व्हडले राजीक’ – गोव्याची ‘थोरली स्वारी’
एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते. नारावे येथे सप्तकोटीश्वराचे मंदिर आहे. याचा जिर्णोद्धार खुद्द शिवाजी महाराजांनी केला होता. यासंबधीचा शिलालेख देखील शिवाजी महाराजांनी कोरून घेतला होता. शिवराज्याभिषेक-कल्पतरू या निश्चलपुरी गोसावी यांनी लिहलेल्या पोथीत याचा उल्लेख मिळतो तो असा – ” श्री सप्तकोटी शके किलकाब्दे कार्तिक कृष्ण पंचम्या सोम श्री शिवराज्ञा देवालयस्य प्रारंभ “ (ज्व.सं-२१०)
कृष्णाजी कंक यांना देण्यात आलेली मोईन – अस्सल पत्र
परिणामी संभाजी महाराजांनी आता पोर्तुगीजांशी उघडपणे युद्ध पुकारले. मराठ्यांनी चौल आणि रेवदंड्याला वेढा घातला. चौलचा वेढा हा सहा महिने सुरु होता तर रेवदंड्याच्या वेढ्या संदर्भात आपल्याला उल्लेख मिळतो तो असा – ” जेष्ठ वद्य ११ संभाजी राजे स्वार होऊन राजापुरास गेले फिरंगी यासी बिघाड केला रेवदंडी यासी वेढा घातला “(जे.श) मराठ्यांनी चौलचा वेढा उठवावा म्हणून विजरईने फोंडा किल्ल्यावर स्वारी करण्याचे योजले व त्याप्रमाणे दि.२७-१०-१६८३ रोजी विजरई ‘आगाशी’ येथे जाऊन राहिला. त्याच्यासोबत ३२०० लढाऊ लोक, २५ घोडेस्वार व ४ तोफा होत्या. दि. २८-१०-१६८३ रोजी सर्व सैन्य घेऊन विजरई ‘दुर्भाट’ येथे जहाजातून उतरला. ‘दुर्भाट’ हे संभाजी महाराजांच्या ‘फोंडे’ महालातील एक महत्वाचे बंदर होते. फोंडे येथील देसाई दुलाबा नाईक हा फितूर झाला होता. विजरई तेथे येताच तो विजरईला जाऊन मिळाला व सोबत त्याने विजरई यास मदती करिता ७० शिपाई आणले होते. दुर्भाटहून विजरईचे सैन्य दि.१-११-१६८३ रोजी फोंड्यास पोहचले. वाटेत जात असताना ३०० मराठ्यांसोबत विजरईची चकमक उडाली. फोंड्यास यावेळी मराठा सरदार येसाजी कंक आणि त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक हे तैनात होते. येसाजी तर शिवाजी महाराजांचे बालपणाचे संवगडी ! राजगड जवळील भुतोंडे हे त्यांचे गाव. स्वराज्याचा श्रीगणेशा: झाल्यापासून येसाजी इमाने-इतबारे स्वराजायची सेवा करत होते. फोंड्याच्या किल्ल्यात यावेळी मराठ्यांचे ६०० शिपाई होते आणी २०० शिपाई हे रानात योग्य त्या संधीची वाट पाहत लपून बसले होते. फोंड्यास पोहचल्यावर विजरईने तोफांचा भडीमार सुरु केला. सतत होणा-या तोफांच्या मा-यामुळे किल्ल्याच्या आतील भागास भगदाड पडले, तरीदेखील मराठे काही हटेनात. निकराने ते प्रतिकार करत होते. फोंड्यास सतत नऊ दिवस तोफांची सरबत्ती सुरु होती. विजरई पुरता हैराण झाला. अखेर त्याने दि.९-११-१६८३ रोजी शेवटचा निकाली हल्ला करण्याचे ठरवले. तो हल्ल्याला सुरुवात करणार त्याच वेळी संभाजी महाराज राजापूरहून फोंड्यास दाखल झाले. किल्ल्यातील शिपायांच्या साथीला आता आणखी ६०० शिपाई व खुद्द स्वराज्याचे छत्रपती शंभूराजे होते. सैन्याचे मनोबल अफाट वाढले. संभाजी महाराजांनी यावेळी आणखीन ८०० शिपाई किल्ल्याच्या वेढ्याच्या बाहेरील मेटावर संरक्षणाकरिता ठेवले. अश्या परिस्थितीत मराठे दोन्ही बाजूने आपल्याला कात्रीत पकडतील आणि आपण त्यांच्या तावडीत सापडू या भीतीने विजरईने वेढा दि.१०-११-१६८३ या दिवशी उठवला आणि गोव्यास परत जाण्यास निघाला. त्याच्या या निर्णयाने पोर्तुगीज सैन्यात एकच घबराट उडाली आणि ते सैन्य दुर्भाटच्या दिशेने पळत सुटले ! (पो.म.सं-९५)
No comments:
Post a Comment