9 फेब्रुवारी 1689 छत्रपती राजाराम महाराज यांचे
मंचकारोहण
संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य संरक्षण हेच आता जीवितकार्य मानून मराठ्यांमध्ये नीतिधैर्य वाढवण्याचे काम येसूबाई राणीसाहेबांनी निर्माण केले होते. ही गोष्ट विलक्षण मानली पाहिजे. मराठ्यांच्या दुसऱ्या छत्रपतींचा असा बाणेदार शेवट झाला होता.व स्वराज्यासाठी औरंगजेबाशी कोणतीही तडजोड न करता संभाजीराजांनी आपला मृत्यू स्वीकारला होता.छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर येसूबाई यांच्या अंगावर जणू ब्रह्मांडच कोसळले होते. एखाद्या उंच कड्यावरुन मृग पाय घसरून खाली पडावा ,आणि त्याचा गतप्राण देह पाहून हरिणी वेडीपिशी व्हावी, तशी अवस्था येसूबाई राणीसाहेबांची झाली होती .
जो जन्माने राजा होता, वृत्तीने राजर्षी होता ,अशा आपल्या प्राणप्रिय पतिराजांच्या नशिबी हे असे दुर्दैवाचे दशावतार येऊन ,येसूराणींच्या भाळावरचा सौभाग्यसूर्य अस्ताकडे प्रवास करीत होता. रात्रीचा दिवस करून येसूबाई आल्या प्रसंगाला निर्धाराने तोंड देत देत पुरत्या एकाकी झाल्या होत्या .
वादळातली मोगरवेल भरभरावी तशी अवस्था येसूबाई राणीसाहेबांची झाली होती. क्षणभरातच ऊभी हयातच फिरल्या सारखी झाली होती .
स्वारीला दोन वर्षाचे असताना सोडून गेलेल्या आईसाहेब ,भरल्या डोळ्यांसमोर सूनबाई आहोत असे कधीच भासू नये असे आबासाहेब ,थोरल्या आऊ ,सती गेलेल्या माँसाहेब यांनी दिलेला घरोबा, सिंहासनाच्या हौव्यासापोटी रात्रंदिन स्वारींना व आम्हाला पाण्यात बघणाऱ्या सोयरा माँसाहेब , त्यांचे पाठीचे बंधू असून आम्हाला वडीलकीचा आधार देणारे हंबीरमामा,साफ मनाची ,वावगी बाब समोर आली तर तडक बोलून दाखवणारी स्वारी .आई वेगळ्या आपल्या नातवावर मायेची सावली धरणारे आजोळचे फलटणकर नाईक निंबाळकर हे सारे आठवून लहान मुलीगत हमसुन हमसून रडणार्रया ,आणि आपण "श्री सखी राज्ञी जयती"आहोत राजगडावर आहोत, महाराणी आहोत याचे कशाचे कशाचे भान नसणार्या येसूबाई राणीसाहेबांच्या समोर केवढा मोठा प्रसंग उभा राहिला होता.
संभाजीराजांच्या क्रूर हत्येने संपूर्ण मराठा मंडळ अत्यंत शोकाकुल झाले होते .येसूबाई राणीसाहेबांच्या कपाळीचे कुंकू पुसून सुर्य जणू अस्ताला निघाला होता.
तरिही आपल्या स्वतःचे दुःख बाजूला ठेवून येसूबाईंनी खुप मोठा निर्णय घेतला होता.
छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर जरा कुठे राज्याची घडी बसवण्याचा प्रयत्न होत असतानाच त्यांच्यावर हा आघात अगदी वर्मी बसला होता .पुरंदरचा तह करून छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या स्वराज्याचे रक्षण केले होते, तसाच स्वराज्य रक्षणाचा प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या लाडक्या व जेष्ठ सुनेवर येऊन ठेपला होता. छत्रपती शिवाजीराजे व जिजाऊंच्या संस्कारात वाढलेल्या येसूबाईंनी आपले स्वराज्य सांभाळण्यासाठी पावले उचलली होती .समयसूचकता अंगी बाणलेल्या येसूबाईंच्या समोर दोन पर्याय होते.एक म्हणजे 7 वर्षाच्या आपल्या पुत्राला शाहूला गादीवर बसवून राज्यकारभार करणे, आणि दुसरा पर्याय म्हणजे आपले दीर राजारामास गादीवर बसवून अष्टप्रधानांच्या सहकार्याने राज्यकारभार करणे .
अशा परिस्थितीत शक्य तितक्या लवकर कोणताही निर्णय घेणे गरजेचे होते . रिक्त झालेल्या छत्रपती पदाचा राजाविना कोणतेही निर्णय घेणे ,युद्ध मोहिमांच्या हालचाली करणे कठीण होते .औरंगजेबासारखा शत्रु स्वराज्यात ठाण मांडून बसला होता. अशा परिस्थितीत लवकर निर्णय घेणे गरजेचे होते . एखाद्या स्वार्थी, सत्तालोलूप स्त्रीने आपल्या मुलाला गादीवर बसवून राज्यकारभार केला असता ,पण येसूबाईंनी असे न करता स्वार्थ व त्यागाचा आदर्श मराठा राज्यासमोर ठेवला .आपल्या मुलाला गादीवर न बसवता स्वतःहून राजारामाचे मंचकारोहण 9 फेब्रुवारी 1689 रोजी करण्याचा निर्णय घेतला .त्यांच्या या निर्णयाने मराठा राज्याचा प्रश्न मिटला, आणि दुसरी गोष्ट सर्व मराठा मंडळी एक होऊन औरंगजेबाविरुद्ध लढण्यासाठी सिद्ध झाली.औरंगजेब दिल्लीहून अखंड भारताचा बादशहा होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आला होता.त्याचे स्वप्न उध्वस्त करण्यामधे येसूबाई राणीसाहेबांचा मोठाच हात होता.प्रबळ इच्छाशक्ती, नवी उमेद , नि:स्वार्थपणे केलेला त्याग, औरंगजेबाची शक्ती कमी करण्यात नक्कीच कारणीभूत ठरला.सरदार व अधिकारी यांच्याशी चर्चा करून ,मराठी राज्यात फूट पडणार नाही याची येसूबाई राणीसाहेबांनी काळजी घेतली.
इतिहासाच्या दृष्टीने येसूबाई राणीसाहेब समरांगिनी, रणरागिनी जरी नसल्या तरी धैर्य समयसूचकता व स्वाभिमान या गुणांनी त्या परिपुर्ण होत्या .राज्याचे कल्याण व्हावे ,राज्य शत्रूपासून वाचवावे ही लोककल्याणाची भावना येसुबाईंच्यामध्ये होती.अत्यंत प्रयत्नशील ,शांत ,संयमी ,धीराची अशी ही शिवाजीराजांची ज्येष्ठ सून होती. या महाराणीस तब्बल 29 वर्षे मोगलांच्या कैदेत ,अपमानीत जीवन जगावे लागले .यासारखे दुसरे दुर्दैव नाही.
अशा या " सखी राज्ञी जयतीला" आमचा मानाचा मुजरा
No comments:
Post a Comment