रसिक आणि हौशी किती असावं बरं! राजदरबारी येणाऱ्या खास पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी ऑडिटोरियम बांधलं. राज्याच्या कोलाहलापासून लांब. विश्वास बसतो का? नाही ना! पण शौकीन लोगोकी शौकीन बाते!! अहमदनगरच्या मातीत रुजलेल्या रसिकतेचा पुरावा, 3 मजली ऑडिटोरिम, मुस्लिम आणि पर्शियन शैलीचं उत्कृष्ट बांधकाम असलेलं, सर्व बाजूनी करंज्यांनी सजवलेलं, तलावाच्या मधोमध वसलेलं,
"चारशे वर्षांपूर्वीच ऑडिटोरियम"!!! - फराहबक्ष महाल किंवा फरहाबाग. अर्थ ही किती छान बघा फराह म्हणजे आनंद, खुशी, उत्साह त्याची बाग फराहबाग , फराह देणारा किंवा बक्षणारा फराहबक्ष महाल.
"चारशे वर्षांपूर्वीच ऑडिटोरियम"!!! - फराहबक्ष महाल किंवा फरहाबाग. अर्थ ही किती छान बघा फराह म्हणजे आनंद, खुशी, उत्साह त्याची बाग फराहबाग , फराह देणारा किंवा बक्षणारा फराहबक्ष महाल.
नगर सोलापूर रोड वर असणारा हा महाल चौरसाकृती तलावाच्या मध्यभागी, चौथर्यावर असणारी अष्टकोनी वास्तु, मुर्तुझा निजामशहा ने 1576 च्या दरम्यान बांधून घेतली. मोठे गवाक्ष आणि उंच कमानींनी ही इमारत सुशोभित आहे. महालाच्या मध्यभागी कारंजा, त्याभोवती रंगमहाल, महालाच्या चारही बाजूंना पुन्हा कारंजे. कारंजे आणि तालावसाठी पाणी खापरी नळांनी जवळजवळ चार मैलावरून आणण्यात आलेले.
महालाच्या भोवती मोठ्ठा चौथरा, चौथर्याच्या चारही बाजूंना सुरेख कारंजे. त्याच्या आजूबाजूला कृत्रिम तलाव त्याच्या बाहेर आमराई आणि गुलाबाचे देखणे उद्यान त्यामध्ये सुद्धा कारंजे!! किती सुंदर असेल ते वातावरण आपण फक्त विचारच करू शकतो
नगरचे वातावरण खूप शुष्क असते. त्यामुळे उन्हाळ्यात महाल थंड राहावा म्हणून छतात पोकळी ठेवून त्यात पाण्यावरून येणारी थंड हवा खेळती राहील अशी रचना केलेली आहे. जलविहार करूनच महालात येण्याचा रस्ता होता. वायुविजन, ध्वनी व प्रकाश यांची उत्कृष्ट रचना या इमारतीमध्ये दिसून येते. या महालात नृत्य, गाणी, व मुशायरे होत असत. तो ध्वनी सर्वत्र योग्य पद्धतीने पोहोचण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या कोनाड्याच्या रचना केलेल्या दिसतात. तिसऱ्या मजल्यावरील श्रोत्यांना स्पष्ट आवाज ऐकू जाईल अशी रचना आहे. विशेष म्हणजे जुन्या इमारतींमध्ये जसा आवाज घुमतो तसा आवाज येते घुमत नाही कारण इथले वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम. या वास्तूला आतून एकसुद्धा खांब नाहीये. आरसीसी बांधकामा सारखं सागवानी लाकडाच्या मोठया फळ्या कॉलम सारख्या भिंतीत वापरल्या आहेत. रंग महालाच्या फ्लोरिंग मध्ये काच लावलेले दिसते. त्याचा उद्देश म्हणजे दिवे लावले की पूर्ण जमीन उजळल्या सारखी दिसेल. तिथे असणारी ग्रीन रूम तर इतकी बेमालूम बांधलेली आहे की आत जाईपर्यंत कोणाला कळणार पण नाही की इथे ग्रीन रूम आहे. पूर्ण वास्तूमध्ये प्रत्येक दिशेला अनेक दरवाजे आहेत जेणेकरून प्रेक्षक कुठूनही आत-बाहेर जाऊ शकतात. ह्याचा अजून एक उद्देश हा की आत-बाहेर करणाऱ्या लोकांचा इतर प्रेक्षकांवर आणि कार्यक्रमावर काही फरक पडायला नको, त्यांच्यामुळे व्यत्यय यायला नको. असे एक ना अनेक वैशिष्ट्य असणारी ही वास्तू, ताजमहालची रोलमॉडेल आहे. ताजमहाल मध्ये फक्त तीन घुमट जास्तीचे केलेले आहेत बाकी पूर्ण रचना ही नगर मधल्या या वास्तु वरून घेतलेली आहे. किंबहुना एक कथा अशीही सांगितली जाते की शहाजहानने इथलेच कारागीर तिकडे नेले. आणि ते खरं पटतं कारण दोन्ही वस्तूंच्या बांधकामामध्ये खूपच समानता आहे.
मध्यंतरीच्या काळात बरीच पडझड झाली पण आता स्वयंसेवी संघटना आणि पुरातत्त्व खात्याकडून संगोपनाचे प्रयत्न चालू आहेत.
..... दिपाली विजय
No comments:
Post a Comment