लेखन माहिती :डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर, पुणे
दर्याबाई नाईक निंबाळकर म्हणजे छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराराणी यांच्या नात. सरलष्कर निंबाजी नाईक निंबाळकर (वैराग) यांच्या पत्नी. स्वराज्याचे छत्रपती रामराजांचा गुप्तपणे सांभाळ करणाऱ्या मध्ये दर्याबाईसाहेब नाईक निंबाळकर व सरलष्कर निंबाजी नाईक निंबाळकर यांचा मोठा सहभाग होता. ताराराणीसाहेब करवीर राज्याचा कारभार पाहू लागल्या. त्यानंतर करवीर राज्यामधे रक्तविहीन क्रांती घडून आली. त्यामधे बालशिवाजी व ताराराणी यांचे सत्तांतर होऊन त्यांना नजर कैदेत पडावे लागले. राजाराम महाराजांची दुसर्या पत्नी राजसबाई व त्यांचे पुत्र संभाजी (दुसरे) यांच्या हातात सत्ता गेली. संभाजी राजेही अल्पवयीन असल्याने त्यांच्या वतीने राजसबाई कारभार पहात होत्या. ताराराणी यांचे पुत्र शिवाजी राजे (दुसरे) कैदेत असतानाच इ.स.1727 साली मृत्यू पावले. त्यावेळी त्यांची पत्नी भवानीबाई या गरोदर होत्या. शिवाजी राजांच्या मृत्यूनंतर साधारणपणे तीन महिन्यांनी भवानीबाई प्रसुत होऊन त्यांच्या पोटी पुत्र जन्मास आला. सातारच्या गादीवर बसलेले हेच ते रामराजे होय. आपली सवत राजसबाई या पुत्राला दगाफटका करेल म्हणून ताराराणी यांनी तो पुत्र वारल्याचा व त्यास पुरून टाकल्याचा बहाणा केला. रामराजे हे सरळ शिवछत्रपतींच्या घराण्याचे वारस असल्यामुळे ते आज ना उद्या सातारा किंवा करवीर यापैकी कोणत्याही गादीवर बसण्याची शक्यता होती. त्यामुळे आपल्या नातवाच्या सुरक्षितेसाठी ताराबाई राणीसाहेबानी गृहकलहानंतर कोल्हापूर सोडले व त्या सातारा येथे येऊन राहिल्या. आपला नातू रामराजे त्याच्या बहिणीकडे (दर्याबाई नाईक निंबाळकर) वैरागजवळील पानगाव येथे गुप्तपणे नेऊन ठेवले, कारण कोल्हापूरच्या राजसबाईंचे कडून त्यांना धोका होता. ज्यावेळी सातारचे छत्रपती शाहूमहाराज यांचा वृद्धापकाळ आला व त्यांना अपत्य नसल्याने गादीला वारस बघण्याचे काम चालू होते. गादीचा वारस म्हणून ताराराणी साहेबानी रामराजे यांचे नाव सुचविले व ते छत्रपती शाहू महाराज यांनी मान्य केले कारण छत्रपती शिवाजीमहाराज यांचा वंशजच गादीला मिळत होता. दर्याबाई नाईक निंबाळकरांनी सातारच्या गादीचा वारस सांभाळण्याचे मोठे दिव्य काम पार पाडले होते. दर्याबाई या रामराजे यांच्या मोठ्या बहिण होत्या. रामराजे यांना तब्बल ५ वर्षे त्यांनी सांभाळ केला होता, परंतु अज्ञातवासातच त्यांना तब्बल १८ वर्षे काढावी लागली. 15 डिसेंबर 1749 रोजी शाहू महाराज यांचे निधन झाले .त्यावेळी पानगाव (वैराग) येथे मोठा लवाजमा पाठवून नानासाहेब पेशवे यांनी रामराजे यांना सातारा येथे आणले. त्यावेळी दर्या बाई नाईक निंबाळकर या रामराजे यांच्या समवेत सातारा येथे आल्या. रामराजे यांचा 4 जानेवारी 1750 रोजी राज्याभिषेक झाला. त्यानंतर रामराजे आपल्या मोठ्या बहिण दर्याबाई नाईक निंबाळकर यांच्या सल्ल्यानुसार राज्यकारभार पाहात असत त्यामुळे पेशवेही दर्याबाई नाईक निंबाळकर यांना दबकून असत. दर्याबाई या वजनदार व लष्कराची तयारी असलेल्या सामर्थ्यवान स्री होत्या. म्हणूनच नानासाहेब पेशवे काही वेळा मुत्सद्दीपणे तर काही वेळा खोट्या_ नाट्या शकला लढवून दर्याबाईंना वतन - सरंजाम देण्याचे टाळाटाळ करत असत. छत्रपती रामराजे यांनी दर्याबाईं यांचे पती निंबाजी नाईक निंबाळकर यांना सरलष्कर म्हणून नेमले होते. पुढे नानासाहेब पेशवे यांनी हे सरलष्कर पद जास्त काळ निंबाजी नाईक निंबाळकर यांच्याकडे टिकु दिले नाही. हे स्वाभिमानी दर्याबाईंच्या लक्षात आल्याने त्यांनी वस्रे ,हत्ती, घोडे,अलंकार स्विकारण्यास नकार दिला. नंतर त्या आपली छावणी घेऊन आपल्या जहागिरीच्या ठिकाणी वैराग येथे परत गेल्या. दर्याबाईं या स्वतंत्र व्यक्तीमत्वाच्या सामर्थ्यवान स्री होत्या. त्यांचे राजकारणातील महत्व पाहून पेशव्यांनी अनेक हिकमती करून, प्रसंगी खोटी-नाटी आश्वासने देऊन ,डावपेच लढवून आपल्या मार्गातून दर्याबाईंना बाहेर काढले. त्यामुळे नानासाहेब पेशवे यांना सर्व रान मोकळे सापडले. सरळ मार्गी रामराजेंना त्यांनी व्यवस्थित राज्यकारभार करू दिला नाही.
दर्याबाई स्वतः लढवय्या होत्या तर त्यांचे पती निंबाजी नाईक निंबाळकर हेही अत्यंत शूर व लढवय्ये होते. निंबाळकर घराण्यातील पुरूषांबरोबर स्रियांनी ही स्वातंत्र्यानंतर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. वैराग येथील वैभवाचा साक्षीदार म्हणजे भव्य दरवाजे, हत्ती खाना, अनेक शस्रास्रे आजही नाईक निंबाळकर यांच्या पराक्रमाची साक्ष देत आहेत.
No comments:
Post a Comment