विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 26 February 2021

पानपतचा अखेरचा संग्राम !



पानपतचा अखेरचा संग्राम !
शके १६८३ च्या पौष शु. ८ या दिवशी पानिपतचा शेवटचा घनघोर संग्राम होऊन सदाशिवरावभाऊ पेशवे यांचा अंत झाला व लढाई थांबली.
या दिवशी सूर्योदयापूर्वी मरूं वा मारूं या भावनेने मराठ्यांची सेना वीरश्रीने मैदानावर आली. श्रीमंत भाऊसाहेब व विश्वासराव घोड्यावर बसून निशाणाकडे निघाले. सर्वांच्या अंगांत त्वेष संचारत होता. लढाईचे तोंड भारी लागून मारामारी, खणाखणी, एक प्रहरपर्यंत चालू होती. भाऊसाहेब व विश्वासराव बारा वाजण्याच्या सुमारास घोड्यावर स्वार होऊन स्वतः हल्ल्यात पुढे झाले. मराठ्यांकडे जयश्री चालून येत होती तो अहमदशहाच्या नशिबाने विश्वासरावास गोळी लागून ते ठार झाले. नानासाहेबांचे निधान हरपले. भाऊसाहेबांनी बहुत विलाप केला आणि 'गिलच्यास खाशानिशी मारीन' म्हणून भाऊसाहेब पुढे झाले. जरिपटक्याजवळ भाऊसाहेबांच्यावर गिलच्यांचा मारा पडला होता तिकडे जनकोजी धावला. भाऊसाहेबांचा चेहरा लाल झाला असून धुळीने भरला होता, तरवार रक्ताने न्हाली असल्याने चमकत नव्हती, त्यांनी जनकोजीला शाबासकी दिली. आतां चार घटका दिवस राहिला होता. दहा हजार ताजा दमाचे गिलचे व रोहिले आणि पांच हजार थकलेले पण निर्वाणीच्या शूरत्वाने लढणारे मराठे यांचेमधील हा अखेरचा सामना फारच भयंकर झाला. चारी बाजूंनी तरवार उसळत होती.भाऊसाहेब दिसतां दिसतां दिसेनासे झाले. तेव्हां जरिपटक्याच्या निशाणाचे घोडे इकडे तिकडे भटकू लागले. शेवटी घोड्यावरील निशाण धरणारा मनुष्य ठार झाला. तेव्हां निशाण जमिनीवर पडले. लढाई बंद झाली. पानिपतचा संग्राम समात झाला. या युद्धांत मराठ्यांची एक संबंध पिढीच्या पिढी कापली गेली. मराठ्यांचा पराजय झाला तरी त्यांतहि शत्रूला जबरदस्त धक्का बसल्यामुळे तो एक प्रकारचा विजयच होता. “ Even the battle of panipat was a triumph and glory for Marathas" असा निर्वाळा इंग्रज लेखकहि देतात.
१४ जानेवारी १७६१

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...