२६ मार्च १७७४
उत्तर पेशवाईत रघुनाथरावाने अन्यायाने पेशवेपद मिळविण्यासाठी केलेला प्रयत्न अयश्स्वी करणाऱ्या मराठी सेनानी व मुत्सद्दी यांचा संघ. नारायणरावाच्या वधानंतर पेशवाई मिळविण्यासाठी रघुनाथरावाने केलेल्या कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी प्रामुख्याने हा स्थापन झाला. बारभाई म्हणजे बारा माणसांचे मंडळ असे नसून काही एका हेतूने एकत्र जमलेला समूह होता. बारभाई मंडळ स्थापन झाले, तेव्हा त्यात सखाराम बापू, भगवंत बोकील, बाळाजी जनार्दन उर्फ नाना फडणीस, त्रिंबकराव पेठे, हरिपंत फडके, मालोजी घोरपडे, महादजी शिंदे, तुकोजी होळकर ही प्रमुख मंडळी होती. रघुनाथरावाला पदच्युत करून नारायणरावाची गरोदर पत्नी गंगाबाई हिच्या नावाने कारभार करावा तिला मुलगा झाला तर त्यास, नाही तर दत्तक घेऊन त्याच्या नावाने कारभार करावा, असे सुरुवातीस कारस्थान ठरले. यालाच बारभाई कारस्थान म्हणतात. सखाराम बापू व नाना फडणीस हे कारभारी आणि त्रिंबकराव पेठे यांच्याकडे फौजेची अखत्यारी ठेवावी असे ठरले. पार्वतीबाई आणि गंगाबाई यांना मारण्याचा कट उघडकीस येताच सखारामबापू नाना फडणीस, हरिपंत फडके यांनी गंगाबाईला पुण्याहून १७ जानेवारी १७७४ रोजी पुरदंरच्या किल्ल्यावर नेले आणि तिच्या नावाने कारभार सुरू केला. त्यामुळे रघुनाथराव व बारभाई संघ असा उघड सामना सुरू झाला. यातूनच २६ मार्च १७७४ रोजी कासेगावची लढाई झाली. यात त्रिंबकराव पेठे मरण पावले आणि रघुनाथरावाला बऱ्हाणपूरकडे जाण्यास संधी मिळाली.
No comments:
Post a Comment