पेमगिरी उर्फ शहागड उर्फ भीमगड हा नगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात येणारा किल्ला आडबाजूला असल्यामुळे फारसा परिचित नाही. पण मराठ्यांच्या इतिहासातला एक महत्वाचा प्रसंग या किल्ल्यावर घडला होता.आज वनखात्याने किल्ल्याचे सुशोभिकरण केले आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी गाडी मार्ग तसेच पायी जाणार्यांसाठी शिड्या बसवलेल्या आहेत. किल्ल्यापासुन २.५ किमीवर असलेला प्राचीन अवाढव्य वटवृक्षही पाहाण्यासारखा आहे.
• इतिहास :
इ.स. १६३२ च्या अखेरीस मोगल सरदार महाबतखानाने निजामाची राजधानी असलेल्या दौलताबाद किल्ल्याला वेढा घातला आणि जिंकुन घेतला. त्याने खुद्द हुसेन निजामशहा आणि त्याचा वजिर फत्तेखान याना तुरुंगात टाकल. निजामशाहीची अखेर झाली.
त्यावेळी शहाजी राजे निजामाकडे सरदार होते. त्यानी पेमगिरी किल्ल्यावर अटकेत असलेल्या निजामाच्या अल्पवयीन मुलाला मुर्तिजा निजामशहाला सोडवल आणि त्याला गादीवर बसवुन शहाजी राजानी स्वत:ला निजामाचा वकील जाहीर करुन राज्य चालवायला सुरुवात केली. मोगल आणि आदिलशहाच्या संयुक्त सैनाशी शहाजी राजानी ६ मे १६३६ रोजी तह केल्यावर निजामशाहीची अखेर झाली.
• गडावरील पहाण्याची ठिकाणे :
बाळेश्वर या मुख्य डोंगररांगेपासून वेगळ्या झालेल्या डोंगरावर पेमगिरी हा पुरातन किल्ला वसलेला आहे. वनखात्याने किल्ल्यावर जाण्यासाठी गाडी मार्ग बांधल्यामुळे खाजगी वाहानाने थेट किल्ल्यावर जाता येत. किल्ल्यावर पेमादेवीची दोन मंदिर आहेत. जुन्या छोट्या मंदिरा समोर ४ सातवहाण कालिन टाकी आहेत. त्यात मधली दोन खांब टाकी आहेत. टाकी पाहुन डाव्या बाजुंने पुढे गेल्यावर खालच्या बाजुस एक लांबलचक टाकं आहे त्याला "बाळंतीणीचं टाकं" म्हणतात. ते टाक पाहुन किल्ल्याच्या दक्षिण टोकापर्यंत जाता येते. या ठिकाणी कुठलेही अवशेष नाहीत. पण किल्ल्याच नैसर्गिक संरक्षण करणारी किल्ल्या मागची बाळेश्वर डोंगररांग इथुन पाहायला मिळते. टोकावरुन परत फिरुन किल्ल्यावर नविन बांधलेल्या पेमादेवी मंदिराकडे जाताना डाव्या बाजुला दोन कोरडी टाक आहेत. पेमादेवी मंदिरात देवीची नविन मुर्ती बसवलेली आहे.
No comments:
Post a Comment