१२ फेब्रुवारी इ.स.१७९४
एप्रिल
१७९३ मध्ये
नाना फडणीस व महादजी शिंदे यांचा समेट झाला. १ जून १७९३ ला बावांच्या सैन्याने होळकर सैन्याचा सपशेल पराभव लाखेरी येथे केल्यावर पुणे दरबारने बावांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्यानंतर महादजीबावांस ताप ज्वर येऊ लागला. आठ दिवस सारखा ज्वर येतो हे कळल्यावर खुद्द पेशवे एक वेळ समाचारास गेले होते. नानाही जाऊन आले. हरीपंत तात्या तर एक दोन दिवसाआड नेहमी जात होते. यापुढे महादजीबाबा जवळ जवळ आठ महिने थोडे थोडे आजारीच होते असे म्हणावे लागते. फेब्रुवारी १७९४ त महादजीबावांची भयंकर शीतज्वराची भावना झाली. पांच सात रोज यातच गेले, नंतर कफ झाला. वैद्य आणून औषधे चालू केली पण लागू होईना, चढ होत चालला. बोलणे राहिले. बुधवार त्रयोदशीस सायंकाळी नाना समाचारास आले. बोलणे झाले नाही. तसेच श्रीमंतांकडे जाऊन वर्तमान सांगितले, पेशवे महाराजांजवळ येऊन उभे राहिले. चिंता वाटली. सुवर्णतुला करण्याची सूचना केली. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सुवर्णतुला केली. बोलले नाहीत. दुखणे वाढत जाऊन काल जाहला. (१२ फेब्रुवारी १७९४). मृत्युसमयी महादजींचे वय ६७ वर्षाचे होते. ते वानवडीस निवर्तले. त्या ठिकाणी दौलतराव शिंदे यांनी त्यांची छत्री बांधली. तिच्या खर्चास पेशवे यांनी ५ सप्टेंबर १७९५ रोजी १ चाहूर जमीन छत्रीचे लगत देवविली. ही छत्री पुढे माधवराव शिंद्यांनी वाढवून टोलेजंग केली. पुण्याच्या ऐतिहासिक स्मारकात त्याची गणना होते. महादजीबावांनी आपल्याला पुत्र संतान व्हावे म्हणून नऊ लग्ने केली पण त्यांना पुत्र लाभ झाला नाही. मृत्यूपूर्वी काही महिने अगोदर त्यानी आपल्या चुलत भावाचा १४ वर्षाचा मुलगा दौलतराव यास दत्तक घेतले. दौलतरावाचा जन्म १७८० चा असून त्याच वर्षी त्याचा समकालीन रणजीतसिंग जन्मला.
दौलतरावांचे दत्तविधान यथाविधी झाले नव्हते असे दिसते. बावा मरण पावल्यावर तेरावे दिवशी त्याचे दत्तविधान करून पेशव्यांनी त्यास शिंद्यांचे दौलतीवर स्थापन केले. (१० मे १७९४).
No comments:
Post a Comment