विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 16 March 2021

हेमाचंद्र उर्फ विक्रमादित्य

 





हेमाचंद्र उर्फ विक्रमादित्य 

लेखन :
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे
संदर्भ
मुसलमान रियासत - भाग २
लेखक
गो.स.सरदेसाई
पानिपतची दुसरी लढाई ५ नोव्हेंबर १५५६ रोजी झाली. एका बाजूला मोहम्मद आदिलशाह,पन्नी पठाण शेरशाह सूरीचे वंशज आणि हेमाचंद्र भार्गव यांच्या नेतृत्वात भारताचे रक्षण करण्यासाठी लढत असलेले राजपूत यांचे सैनिक होते. दुसऱ्या बाजूला अकबराचा सेनापती बैराम खान यांच्या नेतृत्वात परदेशी मोगल , इराणी तुर्क आणि मोहम्मद पैगंबर यांचे वंशज होते. तो दिवस होता १५ नोव्हेंबर १५५६
स्थानिक भार्गवकुलीन सम्राट हेमू विक्रमादित्य विरुद्ध परकीय आक्रमक मोगलांचा १४ वर्षांचा वारसदार अकबर. या लढाईनंतरच मुघलांचा हिंदुस्तानात जम बसला. म्हणजे हिंदुस्तानी इतिहासाला वळण देणारी अशी ही महत्त्वाची लढाई होती.
मुळात जमीनदार, नंतर व्यापारी असलेला हेमू नक्कीच असामान्य निरीक्षणशक्ती घेऊन आला होता. हेमूला घोड्यांची आणि हत्तींची चांगली पारख होती. निरीक्षणशक्तीला बुद्धिमत्ता आणि कल्पकता यांची जोड देऊन हेमूने पारंपरिक मैदानी, गोलाच्या लढाईत नवनव्या व्यूहरचना, नवनव्या चाली रचल्या आणि तुटपुंज्या पण वेगवान आणि त्वेषाने लढणार्या सैन्यबळावर संख्येने मातब्बर असलेल्या प्रबळ सैन्याविरुद्ध लढाया जिंकल्या. पराभूत सैनिकांचे शिरकाण,मारलेल्या सैनिकांच्या मुंडक्यांचा मनोरा रचून विजयाचा जल्लोष,भाल्याच्या टोकावर मुंडकी खोचून घोड्यावरून दौडत जाणे,पराभूत सेनापतींची मुंडकी तबकातून बादशहाला नजर करणे अशा या मुघलांच्या क्रौर्याचा त्यांच्या सर्व शत्रूंनी धसका घेतला होता. आपल्याकडे क्रूर समजल्या गेलेल्या अफगाणांनी देखील. परंतु हुमायूं आणि अकबर यांच्या या क्रूर सैन्याविरुद्ध तोपर्यंत २२ लढाया हेमूने एकदाही पराभूत न होता जिंकल्या होत्या. बहुतेक वेळा तुटपुंज्या सैन्यबळावर.
६ ऑक्टोबर १५५६ रोजी मुघल सरदार तर्दी बेगचा हेमूने इतका जबरदस्त पराभव केला होता की तर्दी बेग रणांगणातून पळुन थेट काबूलच्या वाटेला लागला होता. व्यसनी, मानसिक रुग्ण असलेल्या आदिलशहा सुरीला फ़ाट्यावर मारुन हेमूने स्वत: हिंदुस्तानचा सम्राट होण्याचे ठरवले व ७ ऑक्टोबर १५५६ रोजी दिल्लीतील प्रसिद्ध पुराना किला येथे हेमूचा हिंदू पद्धतीने दिल्लीची जनता व अफ़गाण व हिंदू सैन्यासमोर राज्याभिषेक झाला.त्याने "सम्राट हेम चंद विक्रमादित्य" असे नाव धारण केले तसेच स्वत:च्या प्रतिमेच्या नाण्यांचे चलनही प्रस्थापित केले. हेमूच्या बंगालपासून दिल्लीच्या धडकेनंतर व दिल्लीच्या कब्ज्यानंतर मोगल सैन्यात जरब बसली व बर्याच मोगल सरदारांनी गाशा गुंडाळुन काबूल येथे राजधानी स्थापून राज्य करावे असे मत व्यक्त केले परंतू बेहरामखान याने हेमूशी युद्धाचा आग्रह धरला. दिल्ली हातची गमावल्यावर १४ वर्षांचा सुल्तान जलालुद्दिनला हेमुच्या भीतीने सुरक्षित ठिकाणी नेले होते. दिल्लीकडे मोगल सैन्याने कूच केल्याची बातमी ऎकून हेमूही सैन्य घेऊन मोगलांचा पाडाव करण्यासाठी निघाला व ५ नोव्हेंबर १५५६ रोजी दोन्ही सैन्याची पानिपत येथे गाठ पडली. बेहरामखान याने सैन्यास लढाईस प्रेरणा दिली व स्वत: मैदानापासून दूर राहीला. काही इतिहासकारांच्या मतानुसार, हेमूबद्दल प्रचंड भय आणि सुरक्षेच्या कारणास्तव जलालुद्दिन आणि त्याचा रक्षणकर्ता बेहरामखान याने युद्धात प्रत्यक्ष भाग घेतला नव्हता. प्रत्यक्ष युद्धभूमीपासून ते ८ मैल अंतरावर उभे होते. जलालुद्दिनबरोबर ५००० अतिविश्वासू आणि तयारीचे सैन्य होते, युद्धात पराभव होत असल्याचे दिसून येताच काबुलकडे पळून जावे असा बेहरामखानचा सैन्याला आदेश होता. हेमू स्वत: हत्तीच्या पाठीवरुन सैन्याचे नेतृत्व करत होता. पानिपतच्या या लढाईत हेमूच्या रणनीतीची आखणी नेहमीप्रमाणे होती. हेमूच्या मुख्य सैन्यातल्या हत्तींना तोंड देण्यसाठी शत्रूने आपले गजदळ आणि गजदळाचे संरक्षक धनुर्धर पुढे आणून ठेवले. तरी हेमूच्या सैन्याने प्रखर शौर्याच्या जोरावर शत्रूला मागे रेटले. बाजूने आणि पिछाडीवरून केलेल्या घोडदळाच्या हल्ल्यामुळे शत्रूसैन्याचा व्यूह पुरता विस्कळित झाला. पराभव डोळ्यासमोर आल्यामुळे शत्रुसैन्यात पळापळ सुरू झाली. हेमूचा विजय नजरेच्या टप्प्यात आला.तेवढ्यात शत्रूसैन्य पळत असतांना अचानक एक बाण हेमूच्या डोळ्यात लागला आणि आणखी एका बाणाने निशाण पडले. सैन्याच्या हालचाली नियंत्रित करणारा हेमू बेशुद्ध पडला.आपण जखमी झालो तर सेनापतीपदाचे नेतृत्त्व कुणी करायचे याच्या सूचनाच अस्तित्त्वात नव्हत्या. रणनीतीतली ही फारच मोठी त्रुटी म्हणावी लागेल. हेमू जखमी झाल्याची खबर सैन्यात पसरली व सैन्याचे अवसान गळाले, गोंधळात सैन्य सैरावैरा पळत सुटले आणि विजयाच्या उंबरठ्यावरून हेमूच्या सैन्याचा पराजय झाला. हेमूच्या हत्तीला बेहरामखानाच्या एका सरदाराने हत्तीवरूनच वेढा घालून वळवून जलालुद्दिनच्या शिबिरात नेले. तिथे जलालुद्दिनला गाझी सिद्ध करण्यासाठी बहरामखानाने हेमूचे मुंडके छाटले गेले,हेमूचा शिरच्छेद केला गेला. हेमूचे मुंडके हे काबूल मध्ये तर धड दिल्लीला पाठवून टांगण्यात आले. हेमचंद्र च्या गावात रेवाडी येथे मोगल सैनिकांचे पथक पाठविण्यात आले हेमचंद्र यांची सर्व मालमत्ता लुटली गेली कुटुंब कैदेत टाकले मुसलमान न बनल्यामुळे हेमचंद्र यांच्या वडिलांची हत्या करण्यात आली . घरातील तरुण बायकांची अब्रू लुटली आणि उर्वरित मुले वृद्ध स्त्रिया गुलाम म्हणून विकल्या गेल्या.या लढाईत भाग घेतलेल्या हेमूचे सर्व पुतणे हेमूने दत्तक घेतलेल्या पुतण्यासह मारले गेले. लढाईत भाग न घेतलेला एकच पुतण्या गावात होता तेवढाच वाचला. त्याचे वंशज आजही आहेत. जलालुद्दिन दिल्लीच्या तख्तावर बसला व नंतर त्याने 'अकबर' हे नाव धारण केले.अकबराने हेमूचा इतका धसका घेतला होता की लढाईनंतर कित्येक महिने भार्गव आडनावाच्या प्रत्येक माणसाला अकबराच्या हेरांनी कापून काढले. भार्गव आडनावाचे लोक मग आडनाव बदलून राहू लागले. आपले देशी इतिहासकार, आपले स्वतःला विद्वान म्हणून समाजात मिरवणारे शालेय पाठ्यपुस्तक लेखककार देखील अकबराचे गोडवे गातात आणि सम्राट हेमू विक्रमादित्याचा साधा उल्लेखदेखील करीत नाहीत याची खंत वाटते. हेमू केवळ स्वपराक्रमाने मोठ्या योग्यतेस चढला होता. त्याच्याच कर्तृत्वाच्या जोरावर पठाणास इतके दिवस मोगलांशी झगडत आले. मुसलमानांच्या ताबेदारीत राहून एवढ्या मोठ्या पदावर असलेला असा हा एकच हिंदु गृहस्थ .त्यावेळी इतिहासात झळकला. त्याची हुशारी व राजनिष्ठा या गुणांचा मोबदला त्यास मिळाला नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. अकबरास अशा मोठ्या फौजेशी लढण्याचा पुन्हा प्रसंग आला नाही.
हेमचंद्र विक्रमादित्य हे भारताचा शेवटचा हिंदू राजा होता. "भारतीय इतिहासात यांची गणना शूर पुरुष म्हणून केली जाते ." मध्ययुगीन भारताचा नेपोलियन म्हणून ओळखले जाणारे हेमू यांनी आपल्या विलक्षण कौशल्याच्या बळावर सैन्य दलाचे प्रमुख पद मिळवले होते. अफाट पराक्रमामुळेच त्यांना " विक्रमादित्य" ही पदवी मिळाली होती. हेमूने शेवटची लढाई प्रसिद्ध पानिपत मैदानावर लढली होती.
उत्तर हिंदुस्थानात पंजाब पासून बंगाल पर्यंत हेमचंद्र यांनी अफगाण बंडखोर हुमायु व अकबराच्या मोगल फौजा यांच्याशी सुमारे बावीस लढाया एकदाही पराभूत न होता जिंकल्या होत्या. सुमारे ३५० वर्षानंतर त्यानी हिंदू साम्राज्याचे थोड्या काळासाठी का होईना पुनर्स्थापना केली. त्यानी पृथ्वीराज चव्हाणां नंतर थोडे दिवस का होईना एक हिंदू राजा दिल्लीच्या तख्तावर विराजमान झाला होता.
🙏 अशा या शूर व धाडसी योद्ध्यास स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...