गोविंद तिसरा
(७७६? — ८१४). महाराष्ट्रातील राष्ट्रकूट वंशातील एक पराक्रमी राजा. तो ध्रुव राजाचा मुलगा. गोविंद हा कनिष्ठ मुलगा असूनही ध्रुवाने त्याचीच भावी वारस म्हणून नियुक्ती केली आणि त्यास औपचारिक रीत्या राज्यभिषेकही केला. त्याने ध्रुवाच्या हयातीतच राज्यसूत्रे हाती घेतली वा त्याच्या मृत्यूनंतर, यांविषयी तज्ञांत एकवाक्यता नाही. मात्र ७९३ मध्ये तो गादीवर आला असावा; कारण थोड्याच अवधीत गंगवाडीचा राज्यपाल व गोविंदाचा थोरला भाऊ स्तंभ याने इतर बारा लहानमोठ्या राजांच्या मदतीने त्याविरुद्ध बंड पुकारले.
गोविंदाने ते मोडून स्तंभास पकडले व त्याच्याकडून ‘यापुढे विश्वासघात करणार नाही’,असे वचन घेऊन गंगवाडीसच राज्यपाल म्हणून त्याची पुन्हा नियुक्ती केली. या लढाईनंतर त्याने जगत्तुंग, प्रभुतवर्ष, श्रीवल्लभ,जनवल्लभ, कीर्तिनारायण, त्रिभुवनधवल वगैरे बिरुदे धारण केली. ध्रुवाचे अपुरे स्वप्न साकार करण्यासाठी त्याने दिग्विजयार्थ दक्षिण (८०३-८०४), पूर्व (८०४-८०५), उत्तर (८०६-८०८) व पुन्हा दक्षिण (८०८-८११) अशा यशस्वी मोहिमा केल्या. तेथील राजांना त्याने आपले मांडलिकत्व मान्य करण्यास भाग पाडले आणि पल्लवांचे वर्चस्व कमी केले.
तसेच दक्षिणेच्या स्वारीवर असताना त्याचा पराक्रम ऐकून श्रीलंकेच्या राजानेही त्याचे स्वामित्व कबूल केले आणि आपण मांडलिक असल्याबद्दलचा पुरावा म्हणून आपला व महामंत्री यांचा पुतळा धाडला. हे पुतळे मालखेड (मान्यखेट) येथे शिवमंदिरासमोर उभारण्यात आले. ८११-१२ च्या सुमारास पांड्य, पल्लव, चेर, चोल, गंग या दक्षिणेकडील राजांच्या प्रदेशांवर तसेच उत्तरेकडे कनौज, गुजरात, माळवा, बुंदेलखंड,बंगाल व हिमालयाचा पायथा येथपर्यंत राष्ट्रकुटांचा दरारा होता.
८०५ च्या नेसरी ताम्रशासनात, त्याने चारी दिशांना केलेल्या पराक्रमांचे सुंदर वर्णन आले आहे. गोविंद ८१३ च्या डिसेंबरमध्ये हयात असल्याचा पुरावा आहे. तसेच त्याचा मुलगा अमोघवर्ष ८१४ मध्ये गादीवर असल्याचा पुरावा आढळतो. यावरून गोविंद ८१४ च्या सुरुवातीस मृत्यू पावला असावा, असे दिसते.
संदर्भ : Alteker, A. S. Rashtrakutas and Their Times, Poona, 1967.
देशपांडे, सु. र.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
No comments:
Post a Comment