विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 29 March 2021

कर्नाटक स्वारी : भाग ३



कर्नाटक स्वारी : भाग ३
या विजयानंतर लगेच जुलै १६७६ मध्ये बहलोलखानाने शिवाजी महाराजांशी तह केला. या तहाप्रमाणे शिवाजी महाराजांचे राज्य आणि आदिलशाही राज्य यांची सीमा कृष्णा नदीपर्यंत निश्चित केली. कृष्णा नदीच्या उत्तरेकडील मुलूख शिवाजी महाराजांना मिळाला. अशाप्रकारे शिवाजी महाराज आणि आदिलशाही यांच्यामध्ये सख्य निर्माण झाले.आता कुतूबशहाशी सख्य जोडून संपूर्ण दक्षिण देश मुघली वर्चस्वातून मुक्त करण्याचा शिवाजी महाराजांनी निर्धार केला.
🚩कर्नाटक स्वारीची तयारी🚩
आपल्या स्वराज्याचा विस्तार कर्नाटकापर्यंत करावा अशी महत्त्वाकांक्षा शिवाजी महाराज बाळगून होते. पूर्वी समुद्रमार्गे त्यांनी बसनूरपर्यंत स्वारी केली होती. त्यांच्या उत्तेजनामुळे मराठ्यांनी कारवारपर्यंत धडक मारली होती. महाराजांचे पिताजी शहाजी राजे यांची बंगलोर ही जहागिरी होती. त्यांच्या पश्चात महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे हे बंगलोरच्या जहागिरीचा मालक होता. त्यांनी तंजावरपर्यंतचा प्रदेश वर्चस्वाखाली आणून आपले मुख्य ठाणे तंजावर हेच केले. व्यंकोजी राजे विजापूरच्या आदिलशहाशी एकनिष्ठ असल्याचे भासवत होते. शिवाजी महाराजांना आपल्या सावत्र भावाचा पराक्रम माहित होता. त्याला स्वराज्यकार्यात सामील करून घेतले तर संपूर्ण दक्षिण भागात स्वराज्याचा विस्तार होईल आणि मुघल किंवा आदिलशहा नामोहरम होतील अशी महाराजांची अपेक्षा होती.
मुघल हे पहिल्या क्रमांकाचे शत्रू आहेत याची खूणगाठ महाराजांनी मनाशी बांधली होती. म्हणून बहादूरखानाविरुद्ध विजापूरचा सरदार बहलोलखान याला महाराजांनी मदत केली होती. बहलोलखानाने वरकरणी मराठ्यांशी सलोखा जरी जोडलेला होता, तरी विजापूरच्या दरबारात पठाणांचे वर्चस्व वाढविण्यास त्याने सुरुवात केली. अनेक पठाण सरदार बहलोलखानाच्या प्रेरणेने आदिलशाहीत दाखल झाले. त्यामुळे विजापूरदरबारात पठाणांचे वर्चस्व वाढू लागले. आदिलशहा काय किंवा कुतुबशहा काय यांच्या राजवटी पंधराव्या शतकाच्या अखेरीपासून दक्षिण भारतामध्ये होत्या आणि या राजवटीत दख्खनी लोकांचाच वर्षानुवर्षे प्रभाव होता. परंतु जानेवारी १६७५ मध्ये जी रक्तरंजित क्रांती विजापुर दरबारामध्ये झाली, तेव्हापासून पठाणांचा भरणा आदिलशाहीच्या प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणात होऊ लागला. विजापुर दरबारातील पठाणांचे वाढते वर्चस्व शिवाजी महाराजांना धोक्याचे वाटत होते. कुतुबशहाच्या दरबारात पठाणांचे वर्चस्व नव्हते. कुतुबशहाच्या वर्चस्वाखाली असलेल्या प्रदेशात दख्खनी मुसलमान आणि हिंदू अधिकारी यांचे वर्चस्व होते. प्रत्यक्ष कुतुबशहाच्या दरबारात हिंदूंनाही मानाच्या जागा दिल्या जात होत्या, मादण्णा आणि अकण्णा नावाचे दोन हिंदू मुत्सद्दी कुतुबशहाचे दोन प्रमुख सल्लागार होते.

क्रमशः ......!!

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...