टीप: हा लेख मराठ्यांच्या इतिहासातील व्यक्ती-घटनांशी संबंधित आहे. वर्तमानकाळातील कुठल्याही व्यक्ती आडनाव,जातिसमूहाशी आणि घटनांशी लेखाचा कुठलाही संबंध नाही. महाराष्ट्रधर्म समूह आणि लेखक कुठलाही जातीधर्म वंशभेद मानत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वधर्म समभाव ह्या विचारधारेवर हा समूह चालतो.
औरंगजेबाच्या उत्कर्षाची व कल्याणाची तळमळ उरी बाळगून मिर्झाराजा जयसिंग हा छत्रपती शिवाजी महाराजांवर चालून आला.
सभासद बखरीतील मजकुराप्रमाणे, "तेंव्हा मिर्झा राजा जयसिंह याने मनात विचार केला कि शिवाजी मोठा दगेबाज, मोठा हुन्नरवन्त आणि मर्दाना शिपाई, आंगाचा खासा आहे. अफझलखान अंगे मारिला शास्ताखानाच्या डेऱ्यात शिरून मारामारी केली आपणास यश कसे होईल? म्हणून चिंता केली.
तेंव्हा मोठमोठे ब्राम्हण पुरोहित यांनी उपाय सांगितला. देवी प्रयोगी अनुष्ठाने करावी आणि अकरा कोटी लिंगे करावी म्हणजे यश येईल असे सांगितले.
मग मिर्झा राजा बोलिला कि, कोटीचंडी कामनाथ बगळामुखी कालरात्रीप्रित्यर्थ जप करावा.
असे अनुष्ठान करावे. मग मिर्झा राजाने चारशे ब्राम्हण अनुष्ठानास घातले. प्रत्ययही अनुष्ठान चालले. अनुष्ठानासाठी दोन कोटी रुपये अलाहिदा काढून ठेविले. आणि तीन मास अनुष्ठान चालून सिद्ध केले. अनुष्ठानाची पूर्णाहुती होउन, ब्राम्हणांस दान दक्षिणा देऊन संतर्पण केले. मग चालिले."
म्हणजे शिवाजी राजाचे अ-हीत करण्यासाठी अघोरी विद्येचा प्रयोग मिर्झा राजा जयसिंहाने केला.
ह्या पुढचा इतिहास सर्वांना माहीतच आहे. पुरंदरला येऊन शिवाजी महाराजांना तेवीस किल्ले पातशहास देऊन मिर्झा राजा जयसिंहशी तह करावा लागला आणि तहानुसार आग्र्याला जावे लागले.
महत्वाचे: औरंगजेबाने काही शिवाजी महाराजांना आग्र्याला बोलाविले नव्हते. हि सगळी मिर्झा राजा जयसिंगाच्या डोक्यातील कल्पना.
मिर्झा राजा जयसिंगाच्या सांगण्यावरून महाराजांना ५ मार्च १६६६ रोजी आग्ऱ्यास औरंगजेबाच्या भेटीस जावे लागले.
पुढे महाराज आग्र्यात औरंगजेबाच्या कैदेत पडले.
चतुराईने महाराज आग्ऱ्यातून सुटले आणि १२ सप्टेंबर १६६६ रोजी राजगडी परत पोहचले.
महाराज जसे राजगडी परत आले तसे इथून पुढे महाराजांनी तहान्वये मुघलांना दिलेले तेवीस किल्ले परत घेत आता औरंगजेबाच्या सरळ सरळ कानशिलावरच जाळ काढण्यास सुरवात केली.
महाराज आग्र्यावरून परत आल्यावर संपूर्ण हिंदुस्थानभर आणि इराण वगैरे देशांत जिकडे तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार होऊ लागला.
ह्या घटनेनंतर औरंगजेबाची जी लाज निघाली तिला काही मर्यादा राहिली नाही.
महाराष्ट्र धर्म समूहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम ह्यांच्या अभ्यासानुसार;
सगळ्यात महत्वाचे:
आग्र्यावरून परत आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या विरोधात एकामागून एक धडाकेबाज मोहिमा काढायला सुरवात केली. इतक्या दिवस महाराज 'जरा पाहून' मुघलांच्या प्रदेशात धुमाकूळ घालत होते पण आग्र्यावरून परत आल्यावर महाराज मुक्तपणे सगळ्या मुघलाईत संचार करू लागले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे तमाशे आणि आपल्या पराभवाच्या दुःखद कहाण्या हताशपणे पाहत राहण्याशिवाय औरंगजेबापुढे दुसरा काहीही पर्यायच नव्हता.
**
२४ जानेवारी १६७० ला औरंगजेबाचा सरदार अश्रफखान हा औरंगजेबाला लिहितो कि, "शिवाजीराजांची फौज वऱ्हाडप्रांत लुटीत आहे. बादशाही प्रांतातून (म्हणजे औरंगजेबाच्या प्रांतातून ) २० लाख रुपये शिवाजीराजांनी गोळा केले आहेत.
औसा येथील किल्लेदार बहादूरखान याच्याकडून मला आलेल्या पत्रात म्हंटले आहे कि, शिवाजीराजांची २० हजार फौज या प्रांती आली आहे. मराठ्यांच्या फौजा आपला सर्व प्रांत लुटून वसूल घेत आहेत. औश्याच्या किल्ल्यापासून फक्त दोन कोसांवर मराठ्यांच्या फौजांचा मुक्काम आहे.
(मराठ्यांचे धाडस पहा. कोण मुघल आणि कसले मुगल. आम्ही मराठा मोजत नाही मुघलांना असा सगळा भाव. हा औसा किल्ला लातूर पासून साधारण २१ किलोमीटर अंतरावर आहे. एक कोस म्हणजे १.८ किलोमीटर. २ कोस म्हणजे ३.६ किलोमीटर.)
मी औसा किल्याची डागडुजी चालविली आहे.
( मी म्हणजे पत्र लिहिणाऱ्या अश्रफ खानाने.)
माझी सर्व जहागीर शिवाजीराजाने लुटली आहे. मला निर्वाहालासुद्धा काही साधन म्हणून राहिलेले नाही. आलमगीर बादशहांनी मला पैशाची मदत करावी."
अश्रफ खानाच्या ह्या पत्रावर औरंगजेब दातओठ चावत चिडला आणि औरंगजेबाने अश्रफ खानाला पत्र पाठवून लिहिले कि, ".. तुझ्यासारखे असे पुष्कळ लोक सारखे सारखे आम्हास मराठ्यांनी लुटले म्हणून माझ्याकडे मदत मागण्यास येत असतात.
मी तरी कितीजनांचे असे नुकसान भरून द्यावे ???"
**
औरंगजेबाची तडफड पहा.
मराठ्यांच्यामुळे आपल्या सरदारांचे झालेले नुकसान भरून द्यायलाही आता औरंगजेबाकडे पैसे कमी पडायला लागले होते.
मराठ्यांचा झटका हा असा असतो.
जो वाकड्यात शिरेल त्याला भिकारी करूनच सोडायचा.
**
इंग्रज अधिकारी मि. डेलर हा १६६९-१६७० ला लिहितो, "सुरतेला पूर्वी तट नव्हता. पण शिवाजीराजांच्या भीतीमुळे आता सुरतेला पक्का तट बांधून नेहमी पहारा करीत राहने भाग पडले आहे."
**
१२ मार्च १६७० ला सुरतकर इंग्रज लिहितात कि, "शिवाजीराजाने अलीकडे मुघलांवर अनेक विजय मिळवून मुघलांचा मुलुख जिंकल्यामुळे सुरतेपासून साठ मैलांच्या टापूंत शिवाजीराजा आल्याची बातमी आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीने पळापळी, बंदोबस्त इत्यादी नानाप्रकार परत सुरतेमध्ये दिसू लागले आहेत. शिवाजीराजाने औरंगजेबाचे सैन्य पांगविण्यासाठी मुघलांच्या मुलखात जिकडेतिकडे हल्ले सुरु केले आहेत."
**
मुंबईकर इंग्रज सुरतेला मार्च १६७० च्या पत्रात लिहितात कि, "मराठ्यांनी मुघलांच्या ताब्यात असलेल्या कर्नाळा किल्याला वेढा घातला आहे. आपल्या समोर रक्षणाकरिता मराठे लाकडी फळ्या आणी चिखल यांच्या भिंती बांधीत बांधीत थेट कर्नाळा किल्याच्या तटापाशी जाऊन भिडले आहेत.
ह्या फळ्या मराठ्यांचे लोक आपल्यासमोर धरितात. थोड्या अवकाशातच मराठे हा किल्ला मुघलांपासून घेणार."
(कर्नाळा किल्ला हा रायगड जिल्ह्यात येतो. पनवेल पासून हा किल्ला जवळ आहे.)
**
२९ मार्च १६७० ला मुबईकर इंग्रज लिहितात कि,
"शिवाजीराजा कोणाचाही विरोध न जुमानता एकसारखा जिंकतच चालला आहे. त्याने मुघलांपासून पुरंदर किल्ला घेतल्याची आज बातमी आली. कर्नाळा किल्लादेखील फार दिवस टिकाव धरणार नाही. दोन दिवसांपूर्वी शिवाजीराजांच्या कल्याणच्या सुभेदाराकडून दोन हस्तक आमच्याकडे तोफा खरेदी करण्यासाठी आले होते. पण आम्ही त्या तोफा सुरतेला पाठविल्या आणि आता आमच्याकडे तोफा नाहीत असे उत्तर त्यांना दिले."
**
महाराष्ट्र धर्म समूहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम ह्यांच्या अभ्यासानुसार;
३० मार्च १६७० च्या पत्रात इंग्रज मोठा गमतीशीर उल्लेख करतात तो असा: "शिवाजीराजा पुन्हा आमचा शेजारी झाला असून त्याने आमच्या समोरील किनाऱ्यावरचे त्याचे बरेच किल्ले मुघलांकडून परत मिळविले आहेत.
औरंगाबाद येथे असलेला औरंगजेबाचा मुलगा शहजादा मुअज्जम यानेच मुद्दाम शिवाजीराजांना मुघलांच्या मुलखात बोलावून आणले व तो मुअज्जम शिवाजीराजांना खजिना पुरवितो अशी बऱ्याच जनांची समजूत आहे.
उत्तरेकडून एखादे मोठे मुघलांचे सैन्य मराठ्यांवर चालून येण्याअगोदरच शिवाजीराजे आपले मुघलांना दिलेले सर्व किल्ले जिंकून घेण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत आणि त्यांना एकामागून एक सारखे यशच येत आहे.
शिवाजीराजांच्या हालचालींमुळे शेजारच्या मुलखांत अंदाधुंदी चालली असून जमिनीवरील आमचा व्यापार आता तर बंदच पडला आहे. सराफ आणि व्यापारी लोक ह्यांनी आपली संपत्ती लपवून ठेवल्यामुळे आता कर्ज अजिबात मिळत नाही.
औरंगजेबाचा मुलगा शहजादा मुअज्जम हा शिवाजीराजांना उत्तेजन देत असून औरंगजेबाने शहजादा मुअज्जमच्या धाकट्या भावाला मुगलांच्या गादीचा वारस ठरविल्यामुळे आपल्याच बापाविरोधात म्हणजे औरंगजेबाविरोधात बंड करून शहजादा मुअज्जम आता शिवाजीराजांना जाऊन मिळणार आहे.
शिवाजीराजांच्या हालचाली पाहून ह्याला दुजोरा मिळतो. कारण शिवाजीराजा आता पूर्वीसारखा चोरासारखा वागत नाही. तर राजरोसपणे तीस हजार सैन्यानिशी जाईल तिथे जिंकण्याचा शिवाजीराजांचा क्रम चालू असून मुघल शहजादा मुअज्जम हा जवळ असतानाही शिवाजीराजांना विरोध करत नाही. शिवाजीराजांनी कल्याण आणी भिवंडी हि शहरे मूघलांपासून घेतली असून ती शिवाजीराजांकडेच राहतील तर बरे. कारण मुसलमानांच्या शेजारापेक्षा शिवाजीराजांचा शेजार अधिक बरा वाटतो.*
संदर्भ: *प सा सं. क्र. १२९५ , OC Vol. 31, No 3415
**
७ एप्रिलला अशी बातमी आली आहे कि, शिवाजीराजाने चांदवड लुटले आणी तळकोकणचा फौजदार लुधीखान ह्याचा पराभव केला.
शिवाजी राजांच्या नुसत्या येण्याच्या बातमीनेच नांदेडचा फौजदार फत्तेजंग खान पळून गेला आहे.
औरंगजेब बादशहाने आता हुकूम केला आहे कि, त्या फत्तेजंग खानाचा 'जंग' हा किताब ताबडतोब काढून टाकण्यात यावा."
**
नुसते किताब देऊन 'जंगी' पराक्रम होत नसतात ह्याचा साक्षात्कार औरंगजेबाला झाला असेल.
पराक्रम हा रक्तात आणि निष्ठेत असतो. मराठ्यांचा पराक्रम हा त्यांच्या रक्तात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रति असलेल्या निष्ठेत होता.
टीप: इंग्रजांनी आणि मुघलांनी त्यांच्या पत्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलेला आहे. पण आपण लिहिताना अशी चूक करायची नाही. म्हणून मी जिकडे तिकडे शिवाजीराजे असे लिहिलेले आहे.
लेख समाप्त.
लेख आवडल्यास जरूर प्रतिक्रिया द्या आणी आपल्या महाराष्ट्र धर्मवर मित्रमंडळींना आमंत्रित करा.
समाप्त.
श्री भवानी शंकर चरणी तत्पर
सतीश शिवाजीराव कदम
निरंतर
No comments:
Post a Comment