ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील महाराष्ट्रात असणारे एक जुने संस्थान. ठाणे जिल्ह्याच्या ईशान्येस असलेले जव्हार संस्थान सांप्रत जव्हार तालुका असून तो पालघर जिल्ह्यात आहे.
जव्हार संस्थानची राजमुद्रा.
संस्थानाचा बहुतेक भूप्रदेश पठाराचा आहे. प्रथम हे संस्थान वारल्यांकडे होते. वारल्यांकडून जयाबा उर्फ जयदेवराव मुकणे यांनी ते मिळविले आणि कोळी राज्याची स्थापना केली (१३१६). जयाबानंतर त्यांचा मुलगा धुळबाराजे उर्फ नीमशाह हे पराक्रमी शासक झाले. नीमशाहांनी सैन्य उभे करून सध्याच्या नाशिक आणि ठाणे जिल्ह्यांतील बराच मोठा प्रदेश घेऊन सु. २२ किल्ल्यांवर नियंत्रण ठेवले. १३४३ मध्ये दिल्लीच्या तुघलकांनी नीमशहांना राजा ही पदवी दिल्यावरून नवीन शक सुरू झाला (५ जून १३४३). तो अखेरपर्यंत जारी होता. जव्हार येथील भोपटगड (भूपतगड) किल्ला या कोळी साम्राज्याची राजधानी होती.
नीमशाहांनंतर सु. दोनशे वर्षांच्या काळातील इतिहास ज्ञात नाही. पोर्तुगीजांशी युद्धे करून कोळी राजांनी वसई ते डहाणू टापूवर अंमल बसवला होता. १७८२ पासून पेशव्यांनी दुसऱ्या पतंगशाहांवर १,००० रु. खंडणी बसवली.
जव्हारचे साम्राज्य हे मुख्यत: उत्तर कोकणात असल्यामुळे त्यांचा इतर साम्राज्यांशी संबंध येत असे. त्यांत प्रामुख्याने मोगल, पोर्तुगीज, मराठे, इंग्रज यांचा समावेश होता. या कोळी साम्राज्याशी मराठ्यांचा संबंध हा छ. शिवाजी महाराजांच्या काळापासून येतो. छ. शिवाजी महाराजांनी जानेवारी १६६४ मध्ये सुरत लुटण्यासाठी जव्हारच्या अरण्यमार्गाचा उपयोग केला. यावेळी जव्हारवर राजे विक्रमशाह मुकणे प्रथम यांचे राज्य होते.
१६६५ मध्ये मिर्झाराजे जयसिंग याला औरंगजेबाने छ. शिवाजी महाराजांविरुद्ध पाठविले, तेव्हा औरंगजेबाने जव्हारच्या कोळी राजांनी स्वतः किंवा आपल्या मुलांना औरंगजेबाच्या फौजेत दाखल व्हावे, असे फर्मान पाठविले होते. त्याप्रमाणे विक्रमशाह यांनी आपल्या भावाला मिर्झाराजे जयसिंग यांच्या फौजेत दाखल केले व येथून कोळी राजे व मराठे यांच्यात संघर्षाला सुरुवात झाली.
छ. शिवाजी महाराजांनी आपले प्रधान मोरोपंत पिंगळे यांना जव्हारवर स्वारी करण्यासाठी पाठविले (१६७२). मोरोपंतांनी ५ जून १६७२ रोजी विक्रमशाहांचा पराभव केला, परंतु विक्रमशाह मराठ्यांच्या हाती लागले नाहीत. या स्वारीत मराठ्यांना जव्हारचा सु. १७ लक्ष रुपयांचा खजिना मिळाला. मराठ्यांनी जव्हारवर १,००० रु. खंडणी बसवली. पुढे १६७८ मध्ये साल्हेरच्या लढाईत विक्रमशाहांना वीरगती मिळाली. पुढे १६८८ मध्ये विक्रम पतंगराव यांनी मराठ्यांकडून कोहोज किल्ला जिंकून घेतला.
१७५८ ते १७६१ या काळात येथे पेशव्यांची सत्ता होती. पेशव्यांनी जव्हारवर सरदेशमुखी कर बसविला. जव्हारच्या राज्यात अनेकांनी बंड केले होते. कोळी राजांना हे बंड मोडता आले नाही, म्हणून पेशव्यांना दरवर्षी १००० रु. नजराणा द्यावा लागत असे. मराठ्यांनी टकमक, तांदुळवाडी, काळदुर्ग हे किल्ले जिंकले, तेव्हा याकामी त्यांना कोळी राजांची मदत झाली (१७८२). पेशव्यांनी दुसरे पतंगशाह यांच्यावर १,००० रु. खंडणी बसवली (१७८२). दुसरे पतंगशाह १७९८ मध्ये मृत्यू पावले. पेशव्यांच्या आज्ञेवरून पतंगशाह यांचा मुलगा विक्रमशाह तिसरे यांस गादीवर बसविले; परंतु पेशव्यांना त्यांनी ३,००० रु. नजराणा देणे व त्र्यंबकच्या मामलेदाराच्या साहाय्याने राज्यकारभार केला जाईल, असे लेखी कबूल केले. विक्रमशाह तिसरे यांच्या मृत्यूनंतर (१८२१) त्यांचा मुलगा पतंगशाह तिसरे लहान असल्याने विक्रमशाहांच्या दोन्ही भावांत भांडणे सुरू झाली. यावेळी राणी सगुणाबाई यांनी इंग्रजांच्या मदतीने पतंगशाह तिसरे यांस गादीवर बसविले.
१८९० मध्ये संस्थानला दत्तकाचा अधिकार मिळाला. राजाला खूनखटल्यांचा अधिकार होता. जव्हार हीच राजधानी होती व संस्थानात १०८ खेडी होती. ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे संस्थानवर पूर्ण नियंत्रण असे. स्वातंत्र्योत्तर काळात संस्थान प्रथम मुंबई प्रांतातील ठाणे जिल्हा आणि नंतर महाराष्ट्र राज्य यांत समाविष्ट करण्यात आले.
संदर्भ :
राजवाडे, वि. का. महिकावतीची बखर, पुणे, १९९१.
साठे, श्रीनिवास, कल्याणचा इतिहास, कल्याण, १९९७.
No comments:
Post a Comment