‘व्हडले राजीक’ – गोव्याची ‘थोरली स्वारी’
( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी )
भाग 2
खऱ्या अर्थाने या स्वारीची सुरवात होते ती शिवाजी महाराजांच्याच काळात. राज्याभिषेकानंतर अवघ्या एक वर्षातच शिवाजी महाराजांनी ‘वैशाख शु २ १७ एप्रिल १६७५ रोजी फोंडा किल्ला जिंकून घेतला’.(जे.श) पोर्तुगीजांचा प्रदेश असणारा व किनारपट्टी लाभलेला आणि व्यापाराला अनुकूल असणारा गोमांतक प्रदेश मराठ्यांच्या अंमलाखाली असावा ही शिवाजी महाराजांची खूप जुनी मनीषा होती. पण मुघल आणि पोर्तुगीज यांच्या सोबत एकाच वेळी लढणे शक्य नव्हते. याच काळात शिवाजी महाराजांनी दक्षिणेची मोहीम देखील हाती घेतली होती. एकाच वेळी सर्वाना तोंड देणे हे काही शक्य नव्हते यामुळे पोर्तुगीजांवर स्वारीचा विचार शिवाजी महाराजांनी तूर्तास रद्द केला असावा. या निर्णयामुळे पोर्तुगीजांच्या जीवात जीव आला व ते गोव्यात आपले हात पाय पसरू लागले. काही वर्षाच्या अंतरानी शिवाजी महाराजांचा कैलासवास झाला. यावेळी संभाजी महाराजांनी गोव्याचा विजरई अंतोनियो-पाइस-द-सांदे याला महाराजांच्या निधनाची बातमी पत्राद्वारे दिली. यावेळी मराठ्यांचा वकील हा रामजी नाईक ठाकूर होता. ५ मे १६८० रोजी रामजी नाईक सोबत विजरईने सलोख्याचे पत्र पाठवले यात पोर्तुगीज व मराठे यांच्यात मैत्रीचा तह करण्यासंदर्भात मसुदा होता, पण याबद्दल पुढे काही हालचाल झाली नाही. यानंतर बरोबर १ वर्षाच्या अंतराने मे १६८१ च्या सुमारस संभाजी महाराज डिचोलीला गेले. याच सुमारास विजरईने संभाजी महाराजांना एक पत्र लिहिले त्यात तो लिहितो – ” शिवाजी महाराजांच्या मरणानंतर ज्या काळी तुम्हास सर्व गोष्टी अनुकूल नव्हत्या त्यावेळी तुमच्याशी आम्ही कशी वर्तवणूक ठेवली ” – याची आठवण त्याने या पत्राद्वारे करून दिली. यानंतर येसाजी गंभीरराव हा गोव्यास व्यापार व तहाची बोलणी करण्यासाठी गेला. (पो.म.सं-८७)
या सुमारास ‘दो-फ्रांसिस्कू-द-ताव्हर- कोंदि- द-आल्व्होर’ हा गोव्याचा नियुक्त विजरई (Viceroy) म्हणून कारभार पाहत होता.
No comments:
Post a Comment