आज आम्ही छत्रपती शिवरायांच्या नावानं गजर करतो. जिजाऊसाहेबांच्या नावानंही करतो. तो होणं गरजेचं आहे. तथापी, त्यांच्यासोबत मराठी मातीच्या
इतिहासानं शहाजी' नावाचं आणखीही एक लेणं ल्यालेलं आहे, याचा आम्हाला बऱ्याचदा विसर पडतो.
एक मराठा स्वराज्यासाठी आयुष्यभर संघर्षरत राहून मराठी मातीला तिचा आत्मसन्मान पुनरपी मिळवून देतो, ही घटना सामान्य नाही. इतिहासालाही तिची नोंद टाळता येत नाही.
छत्रपती शिवराय महान आहेतच. परंतु शिवराय ज्यांच्या खांद्यावर उभे आहेत, ते शहाजीराजे तर महानतम ठरतात, हे त्यांच्या कर्तृत्वाचं अवलोकन केलं तर ध्यानी येतं. त्यांच्याप्रती आपण उदासीनभाव बाळगला तर तो आपला कृतघ्नपणा ठरेल.
शहाजीराजांकडे आम्ही राष्ट्रीय ऐक्याचा संस्थापक या दृष्टीतूनही पाहिलं पाहिजे. आम्ही मराठे दक्षिण भारतीय आहोत. पुरातन कालापासून आमची
सांस्कृतिक, सामाजिक नाळ ही दक्षिण भारताशी जुळलेली आहे, उत्तर भारताशी नाही. सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, शिलाहार, चालुक्य, कदम्ब, पल्लाव , सेंद्रक,आणि देवगिरीचे यादव ही सर्व मराठा राजघराणी दक्षिण भारतात होती आणि त्यांचा एक देदीप्यमान इतिहास आम्हाला लाभला आहे, याचा अभिमान आम्ही बाळगला पाहिजे.
त्याच मालिकेत शहाजीराजे यांचंही स्थान कोंदणातील हिऱ्याप्रमाणे शोभत आहे, याचं विस्मरण होऊ नये. विजयनगरचं पुनरुज्जीवन करण्यासाठी शहाजीराजे
का प्रयत्नशील होते, याचं उत्तर त्यांच्या पूर्वसूरींच्या लखलखत्या इतिहासाची जाणीव त्यांच्या मनात जागी होती, हे आहे.
No comments:
Post a Comment