळ कोंढाळे बांधलेले होते.
पेठेतील नागरिक तेथे पाणी भरायचे, अंघोळीला यायचे, गणेशोत्सवापुर्वी या बाहुलीला रंग देत असत.
तिच्या भोवती कुंड्या लावून सजावट करीत असत, हौदात एक कारंजे होते, त्यावर चक्र लावून पिंगपाँगचा चेंडू ठेवला जायचा, या हौदासमोर मंडळाचा उत्सव पार पडायचा म्हणून या गणेशोत्सवाला तेच नाव होते.
*‘बाहुलीच्या हौदाचा गणपती’*
साक्षरतेसाठी बलिदान केलेल्या अवघ्या नऊ वर्षाच्या काशिबाईंची सव्वाशे वर्षापासून जतन केलेली बाहुलीच्या रुपातील एतिहासिक स्मृती बुधवार पेठेतील फरासखाना परिसरातून अदृष्य झाली आहे.
खांद्यावर कळशी घेतलेली, कुरळ्या केसांची हि बाहुली अनेक वर्षे तेथील हौदावर होती.
काशीबाई शाळेत जात होती, म्हणून 1899 मध्ये पुण्यात तिचा वध करण्यात आला होता.
काशिबाई म्हणजे सत्यशोधक चळवळीचे पहिले अध्यक्ष डॉ. विश्राम रामजी घोले यांची कन्या.
डॉ. विश्राम घोले मोठे शल्यविशारद होते.
ते माळी समाजातील बडे प्रस्थ, पुणे नगरपालिकेचे सदस्य आणि नंतर स्थायी समिती अध्यक्ष होते.
ते महात्मा फुले यांचे सहकारी आणि फॅमिली डॉक्टर होते आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे ते समाज सुधारक होते.
महात्मा फुले यांच्यापासून प्रेरणा घेउन त्यांनी स्त्रीशिक्षणाची पालखी आपल्या खांद्यावर घेतली.
आपल्या घरातून सुरवात करण्यासाठी त्यांनी आपली लाडकी कन्या बाहुली...
हिला शिकवण्यास सुरवात केली.
लाडाने तिला ‘बाहुली’ म्हटले जायचे.
डॉ. घोले साक्षरतेचे कट्टर समर्थक होते, स्त्री शिक्षणाबाबत आग्रही होते.
म्हणूनच लाडक्या बाहुलीला त्यांनी शाळेत घातले.
अतिशय हुशार कुशाग्र आणि चुणचुणीत बाहुलीच्या शिकण्याला डॉ. घोले यांचे पाठबळ असले तरी समाजातील काही व्यक्तींना त्यांची ही कृती नापसंत होती, किंबहुना प्रखर विरोध होता.
अनेकदा मान्यवरांनी डॉ. घोले यांना समजविण्याचा प्रयत्न केला.
बहिष्कृत करण्याची धमकी दिली.
पण डॉ.घोले यांनी त्यांना कुठलीही भीक घातली नाही.
शेवटी काही नतद्रष्ट व्यक्तिंनी काचा कुटुन घातलेला लाडु बाहुलीस खावयास दिला.
अश्राप पोर ती काचांचा लाडु खाल्ल्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव होऊन मृत्यूमुखी पडली.
*स्त्री शिक्षणाचा पहिला बळी*
उद्विग्न झालेल्या तिच्या पित्याने म्हणजे डॉ. विश्राम घोले यांनी आपल्या लाडक्या लेकीच्या स्मरणार्थ
"बाहुलीचा हौद" बांधला आणि तो सर्व जातीधर्मातील लोकांसाठी खुला ठेवला.
त्याचा लोकार्पण सोहळा मातंग समाजातील थोर समाज सुधारक "दादा भुतकर" यांच्या हस्ते झाला.
पुण्यात भुतकर हौद सुद्धा आहे.
घरासमोरच बांधलेला हा हौद ‘‘बाहुलीचा हौद’’ म्हणून ओळखला जायचा.
100 वर्षाहून अधिक काळ हा हौद बुधवार पेठेतील कोतवाल चावडीजवळ अस्तित्वात होता.
रस्तारुंदीकरणासाठी कोतवाल चावडी 1995 मध्ये जमीनदोस्त करण्यात आली. त्यावेळी बाहुलीची एतिहासिक स्मृती फरासखान्यासमोर हलविण्यात आली.
सध्या अक्षररुपात या हौदावर काशिबाईंच्या आठवणी जतन करुन ठेवल्याचे पहायला मिळतात.
पुस्तक हे शिक्षणाचे प्रतिक असल्याने ग्रंथाच्या आकारातील संगमरवरातील फरशी या हौदावर लावण्यात आली होती.
त्यावर काशिबाईंचा हौद असे लिहीलेले आहे.
साक्षरतेसाठी बलिदान केलेल्या या बालिकेची ऐतिहासिक आठवण भावी पिढीला पाहायला मिळणे कठीण आहे.
हा हौद डॉ. विश्राम रामजी घोले यांनी आपली प्रिय कन्या काशीबाई हिच्या स्मरणार्थ बांधला, असे त्यावर लिहिले आहे.
डॉ. विश्राम घोले हे पुणे महानगरपालिकेचे सदस्य होते. ते समाज सुधारक होते. महापालिकेच्या औद्योगिक प्रशालेसाठी व कात्रजच्या तलावासाठी त्यांनी फार मोठे योगदान दिलेले आहे.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...