विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 3 February 2021

निजामशाही

 




निजामशाही : पंधराव्या शतकाच्या अखेरीस दक्षिण हिंदुस्थानात स्थापन झालेली एक राजसत्ता. बहमनी राज्य निष्प्रभ झाल्याचा फायदा घेऊन त्याच राज्यातील मलिक अहमद निजामशाहाने वडिलांच्या पाठिंब्यावर १४९० साली स्वतंत्र राज्य स्थापन केले. ते निजामशाही या नावाने इतिहासात प्रसिद्ध पावले. अहमदचा बाप मलिक हसन ऊर्फ निजाम-उल्-मुल्क बहरी हा बहमनी राज्यात मुख्य प्रधान होता. तोच निजामशाही घराण्याचा मूळ पुरुष. हा मूळचा तिमभट हर्लू नावाच्या ब्राह्मणाचा मुलगा. पुढे निजामशाहीने १४९० ते १६३६ पर्यत सत्ता गाजविली. या सु. १५० वर्षांच्या काळात पुढील राजे निजामशाहीत झाले : अहमद निजामशाह बहरी (१४९०–१५०९), बुऱ्हाण निजामशाह (१५०९–५३), पहिला हुसेन निजामशाह (१५५३– ६५), दुसरा मुर्तजा निजामशाह (१५६५–८८), दुसरा मिरान हुसेन निजामशाह (१५८८–८९), इस्माईल निजामशाह (१५८९–९१), दुसरा बुऱ्हाण निजामशाह (१५९१–९५), इब्राहीम निजामशाह (१५९५), बहादुर निजामशाह (१५९५–
१६००), दुसरा मुर्तजा निजामशाह (१६००–१०), तिसरा बुऱ्हाण निजामशाह (१६१०–३०), तिसरा हुसेन निजामशाह (१६३०–३३), तिसरा मुर्तजा निजामशाह (१६३३–३६).
यांतील पहिले तीन सुलतान कर्तृत्ववान होते. त्यांनी निजामशाही दृढ करून बराच राज्यविस्तार केला. १४९४ मध्ये अहमदशाह निजामाने अहमदनगर हे नवीन शहर वसवून तेथेच त्याने आपली राजधानी केली. यापूर्वी जुन्नर व शिवनेरी किल्ला हेच निजामशाहीच्या राजकीय उलाढालींचे केंद्र होते. राज्याचे संरक्षण आणि वाढ करण्यात निजामशाही सुलतानांना आदिलशाही, कुत्बशाही, बिदरशाही, इमादशाही आणि गुजरातच्या सुलतानांशी अनेक वेळा मुकाबला करावा लागला. आदिलशाही व इमादशाही राज्यांत निजामशाही सुलतानांनी राज्यविस्तार केल्याने त्यांचे संबंध मित्रत्वाचे राहिले नाहीत. तरीसुद्धा पहिला बुऱ्हाण निजामशाह यास आदिलशाहाची मुलगी आणि अली आदिलशाहाल पहिला हुसेनशाह याची मुलगी ⇨ चांदबीबी ही देऊन मित्रत्वाचे संबंध जोडण्याचा प्रयत्न झाला. विजयानगर राज्याविरुद्ध सर्व मुसलमान सत्ताधिशांचा संघ स्थापन करण्यात पहिला हुसेनशाह याने पुढाकार घेतला. १५६५ मध्ये विजयानगर राज्याविरुद्ध झालेल्या तालिकोटच्या लढाईत त्याने विशेष कामगिरी बजावली. आदिलशाही सुलतानांच्या मदतीने मुर्तजा निजामशाहाने इमादशाही राज्य जिंकून घेतले. वऱ्हाड व सोलापूर जिकूंन त्याने राज्याच्या मर्यादा वाढविल्या. त्याच्या सत्तेखाली वऱ्हाड, जालना, खानदेशमधील काही जिल्हे, कल्याणी आणि बाणकोटपासून वसईपर्यंतचा बराच मुलूख होता. त्याच्यानंतर गादीवर आलेले सुलतान दुर्बल निघाले. त्यामुळे राज्याला साहजिकच उतरती कळा लागली. राज्यात गोंधळ व बजबजपुरी माजली. सरदारांच्या अंतस्थ कलहामुळे मोगलांना आक्रमण करण्यास संधी मिळाली. अहमदनगरला झालेल्या मोगली आक्रमणविरुद्ध ⇨ मलिकंबर व चांदबीबी यांनी मोठ्या चिकाटीने लढा दिला परंतु चांदबीबीच्याच माणसाने तिचा खून केल्यामुळे अहमदनगरचा किल्ला १६०० साली मोगलांच्या हाती पडला. राजधानी मोगलांनी जिंकली, तरी निजामशाही राज्य नष्ट झाले नव्हते. दुसरा मुर्तजा निजामशाह यास परांडा येथे गादीवर बसवून मलिकंबरने शहाजी भोसले व इतर मोठे सरदार यांच्या साहाय्याने मोगलांचे आक्रमण २०–२५ वर्षे थोपवून धरले. मलिकंबर मेल्यानंतर शहाजीने तिसरा मुर्तजा निजामशाह यास गादीवर बसवून निजामशाही तगविण्याचा प्रयत्न केला पण शाहजहानच्या सामर्थ्यापुढे त्याचा निभाव लागला नाही. शाहजहानने मुर्तजास कैद केले आणि निजामशाही राज्य खालसा करून मोगली राज्यास जोडले (१६३७). निजामशाही सुलतान आणि पोर्तुगीज यांचे संबंध सुरुवातीपासून अखेरपर्यंत मैत्रीचे होते तथापि पोर्तुगीजांना निजामशाहीत कधीच आपला पाय रोवता आला नाही. ज्या ज्या वेळी पोर्तुगीजांनी निजामशाही राज्यात अतिक्रमण केले, त्या त्या वेळी सुलतानांनी त्यांना योग्य तऱ्हेने विरोध केला.
निजामशाहीत राजेशाही पद्धती होती आणि सुलतान हाच सर्व बाबतींत श्रेष्ठ असे. प्रसंगोपात्त सुलतान आपल्या मंत्र्यांचा सल्ला घेई. प्रशासनाच्या सोयीसाठी राज्याची प्रांतात व प्रांतांची सरकारमध्ये विभागणी केलेली असे. लष्करी व मुलकी या दोन विभागांत निरनिराळी खाती विभागलेली असत. मलिकंबरने जमाबंदीची नवी पद्धत सुरू केली. त्याने जमिनीतील उत्पन्नाची दरसाल पहाणी करून उत्पन्नाच्या २/५ किंवा १/३ सारा घेण्यास सुरुवात केली. त्याने इजाऱ्याने गावे देण्याची पद्धत बंद केली. निजामशाहीत राज्यात अनेक ठिकाणी कालवे काढण्यात आले. राजांनी अहमदनगर शहराला पाणीपुरवठ्याची सोय केली. निजामशाही सुलतान कलाभिज्ञ असून त्यांना कलेची व विद्येची विशेष आवड होती. कवी, लेखक, इतिहासकार, कायदेपंडित, तत्त्वज्ञ, चित्रकार इ. गुणी लोकांना त्यांनी उदार राजाश्रय दिला. सुप्रसिद्ध इतिहासकार फिरिश्ता यांच्या दरबारी वाढला.
निजामशाही राजवटीत बांधल्या गेलेल्या अनेक वास्तूंत वास्तुसास्त्रदृष्ट्या काही वैशिष्ट्ये आढळतात. उदा., निमुळते मनोरे, अर्धवर्तुळाकृती घुमट, बैठ्या कमानी इत्यादी. निजामशाही चित्रशैलीतही इराणी कला, विजयानगरची कला व अहमदनगरची स्थानिक कला एकरूप झालेल्या दिसतात. आजही उपलब्ध झालेल्या तारिफिन हूसेन सारख्या प्रसिद्ध ऐतिहासिक हस्तलिखितावरून त्या काळात चित्रकलेत झालेली प्रगती दिसून येते. त्या काळाचे मीर हाशिम व नूर महंमद हे श्रेष्ठ चित्रकार आजही प्रशंसले जातात.
संदर्भ : Radhey Shyam, The Kingdom of Ahmadnagar, Delhi, 1966.
खोडवे, अच्युत

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...