व्हडले राजीक’ – गोव्याची ‘थोरली स्वारी’
भाग 4
यावेळी खासा औरंजेब दख्खन काबीज करावयाच्या हेतूने दिल्लीहून निघाला होता. संभाजी महाराजांना कोंडीत पकडण्यासाठी त्याने पोर्तुगीजांना हाताशी धरले आणि आपला वकील शेख महंमद यास गोव्यास पत्र घेऊन पाठवले. यात औरंगजेब लिहितो – ” मोगल बादशाहने संभाजी विरुद्ध युद्ध पुकारले आहे.पोर्तुगीजांनी देखील संभाजी विरुद्ध युद्ध करावे अशी बादशाह यांची इच्छा आहे. तसेच मोगलांच्या सैन्यास पोर्तुगीजांच्या प्रदेशातून धान्य विकत घेण्यास परवानगी असावी आणि सुरतहून मुंबईला येणा-या मोगलांच्या तारवांस व काफिलांस पोर्तुगीजांकडून उपद्रव होऊ नये “. हे पत्र गोव्यास २०-१-१६८३ रोजी पोहचले. आता मात्र विजरईची चांगलीच अडचण झाली. औरंगजेब आणि मुघल सैन्य किती बलवान होते हे त्यास माहिती होते. त्यांना विरोध करणे सोयीचे नव्हते तर इकडे मराठ्यांसोबत तहाची बोलणी सुरु असताना औरंगजेबाला साथ देणे म्हणजे दुहेरी पेचात अडकण्यासारखे होते. विजरईने औरंगजेबाची विनंती मान्य केली खरी पण संभाजी महाराजांशी युद्ध करण्याची अट नाकरली. औरंगजेबाच्या या पत्राचा मजकूर पोर्तुगीज भाषेत असल्याने त्याने ते पत्र भाषांतरित करून घेण्यासाठी हे पत्र निकोलाय मनुची याकडे पाठविले. मनुचीने ते पत्र वाचून नंतर स्वतः विजरईस सल्ला दिला की ” या नीतीने पोर्तुगीजांचे काहीही भले होणार नाही. औरंगजेबाने एकदा संभाजीचा नाश केला की मग त्यानंतर तो पोर्तुगीजांना स्वस्थ बसू देणार नाही “ आणि मग विजरईने संभाजी विरोधात युद्ध पुकारले. (अ.हो.मो-२१२) विजरईचे धोरण आता दुटप्पी पणाचे होते हे यावरून लक्षात येते. यासोबतच औरंगजेबाचे धूर्त धोरण देखील विजरईसं पाठवलेल्या पत्रातून स्पष्ट होते. शत्रूचा जो शत्रू तो आपला मित्र या सूत्राने औरंगजेबाने विजरईस संभाजी महाराजांविरोधात युद्ध करावयास सांगितले होते.
No comments:
Post a Comment